Sunday 9 May 2021

#हिरोज_भाग_४ 'सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव'... विनीत वर्तक ©

 #हिरोज_भाग_४ 'सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव'... विनीत वर्तक ©

शाळा संपवून कॉलेजमध्ये प्रवेश घेतला कि ते दिवस आयुष्यातले सगळ्यात मयुरपंखी दिवस असतात. वयाची वीस वर्ष ओलांडताना नवीन स्वप्नांची चाहूल लागलेली असते. आयुष्य काय? आयुष्यातलं लक्ष काय? आपण काय करणार? हे असले प्रश्न अजून आपल्या समोर यायचे असतात. पण काही लोक वेगळ्याच मातीची बनलेली असतात. म्हणजे आपलं लक्ष्य काय हे त्यांनी आधीच ठरवलेल असते. ते लक्ष्य पूर्ण करताना आपल्या जीवाची कोणतीही पर्वा ते करत नाहीत. “लक्ष्य तो हर हाल में पाना हे” हे हृतिक रोषन च्या चित्रपटातील गाण तर सगळ्यांना माहित असेल. किंबहुना हा चित्रपट हृतिक च्या करियर मधील मैलाचा दगड समाजला जातो. पण ज्यांच्या खऱ्या पराक्रमावर हा चित्रपट बेतला आहे त्या सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांच्या बद्दल आपणच सगळेच अनभिज्ञ आहोत. 

वय वर्ष १९. विचार करा....  ज्या वर्षात आयुष्याच लक्ष्य ठरवायच असते. त्या वर्षी सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांना भारताच्या सर्वोच्च सैनिकी सन्मानाने  सन्मानित करण्यात आल आहे. 'परमवीर चक्र' हा पुरस्कार काही साधासुधा सन्मान नाही. लढाईत आपल्या विचारानं पलीकडचं पराक्रम, शौर्य, देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा बजावण्यासाठी देण्यात येतो. हा सन्मान रेअरेस्ट ऑफ रेअर असून आत्तापर्यंत फक्त २१ जणांना मिळालेला आहे. अमेरिकेच्या 'मेडल ऑफ ऑनर' किंवा ब्रिटन च्या 'व्हिक्टोरिया क्रॉस' इतक्या सर्वोच्च सन्मानासारखा आहे. वयाच्या १९ व्या वर्षी हा सर्वोच्च सन्मान मिळवणाऱ्या सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांना किती भारतीय ओळखतात?

१० मे १९८० साली जन्मलेल्या सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांनी वयाच्या अवघ्या १६ वर्ष ५ महिन्यांचे असताना भारतीय सेनेत दाखल होत देशाच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतल. सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव हे १८ ग्रेनेडियर च्या “घातक” ह्या दस्त्यामध्ये सेवेत असताना कारगिल युद्धात त्यांच्या टीम ला सगळ्यात कठीण अश्या मोहिमेच लक्ष्य देण्यात आल. कसही करून टायगर हिल वर तिरंगा फडकवायचा हा निर्धार करून सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांनी आपल्या लक्ष्याकडे कूच केल. ४ जुलै १९९९ ची पहाट भारतीयांसाठी नेहमीसारखीच असली तरी सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव तो दिवस आपल लक्ष्य पूर्ण करण्याचा होता. १६,००० फुटापेक्षा जास्त उंचीवर असलेली टायगर हिल बर्फाने झाकलेली होती. त्याच्या टोकावर होते भारताचे दुश्मन. १००० फुटाचा सरळ सोट कडा समोर उभा होता. त्याच्या वर प्रतिकूल वातावरणात चढाई करायची बर नुसती चढाई नाही कि ट्रेकिंग होत. वर दुश्मन बसलेला होता तेव्हा त्याची नजर चुकावत, गोळ्या चुकवत वर चढाई करायची. नुसत चढून लक्ष्य मिळणार नव्हत तर तिकडे बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करून टायगर हिल वर भारताचा तिरंगा फडकावण हे ते लक्ष्य होत. 

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांनी सगळ्यात प्रथम चढाई करण्याची जबाबदारी उचलली. अंग गोठवून टाकणाऱ्या थंडीत जिकडे श्वास घ्यायला पण त्रास होतो अश्या वातावरणात १००० फुट सरळसोट कड्यावर चढाई करण म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण पण भारतीय सैनिकच वेगळे. सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांच्या कडे जबाबदारी होती ती म्हणजे वर पोचून खाली दोर सोडायचे ज्यावरून बाकीचे सैनिक वर पोचून टायगर हिल वर शत्रूशी युद्ध करू शकतील. सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव नी १००० फुटाचा कडा चढण्यास सुरवात केली. अर्ध्या रस्त्यात पोचल्यावर शत्रूला त्याची माहिती मिळाली. वरच्या भागावरून पाकिस्तानी अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार तसेच रॉकेट चा मारा खालच्या बाजूने सुरु केला. ह्या गोळीबारात त्यांच्या प्लॅटून चा कमांडर तसेच इतर दोन जण मृत्युमुखी पडले. सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांच्या शरीरात तीन गोळ्या घुसल्या. खांद्यात गोळ्या लागल्यावर आणि अजून ६० फुट चढण बाकी असूनसुद्धा त्यांनी हिंमत नाही गमावली. 

आपला घायाळ झालेला खांदा आणि ३ गोळ्या शरीरात असताना सुद्धा सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव टायगर हिल ची ती कठीण चढण चढून गेले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसाठी दोर खाली सोडले. इथवर खरं तर त्यांच लक्ष्य संपल होत. पण म्हणतात न वेगळ्या मातीच्या बनलेल्या माणसांची लक्ष्यच वेगळी असतात. वर पोचून त्यांनी शत्रूच्या पहिल्या बंकरकडे आपला मोर्चा वळवला. १७,५०० फुटावर बर्फावरून लोळत शत्रूच्या पहिल्या बंकर वर ग्रेनेड ने हमला केला. ह्यात ४ पाकिस्तानी सैनिक मारले गेले. ह्या सगळ्यामुळे इतर भारतीय सैनिकांना त्या कड्यावरून चढण सोप्प गेल. पण त्याचवेळी पाकिस्तानी सैनिकांना सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव दिसले होते. त्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आंगावर गोळ्या झेलत बंकर च्या दिशेने धाव घेतली. पाकिस्तानी सैन्यावर हातानी हमला केला. तिकडे झालेल्या हाणामारीत ( हॅन्ड टू हॅन्ड कॉम्बॅट) मध्ये सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांनी अजून ४ सैनिकांना कंठस्थान घातल. त्यांच्या ह्या कामगिरीमुळे त्यांच्या मागे असलेल्या भारतीय सैनिकांमध्ये वीरश्री संचारली. तिसर बंकर भारतीय सैनिकांनी उध्वस्थ करत टायगर हिल वर भारतीय तिरंगा फडकवला. 

हे युद्ध संपल तेव्हा सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांचा खांदा पूर्णपणे निखळलेला, पाय तुटलेला  आणि शरीरात तब्बल १५-१६ गोळ्या घुसल्या होत्या. आपण विचार करू का साध खरचटल तर आई ग!!!.......  करणारे आपण १६ गोळ्यांचा विचार तरी करू शकतो का? वयाच्या ज्या वर्षात आपण सोनेरी स्वप्न बघतो त्या वयात सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांनी असा पराक्रम गाजवला होता ज्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. एक माणूस १६ गोळ्या शरीरात असताना पण हॅन्ड टू हॅन्ड कॉम्बॅट करू शकतो हे आपल्या विचारानं पलीकडच आहे. हे फक्त आणि फक्त शक्य झाल ते देशावरच्या प्रेमामुळे अशी देशभक्ती जिचा विचार पण आपण करू शकत नाही. आधी जेव्हा त्यांना परमवीरचक्र देण्यात आल तेव्हा ते मृत्युमुखी पडले अस म्हंटल गेल. नावातील गोंधळामुळे हा प्रकार झाला पण मृत्यूला स्पर्श करून सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव जिवंत राहिले. 

सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव ह्यांचा पराक्रम इतका मोठा आहे कि जगातील सर्वोच्च पराक्रम दाखवणाऱ्या पहिल्या पाच सैनिकात त्यांची गणना होते. एका इंटरनेट साईट ने “ ५ सोल्जर हु मेक रॅम्बो लुक लाईक पुसी” ह्या एका लेखात त्यांना समाविष्ट केल आहे. चित्रपटात आजवर अनेक वॉर हिरो झाले पण खऱ्या आयुष्यात आपल्या कर्तुत्वाने ज्या सैनिकांनी सांगता, लिहिता येणार नाही अशी कामगिरी केली त्यात जगातील पहिल्या पाच मध्ये एक भारतीय सैनिक आहे हेच आपल्याला माहित नाही. हाच आपला करंटेपणा. हृतिक रोषन चा लक्ष्य आपल्याला लक्षात राहतो पण तेच लक्ष्य आपल्या अतुलनीय शौर्याने, देशभक्तीने मिळवणारे सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव लोकांना माहित पण नाहीत हीच आपल्या देशाची शोकांतिका आहे. 

२०१५ साली कारगिल ला गेलो असताना ह्या जाबांज सैनिकाला भेटण्याची संधी मिळाली. त्यांना कडक सॅल्यूट देताना आणि हात मिळवतानाचा क्षण माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे......... आजही तोच अभिमान, तेच देशप्रेम त्यांच्या डोळ्यात मला दिसलं. 

अश्या आयुष्यातील खऱ्याखुऱ्या हिरो पुढे मी मनोमन नतमस्तक झालो......  

१)पहिल्या फोटोत सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव

२)२०१५ साली कारगिल विजय दिवस निमित्ताने शहीदांना आदरांजली वाहताना मध्यभागी सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव.    




फोटो स्रोत :- गुगल 

सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment