Wednesday 4 September 2019

उंचीवरचा नवीन मित्र कमोव्ह के.ए. २२६ टी... विनीत वर्तक ©

उंचीवरचा नवीन मित्र कमोव्ह के.ए. २२६ टी... विनीत वर्तक ©

भारत अश्या ठिकाणी जगाच्या नकाशात आहे ज्याच्या भूमिवर जगात आढळणाऱ्या सगळ्या परिस्थिती आपण अनुभवु शकतो. एकीकडे ७००० किलोमीटर पेक्षा जास्त लांबीची समुद्र किरनारपट्टी तर दुसरीकडे जगातील सर्वोच्च शिखर असणारा हिमालय. त्यात भरीस भर म्हणुन भारताला पाकिस्तान आणि चीन सारखे मतलबी, छुप्या कारवाया तसेच सतत काही ना काही खुसपट काढणारी शत्रु राष्ट्र लाभली आहेत. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अश्या शत्रुंवर वचक ठेवणं तितकचं कठीण काम आहे. भारताकडे सियाचिन सारखी जगातील सगळ्यात उंचीवरच्या युद्धभुमीच रक्षण करण्याची जबाबदारी आहे. सियाचिन हिमालयाच्या शिखरांवर जवळपास ५४०० मीटर (१७,७०० फुट ) वसलेलं आहे. १९८४ च्या युद्धानंतर सियाचिन च्या पुर्ण परिसरावर भारताचा हक्क असुन ह्याच्या रक्षणासाठी भारतीय आर्मी नेहमीच तत्पर असते. इतक्या उंचीवर सैन्याला लागणारी रसद, दारुगोळा, वैद्यकीय मदत ते आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सैन्याची भिस्त असते ती ह्या सर्वांची देवाणघेवाण करणाऱ्या हेलिकॉप्टर वर. आजवर चितक आणी चेता हेलिकॉप्टर गेली ४० वर्ष भारतीय सैन्याची मदत करत आलेली आहेत. अतिशय जुनी, कालबाह्य झालेली ही हेलिकॉप्टर आता मृत्युचा सापळा बनतं चालली आहेत. ह्या हेलिकॉप्टर ची जागा आणि भारतीय सेनेची भिस्त सांभाळण्यासाठी भारत रशिया कडुन  २०० कमोव्ह के.ए. २२६ हेलिकॉप्टर जवळपास १ बिलियन अमेरिकन डॉलर च्या किमतीत खरेदी करत आहे.

कमोव्ह के.ए. २२६ टी हेलिकॉप्टर अतिशय शक्तिशाली, कमी वजन असणारं पण त्याच वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्रमानांकन असणारं, ह्या सोबत हवेत अतिशय सहजतेने नियंत्रण करता येणारं, अतिशय छोट्या जागेत उड्डाण आणि उतरवता येणार असं बहुउद्देशीय हेलिकॉप्टर आहे. ह्या हेलिकॉप्टर ची कार्यक्षमता अतिशय उच्च असुन पर्यावरणाच्या दृष्टीने ह्यातुन होणार प्रदूषण इतर हेलिकॉप्टर च्या तुलनेत कमी आहे. हे हेलिकॉप्टर रात्री- दिवसा, कोणत्याही प्रकारच्या वातावरणात उड्डाण भरण्यास सक्षम असुन वेगात वारा अथवा अतिशय पाऊस असताना पण सुरक्षिततने उड्डाण भरू शकते. हे हेलिकॉप्टर ५० डिग्री सेल्सिअस ते उणे -५० डिग्री सेल्सिअस तपमानात अगदी १००% आद्रता असताना पण उड्डाण भरू शकते. जमिनीवर उतरल्यावर ह्याला ठेवण्यासाठी ह्यांगर (ह्यांगर म्हणजे जिकडे काम नसताना हेलीकॉप्टर ठेवले जातात ती जागा) ची गरज भासत नाही. असं भारतीय सैन्यासाठी अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं असलेलं हे हेलिकॉप्टर लवकरचं भारतीय सैन्याचा भाग होणार आहे. ह्यातील ६० हेलिकॉप्टर रशियात बनणार असुन १४० हेलिकॉप्टर मेक इन इंडिया च्या माध्यमातुन भारतात टेक्नोलॉजी ट्रान्स्फर सह हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एच.ए.एल.) मध्ये बनवण्यात येणार आहेत.

कमोव्ह के.ए. २२६ टी मध्ये टर्बोमेका एरियस २ जी १ दोन इंजिन असुन ह्यातील प्रत्येक इंजिन ६७५ एस.एच.पी. ऊर्जा निर्माण करते. ह्यामुळे हे हेलिकॉप्टर तब्बल ७००० मीटर उंचीपर्यंत उड्डाण भरण्यास सक्षम आहे. नवीन इंजिनामुळे ह्याची अतिउंचीवर उड्डाण करण्याची क्षमता खुप वाढलेली आहे. ह्यात नवीन एव्हियॉनिक्स असुन ऑटोम्याटिक कंट्रोल सिस्टीम, रडार आहेत. गरज पडल्यास सर्च आणि रेस्क्यु मिशनसाठी सर्च लाईट, हेलिकॉप्टर हॉईस्ट तसेच अतिरिक्त इंधन टाकी लावण्याची तरतूद केलेली आहे. ह्या हेलिकॉप्टर मध्ये वैद्यकीय मिशन साठी मेडिकल मॉड्युल बसवण्याची सोय केलेली आहे. कमोव्ह के.ए. २२६ टी एकावेळेस ७ जणांना घेऊन उड्डाण भरू शकते किंवा १ टन वजनाच सामान घेऊन उड्डाण भरु शकते. हे सामान हेलिकॉप्टर च्या आत अथवा बाहेर कोणत्याही पद्धतीने हवेत उचलण्याची ह्यात सोय आहे. ह्याचा उपयोग रसद पुरवण्यासाठी, दारुगोळा नेण्यासाठी किंवा आपात काळात सैनिकांना अति उंचीवर ने आण करण्यासाठी केला जाऊ शकतो.

कमोव्ह के.ए. २२६ टी सगळ्यात मोठी जमेची बाजु म्हणजे ह्याचे को-एक्सियल रोटर तंत्रज्ञान. कमोव्ह के.ए. २२६ टी च्या डोक्यावर ६ पाती असुन ह्यातील ३ घड्याळाच्या दिशेने तर ३ घड्याळाच्या उलट दिशेने एकाच वेळी फिरतात. को-एक्सियल रोटर तंत्रज्ञानामुळे ह्याची क्षमता जास्त झाली आहे.  को-एक्सियल रोटर तंत्रज्ञानात हेलिकॉप्टर च्या मागच्या बाजूला असलेल्या पंख्याची गरज भासत नाही. सामान्यतः हेलिकॉप्टर ला डोक्यावर पाती असतात. ही पाती हवेचा दाब खालच्या बाजूला निर्माण करतात त्यामुळे हेलिकॉप्टर हवेत उचललं जाते पण असं करत असताना ज्या दिशेने ही पाती फिरतात त्या दिशेने निर्माण होणाऱ्या बलामुळे हेलिकॉप्टर स्वतःभोवती गोल फिरण्याची शक्यता असते. ह्यासाठी हेलिकॉप्टर च्या शेपटीवर उलट दिशेने फिरणारा पंखा बसवलेला असतो. ह्या पंख्याचा वेग नियंत्रित करून हेलिकॉप्टर ची दिशा नियंत्रित आणि डोक्यावरील पात्यांच्या विरुद्ध दिशेचे बल निर्माण केले जाते. पण हे करत असताना इंजिनाने निर्माण केलेली शक्ती शेपटाच्या पंख्याला फिरवण्यासाठी खर्च होते. तसेच डोक्यावरील पंख्याने निर्माण केलेल्या दाबाच्या क्षेत्रात हा पंखा येत असल्याने हवेचा आवाज प्रचंड होतो. ह्यामुळे अनेक हेलिकॉप्टर जवळ आपण उभं राहू शकत नाही कारण त्याने आपली ऐकण्याची क्षमता जाऊ शकते. को-एक्सियल रोटर तंत्रज्ञानात एकमेकांवर असलेली ३ पाती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरत असल्याने निर्माण होणार बल विरुद्ध दिशेने निर्माण होऊन शेपटाच्या पंख्याची गरज भासत नाही. ह्यामुळे इंजिनाने निर्माण केलेली पुर्ण शक्ती हेलिकॉप्टर ला हवेत उचलण्यासाठी वापरली जाते. तसेच शेपटीवर पंखा नसल्याने ह्याला लांब शेपटीची गरज भासत नाही तसेच ह्या हेलिकॉप्टर ने निर्माण होणार आवाज खुप कमी असतो.

कमोव्ह के.ए. २२६ टी को-एक्सियल रोटर तंत्रज्ञान वापरुन अतिशय उंचीवर जाऊ शकते तसेच अतिशय कमी जागेत (लांब शेपटी आणि पंखा नसल्याने) उड्डाण भरू अथवा उतरू शकते. भारतीय सेनेसाठी ह्या दोन्ही गोष्टी अतिशय गरजेच्या होत्या. सियाचिन सारख्या युद्धभुमीवर अतिशय कमी जागेत उड्डाण भरणारी आणि तितक्या उंचीवर सहजतेने उतरणारी ही  हेलिकॉप्टर भारतीय सेनेचं हृद्य असणार आहेत. त्यामुळे भारत- रशिया ह्यांच्या दरम्यान होणारा हा सौदा भारतीय सेनेसाठी अतिशय महत्वाचा आहे. भारत- रशिया दरम्यान हा सौदा आता पूर्णत्त्वावर आहे. रशिया ने हे हेलिकॉप्टर अमेरिकन डॉलर मध्ये न विकता भारतीय रुपयात विकण्यास शेवटी मान्यता दिली आहे. ह्यामुळे भारताच्या परकीय चलनावर वाढीव दबाव येणार नाही. पंतप्रधानांच्या चालु असलेल्या दौऱ्यात ह्या सौद्यावर शेवटची मोहोर लागण्याची शक्यता आहे.

माहिती स्रोत:- गुगल

फोटो स्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment