Saturday 10 August 2019

#मंदिरांचं_विज्ञान भाग १७... विनीत वर्तक ©

#मंदिरांचं_विज्ञान भाग १७... विनीत वर्तक ©

मराठीत एक म्हण आहे "खाकेत कळसा आणि गावभर वळसा" अशीच परिस्थिती आज भारतीयांची आहे. दुसऱ्या देशातील गोष्टी बघण्यासाठी आपण हातचे पैसे खर्च करून तिकडे भेट देतो त्याचे फोटो टाकतो. तिथल्या मेलेल्या लोकांसाठी बांधलेल्या गोष्टी पण जागतिक आश्चर्य बनतात. पण आपल्या भारतीय संस्कृती चे दाखले बघायला मात्र कोणाकडे वेळ नसतो किंवा त्या बद्दल आजवर कोणी हा वारसा आपल्या येणाऱ्या पिढीकडे देण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसतं नाही. आपली संस्कृती किती उच्च होती ह्याचा मोठा दाखला म्हणजे भारतीय मंदिरे. पाश्चात संस्कृतीत मेलेल्या लोकांसाठी संस्कृतीचे दाखले देणाऱ्या कलाकृती बनवल्या गेल्या तर भारतात सृष्टीची रचना करणाऱ्यानां अमर केलं गेलं. हे करताना त्याला मानवाला त्या काळी माहित असलेल्या प्रत्येक गोष्टीला त्यात बसवलं गेलं मग ते स्थापत्यशास्त्र, तंत्रज्ञान, गणित, कला, संस्कृती, विज्ञान काहीही असो. ह्यांची सरमिसळ करताना पौराणिक गोष्टी, देव, देवता त्यांच्या शक्ती, त्यांची श्रद्धा ह्या सगळ्यांना तसूरभर ही धक्का लागणार नाही ह्याची काळजी घेतली गेली.

ह्या सगळ्या शाखांना एकत्र आणून अश्या अजोड कलाकृती निर्माण करण्यात आल्या की ज्यात ह्या सगळ्या शाखांना योग्य ते महत्व दिलं जाईल त्याच सोबत त्यांचं स्वतःच असं अस्तित्व दिसतं राहील आणि ह्या सगळ्यामध्ये भक्तिभाव, श्रद्धा ह्या भावनांना पण धक्का लागणार नाही. हे सगळं पेलणं तितकं सोप्प नाही. कलाकृती निर्माण केल्यावर ती सगळ्या नैसर्गिक प्रकोपावर मात करत टिकून राहील ह्यासाठी जागेची निवड, बांधण्याची पद्धत, बांधकामाचं साहित्य ह्या सगळ्याचा खोलवर विचार करून मग त्याच निर्माण केलं गेलं आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर कैलास मंदिरासाठी वेरूळ ची निवड करताना इथल्या दगडाचा अभ्यास नक्की केला गेला आहे. मंदिर कळसापासून पायापर्यंत उलट बांधलं आहे. समजा पायाकडच्या दगडात भेग अथवा फॉल्ट निघाला तर अनेक वर्षांची , कारागिरांची मेहनत लयाला जाण्याचा धोका. ह्याचसाठी प्रत्येक छोट्या, मोठ्या गोष्टीचा विचार प्रत्येक कलाकृतीच्या निर्मिती मध्ये केला गेला आहे.

भारतीय संस्कृतीत विज्ञान - तंत्रज्ञान, गणित, स्पेस- टाइम, ग्रह - तारे ह्या सगळ्या गोष्टींना महत्व दिलेलं आहे. प्रत्येक मंदिराच्या निर्मितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासाचा वापर केला गेला आहे. आपले पुर्वज आधीपासून आकाशाकडे त्यातल्या ग्रह ताऱ्यांकडे आकर्षित झाले होते. इतर कोणत्याही संस्कृती च्या इतिहासात ग्रह ताऱ्यांचा सखोल अभ्यास सुरु होण्याआधी भारतीय संस्कृतीत रात्रीच्या आकाशात लुकलुकणाऱ्या ताऱ्यांची तसेच त्यांच्या वेगवेगळ्या पुंजक्यांची नोंद केली गेली होती. वर्षाच्या पूर्ण कालावधीत कोणते पुंजके दिसतात आणि त्यांच्या एकत्र दिसणाऱ्या आकारावरून त्यांना नावं दिली गेली. चंद्राचं पूर्ण वर्षातील भ्रमण ज्या आकाशाच्या भागातून होते त्या रस्त्यावर जे तारकापुंज येतात त्यांना नक्षत्र आणि राशीत बसवलं गेलं. २७ नक्षत्र आणि १२ राशी मिळून पूर्ण वर्षाचं गणित मांडलं गेलं. १२ राशींना माणसाच्या स्वभावाशी जोडताना प्रत्येक राशीत भूतलावरची निदान भारतीय संस्कृती मधील सगळी लोकं त्यात बसवली गेली. मला राशीभविष्य ह्या मध्ये जायचं नाही. हे सगळं सांगण्याचं कारण इतकचं की ह्या १२ राशींच महत्व सांगणार आणि त्याचा संदर्भ सूर्याच्या भ्रमणाशी जोडून पुढच्या पिढीकडे राशी अभ्यासाचा वारसा सोपवलेलं एक मंदिर भारतात आहे. जवळपास ८०० वर्ष जुनं असलेलं हे मंदिर भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाचा एक अभिजात कलाविष्कार तर आहेच पण त्याचसोबत विज्ञान, तंत्रज्ञानाचा एक वारसा आहे. (विनीत वर्तक ©)

कर्नाटक राज्यात श्रींगेरी इकडे विद्याशंकरा हे मंदिर आहे. १३५७-५८ च्या काळात विजयनगर साम्राज्याच्या वेळेस ह्या मंदिराचं निर्माण केलं गेलं आहे. हे मंदिर होयसळ आणि द्रविडी स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. भारतातील इतर मंदिरा प्रमाणे ह्याच बांधकाम, कलाकुसर ह्यावर लिहायला घेतलं तर शब्द कमी पडतील इतकी सुंदर ह्याची रचना आहे. पण इकडे दोन गोष्टी भारतातील विज्ञान, तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास आजही आपल्याला दाखवतात. पहिलं म्हणजे इकडे असलेली १२ राशी खांबांची रचना. इथल्या पूर्वे कंदील मंडपात १२ खांब असून ह्यातील प्रत्येक खांब हा प्रत्येक राशीला वाहिलेला आहे. प्रत्येक खांबावर त्या त्या राशीला दर्शवणाऱ्या चित्रांची कलाकुसर केलेली आहे. पण ह्यांची रचना अश्या पद्धतीने केली आहे की सूर्य ज्या राशीत असेल त्या राशीच्या खांबावर त्या वेळेला सूर्याची किरणे पडतील. सूर्याच्या एका वर्षातील पूर्ण भ्रमणाचा अभ्यास करून तो कोणत्या राशीत कधी असेल ह्याचं गणित करून तसेच किरणे कश्या पद्धतीने प्रवेश करतील ह्या सगळ्यांची आकडेमोड करत त्याला कलेची, श्रद्धेची साथ देण्यात आली आहे. १२ खांबाच्या मध्ये गोलाकार रेषेत लाईन्स असून त्यावर सूर्याची सावली कशी पडेल हे दर्शवण्यात आलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मंडपाच्या बाहेर असणारी आणि आजही दिसणारी दगडी चेन. ह्या चेन मध्ये अनेक लूप एकमेकात अडकवले असून ही चेन जणू काही छताच्या दगडाला वेल्डिंग करून चिकटवलेली आहे. दगडाच वेल्डिंग होऊ शकते ह्यावर आपण आज विश्वास ठेवू शकणार नाही. पण त्याकाळी रॉक मेल्टिंग टेक्नोलॉजी सारखं तंत्रज्ञान अस्तित्वात असल्याशिवाय ह्या दगडी चेन ची निर्मिती अशक्य आहे. (विनीत वर्तक ©)

परकीय आक्रमणात ह्या दगडी चेन नष्ट केल्या गेल्या पण त्या बनवण्याचं तसेच त्यांना मुळ बांधकामाशी जोडण्याचं तंत्रज्ञान मात्र परकीय चोरून नेऊ शकले नाहीत. काळाच्या ओघात रॉक मेल्टिंग टेक्नॉलॉजी नष्ट झाली असली तरी ही दगडी चेन भारतीय संस्कृतीच्या तंत्रज्ञानातील प्रगती मधील एक मैलाचा दगड आहे. ताजमहाल च्या सौंदर्यामध्ये कला असेल तर ह्या दगडी चेन असलेल्या मंदिरात कलेचा आत्मा आहे कारण ते बनवताना किती बारीक,सारीक गोष्टींचा विचार केला गेला असेल हे कळण्यासाठी कशी बनवली गेली असेल ह्याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने करावा. १२ राशी स्तंभ असो वा दगडी चेन ह्यातील प्रत्येक गोष्ट ही अवर्णनीय अशी आहे. ज्याचा आस्वाद आपण तिकडे जाऊनच घेऊ शकतो. दुसऱ्या संस्कृतीत जागतिक आश्चर्य शोधून त्याचा अभ्यास नक्की करावा त्यांना नक्की भेट द्यावी पण त्याच सोबत आपल्या घरात असलेल्या मंदिराच्या विज्ञानाला ही समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

माहिती स्रोत :- गुगल
फोटो स्रोत :- गुगल.



No comments:

Post a Comment