Thursday, 15 August 2019

वसुधैव कुटुंबकम... विनीत वर्तक ©

वसुधैव कुटुंबकम... विनीत वर्तक ©


आज भारताने ७३ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या दिमाखात साजरा केला. १५ ऑगस्ट १९४७  भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारत हालाखीच्या परिस्थितीत होता. तब्बल १००० वर्ष भारताच्या संस्कृतीने आणि देशाने जगाच्या व्यापारावर वर राज्य केले होते. १००० साली भारत जागतिक व्यापाराचा ३०% हिस्सा आपल्याकडे राखून होता. हळूहळू  वाटचाल तळाच्या दिशेने सुरु झाली आणि  भारतात आल्यावर भारत आपलं अस्तित्व जगाच्या पटलावरून  बसला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सत्तेची वाताहत सुरु झाली होती. अश्या वेळेस कंगाल बनलेला भारत त्यांच्यासाठी पांढरा हत्ती बनला होता. म्हणून ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देताना त्याचे दोन तुकडे करत हे तुकडे आपसात नेहमी भांडत बसून भारत पुन्हा कधी ह्यातून उभारी घेऊ शकणार नाही अशी व्यवस्था करून ठेवली होती.

१९५० च्या आसपास रसातळाला असलेल्या भारताच्या इकोनॉमी ने हळूहळू उभारी घ्यायला सुरवात केल्यावर ही वाढ अतिशय संथ होतं होती. किंबहुना भारत जागतिक पातळीवर कधी उभारी घेऊ शकतो हे  त्याकाळच्या अर्थशास्त्रींना वाटत होतं. २१ व शतक उजाडताना जागतिक व्यापाराचे संदर्भ अचानक बदलून गेले. चीन आणि भारत ह्या दोन्ही देशांनी एके काळी जागतिक व्यापारावर राज्य केले होते. त्यांचे दिवस पुन्हा बदलले. चीन ह्या काळात प्रचंड मुसंडी मारत अग्रस्थानाकडे वाटचाल सुरु केली तर भारत संथ कासवाप्रमाणे पुढे जात होता. २००३ नंतर मात्र भारतीय अर्थव्यस्थेने जो वेग घेतला त्याने भारत पुन्हा एकदा जागतिक व्यापारात लक्षणीय भागीदार झाला. २०५० च्या आसपास भारत जगातील ३ री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनेल असं भविष्य आजकाल सगळेच अर्थशास्त्री आता व्यक्त करत आहेत.

जगातील मोठ्या अर्थव्यस्थेचा देश म्हणून उदयास येत असताना पण जगासाठी असलेलं आपलं कर्तव्य भारत विसरलेला नाही. भारतासाठी पूर्ण जग हे "वसुधैव कुटुंबकम" राहिलेलं आहे. त्याचाच  भाग म्हणून आज जग भारताकडे एक दानशूर देश म्हणून बघतं आहे. आपल्या शत्रूच्या अडचणीच्या काळात पण भारत खंबीरपणे मागे उभा राहिलेला आहे. जमिनीवरील प्रदेश वादाचा विषय असू शकेल पण त्यात राहणारी माणसं ही आपल्या नागरिकांसारखीच आधी एक माणूस आहेत ह्याचा अनुभव भारताच्या शत्रूंनी घेतलेला आहे. २००५ साली पाकिस्तान ला भूकंपाचा तडाखा बसला. भारताने आपल्या शत्रू देशाला तब्बल २५ मिलियन अमेरिकन डॉलर चं  आर्थिक सहाय्य दिलं. २०१० पाकिस्तना ला पुराचा तडाखा बसला ह्यावेळेस ही भारताने तब्बल २५ मिलियन अमेरिकन डॉलर ची मदत पाकिस्तान ला केली.  २००६ साली चीन ला एका मोठ्या भूकंपाने तडाखा दिला भारताने लगेच ५ मिलियन अमेरिकन डॉलर ची मदत चीन ला दिली. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती मध्ये भारत माणुसकी म्हणून चीन च्या सोबत उभा राहिला. 

२००५ ला भारतीय एअर फोर्स च एक विमान अमेरिकेत २५ टन वजनाच साहाय्य घेऊन उतरलं. कॅटरिना चक्रीवादळात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी भारताने हे साहित्य अमेरिकेला दिलं होतं .आजवर भारताने श्रीलंकेला वेगवेगळ्या आपत्ती मध्ये जवळपास १२० मिलियन डॉलर ची मदत केली आहे. भारताला बाकीच्या देशांकडून नैसर्गिक आपत्ती मध्ये जितकी मदत मिळाली आहे त्यापेक्षा कैक पट जास्ती मदत भारताने जगाला दिली आहे. २००४ ला आलेल्या त्सुनामी मध्ये आपल्या पूर्व तटावर लोकांना मदत करताना पण भारतीय नौदलाने आपली मदत इंडोनेशिया, श्रीलंका सारख्या देशांना देताना १२ बोटी, १००० पेक्षा जास्त सैनिक माणुसकीच्या दृष्टिकोनातून तैनात केले होते. ज्यांनी कित्येक लोकांचे प्राण वाचले आहेत. देश, पंथ, शत्रू, मित्र असा कोणताही भेदभाव ना करता भारत कोणत्याही नैसर्गिक अथवा कृत्रिम आपत्ती च्या वेळी सगळ्यात आधी उभा राहिला आहे.

२०१० येमेन यथे युद्ध सदृश्य परिस्थितीत भारताने एक, दोन नाही तर तब्बल २५ देशांच्या नागरिकांना सुखरूप युद्ध भूमीवरून बाहेर काढलं होतं. ज्या प्रदेशात जायला दुसऱ्या कोणत्याही देशाची विमानं घाबरत होती त्या वेळेस भारताची एअर फोर्स आणि एअर इंडिया भारतीय नेव्ही च्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवत होतं. ह्या २५ देशात जर्मनी, अमेरिका, फ्रांस सकट पाकिस्तानी नागरिक ही होते. ह्या व्यतिरिक्त भारताने वेगवेगळ्या गरीब देशांना जे की आफ्रिका, लॅटिन अमेरिका, कॅरेबियन येथिल आहेत अश्या देशात त्यांची प्रगती होण्यासाठी अर्थसहाय्य दिलं आहे. जवळपास २७९ लाईन्स ऑफ क्रेडिट देताना ६३ देशांना २८ बिलियन डॉलर ची मदत केली आहे. ह्या पलीकडे जाऊन भारताने गल्फ ऑफ एडन जो की समुद्री चोरांचा भाग आहे अश्या भागातून भारतासह इतर देशांच्या १५०० पेक्षा जास्ती व्यापारी नौकांना जवळपास ३० युद्धनौका तैनात करून सुरक्षित प्रवास करून दिला आहे. भारतीय नौदलाच्या ह्या कामगिरीमुळे जवळपास ३० पेक्षा जास्ती व्यापारी बोट लुटण्याचे प्रयत्न विफल झाले आहेत.

जेव्हा जगात अतिरेकी कारवायांचा बिमोड करून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रश्न येतो तेव्हा ही भारत मागे राहिलेला नाही. युनायटेड नेशन च्या पिस किपींग मिशन मध्ये भारतीय सैनिकांची कामगिरी अत्युच्य आहे. आजवर २ लाखापेक्षा जास्त सैनिकांनी ४९ पेक्षा जास्त मिशन मध्ये आपलं रक्त सांडून जागतिक शांतता नांदवण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावलेली आहे. आज इंडियन आर्मी च्या सैनिकांना जगात सगळ्यात जाती मानाचं स्थान त्यांच्या ह्या मिशन मधील बहादुरी सोबत माणुसकीच्या दर्शनासाठी मिळालेलं आहे. दुसऱ्या देशांच्या पकडलेल्या सैनिकांना तसेच इतर लोकांना जिवंत असताना किंवा मृत्युमुखी पडल्यावर ही त्यांच्या शरीराला भारत ज्या पद्धतीने सन्मानीय वागणूक देतो त्याचा आदर्श जगातील इतर देशांनी घ्यावा असं युनायटेड नेशन ने जगातील सगळ्याच देशांना सांगितलेलं आहे. हे सगळं करताना आपलं साम्राज्य विस्तारणाच्या महत्वाकांशा भारताने कधीच दाखवलेल्या नाहीत. भूतान सारखा लहान देश असो वा पाकिस्तान सारखा शत्रू भारताने कधीच त्यांच्या अंतर्गत कारभारावर पकड घेण्याच्या दृष्टीने कोणतीच मदत केलेली नाही. चीन च्या छुप्या अजेंड्या सारखा भारताने मदत करताना कोणताच अजेंडा ठेवलेला नाही. भारताने आपल्या संस्कृती मधील एका वाक्यावर हा प्रवास केला आहे ते म्हणजे "वसुधैव कुटुंबकम"

आज भारत ७३ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतो आहे. गेल्या सात दशकात भारताने मारलेली मजल मोठी असली, तो पुन्हा एकदा जागतिक महासत्तेच्या दृष्टीने वाटचाल करू लागला तरी भारताने आपलं आचरण जगात आदर्शवत ठेवलेलं आहे. भारताच्या ह्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आहुती दिलेली आहे. त्यांचं स्मरण करताना भारताचं हे आचरण ह्यापुढेही २१ व्या शतकात पुढे नेण्याची जबाबदारी तुमच्या, आमच्या ह्या पिढीची आणि येणाऱ्या पुढल्या पिढीची आहे. कारण देश, खंड, धर्म, जात हे सगळं वेगळं असलं तरी "वसुधैव कुटुंबकम" मानणारा आमचा देश हा एकमेव आहे. ह्या देशात जन्माला आल्याचा अभिमान आज प्रत्येक भारतीयाला असलाच पाहिजे.

जय हिंद.....

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

माहिती स्रोत :- गुगल, विकिपीडिया

फोटो स्रोत :- गुगल



No comments:

Post a Comment