Saturday, 31 August 2019

शेवटच्या टप्प्यात... विनीत वर्तक ©

शेवटच्या टप्प्यात... विनीत वर्तक ©

३० ऑगस्ट २०१९ ला चंद्रयान २ ने चंद्राच्या भोवती फिरत असताना आपली कक्षा पुन्हा एकदा कमी करत चंद्रावर उतरणाच्या दृष्टीने शेवटच्या प्रवासाला सुरवात केली आहे. ११५५ सेकंद आपलं इंजिन चालू केल्यावर त्याने चंद्रयानाची कक्षा कमी करत त्याला १६४ किमी एपोजी ( चंद्रापासून सगळ्यात जास्ती अंतर ) गुणिले १२४ किलोमीटर पेरोजी ( चंद्रापासून सगळ्यात कमी अंतर) अश्या कक्षेत स्थापन केलं आहे. आता शेवटचा कक्षा बदल १ सप्टेंबर ला केल्यावर चंद्रयान २ ची कक्षा अजून कमी करून चंद्रावर उतरणाच्या घडामोडीनां सुरवात होईल. चंद्रयान २ हे १२१ किमी गुणिले १२५ किमी च्या कक्षेत आल्यावर इसरो महत्वाच्या अश्या शेवटच्या टप्प्याला सुरवात करेल.

शेवटच्या कक्षेत आल्यावर विक्रम रोव्हर आपल्या आत असलेल्या प्रग्यान रोव्हर सह चंद्रयान २ च्या ऑर्बिटर पासुन विलग होईल. एकदा विलग झाल्यावर विक्रम ल्यांडर चंद्रावर उतरण्यासाठी मार्गक्रमण करेल तर ऑर्बिटर (१०० किमी गुणिले १०० किमी ) त्या कक्षेत पुढील वर्षभर फिरत राहून चंद्राचा अभ्यास करत राहील. ऑर्बिटर पासुन रोव्हर विलग होण्याची प्रक्रिया सुरु होण्यासाठी इसरो च्या कमांड सेंटर मधुन निर्देश दिले जातील. अवघ्या काही मिलिसेकंदात कमांड मिळाल्याबरोबर रोव्हर ऑर्बिटर पासुन विलग होऊन चंद्राच्या भोवती फिरत राहील. ३ सप्टेंबर ला इसरो रोव्हर च्या सगळ्या सिस्टीम तपासुन त्याची कक्षा अजून कमी करण्याचे निर्देश देईल. त्या सोबत रोव्हर ची कक्षा कमी होतं रोव्हर चंद्रावर उतरण्यासाठी मार्गस्थ होईल.

विक्रम रोव्हर उतरणाच्या दोन जागा इसरो ने निश्चित केल्या आहेत. पहिली जी जागा आहे तिला पी.एल.एस.( प्रायमरी ल्यांडींग साईट) ५४ असं नाव असून ही जागा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या ऐटकेन बसीन पासून साधारण ३५० किलोमीटर लांब उत्तरेकडे आहे. ही जागा चंद्रावरील दोन विवरे मांझीनस सी आणि सिमपेलियस एन ह्यांच्या मधोमध आहे. ही जागा इसरो ने निवडण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत. पहिलं प्रमुख कारण म्हणजे ही जागा साऊथ पोलार रिजन मध्ये आहे. ह्याचा अर्थ चंद्राच्या ध्रुवीय भागात ह्या जागेचा समावेश होतो. ह्याच भागात बर्फाच्या स्वरूपात पाणी असल्याचं संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. दुसरं कारण म्हणजे ही जागा पृथ्वीच्या दिशेने असुन ह्या जागेचा चढ - उतार १५ डिग्री पेक्षा कमी आहे. ( चंद्रयान २ ला सरळ उतरण्यासाठी १२ डिग्री पेक्षा कमी चढ- उताराच्या जमिनीची गरज आहे. )  तिसरं कारण म्हणजे ह्या जागेत असलेले खडक हे ५० से.मी. पेक्षा कमी जाडीचे आहेत. त्यामुळे इथला बराचसा भाग समतल आहे. अजुन एक कारण म्हणजे इकडे असणारा सूर्यप्रकाश. इकडे सूर्याच्या किरणांना अडवेल अशी रचना कमी आहे त्यामुळे चंद्रयान २ ला ब्याटरी चार्ज होण्यासाठी १४ दिवस (पृथ्वीवरील ) सौर ऊर्जा मिळत राहणार आहे. चंद्रावर उतरण्याची दुसरी जागा आहे ए.एस.एल. ०१ ( एल्टरनेटिव्ह ल्यांडींग साईट) ह्या दोन्ही जागा चंद्राच्या एल.क्यू ३० चा भाग आहे. (चंद्राच्या भागाचं ३० भागात विभाजन केलं आहे. ह्या दोन्ही जागा चंद्राच्या ३० व्या भागाचा भाग आहेत. )

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेलं ऐटकेन बसीन हे आपल्या सौर मालेमधील अशनी च्या धडकेने झालेलं सगळ्यात मोठं विवर आहे. ह्याचा विस्तार सुमारे २५०० किलोमीटर इतका प्रचंड असून ह्याची खोली सुमारे १३ किलोमीटर इतकी प्रचंड आहे. हे विवर सगळ्यात मोठं, सगळ्यात जुनं, सगळ्यात खोल असलेलं विवर मानवाला ज्ञात आहे. ह्याच्या आकारामुळे इथे झालेला एखाद्या अशनी चा प्रहार किती प्रचंड असेल ह्याचा विचार आपण करू शकत नाही. तसेच इतक्या प्रचंड धडकेने चंद्राच्या आतील भूभागाच्या रचनेचा भाग असणाऱ्या अनेक गोष्टी इकडे ह्याच्या पृष्ठभागावर असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा भाग आजवर संशोधनाच्या दृष्टीने अजुन अलिप्त राहिलेला आहे.

भारताचं चंद्रयान २ ह्याच भागात उतरणार असल्याने पूर्ण जगाचं लक्ष त्या कडे लागलेलं आहे. नुकतंच नासा चा अंतराळवीर डोनाल्ड थॉमस हा भारताच्या दौऱ्यावर असताना त्याने केलेलं विधान हे खुप सूचक आहे. डोनाल्ड म्हणतो,

"The learning from the mission is of great interest to NASA because it is where NASA plans to land astronauts five years down the lane. They would be interested in knowing what the surface of the moon would be like, presence of minerals and chemicals and availability of of ice. Not just NASA, but the whole world would be interested in knowing about moon and the universe by following Chandrayaan -2"

आता भारताच्या चंद्रयान २ मोहिमेचा शेवटचा टप्पा सुरु झाला असून येते काही दिवस अतिशय महत्वाचे असणार आहेत. ह्या सगळ्यातून जर चंद्रयान २ सुखरूप चंद्रावर उतरलं तर पुर्ण जगाच्या अवकाश संशोधनात खूप मोलाची भर टाकणारा देश म्हणुन भारताची नोंद होणार आहे हे निश्चित. तूर्तास पुढल्या परीक्षेसाठी इसरो च्या वैज्ञानिक आणि संशोधकांना शुभेच्छा.

माहिती स्रोत:- गुगल, विकिपीडिया

फोटो स्रोत :- गुगल (फोटोत  ऐटकेन बसीन आणि चंद्रयान २ उतल्यावरचं काल्पनिक चित्र)

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment: