Friday, 16 August 2019

एक थरार... विनीत वर्तक ©

एक थरार...  विनीत वर्तक ©


२७ फेब्रुवारी २०१९ चा तो दिवस भारतासाठी नाही तर पूर्ण जगासाठी एक थराराचा दिवस होता. २६ फेब्रुवारी ला भारताने पाकिस्तान मधील बालाकोट इकडे हवाई हल्ला करून अतिरेकी तळ उध्वस्थ केल्यावर पाकिस्तान काही न काही कारवाई करेल ह्याचा अंदाज भारतीय सैन्याला होता. २७ फेब्रुवारी ला अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारताच्या दिशेने कूच केले. ४ थ्या पिढीतील एफ १६ विमानांनी भारताच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले करण्याच्या पाकिस्तानी स्वप्नांना भारतीय हवाई दलाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. भारतीय हवाई दलाच्या रडारवर लाल टिपके दिसताच भारताच्या सुखोई एम.के.आय. ३० आणि मिग बायसन २१ विमानांनी उड्डाण केलं. भारताच्या सुखोई, मिग च्या फळीपुढे आपण तग धरू शकणार नाही ह्याची कल्पना येताच पाकिस्तानी विमानांनी पुन्हा पाकिस्तानकडे कूच केलं पण तोवर ते भारतीय हवाई हद्दीत घुसले होते. विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान ने आपल्या शत्रूला कोंडीत पकडताना एका अविश्वसनीय थरारात पाकिस्तान च्या एका एफ १६ विमानाला नष्ट केलं. विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान आणि त्याला ह्या थरारात सहकार्य करणारी स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल ह्या दोघांना नुकतंच बहादुरीसाठी सैन्य पादकांनी गौरवण्यात आलं. विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान ह्याला वीर चक्र तर स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल हिला युद्ध सेवा मेडल देण्यात आलं. स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल हे मेडल मिळवणारी पहिली महिला आहे. 

२७ फेब्रुवारी चा हा थरार भारत आणि पाकिस्तानसाठी मर्यादित राहिला नाही तर पूर्ण जगाने त्याची नोंद घेतली. हि नोंद कशासाठी? नक्की हा थरार काय होता? ह्यात विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान आणि स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल ह्यांची बहादुरी समजून घेणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. २७ फेब्रुवारी चा हा थरार समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान ज्या विमानाचं सारथ्य करत होता ते होतं मिग बायसन २१. मिग २१ हे दुसऱ्या पिढीतील लढाऊ विमान असून ह्याचा जन्म ६ दशके आधी १९५९ ला रशियात झाला होता. ५६ वर्षांपूर्वी भारताने ही विमाने रशियाकडून खरेदी केलेली आहेत. खरे तर एवढ्या काळ सेवा देत असलेली ही विमान अमेरिकेच्या चौथ्या पिढीतील अग्रगण्य मानल्या गेलेल्या एफ १६ समोर कुठेच बसत नाहीत. ह्यांची तुलना करणं म्हणजे मारुती ८०० ची तुलना मर्सिडीझ बेंझ शी करणं ज्यात सगळ्याच पातळीवर मारुती ८०० कुठेच बसतं नाही. मग असं काय घडलं होतं की एका दुसऱ्या पिढीतील मिग बायसन २१ विमानाने एफ १६ चा वेध घ्यावा. ह्याच कारणासाठी २७ फेब्रुवारी चा थरार हा अमेरिके सोबत पूर्ण जगातील युद्ध नीतीच्या अनेक लोकांनी अभ्यासला. 

अमेरिकेचं एफ १६ हे लढाऊ विमान फ्लाय बाय वायर सिस्टीम मधील विमान आहे. ह्याचा अर्थ होतो की ह्याच रडार, मिसाईल, एव्हीओनिक्स हे अतिशय उच्च दर्जाचं असून लक्ष्यावर नेम धरण्यासाठी पायलट ची गरज भासत नाही. म्हणजे आपलं लक्ष्य ते स्वतःच टार्गेट करून लॉक करू शकते.  त्या तुलनेत मिग २१ जरी खूप जुनं लढाऊ विमान असलं तरी भारताने त्यात त्याची बॉडी आणि इंजिन सोडून सगळ्या गोष्टींवर बदल केलेले आहेत. मिग बायसन २१ व्हर्जन मध्ये नवीन रडार, मल्टी फंक्शन डिस्प्ले स्क्रीन, आर ७२ एअर टू एअर सरफेस मिसाईल तसेच एडव्हान्स हेल्मेट बसवलेलं आहे. ह्या हेल्मेट मध्ये अशी क्षमता आहे की विमानाला शत्रूच्या विमानाचा रोख पकडण्याची गरज नाही. बस पायलट ने त्या लक्ष्याकडे बघितलं की ते टार्गेट लॉक होऊन त्या लक्ष्याकडे विमानातील मिसाईल कूच करते. अश्या विविध अपग्रेडमुळे मिग बायसन २१ ची क्षमता कमालीची वाढली आहे. त्यामुळे एफ १६ च्या आसपास ते पोहचू शकते. 

मारुती ८०० ला कितीही नवीन पार्ट्स बसवले तरी तिची क्षमता मर्सिडीझ बेंझ पेक्षा कमी राहणार हे सर्वश्रुत आहे. पण नुसती गाडी चांगली असली म्हणजे शर्यत जिंकता येते असं होतं नाही. ह्या सगळ्यात एक भाग असतो चालकाचा. असं म्हणतात की, "चांगला खेळणारा खराब पत्ते असताना सुद्धा बाजी आपल्या बाजूने उलटवू शकतो". जो चालक चांगला, ज्याला आपल्या गाडीचे कच्चे,पक्के दुवे ठाऊक आहेत तो बाजी कधीही पलटवू शकतो. तब्बल ५० वर्षापेक्षा जास्ती काळ मिग बायसन २१ चे सगळेच दुवे भारतीय पायलट ना माहित आहेत. आपली क्षमता कुठे जास्त आणि कुठे कमी ह्याचा पूर्ण अंदाज सरावामुळे त्यांना आहे. ह्यामुळेच मिग बायसन २१ हाताळण्याचं त्यांचं कौशल्य सर्वोत्तम आहे. ह्याची कल्पना अमेरिकेला २००४ सालीच आली होती जेव्हा कोप इंडिया जॉईंट एक्सरसाइज मध्ये भारताने ९:१ अश्या विक्रमी आघाडीने अमेरिकेला धूळ चारली होती. आपल्या एफ १६ ला ६० वर्ष जुनं मिग २१ काय टक्कर देणार ह्या भ्रमात अमेरिका आणि त्यांचे पायलट होते. पण तेव्हा मिग बायसन २१ च्या हवेतील चालवण्याच्या कौशल्याने अमेरिकेने तोंडात बोटे घातली होती. २००५ साली पुन्हा एकदा अमेरिका सरावाने उतरली पण तेव्हा ही भारताच्या सुखोई ३० एम.के.आय.आणि मिग बायसन २१ ह्यांनी त्यांना चांगलीच धूळ चार्ली. सलग दोन वर्ष हा पराभव त्यांना इतका जिव्हारी लागला की पेंटागॉन ला विशेष बैठक बोलावून एफ १६ च्या निर्मात्यांना खडे बोल सुनवावे लागले होते. ६० वर्ष जुनं तंत्रज्ञान वापरून पण रशियाने बनवलेली सुखोई, मिग विमानं आपल्या विमानांना टक्कर कशी काय देऊ शकतात? असा सवाल पेंटोगॉन ने एफ १६ च्या निर्मात्यांना केला होता.  

अमेरिकेला एक कळून चुकलं होतं ते म्हणजे ह्या विमानांच सारथ्य करणारं "एक्स फ्याकटर" म्हणजेच भारतीय पायलट. भारतीय वायू दलातील जांबाज, बहादूर आणि कमालीचं ट्रेनिंग असलेल्या पायलटमुळे ६० वर्ष जुनं विमानं ही आपल्याला भारी पडतात. २७ फेब्रुवारी २०१९ च्या थरारात पुन्हा एकदा ते स्पष्ट झालं. विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान चं  ट्रेनिंग आणि खडतर प्रसंगात निर्णय घेण्याची क्षमता त्याच्या जोडीला स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल ने दिलेला ग्राउंड सपोर्ट, रडार माहिती हे ह्या थरारात भारताची जमेची बाजू ठरले. निर्णय घेणारा जर विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान होता तर त्याला रस्ता दाखवणारी स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल होती. म्हणून भारताच्या मिग बायसन २१ ने भूतो न भविष्यती कामगिरी करताना पाकिस्तान च्या एफ १६ ला गारद केलं. त्यामुळेच हा थरार जगाच्या इतिहासात एक अभ्यासाचा विषय म्हणून समाविष्ट झाला. काल ह्या दोघानांही भारत सरकारने त्यांच्या अत्युच्य कामगिरीसाठी रक्षा पदक देऊन त्यांचा गौरव केला. प्रत्येक भारतीय नागरिकाने त्यांच्या ह्या बहादूरीला सलाम करायलाच हवा... ह्या दोघांना माझा सलाम आणि कडक सॅल्यूट. 

माहिती स्रोत :- गुगल 

फोटो स्रोत :- गुगल ( पहिल्या फोटोत मिग बायसन २१ आणि एफ १६, दुसऱ्या फोटोत विंग कमांडर अभिमन्यु वर्धमान, तिसऱ्या फोटोत स्क्वार्डन लीडर मिंटी अग्रवाल) 

  सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




1 comment: