एका नवीन पृथ्वीचा शोध... विनीत वर्तक ©
नासा ने २००९ मध्ये केपलर दुर्बीण अवकाशात सोडली ती एक्सोप्लानेट शोधण्यासाठी. ह्या दुर्बिणीच मुख्य काम होत ते म्हणजे पृथ्वीसारखे दुसरे ग्रह शोधण्याच. आपल्या सारख सजीव कोणी जर अवकाशात अस्तित्वात असेल तर त्यांना पण पृथ्वी सारखाच ग्रह लागणार ज्यावर वस्ती करता येईल अश्या गोष्टी असतील प्रामुख्याने वातावरण, तपमान आणि गुरुत्वाकर्षण. ह्या गोष्टी पृथ्वीवर का आहेत तर त्याला प्रामुख्याने कारण आहे ते पृथ्वी च सूर्यापासून असलेल अंतर. जास्ती जवळ तर जास्ती तापमान आणि जास्ती लांब तर कमीत कमी तापमान ह्या दोन्ही गोष्टींनमध्ये कोणताही सजीव तग धरून राहण तस कठीणच. पण पृथ्वी च सूर्यापासून असलेल अंतर ह्या दोन्ही टोकामधील गोष्टी मध्यावर आणते. त्यामुळे सजीवांना पोषक अस तपमान पृथ्वीवर निर्माण झाल आहे.
जर अजून कुठे ह्या विश्वात सजीव एलियन असतील तर ते अश्याच एखाद्या ग्रहावर असले पाहिजेत. त्यासाठी नासाची केपलर दुर्बीण ही पृथ्वीसारख्या ह्याबीटायटल झोन मध्ये असणाऱ्या ग्रहांचा शोध घेते. तर अश्याच अनेक ताऱ्यांच्या भोवती फिरणारे ग्रह आणि त्यांची कक्षा केपलर ज्या पद्धतीने शोधते ते खूप महत्वाच आहे. ताऱ्यानभोवती समजा अनेक ग्रह परिक्रमा करत आहेत आणि आपण लांबून कुठून तरी त्यांना बघत असू तर त्याचं अस्तित्व कळून येण अशक्य आहे. एकतर त्यांचा आकार कमी असेल ताऱ्यांच्या मानाने आणि ताऱ्यांच्या प्रकाशात त्याचं अस्तित्व दिसून येण शक्य नाही. पण जो प्रकाश ताऱ्यांकडून आपल्याकडे येतो तो मात्र आपल्याशी बोलतो. तर जेव्हा ताऱ्या समोरून कोणताही लहान मोठा ग्रह जातो. तेव्हा ताऱ्याकडून येणारा प्रकाश अंधुक होतो. ते अंधुक होण किती असेल हे त्या ग्रहाच्या आकारावर अवलंबून आहे. तसेच ते किती वेळानी होते ह्यावरून आपण त्या ताऱ्याभोवती तो ग्रह फिरण्याचा अंदाज लावू शकतो.
समजा आपण आपल्याच सौरमालेकडे लांबून बघितल तर जेव्हा गुरु ग्रह सूर्यासमोरून जाईल तेव्हा सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशात २% घट होईल. म्हणजे विचार केला तर सौरमालेतील गुरु सारखा अजस्त्र ग्रह सुद्धा फक्त २% घट सूर्याच्या प्रकाशात करतो. हे कमी होण पण विशिष्ठ वेळाने असेल ज्यावरून आपण गुरु ची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ठरवू शकतो. ह्या केपलर दुर्बीणने २०१६ -२०१७ च्या आसपास के २-१८ बी नावाचा ग्रह शोधला होता. हा ग्रह आपल्या के २ -१८ ह्या ताऱ्याभोवती ३३ दिवसात परीक्रमा करत आहे. ही सौरमाला साधारण पृथ्वीपासुन १११ प्रकाशवर्ष लांब आहे. ( साधारण ६५० मिलियन मिलियन किलोमीटर) (१११ वर्षात ३ लाख किलोमीटर / सेकंद वेगाने प्रकाशाने कापलेले अंतर). हा ग्रह ताऱ्यापासून ह्याबीटायटल झोन मध्ये असल्याचं केपलर ने शोधलं होतं. नुकत्याच झालेल्या संशोधनाने ह्या ग्रहावर पाण्याच अस्तित्व असल्याचं सिद्ध झालं आहे. हा ग्रह आकाराने पृथ्वीच्या दुप्पट असुन ह्यावरचं तपमान ० ते ४० डिग्री सेल्सिअस च्या मध्ये आहे. ह्यावरची ५०% जागा ही पाण्याने व्यापली असल्याचा अंदाज आहे.
ह्याच्या इतक्या अंतरामुळे तुर्तास तिकडे एखादं यान पाठवणं शक्य नाही. पण ह्या ग्रहावर हेलियम आणि हायड्रोजन असल्याचं सिद्ध झालं आहे. ह्या ग्रहाच्या वातावरणात शिरल्यामुळे गाळला गेलेल्या प्रकाशाचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केल्यावर हा शोध लागला आहे. आता ह्यावर नायट्रोजन, मिथेन आणि ओझोन चं अस्तित्व असण्याची शक्यता आहे पण ते सिद्ध करण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. नासा ची जेम्स वेब दुर्बीण अवकाशात गेल्यावर ह्यावर प्रकाश पडेल. तसेच ह्यावर वातावरण किती आहे? ह्यासाठी ही अजुन अभ्यासाची गरज भासणार आहे. नुसतं पाणी असण्याचे दाखले मिळाले म्हणजे जिवन आहे असा अर्थ होतं नाही पण के २-१८ बी चं तपमान अतिशय अनुकुल असुन ९४% पृथ्वीशी मिळते जुळते आहे. त्यामुळे इकडे जिवसृष्टी मिळण्याची शक्यता खुप जास्ती आहे.
हा के २ -१८ बी ग्रह एकटा नसुन केपलर ने शोधलेल्या पृथ्वी ते नेपच्युन च्या आकाराशी साधर्म्य असणाऱ्या १०० ग्रहांपैकी एक आहे. नासा च्या टेस मिशन मधुन ह्याच वर्षी अजुन अश्या १०० ग्रहांचा शोध लागण्याची शक्यता आहे. ह्या अश्या सगळ्या ग्रहांचा अभ्यास केल्यावर पृथ्वीसारखी जिवसृष्टी ह्या विश्वाच्या पोकळीत कुठे आहे का ह्यावर प्रकाश पडेल. तूर्तास आपली पृथ्वी ह्या विश्वाच्या पोकळीत एकटी असली तरी येत्या काळात आपण नक्कीच अजुन एखादी पृथ्वी शोधु असा विश्वास ह्या शोधानंतर वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.
माहिती स्रोत :- नासा, ई.एस.ए. (युरोपियन स्पेस एजन्सी)
फोटो स्रोत :- गुगल.
No comments:
Post a Comment