Sunday, 18 August 2019

तिसऱ्या नजरेने ... विनीत वर्तक ©

तिसऱ्या नजरेने ... विनीत वर्तक ©

गेल्या काही  महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान ची हालत अतिशय बिघडलेली आहे. त्याची वाटचाल आता स्वतःच्या सर्वनाशाकडे सुरु झाली असली तरी त्याचे बरेचसे परीणाम भारताच्या वाटेला ही नकळत येणार आहेत. भारताने ३७० आणि ३५ अ कलम रद्द केल्याने मुळात काश्मीर हा विवादाचा भाग राहिलेला नसून भारताचं अविभाज्य अंग होणाच्या प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. ह्याचे चांगले, वाईट दोन्ही परीणाम येत्या काळात आपल्याला दिसणार असून उताविळपणा न करता परिस्थिती चं आकलन खूप महत्वाचं असणार आहे. कारण ह्याचे जेव्हढे चांगले परीणाम  शक्यता आहे तेवढीच वाईट परिणामांची पण आहे. कारण जेव्हा हरणाऱ्याला आपला पराजय समोर दिसतो तेव्हा समोरच्याला जिंकून न देण्यासाठी कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची त्याची तयारी असते अथवा तशी निर्मिती केली जाते. ह्यात हरणाऱ्याच वाटोळं झालं तरी त्याची झळ जिंकणाऱ्याला पण बसते.

गेल्या काही वर्षात जागतिक घडामोडींचे परीणाम पाकिस्तान च्या अर्थव्यववस्थेला भोगावे लागतं आहेत. विचार न करता आपले दिवसं ढकलण्यासाठी जनतेला फसवून सर्व जगाकडून कर्ज घेऊन त्याच पैश्याने स्वतःची तसेच अतिरेक्यांची, सेनेची पोट भरण्याचे परिणाम आता कर्ज चुकवताना दिसू लागले आहेत. आपल्या क्षमतांचा अंदाज न घेता सिपेक सारखा प्रकल्प दुसऱ्या देशाचे मनसुबे राखण्यासाठी आपल्या देशात राबवताना स्वतःच्या देशाच्या हिताचा विचार न पाकिस्तानी सरकारने केला ना जनतेला ह्याचा काही अंदाज आला. आता जेव्हा पाणी डोक्यावरून वाहू लागलं आहे तेव्हा सगळीकडे वाचवण्यासाठी धडपड सुरु झालेली आहे . नुकत्याच समोर आलेल्या आकडयात पाकिस्तान च्या डोक्यावर ९० बिलियन अमेरिकन डॉलर च कर्ज आहे हा आकडा दिवसेंदिवस जातो आहे. पाकिस्तान आपल्या कमाई मधील जवळपास ४२% टक्के हिस्सा हा फक्त कर्जाचे हफ्ते चुकवण्यात घालवतो आहे. हे वाचून काही भारतीयांना आनंदाची उकळी फुटली तरी हे चित्र भारतासाठी सगळ्यात जास्ती भयावह होऊ शकते. कारण पाकिस्तान त्याच्या कमाईचा फक्त १०% हिस्सा हा तिथल्या लोकांसाठी असलेल्या सरकारी योजनांसाठी खर्च करू शकत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गरीबी, बेरोजगारी वाढत जाते आहे. त्यातच पाकिस्तानी रुपयाचं अवमूल्यन आणि डॉलर च्या तुलनेत होणारी घसरण रोजच्या रोज लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढवत आहेत.

पाकिस्तान ची ढासळणारी अर्थव्यवस्था भारतासाठी चिंतेचा विषय ह्यासाठी आहे की ह्याचे दूरगामी परिणाम भारतावर होणार आहेत. पाकिस्तान ची हीच अशिक्षित जनता पैश्याच्या मोहाने धर्मांध लोकांच्या जाळ्यात अलगद सापडली जाते. 'जेहाद' च्या नावाखाली त्यांना अतिरेकी कारवाईसाठी प्रोत्साहन दिलं जाते. काश्मीर आपल्या हातून गेल्याची भावना ही पाकिस्तानी जनतेच्या मनात ह्या वेळेस तयार झाली आहे. युनायटेड नेशन मध्ये तोंडावर आपटलेला पाकिस्तान त्यात भारताने आता बोलणीमध्ये पाक व्याप्त काश्मीर चा फक्त विषय असेल तसेच पहिल्यांदा अण्वस्त्र वापर हा भारताच्या बाजूने ऑफेन्सिव्ह डिफेन्स असला तरी पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे. ह्या गोष्टीचे परीणाम दोन्ही बाजूने अतिशय खोलवर जाऊ शकतात. कदाचित पाकिस्तान ह्या सगळ्यामुळे जागतिक पातळीवर एकटा पडला आहे त्यात त्याची घसरणारी अर्थव्यवस्था ज्यात युद्ध किंवा कोणतीही सैनिकी कारवाई झाल्यास मुळासकट रसातळाला जाण्याची शक्यता आहे.

ह्या सगळ्या गडबडीत पाकिस्तान चं नुकसान होणार किंबहुना त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न जागतिक पटलावर निर्माण होईल हे येत्या काही वर्षात ठरलेलं आहे. पण ह्या भारताचे ही हात ह्यात गरज नसताना होरपळून निघणार आहेत. ते केव्हा,कसे, कितपत हे येणारा काळ ठरवेल पण ह्या सगळ्यात एक देश मात्र विन- विन बाजूने आहे. तो म्हणजे चीन. दोन्ही बाजूने ढोलकी वाजवून चीन ला कोणीही जिंकलं आणि हरलं तरी फायदा होणार आहे. ह्या भांडणात भारताची नष्ट होणारी शक्ती , पैसे  हे चीन ला हवे आहेत. त्याचवेळी जागतिक पटलावर पाकिस्तान ची बाजू घेऊन आपली ६५ बिलियन अमेरिकन डॉलर गुंतवणुकीचा परतावा तो सुनिश्चित करत आहे. पाकिस्तान ला सिपेक साठी दिलेलं कर्ज हे 'प्रोडक्टीव्ह लोन' प्रकारातील आहे. त्यामुळे ते जरी सरळ पैश्याचा स्वरूपात परत करायचं नसलं तरी त्यामुळे पाकिस्तान ला आपलं विदेशी मुद्रा भांडार खर्च करावं लागतो आहे. जर निर्यातीपेक्षा आयात जास्त राहिली तर पाकिस्तान कडे सामान आणण्यासाठी विदेशी मुद्राच राहणार नाही. ही परिस्थिती अजून भयंकर असेल कारण त्यानंतर चीन आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी तिथल्या एकूण उद्योगधंदे, शेती, जमिनी ह्यावर एक प्रकारे हक्क सांगू शकणार आहे. चीन चा हा छुपा अजेंडा श्रीलंका, तजाकिस्तान ह्या देशांनी अनुभवलेला आहे.

भारतासाठी  हेच महत्वाचं आहे की अश्या स्थितीत कोणत्याही गोष्टीचा उदो- उदो न करता शांतपणे, संयमाने आपल्या सीमेमधील परिस्थिती हाताळताना त्याच वेळेला शत्रूवर योग्य वचक ठेवणं. काही थोडेफार झटके लागणार आहेत कारण आपण आपला शेजारी बदलू शकत नाही. पण त्या परिस्थितीत जगातील बाकीच्या देशांची साथ भारताला जमवून आणावी लागणार आहे. कारण युद्ध पाकिस्तान शी नाही तर आपल्यापेक्षा दहा पट मोठ्या असलेल्या चीन शी आहे. ते ही छुपं आहे. ह्यासाठी 'दुश्मन का दुश्मन दोस्त' ह्या प्रमाणे चीन वागत असेल तर भारताने 'दुष्मनो के दुष्मनो से यारी करनी चाहिये' ही काळाची गरज आहे. जपान, इस्राईल, अति पूर्वेकडील देश ज्यात व्हियेतनाम, थायलंड तसेच म्यानमार, भुतान अश्या देशांची सोबत भारतासाठी खूप महत्वाची आहे. कारण हे सगळेच देश ह्या न त्या कारणाने चीन च्या वाढत्या सामर्थ्याला बळी पडत आहेत. अमेरिका ह्या सगळ्यात वरवर जरी भारताच्या बाजूने असली तरी तटस्थ राहण्यात ती एक सेकंदाचा विचार करणार नाही. रशिया सारखा मित्र मात्र भारताने जपायला हवा. कारण जोवर हे देश भारताच्या बाजूने उभे राहतील तोवर  चीन आणि पाकीस्तान दोघेही जगाच्या पुढे तोंडावर आपटत राहणार. चीन च्या छुप्या अजेंडाला चीन ला पुढे नेणं तितकंच कठीण होणार आहे. तूर्तास ह्या सगळ्या घडामोडीवर नजर ठेऊन आपला विकास करत राहणं हे भारतासाठी सगळ्यात महत्वाचं आहे.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment