Thursday 27 May 2021

टौक्टे ते यास चक्रीवादळाची धोक्याची घंटा... विनीत वर्तक ©

 टौक्टे ते यास चक्रीवादळाची धोक्याची घंटा... विनीत वर्तक ©

गेल्या काही आठवड्यात भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यानां दोन वेगवेगळ्या चक्रीवादळांनी धडक दिली आहे. टौक्टे चक्रीवादळाने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तर यास चक्रीवादळाने भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडक दिली आहे. गेले काही वर्ष चक्रीवादळांचा हा सिलसिला भारताच्या दोन्ही किनारपट्ट्यांवर मान्सून च्या आधी आणि मान्सून नंतर सुरु झाला आहे. अचानक ही चक्रीवादळं निर्माण कुठून होतात? इतिहासात भारताच्या पश्चिम किनारपट्टी वर अशी वादळ निर्माण होत नसताना आजकाल का ती तयार होत आहेत? भविष्यात काय होणार आहे हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. 

गेल्या पाच शतकात एकट्या भारतात तब्बल १.४ लाख लोकांचा जीव चक्रीवादळात गेला आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ धडक देण्याचा इतिहास जुना आहे. त्यामागे काही कारणं आहेत. मुळातच बंगालचा उपसागर हा तीन बाजूने जमिनीने वेढलेला आहे आणि त्याचा आकार त्रिकोणी फनेल  सारखा आहे. या आकारामुळे चक्रीवादळांच्या निर्मितीला चालना मिळते. गेल्या २ शतकात जगातील सगळ्या चक्रीवादळांपैकी जवळपास ४३% वादळ ही याच भागात निर्माण झाली आणि त्यांनी एकट्या बांगलादेश मधे २० लाख लोकांचा बळी घेतला आहे. १९७० मधे आलेल्या 'भोला' वादळाने ३ ते ५ लाख लोकांचा बळी  घेतला होता. बंगालचा उपसागर तीन बाजूने तीन देशांनी वेढलेला आहे. भारत, बांगलादेश आणि म्यानमार. या भागातील जमीन ही जवळपास सपाट आहे. तसेच शेतीसाठी पूरक असल्याने हा भाग दाट लोकवस्तीचा आहे. त्यामुळेच चक्रीवादळांनी होणाऱ्या नुकसानीची तीव्रता प्रचंड आहे.    

चक्रीवादळाची निर्मिती होण्यासाठी पृथ्वीच्या वातावरणचा जो भाग महत्वाचा असतो तो म्हणजे ट्रोपोस्फिअर. हा वातावरणाचा भाग जमिनीपासून साधारण ७ किमी. ते २० किमी. उंचीवर असतो. ह्या भागात चक्रीवादळांची निर्मिती होते. बंगाल च्या उपसागराच्या पृष्ठभागाच तपमान हे साधारण २८ डिग्री सेल्सिअस आहे जे की अश्या वादळांच्या निर्मितीसाठी अतिशय योग्य आहे. जमीन सूर्याच्या उष्णतेने लवकर तापून लवकर थंड होते. पण पाण्याच्या बाबतीत ह्याला वेळ लागतो. तपमानातील उष्णतेच्या फरकामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. कमी दाबाचा पट्टा म्हणजे इथल्या हवेच वस्तुमान हे बाजूच्या हवेपेक्षा कमी असते. त्यामुळे जास्त वस्तुमानाची हवा इकडे ओढली जाते. गोल फिरणाऱ्या हवेला योग्य बाष्प मिळालं की त्याचा चक्रीवादळाकडे बनण्याचा प्रवास सुरु होतो. पाण्याच्या पृष्ठभागाच तपमान हे काम करत असते. ह्या बाष्पाच घन स्वरूपात रुपांतर होऊन मग ह्याची तीव्रता वाढत जाते. हे घोंगावणार चक्रीवादळ जेव्हा कोणत्याही जमिनीवर येते तेव्हा त्याचा इंधन स्त्रोत म्हणजे बाष्प संपते. इंधन संपल्यावर तिव्रता कमी झाल्यावर जमवलेला साठा पाऊसाच्या स्वरूपात जमिनीवर पडतो. इंधन म्हणजेच बाष्प आणि उर्जा संपल्याने वादळ शांत होते. बंगाल चा उपसागराच स्थान आणि त्याच तपमान हे त्याच्या चक्रीवादळ निर्मितीमागे प्रमुख कारण आहे. बंगाल चा उपसागर ह्या वादळांसाठी इंधन म्हणजेच बाष्प पुरवतो. 

अरबी समुद्र बंगाल च्या उपसागरापेक्षा २ डिग्री सेल्सिअस ने थंड आहे. हा दोन डिग्री चा फरक इकडे चक्रीवादळांची निर्मिती इतिहासात होऊ देत नव्हता. पण गेल्या काही वर्षात अरबी समुद्राचं तपमान जवळपास १.२ ते १.४ डिग्री सेल्सिअस ने वाढलं आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे झपाट्याने हा बदल झाला आहे. त्यामुळेच अरबी समुद्र आता चक्रीवादळांची निर्मिती करणारी नवीन भट्टी सुरु झाली आहे. २०१९ मधे चक्रीवादळ वायू भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या जवळून गेलं तर २०२० मधे चक्रीवादळ 'निसर्ग' ने महाराष्टाच्या किनारपट्टीवर तांडव केलं आणि आता २०२१ मधे 'टौक्टे' चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या सह्याद्री पलीकडे धडक दिली आहे. यावरून आपण अंदाज लावू शकतो की येणाऱ्या काळात कोणतं संकट भारताच्या दोन्ही किनारपट्यांवर घोंगावते आहे. ग्लोबल वॉर्मिंग ज्या वेगाने वाढते आहे त्याच वेगाने या चक्रीवादळांची तीव्रता वाढत जाणार आहे त्याचसोबत त्यांच्या निर्मितीसाठी लागणारा वेळ कमी होत जाणार आहे.        

सध्या परिस्थिती अशी आहे की एखाद्या कमी दाबाच्या पट्ट्याला एक्सट्रीमली सिव्हिअर सायक्लॉन किंवा चक्रीवादळाचं स्वरूप धारण करायला अवघे २४ तास लागत आहेत. इतक्या कमी वेळात या वादळांच्या धोक्याची सुचना लोकांना देऊन त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा अवधी ही कमी मिळत आहे. काल पर्यंत छोटं स्वरूप असलेला पट्टा एका रात्रीत चक्रीवादळाचे स्वरूप धारण करून भारताच्या दोन्ही किनारपट्यांवर धडक देण्यास सक्षम होतो आहे. एवढ्या कमी वेळात लोकांचे स्थलांतर आणि मालमत्तेचे होणारे नुकसान वाचवणं येत्या काळात कठीण होणार आहे. २० मे २०२० रोजी धडक दिलेल्या चक्रीवादळ 'आम्फान' ने तब्बल १ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान केलं होतं. चक्रीवादळ 'निसर्ग' ने एकट्या महाराष्ट्रात १२,४४० एकर जमिनीवरच्या शेती आणि मालमत्तेचं नुकसान केलं होतं.  

येत्या काळात चक्रीवादळांची तीव्रता आणि त्यांची संख्या वाढत जाणार आहे. प्रत्येकवेळी सरकारी यंत्रणा आणि मदतीवर अवलंबून न राहता ह्या आस्मानी संकटाची तयारी प्रत्येकाने करायला हवी. कारण आपल्यापैकी प्रत्येकजण निसर्गाच्या या रौद्ररूपासाठी कारणीभूत आहे. या संकटाची तीव्रता आणि त्यांच्यामुळे होणारे नुकसान हे पण वाढणार आहे. या आठवड्यात समुद्राच्या मध्यभागी उभं राहून 'यास' चक्रीवादळाचं रौद्र रूप अनुभवलं आहे. तब्बल १०-१५ मीटर च्या लाटा आणि ४०-६० नॉटिकल मैल वेगाने वाहणारे बोचरे वारे जेव्हा निसर्गाचं रूप दाखवतात तेव्हा एक माणूस म्हणून त्याकडे हतबलतेने बघण्यापलीकडे काही करू शकत नाही. 

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





1 comment: