Thursday 1 August 2019

दोन देशांचा अवकाश प्रवास... विनीत वर्तक ©

दोन देशांचा अवकाश प्रवास... विनीत वर्तक ©


१९४७ ला जगाच्या नकाशावर दोन नवे देश पुन्हा एकदा उदयास आले. ब्रिटिशांनी फाळणी करून हिंदू- मुस्लिम मन तोडून भारत- पाकिस्तान ह्या दोन नव्या देशांना स्वातंत्र्य दिलं. दोन्ही राष्ट्रांनी मग आपल्या एका नवीन वळणावर प्रवास सुरु केला. दोन्ही देश गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी ने ग्रासले होते. १५० वर्षापेक्षा जास्त काळ राज्य करताना ब्रिटिशांनी दोन्ही देशांची अर्थव्यवस्था इतकी खिळखिळी केली होती की त्यातून उभं राहीला ह्या देशांना खूप वेळ लागला. आपापल्या वळणावर पुढे जात असताना प्रत्येक देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात आपापल्या परीने उभारी घेण्याचा प्रयत्न केला. आज ७० वर्षाचा काळ ह्या घटनेला उलटून गेला आहे. एका राष्ट्राच्या झेंड्यात आज चंद्र आहे तर एकाने आपला झेंडा चंद्रावर रोवला आहे.

पाकिस्तान ने फाळणी झाल्यावर विज्ञान, तंत्रज्ञानात भारतापेक्षा पुढाकार घेतला होता. अवकाश क्षेत्रात हा पुढाकार तर खूप लक्षणीय होता. पाकिस्तान चे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ अब्दुस सलाम ह्यांनी तत्कालीन राष्ट्रपती अयुब खान ह्यांना पाकिस्तान ला जर पुढे न्यायचं असेल तर अवकाश क्षेत्र हे महत्वाचं क्षेत्र असेल हे समजावून सांगितलं. अब्दुस सलाम ह्यांच्या सांगण्यावरून राष्ट्रपती अयुब खान ह्यांनी १६ सप्टेंबर १९६१ रोजी सुपारको (स्पेस एंड अप्पर ऍटमॉसफिअर रिसर्च कमिशन ) ची स्थापना केली. स्थापना केल्या केल्या सुपारको ने ७ जुन १९६२ ला पहिलं सॉलिड फ्युल साऊंडिंग रॉकेट बनवून त्याची चाचणी केली. १९७० दशकापर्यंत सुपारको जगाच्या नकाशावर अवकाश तंत्रज्ञानातील एक नवा तारा म्हणून उदयास आली होती. पण त्याच तेज हे क्षणभंगुर ठरलं. १९७० च्या नंतर राजकीय अनास्था, पाकिस्तान ने क्षेपणास्त्र आणि अणूबॉम्ब बनवण्याकडे दिलेलं लक्ष ह्यामुळे सुपारको चा अस्त अवकाश क्षितिजावरून झाला.

भारत मात्र ह्या काळात अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागे पडला होता. पाकिस्तान ने साऊंडिंग रॉकेट ची चाचणी केल्यावर भारताला जाग आली. १९६२ ला इन्कोस्पार ची स्थापना झाली. पण अवकाश संशोधन हे डिपार्टमेंट ऑफ ऍटोमिक एनर्जी च्या छत्रछायेखाली वाढत होतं. १९६९ साली इसरो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ची स्थापना होऊन पण इसरो ही डी.ए.ई. च्या खाली काम करत होती. अवकाश संशोधनाला ऍटोमिक एनर्जी पासून वेगळं करण्याचं मत तत्कालीन संशोधक विक्रम साराभाई ह्यांनी भारत सरकारकडे मांडलं. १९७२ साली भारताने अवकाश संशोधनाला वेगळा दर्जा देताना डिपार्टमेंट ऑफ स्पेस ची स्थापना केली. ह्या नंतर इसरो ने 'आर्यभट्ट' हा आपला पहिला उपग्रह १९७५ साली रशिया च्या मदतीने अवकाशात प्रक्षेपित केला.

इसरो ने फक्त उपग्रह निर्मिती कडे लक्ष न देता उपग्रह अवकाशात नेणाऱ्या रॉकेट वर काम सुरु केलं. १९८० च्या दशकात इसरो ने एस.एल.व्ही. ३ ह्या रॉकेट च्या मदतीने 'रोहिणी' हा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केला. ह्या नंतर इसरो ने दोन वेगळ्या रॉकेट प्रणाली वर काम करण्यास सुरवात केली. त्यातील एक म्हणजे ध्रुवीय प्रक्षेपक यान म्हणजेच पी.एस.एल.व्ही. आणि दुसरं रॉकेट जे जिओस्टेशनरी ऑर्बिट मध्ये उपग्रह नेऊ शकेल असं जी.एस.एल.व्ही. ह्या दोन्ही रॉकेट च्या निर्मितीत इसरो ला अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं. विशेष करून जी.एस.एल.व्ही च्या क्रायोजेनिक इंजिन निर्मितीत जवळपास एका दशकाचा कालावधी गेला. अमेरिका ने ह्या तंत्रज्ञानापासून भारताला वंचित ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केलें. शेवटी भारताने अनेक वर्षाच्या संशोधना नंतर ह्या इंजिनाची निर्मिती स्वबळावर करून भारत अवकाश तंत्रज्ञानात मागे राहणार नाही हे जगाला दाखवून दिलं.

एकेकाळी भारताच्या गरजांसाठी लागणारे उपग्रह निर्मिती ते प्रक्षेपण करणारी एजन्सी म्हणून इसरो चं नाव जगाला आणि खरं तर भारतीयांना अपरिचित होतं. भारताच्या गरजा पूर्ण केल्यावर इसरो ने आता अवकाश संशोधनाकडे लक्ष द्यायचं नक्की केलं. हळूहळू का होईना पण त्या दृष्टीने पावलं आपण टाकायला हवीत ही दूरदृष्टी डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम ह्यांनी वैज्ञानिकांपुढे मांडली. मग इसरो ने एका नवीन लक्ष्याकडे आपली पावलं टाकली. येणाऱ्या एका दशकात डॉक्टर अब्दुल कलामांची दूरदृष्टी किती महत्वाची होती हे भारतासकट पूर्ण जगाला कळून चुकलं. २००८ ला भारताने पहिल्यांदा चंद्रावर स्वारी केली. आपल्या पहिल्याच प्रयत्नात भारताचा तिरंगा चंद्रावर फडकला आणि भारताने जे जगाला जमलं नाही ते करून दाखवलं. चंद्रावर पाणी असल्याचं भारताच्या चंद्र मोहिमेने पूर्ण जगाला दाखवून दिलं. नंतर आलेली मंगळ मोहीम जगाच्या इतिहासात सगळ्यात स्वस्त इंटर प्लानेटरी मोहीम ठरली. तर पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान पाठवणार भारत जगातील पहिला देश ठरला. ह्याच सोबत भारताने आपल्या रॉकेट ना शक्तिशाली तसेच स्वस्त बनवतना एकाच रॉकेट मधून एकाच वेळेस तब्बल १०४ उपग्रह प्रक्षेपित करून इसरो ला जागतिक नकाशावर मानाचं स्थान मिळवून दिलं. (विनीत वर्तक ©)

भारताची इसरो अवकाश तंत्रज्ञानात अमेरिका, रशिया, चीन, युरोपियन एजन्सी, जपान ह्यांच्या सोबत घोडदौड करत असताना तिकडे सुपारको चा सुपडा मात्र साफ झाला. १९७० च्या दशकात घेतलेल्या आघाडी नंतर पाकिस्तान ची स्पेस एजन्सी राजकरण्यांच्या नाकर्तेपणामुळे काहीच करू शकली नाही. आपला स्वतःचा उपग्रह ही आजवर पाकिस्तान स्वतःच्या रॉकेट ने पाठवू शकलेला नाही. चीन च्या मदतीने भारताला शह देण्यासाठी २००६ च्या आसपास पुन्हा एकदा सुपारको ला ताकद देण्याचा प्रयत्न केला गेला. पण तरीही भारताने गेल्या काही दशकात घेतलेल्या तंत्रज्ञानातील आघाडी भरून काढण्यासाठी किंबहुना आज ज्या पातळीवर भारताची इसरो आहे त्या पातळीवर येण्यासाठी सुपरको ला अजून कमीत कमी ३०-४० वर्षांचा कालावधी लागेल असा तज्ञांचा अंदाज आहे. ह्या काळात भारताची इसरो जी झेप घेईल तिथवर पोहचणे सुपारको ला अशक्य असेल.

भारताने आपल्या ७५ व्या स्वातंत्र दिवसाच्या आधी अवकाशात आपल्याच भूमीवरून आपल्या लोकांना नेण्याचं लक्ष्य म्हणजेच 'गगनयान' मोहीम हाती घेतली आहे. भारताने ह्याची घोषणा केल्यावर लगेच पाकिस्तान ने आपण पण पाकिस्तान चा अवकाशवीर अवकाशात नेण्याचं जाहीर केलं. पण ह्या दोन्ही मोहिमेत जमीन - आकाशाचं अंतर आहे. पाकिस्तान आपला अंतराळवीर चीन च्या रॉकेट मधून अवकाशात नेणार आहे. जे कि भारताने २५ वर्षांपूर्वी रशिया च्या मदतीने राकेश शर्मा ह्यांना पाठवून कधीच तो मान मिळवलेला आहे. इकडे इसरो आपलं स्वतःच रॉकेट, स्वतःच अवकाश यात्री नेणारं मॉड्यूल, त्याला लागणारं तंत्रज्ञान स्वतः बनवून स्वतः त्यांना पुन्हा एकदा पृथ्वीवर सुखरूप उतरवणार आहे.


कोणी म्हणेल की आज इसरो आणि सुपारको ह्यांची तुलना होऊ शकत नाही कारण इसरो आज नासा, रॉसकॉसमॉस, इ.एस.ए., स्पेस एक्स, ह्या सारख्या संस्थांच्या तंत्रज्ञानाशी स्पर्धा करत आहे. ह्यांच्या तुलनेत सुपारको नाही च्या बरोबर आहे. पण इतिहास सांगतो की इसरो पेक्षा जवळपास ७ वर्ष आधी स्थापना आणि तंत्रज्ञानात आघाडी घेऊन पण सुपारको आज नावासाठी राहिली आहे. तर इसरो सोबत काम करण्यास पूर्ण जग रांग लावून उभं आहे. दोन देशांच्या अवकाश संस्थांचा हा प्रवास आपल्याला बरच काही सांगून जाणारा आहे.

माहिती स्रोत :- गुगल, विकिपिडिया

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment:

  1. अत्यंत छान माहिती मिळाली.

    ReplyDelete