Monday, 17 May 2021

इस्राईल आणि पॅलेस्टाईन एक रक्तरंजित इतिहास (भाग २)... विनीत वर्तक ©

 इस्राईल आणि पॅलेस्टाईन एक रक्तरंजित इतिहास (भाग २)... विनीत वर्तक ©

१९४८ मधे इस्राईल ने जेरुसलेम आणि आजूबाजूचा भूभाग जिंकून आपलं राष्ट्र स्थापन केलं पण कोणत्याही ठोस करार इस्राईल आणि अरब राष्ट्र यांच्यात न झाल्यामुळे इस्राईल आणि पॅलेस्टाईन वाद हा सुरूच राहिला. युनायटेड नेशन ने हस्तक्षेप करून सुद्धा याच समाधान करणार उत्तर काढता येत नव्हत. इकडे इस्राईल आणि पॅलेस्टाईन पुन्हा एकमेकांसमोर उभे राहिले. १९६७ साली इस्राईल ने पुन्हा ज्याला 'सिक्स डेज वॉर' म्हणतात ते युद्ध अरब लोकांशी केलं. ज्यात इस्राईल ने पुन्हा एकदा सगळयांना पाणी पाजताना गाझा पट्टी आणि पेनिनसुला इजिप्त कडून जिंकलं तर वेस्ट बँक आणि पूर्वेकडील जेरुसलेम वर आपला हक्क प्रस्थापित केला. इस्राईल ने जिंकलेला सर्व प्रदेश पुन्हा एकदा अरब राष्ट्रांना देण्याचं एका अटीवर मान्य केलं ती अट म्हणजे अरब राष्ट्र इस्राईल च सार्वभौमत्व स्वीकारून या भागात शांतता प्रस्थापित करतील आणि सगळ्या धर्माच्या लोकांना आपापल्या पवित्र ठिकाणांना भेट देता येईल. पण अश्या कोणत्याही तहाला अरब राष्ट्रांनी केराची टोपली दाखवली. 

इजिप्त ने मात्र इस्राईल शी शांततेचा करार करताना इस्राईल ला नवीन देश म्हणून मान्यता दिली. इस्राईल ने त्याच्या मोबदल्यात जिंकलेला पेनिनसुला चा भाग इजिप्त ला परत केला. पण इस्राईल ने इतर सर्व जिंकलेला भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. १९६७ पासून कित्येक मिलियन पॅलेस्टाईन लोक हे इस्राईल च्या राजवटीखाली आले. अरब राष्ट्रांनी किंवा तिथल्या धार्मिक मुस्लिम जनतेने इस्राईल चा तह न स्विकारल्यामुळे परीस्थिती चिघळत गेलेली आहे. मुस्लिम लोकांना तिथल्या भागावर मुस्लिम राजवट हवी आहे. तर इस्राईल यहुदी लोकांची वस्ती ईस्ट जेरुसलेम भागात वाढवत आहे. गेल्या कित्येक वर्षात यहुदी म्हणजेच इस्राईल लोकांनी इकडे खूप साऱ्या बिल्डिंग बनवल्या. आपली लोकवस्ती वाढवत नेली. आता अशी परिस्थिती आहे की जे समाधान इस्राईल १९६७ साली देत होती ते आता इस्राईल ला करणं पण शक्य नाही. इस्राईल ने आपल्या भागात असणाऱ्या पॅलेस्टाईन लोकांना इस्राईल च्या भागात राहण्याची मुभा दिली आणि ते लोक नागरीकत्व  मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात असंही सांगितलं पण नक्कीच ही सगळी प्रक्रिया इतकी सोप्पी नाही. 

 १९८७ साली पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी एकत्र येऊन 'हमास' या संस्थेची स्थापना केली. हमास च उद्दिष्ठ हे इस्राईल कडून त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या गाझा, वेस्ट स्ट्रीप आणि ईस्ट जेरुसलेम चा हक्क हिसकावून घेणं आणि मुस्लिम शासन व्यवस्था प्रस्थापित करणं . जेरुसलेम मधे फक्त आणि फक्त मुस्लिम धर्मातील लोकांना पवित्र स्थानी जाण्याचा हक्क आणि बाकीच्या धर्माच अस्तित्व संपुष्टात आणणं हे हमास च अजून एक उद्दिष्ठ आहे. त्यासाठी वाट्टेल ते करण्याची हमास ची तयारी आहे. २००६ साली हमास ने गाझा पट्टीत निवडणूक जिंकून आपलं नियंत्रण गाझा पट्टीत प्रस्थापित केलं. त्यानंतर त्यांनी तिकडे इस्राईल विरुद्ध अतिरेकी कारवाया करायला सुरवात केली. इस्राईल ने २०१५ मधे गाझा पट्टी मधून आपलं सैन्य मागे घेतलं आणि अश्या रीतीने हमास कडे गाझा पट्टीच संपूर्ण नियंत्रण आलं. 

हमास ला ह्या यशामुळे आपण आपल्या अतिरेकी अथवा शस्त्राच्या धाकाने इस्राईल च वर्चस्व संपुष्टात आणू असं वाटायला लागलं. त्याचाच भाग म्हणून हमास ने अजून भूभाग ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली. इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन लोकांवर अन्याय केल्याचा आरोप इस्राईलवर जागतिक समुदायाकडून केला गेला पण इस्राईल ने तो कधीच मान्य केला नाही. इस्राईल ने यहुदी लोकांच्या बदल्यात पॅलेस्टाईन लोकांचा बळी दिला असं एक प्रवाह आहे त्यालाच हवा देऊन हमास ने गाझा पट्टी मधे आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. हमास सामान्य लोकांना वेठीस धरून आपल्या अतिरेकी कारवायांना सफल करत आलेली आहे. ज्या प्रमाणे काश्मिरी जनता आणि तिथले काही प्रस्थापित नेते दरवाज्या आडून पाकिस्तान च समर्थन करून अतिरेक्यांना शरण देतात तसला हा प्रकार आहे. 

इस्राईल मधे भारतात असलेले बुरखाधारी आणि परकीय शक्तीची मदत घेऊन देश पोखरणारे नेते, लोकं आणि मानवतेच्या नावाखाली सोशल मिडिया आणि रस्त्यावर उतरणारी पिलावळ नाही. त्यामुळे देशाच्या विरुद्ध कारवाई करणाऱ्या प्रत्येकाला इस्राईल घरात घुसून मारतो. ह्यात इस्राईल हयगय करत नाही. हमास त्याचवेळी गाझा पट्टीत असलेल्या निष्पाप नागरीकांचा सहारा घेऊन इस्राईल वर हल्ला करते. इस्राईल ला प्रत्येकवेळी सैन्य एखाद्या भागात पाठवून कारवाई करणं शक्य नसल्याने इस्राईल मिसाईल, ड्रोन आणि आपल्या अदयावत तंत्रज्ञानाने गाझा पट्टीच्या भागात लपलेल्या हमास च्या अतिरेक्यांवर कारवाई करते. त्यात निष्पाप नागरिकांचा बळी जातो. २०१४ मधे ५० दिवस चाललेल्या युद्धात २२०० पॅलेस्टाईन लोकांचा बळी गेला आणि फक्त ७३ इस्राईल चे लोक यात मारले गेले. पॅलेस्टाईन मधे  मारल्या गेलेल्या सर्व लोकांमध्ये ५०% हे सामान्य नागरीक होते. गाझा  पट्टीत वसलेल्या २ मिलियन पेक्षा जास्त लोकांना वापरून हमास आपले हल्ले करत असते. आपल्या अतिरेकी संघटनेचा पाया वाढवण्यासाठी तिथल्या गरीब तरुणांना धर्माच्या नावाखाली अतिरेकी कारवायांसाठी तयार करते. जेव्हा इस्राईल वर हल्ला केला जातो तेव्हा उत्तरात हमास च्या अतिरेक्यांसोबत त्यांना मदत करणारी निष्पाप माणसंही मृत्युमुखी पडतात. 

इस्राईल- पॅलेस्टाईन संघर्षाचं समाधान अरब राष्ट्रांना नको आहे. समोर माणुसकीचा भाव आणणारे अरबी आणि मुस्लिम राष्ट्र मागच्या दाराने हमास ला मिसाईल आणि दारुगोळा पुरवत आहेत. एकट्या गाझा पट्टीत हमास ने तब्बल ३०,००० रॉकेट, मोर्टार चा साठा इस्राईल च्या दिशेने तयार ठेवला आहे. प्रत्येक क्षणी इस्राईल नागरीक आणि इस्राईल या हजारो रॉकेट च्या टप्यात आहे. नकाशा बघितला तर गाझा पट्टी इस्राईल अगदी खेटून आहे. त्यामुळे इस्राईलच्या नागरिकांना प्रत्येक रात्र आणि दिवस डोळ्यात तेल घालून आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सज्ज रहावं लागते. हमास ला हा शस्त्र पुरवठा इजिप्त, लिबिया, इराण अश्या अनेक देशांकडून केला जातो. इराण कडून मोठ्या प्रमाणावर मिसाईल हमास ला पुरवली जात आहेत. अश्या वातावरणात इस्राईल कडे एकच पर्याय होता तो म्हणजे स्वतःला सुसज्ज ठेवणे. त्यासाठी इस्राईल ने तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केली. आयर्न डोम सारखं तंत्रज्ञान देशाच्या सुरक्षिततेसाठी तयार केलं त्याचवेळी जगातील सर्वात चांगली आणि सुसज्ज अशी गुप्तचर संघटना ज्याला अमेरिका पण सलाम करते ती 'मोसाद' तयार केली. जिच्यामुळे आपल्यावर होणाऱ्या प्रत्येक कारवाईसाठी इस्राईल तयार असतो. 

२०२१ मधे रमजान च्या महिन्यात जेरुसलेम मधे अल अकसा मशिदी च्या भागात नमाज करण्यासाठी इस्राईल च्या सैनिकांनी सुरक्षेच्या आणि अतिरेकी कारवाया घडण्याची शक्यता लक्षात घेऊन बंदी घातली. त्याचा परिणाम इथल्या भागात असंतोष वाढवण्यासाठी झाला. इस्राईल च्या कारवाई विरोधात मोर्चे निघाले आणि इस्राईल चा बदला घेण्याची भाषा हमास ने सुरु केली. इराण ने याला खतपाणी घातलं आणि असंतोषाचा वणवा पेटत गेला. इस्राईल वर हमास ने रॉकेट ने हल्ले केले. शेवटी इस्राईल ला युद्धाची भाषा बोलावी लागली आणि आता एकदाच काय ते हमास आणि त्याच्या अतिरेक्यांना संपवण्यासाठी इस्राईल ने पावलं उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून इस्राईल ने गाझा पट्टीत मिसाईल आणि ड्रोन ने मारा सुरु केला आहे. ह्या सगळ्यात निष्पाप लोक ही बळी पडत आहेत हे सत्य आहे. इस्राईल ला सैनिकी कारवाईसाठी भाग पाडलं गेलं आहे जसं भारताला बालाकोट मधील कारवाईसाठी भाग पाडलं गेलं होतं. या युद्धाचा शेवट काय होईल हे सध्यातरी सांगणं कठीण आहे. पण इस्राईल आता आर-पार ची लढाई करेल असं सध्यातरी दिसत आहे. ह्यात निष्पाप नागरिक दोन्ही बाजूचे मृत्युमुखी पडणार हे उघड आहे. 

जेरुसलेम आणि तिथलं पावित्र्य टिकवणं हे सगळ्यांची जबाबदारी होती. पण फक्त मलाच हक्क हवा या स्वार्थापोटी तिन्ही धर्मातील विशेष करून यहुदी आणि मुस्लिम धर्मातील निष्पाप लोक बळी पडत आहेत. हे सगळं थांबवता येऊ शकलं असतं पण तसं  करण्याची तयारी कोणत्याच देशाची नाही. एकीकडे इस्राईल आपल्यावर होणाऱ्या अतिरेकी कारवाईसाठी लढा देत आहे तर दुसरीकडे हमास धार्मिक भावनांना पेटवून जेहाद च्या लढाईत उतरली आहे. इस्राईलकडे असलेलं तंत्रज्ञान लक्षात घेता हमास च पानिपत नक्की आहे. पण त्या पानिपतात गाझा पट्टीतील जनता बळी  पडणार आणि त्याचे परीणाम  भोगणार हे पण निश्चित आहे. येत्या काळात इस्राईल आणि पॅलेस्टाईन चा इतिहास अजून रक्तरंजित झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. 

समाप्त.       

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment