Sunday 25 August 2019

मंगळाचे मिशन मंगळ... विनीत वर्तक ©

मंगळाचे मिशन मंगळ... विनीत वर्तक ©

भारताचे मंगळयान अर्थात मॉम मंगळाच्या कक्षेत विराजमान व्हायला आता ५ वर्ष येत्या २४ सप्टेंबर ला पूर्ण होतील. मंगळावर भारत स्वारी करू शकतो हा विचारच ज्याकाळी पुर्ण जगासाठी एक धक्का होता तेव्हा तो भारतीयांसाठी पण होता. इसरो आपल्या स्वबळावर मंगळावर स्वारी करू शकते ह्याचा विश्वास न भारतीयांना होता ना खुद्द इसरो ला. २४ सप्टेंबर ला पंतप्रधान जेव्हा मंगळाच्या कक्षेत मॉम स्थापन होणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते तेव्हा खुद्द तत्कालीन इसरो चिफ के. राधाकृष्णन ह्यांनी त्यांना ह्या यशाबद्दल आपण सांशक असल्याचं कळवलं होतं. अपयशाची शक्यता जास्ती असुन भारत हे मिशन यशस्वी करू शकेल ह्याची शक्यता कमी असल्याचं म्हंटल होतं. पण इसरो ने जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवलं.

ह्या मोहिमेच्या प्रत्येक क्षणाचा मी साक्षीदार झालो होतो. मग ते मॉम च भारतातून उड्डाण असो वा मंगळाच्या कक्षेत स्थापन होणं असो. ह्या प्रत्येक क्षणाला मी लाईव्ह अनुभवलं होतं. आज पुन्हा एकदा मिशन मंगळ बघताना त्याचा अनुभव आला. भारतीय प्रेक्षक जो प्रेमाच्या बाहेर जाऊन विचार करत नाही. चाकोरीबद्ध चित्रपटा पलीकडे जाऊन सिनेमागृहात चित्रपट बघत नाही अश्या वेळेस मंगळ मिशन सारख्या वैज्ञानिक घटनेवर आधारीत असलेल्या चित्रपटासाठी हाऊस फुल चा बोर्ड नक्कीच कुठेतरी सुखावणारा होता. बऱ्याच संख्येने नवीन पिढीने ह्या चित्रपटासाठी गर्दी केली होती. वैज्ञानिक आशय असलेल्या चित्रपटात मनोरंजन होईल असं काय असेल? असा एक प्रश्न मनात आला पण चित्रपट बघताना विज्ञाना सोबत मनोरंजन मसाला चित्रपटात नक्कीच आहे ह्याचा अनुभव आला.

मुळातच भारताच्या वैज्ञानिक प्रगतीवर एखादा बॉलिवूड चित्रपट येणं हे एक धाडस आहे. युरोप च्या देशात आणि खान लोकांच्या प्रेमात डुबलेल्या भारतीय प्रेक्षकाला काहीतरी वेगळं लवकर सहसा पचनी पडत नाही असा अनुभव आहे. हिरो ह्या शब्दाच्या संकल्पना इतक्या स्वप्नवत आहेत की त्याच्या इमेज ला लागलेला धक्का त्याला सहन होतं नाही. त्यामुळेच मिशन मंगळ हा एक धाडसी प्रयोग होता. चित्रपट म्हंटला की त्यात अतिशियोक्तीपणा आलाच काही गोष्टींना विनोदात, गाण्यात बसवण्याचा केलला प्रयत्न ही आलाच. त्यामुळे चित्रपट कुठेतरी पकड सोडून दुसरीकडे जातो आहे असं वाटत असताना पुन्हा एकदा चित्रपट मुळ विषयाकडे वळतो. इसरो च यश हे त्यांच्या सामान्य असणाऱ्या वैज्ञानिक, संशोधक ह्यामुळे मिळालेलं आहे. आपण कसं दिसतो? आपल्याबद्दल लोकं काय विचार करतात? ह्या पेक्षा आपण काय करू शकतो ह्याचा विचार करणारे १७,००० पेक्षा जास्ती लोकांची इसरो टीम ह्या मोहिमेसाठी झटली होती. पैसे किती मिळणार? आपला काय फायदा? ह्या पेक्षा आपण देशाचं नाव पुढे नेऊ शकतो. आपलं स्वप्न जगू शकतो ही भावना इसरो मध्ये मोठी होती म्हणून इसरो आपल्या पहिल्या प्रयत्नात मंगळावर स्वारी करू शकली. (विनीत वर्तक ©)

मिशन मंगळ ह्या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे रॉकेट लॉंचिंग चे इफेक्ट्स. रॉकेट उड्डाण बघताना अंगावर अक्षरशः शहारे उभे राहतात. मंगळ यानाचा प्रवास अजून चांगल्या पद्धतीने नक्कीच दाखवता आला असता. शेवटच्या क्षणी चित्रपट आटोपलेला वाटला. पब मधल्या सिन पेक्षा रॉकेट च्या प्रवासावर जास्ती वेळ द्यायला हवा होता. चित्रपटातील पात्र योग्य आणि अयोग्य ज्याला जसे वाटेल तसे त्याने ठरवावे. चित्रपटात थोडा बाज आणण्यासाठी दिलेला धर्माचा रंग, तरुण, देवावरील श्रद्धा ते पर्सनल लाईफ मधील घटनांचा संबंध हे प्रेक्षकांनी बघताना ह्या विज्ञान कथेचा एक भाग म्हणून घेतले तर तितकासा त्रास होतं नाही. महत्वाचं होतं ते आपण अशी एखादी मोहीम यशस्वी करू शकतो आणि ते करताना येणाऱ्या अडचणींवर भारतीय वैज्ञानिकांनी शोधलेली उत्तरे. भारताचा मंगळ प्रवास किती अडचणींचा होता हे पोहचवण्यात चित्रपट यशस्वी होतो ह्यात शंका नाही. ह्या चित्रपटात सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे चित्रपटाचा शेवट झाल्यावर भारताच्या सर्व टिम ला दिलेली एक पोचपावती. चित्रपटातील प्रत्येक हिरो आणि हिरोईनची नाव तोंडपाठ असणारी पिढी भारताच्या पडद्यामागे राहून काम करणाऱ्या वैज्ञानिकांना ओळखत नाही. त्यांची ओळख ह्या निमित्ताने ह्या सगळ्या लोकांना झाली हे नसे थोडके.

थोडक्यात काय तर मंगळाचे मिशन मंगळ नक्कीच एक चांगला प्रयत्न आहे. येत्या २४ सप्टेंबर रोजी मंगळयान आपल्या ५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आजवर ह्या मोहिमेतून १००० पेक्षा जास्त मंगळाची छायाचित्र मॉम ने इसरो ला पाठवली आहेत. ६ महिन्यांचं आयुष्य असणारं मॉम आज ५ वर्ष झाली तरी काम करत आहे. ह्यातून इसरो च्या अभियांत्रिकी दर्जाचा आपण अंदाज बांधु शकतो. २०१४ ला कक्षेत स्थापन होताना मॉम वर ३२ किलोग्रॅम इंधन बाकी होतं. आपली कक्षा सुरळीत ठेवण्यासाठी मॉम ला वर्षाला फक्त २ किलोग्रॅम फ्युल लागते. ह्याचा सरळ अर्थ आहे की मॉम जवळपास पुढली १५ वर्षापेक्षा जास्ती काळ मंगळाच्या कक्षेत फिरत राहू शकते. पण ह्यावरील उपकरणं अवकाशातील रेडिएशन तसेच ह्यावरील ब्याटरी किती तग धरते ह्यावर ते किती काळ इसरो शी संवाद करू शकेल हे अवलंबून आहे. आज ५ वर्ष उलटून गेल्यावर ही ह्यावरील उपकरणं व्यवस्थित काम करत असून इसरो ला माहिती पाठवत आहेत. मंगळ मिशन हा एक चित्रपट म्हणून न पाहता इसरो च्या अविश्वसनीय अश्या प्रवासाचा साक्षीदार होण्याची संधी काही प्रमाणात आज आपल्याला मिळत आहे. त्या संधीचा उपभोग आणि फायदा प्रत्येक भारतीयांनी न चुकता घ्यावा.


सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment