इस्राईल आणि पॅलेस्टाईन एक रक्तरंजित इतिहास (भाग १)... विनीत वर्तक ©
सध्या सुरु असलेल्या इस्राईल आणि पॅलेस्टाईन संघर्षावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. घरामध्ये बसून नकाशात हे दोन्ही भूभाग कुठे आहेत? संघर्षाची पार्श्वभूमी काय? नक्की कोण चुकीचं आणि कोण बरोबर? याचा अभ्यास न करता अनेकजण सोशल मिडिया मधून आपली मत बिनदिक्कतपणे ठोकून देतं आहेत. मानवतेचा बुरखा धारण करून समर्थन अथवा विरोध करत आहेत. असं करताना आपल्याच मताची किंमत कमी करत आहेत याची जाणीव कदाचित त्यांना येत नसेल. इस्राईल आणि पॅलेस्टाईन संबंध समजून घ्यायचा असेल तर माझ्या मते अयोध्या मधील राम मंदिर एक आदर्श उदाहरण ठरू शकेल. कदाचित त्याची तुलना केली तर दोन्ही बाजूने गुंतलेल्या भावना एवढ्या तीव्र का? तसेच एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत हा संघर्ष का येऊन पोहचला आहे याचा थोडाफार अंदाज येऊ शकेल.
इस्राईल आणि पॅलेस्टाईन संघर्षाच ठिकाण किंवा रक्तरंजित दुखरी नस म्हणजे 'जेरुसलेम' हे शहर. या जेरुसलम शहरात काय दडलं आहे हे समजून घेण्यासाठी थोडं इतिहासात जाऊ. साधारण १००० बी. सी. (येशू ख्रिस्ताचा जन्म होणाच्या १००० वर्ष आधी) राजा डेव्हिड ने जेरुसलेम जिंकल आणि तिकडे यहुदी धर्म बसवला. यहुदी धर्माची जेरुसलेम राजधानी झाली. हे शहर वसवल्या नंतर साधारण ४० वर्षांनी त्याने यहुदी धर्माच पहिलं मंदिर तिकडे बांधलं. हे मंदिर ४ दशक म्हणजेच ४०० वर्ष वापरलं गेलं आणि त्याकाळी अतिशय प्रसिद्ध झालं कारण त्यात असलेला 'पवित्र कोष'. साधारण ५८६ बी.सी.मधे त्यावर परकीय शत्रूंनी आक्रमण करून यहुदी लोकांच ते पवित्र मंदिर उध्वस्थ केलं. तिथे वसलेल्या ज्यू (यहुदी) लोकांना कैदेत टाकलं आणि त्यांच्यावर अत्याचार केले. ५० वर्षानंतर यहुदी लोकांना पर्शियन राजा सायरस ने पुन्हा जेरुसलेम ला येऊन आपलं मंदिर उभारण्याची मुभा दिली. त्या नंतर अलेक्सझांडर दि ग्रेट याने ३३२ बी.सी. मध्ये जेरुसलेम वर ताबा मिळवला. त्यानंतर रोमन, अरब, पर्शियन, इस्लामिक अश्या अनेक राज्यकर्त्यांनी पुढल्या १०० वर्षात आक्रमण करून ताबा मिळवला.
त्या नंतर ६३२ व्या शतकात मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हे जेरुसलेम मधून स्वर्गात गेले. त्या नंतर अनेक वर्ष मुस्लिम आणि यहुदी समाजासाठी जेरुसलेम हे अतिशय पवित्र स्थान म्हणून मानलं गेलं. यहुदी आणि मुस्लिम धर्माचे लोक इकडे हजारो च्या संख्येने येत राहिले. १९१७ ला पहिल्या महायुद्धानंतर जेरुसलेम चा ताबा ग्रेट ब्रिटन कडे आला. तोवर या प्रदेशात यहुदी आणि मुस्लिम धर्मांच्या लोकांमध्ये संघर्ष वाढत होता. कारण दोन्ही धर्मासाठी जेरुसलेम अतिशय पवित्र स्थान होतं. प्रत्येकाला त्यावर ताबा हवा होता. इंग्रजांच शासन संपुष्टात आल्यानंतर १९४८ साली इस्राईल हा यहुदी लोकांचा देश जगाच्या नकाशावर वर अस्तित्वात आला.
हा झाला इतिहास पण या सगळ्यात वादाची ठिणगी किंवा कारण समजण्यासाठी पुन्हा एकदा या इतिहासातली काही पान उलटावी लागतील. वर सांगितलं त्या प्रमाणे यहुदी लोकांच मंदिर जेरुसलेम मधे सगळ्यात आधी होतं असं इतिहास सांगतो. रोमन लोकांनी ७० ए.डी. मधे हे मंदिर उध्वस्थ केलं. ज्याची एक भिंत आज फक्त शाबूत आहे. त्यामुळेच यहुदी लोकांसाठी ती खूप पवित्र आणि धार्मिक आहे. त्याच जागेवर शेकडो वर्षांनी अल अकसा ही मशीद बांधण्यात आली.याच मशिदीच महत्व मुस्लिम धर्मातील लोकांसाठी मक्का आणि मदिना नंतर तिसऱ्या नंबरवर आहे. इकडेच ख्रिश्चन धर्मियांसाठी पवित्र असं पवित्र थडग्यांच चर्च आहे. साधारण ३५ चौरस किलोमीटर ची ही जागा तीन धर्मांसाठी अतिशय महत्वाची आहे. गेल्या १००-२०० वर्षाच्या इतिहासात इकडे कोणी प्रार्थना करावी आणि कश्या पद्धतीने यावर अनेकदा अरब आणि यहुदी- ख्रिश्चन लोकांमध्ये मतभेद झाले आहेत. त्याचीच परिणीती एकमेकांचा द्वेष करण्यापर्यंत गेली आहे.
१९४८ मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी या विवादित भागातून माघार घेतली तेव्हा इस्राईल या स्वतंत्र्य राष्टाची निर्मिती झाली. यहुदींनी हा भाग आपला असून आपल्या हक्कापासून गेली अनेक दशके वंचित ठेवण्यात आलं त्या भागावर आपला हक्क सांगितला पण त्याचवेळी मुस्लिम धर्मातील पवित्र स्थानाचे महत्व ओळखून त्यांचा हक्क ही या जमिनीवर राहील अशी भूमिका मांडली. ब्रिटिश येण्याअगोदर या प्रदेशावर मुस्लिम शासकांचे राज्य असल्याने हा भाग आपला आहे असं अनेक अरब राष्ट्रांचे म्हणणे होते. इस्राईल ला थांबवण्यासाठी सर्व अरब राष्ट्र एकत्र आली. त्यातून १९४८ साली अरब आणि इस्राईल असा संघर्ष झाला. त्यात इस्राईल ने अरब लोकांना पाणी पाजलं. अरब लोकांमध्ये ही गटबाजी होती ज्याचा फायदा इस्राईल ला झाला. जवळपास १ वर्ष युद्ध झाल्यानंतर इस्राईल ने ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असणारा भूभाग आपल्या ताब्यात घेतलेला होता. इस्राईल ने 'जेरुसलेम' जिंकलं तर जॉर्डन ने पश्चिमेकडील नदीचं पात्र तर इजिप्त ने गाझा वर आपला झेंडा रोवला. यात सगळ्यात जास्ती पानिपत झालं ते इकडे राहणाऱ्या पॅलेस्टाईन लोकांच. ज्यातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना इकडून पळून जावं लागलं.
क्रमशः
पुढील भागात इस्राईल आणि पॅलेस्टाईन ची रक्तरंजित गोष्ट आज कुठे येऊन पोहचली तिचे येत्या काळात होणारे संभाव्य परिणाम.
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment