Wednesday 26 May 2021

निरागसता... विनीत वर्तक ©

 निरागसता... विनीत वर्तक ©


लहान असताना जसे मन निरागस असते ना, तसे लहान मुलांची नजर पण निरागस असते. मनातले भाव नजरेत पटकन कळून येतात, म्हणून लहान मुलं पटकन आपलीशी होतात. राग, प्रेम जे काही वाटते, ते त्यांच्या नजरेतून अगदी आपल्यापर्यंत लगेच पोहोचते. मनातले भाव आपल्या एकंदर व्यक्तिमत्वावर खूप काही परिणाम करत असतात. म्हणूनच माणसाचे मन अगदी नजरेतूनही काही वेळा समोर येते. आपण मोठे होत जातो, तश्या अनेक गोष्टी आपल्या विचारांवर प्रभाव टाकतात. काही छोट्या गोष्टीही खूप परिणाम करतात, तर काही सतत समोर आल्याने आपले विचार बदलवतात. त्या विचारांचा प्रभाव इतका प्रचंड असतो, की आपलं मन निरागस विचार करण्याची क्षमता हरवून बसतं. 


आजकालच्या जमान्यात ज्या पद्धतीने गोष्टी समोर आणून टाकल्या जात आहेत, त्यामुळे मनाची निरागसता तर हरवलीच आहे, पण मनात आता गोष्टी विकृततेने भरल्या जात आहेत. त्यामुळे त्याचे  परिणाम आता दिसत असून, माणूस आता माणसाकडे विकृतीमधून बघायला लागला आहे. सुंदरताही विकृत नजरेने समोर येते आहे. विचार पण विकृततेने केला जात आहे. माणूस हळूहळू विकृत मशीन बनला आहे. तेच त्याच्या नजरेतून पण समोर येते आहे. स्त्रीकडे बघताना खरे तर तिच्या सौंदर्याची भुरळ पुरुषाला पडायला हवी. सौंदर्याचे निकष भले वेगळे असतील, पण त्यात नजाकत आणि निरागसता असायची. ती नजर स्त्रीलाही हवीहवीशी वाटते. खरे तर तिचं ते नटणं, छान राहणं, दिसणं ह्याच नजरेसाठी असतं. पण आजकाल नजर सौंदर्यावर न जाता तिच्या उंचवट्यांवर जाते. उंचवटे जितके अधिक आणि त्या कपड्यातून त्याचं उन्नत दर्शन अधिक त्यावर स्त्रीची सुंदरता मोजली जाते. 


किती पुरूषांचं लक्ष आज खऱ्या सौंदर्याकडे जातं? तीच लाजणं, नटणं, ती अदा, ते रूप ह्याकडे किती जण बघतात? बघितलं तरी त्यात ते ओरबाडून घेण्याचा भावच जास्ती जाणवतो. आज काल पहिली नजर जाते ती छातीवर आणि मग पार्श्वभागावर. तिकडे उन्नतता कशी आहे, कपडे कसे आहेत, हे बघून ती किती सेक्सी आहे की नाही ह्याचं अनुमान लावण्यात पुरूषांचं डोकं बिझी असतं. काही अपवाद असतीलही, पण सौंदर्याचं अनुमान हे शरीराच्या उन्नत भागावरून लावताना तिच्या बाकीच्या सौंदर्याकडे त्याची नजरच जात नाही. तिचं ते लाजणं, तिच्याकडे तिरक्या नजरेतून बघणं हे सगळ हरवलं आहे. आपले विचार सुरूच मुळी सेक्सपासून होतात आणि संपतात पण तिकडेच. हे फक्त पुरुषापुरतं मर्यादित नाही, तर स्त्रीसाठी पण हेच लागू आहे. व्यायाम करून दिसणारी छाती आणि सिक्स पॅक आजकाल नजरेत भरतात. बाकी पुरुष कसा का असेना, तरी ह्या गोष्टी त्याला हिरो बनवतात. 


सेक्सला इतकं मशीन बनवलं आहे, की आजकाल इंचांचे आकडे महत्वाचे ठरतात. त्यातील भावना, स्पर्श, प्रेम हे सगळं नंतर येतं, बरेचदा येत पण नाही. पॉर्न बघून डोळ्यासमोर जननेंद्रियांचं इतकं उद्दातीकरण झालं आहे, की दुसरं काही दिसतच नाही. फक्त कधी एकदा त्याचं मिलन होतं आणि मी त्या कळसाकडे कधी पोहोचतो, ह्याची घाई लागलेली असते. बाकी समोर काय दिसते, काय जाणवते, समोरच्याला काय पोहोचते, ह्याचं काहीच सोयरसुतक नाही, म्हणून आजकाल नजरच घाण वाटायला लागली आहे. स्त्री काय, पुरुष काय! बघताना त्यातून मिळणाऱ्या संवेदना फक्त आणि फक्त शरीरापासून सुरु होऊन शरीरावर संपत असतात, मग त्यातून चांगलं वाटणार कसं? एक जोडीदार नसलेले स्त्री आणि पुरूष  बोलले, भेटले किंवा एकत्र असतील तर पहिला विचार लफड्यापासून सुरू होऊन अफेअरपर्यंत संपतो. शाळेतली मैत्रीण किंवा मित्र पुन्हा एकदा कॉफीला भेटले, तर मदतीचा भाग हा एकटेपणावर सुरु होतो आणि शरीरसुखावर संपतो. काही अपवाद असतीलही नक्कीच, पण नजरेतील निरागसता आजकाल जास्ती जाणवत नाही हेच खरं.


सतत तेच तेच बघून आता मनही विकृत बनलं आहे. वयाचा मुलाहिजा आम्ही कधीच बाजूला केला आहे. लहानग्या वयातही आम्हाला शरीर दिसायला लागलं आहे. कोरं फूल मिळावं, म्हणून न उमललेल्या कळ्यांना कुस्करायची स्पर्धा आम्ही लावली आहे. हे कोरं असणं आणि हे मशीन झालेलं मन कसं झालं, ह्याचा विचार करायला तर सोडाच पण हे स्वीकारायलाही आपलं मन तयार नाही आहे. निरागसता यायला आधी मनावर झालेली ही जाळी बाजूला काढायला हवीत. ह्यातून कोणी सुटलेलं नाही, हे अगदी माझ्या तुमच्यापासून सगळेच ह्यात अडकलेलो आहोत. फरक इतकाच, की काही दाखवतात तर काही लपवतात. प्रश्न हा आहे, की आपल्याला ती निरागसतेची जाणीव केव्हा होणार आहे? 


ही जाळी खूप भक्कम आहेत. अशी सहजासहजी ती निघणार नाहीतच. आधी त्याची जाणीव जरी झाली, तरी आपलं एक पाउल पुढे पडलं, असंच मी म्हणेन. निदान जाळीचे विचार आले तरी त्यात आपली निरागसता अडकलेली आहे ह्याची जाणीव ज्या दिवशी होईल, तेव्हा नजरेतही त्याचा फरक दिसेल. माणसाकडे माणूस म्हणून बघण्याची ती सुरूवात असेल. लहानपणीचं ते निरागस मन आपण कधीच हरवलं आहे. गरज आहे ती त्याला शोधण्याची आणि त्याच्या नजरेतून बघण्याची.


सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment