Monday 5 August 2019

एक काळा दिवस... विनीत वर्तक ©

एक काळा दिवस... विनीत वर्तक ©

५४ वर्षांपूर्वी जगात दुसरं महायुद्ध सुरु होतं. एकीकडे मित्र राष्ट्र तर दुसरीकडे जर्मनी, जपान सारखी राष्ट्र. दुसऱ्या महायुद्धाची सुरवात साधारण १९३९ झाली असली तरी त्याचा धोका अमेरिकेने आधीच ओळखला होता. हिटलर च्या नाझी कॅम्प मध्ये अणूबॉम्ब बनवण्याची सुरवात झाली असेल अशी दाट शंका त्या काळाच्या अनेक नोबेल विजेत्या अमेरिकन भौतिक विज्ञान संशोधकांना आली होती. अमेरिकेने अणूबॉम्ब च्या निर्मितीत पुढाकार घेण्यासाठी "मॅनहॅटन प्रोजेक्ट" १९३९ सालच्या आधीच सुरु केले होते. ह्यातील वैज्ञानिकांनी युरेनियम २३५ आणि प्लुटोनियम २३९ ह्यांच्या अणूंचे विखंडन करून अणूबॉम्ब बनवण्याच्या दृष्टीने पावलं टाकली होती. १६ जुलै १९४५ ला जे. रॉबर्ट ओपेनहायमार ह्यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने न्यू मेक्सिको इकडे प्लुटोनियम बॉम्ब ची चाचणी घेतली. ह्या चाचणीत १८,००० टी.एन.टी. इतकी ऊर्जा उत्पन्न झाली. ( टी.एन.टी. म्हणजेच म्हणजेच १ ग्राम ट्रीनीट्रोटोल्युने हा स्फोटक पदार्थ जाळल्यावर निर्माण होणारी ऊर्जा. साधारण ४००० ज्यूल्स (ज्यूल हे ऊर्जा मोजण्याचं एकक आहे)) ही चाचणी होई पर्यंत मित्र राष्ट्रांनी जर्मनीचा पाडाव केला होता. जपान ऐकत नव्हता. अमेरिकेन जनलर डग्लस मॅकआर्थर ह्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितलं होतं की 'ऑपरेशन डाऊनफॉल" सुरु असून जपान वर बॉम्ब वर्षाव करून त्यांचा पडावं केला जाईल. पण हे व्हायला वेळ जावा लागेल. ह्या सगळ्यात अमेरिका पण साधारण १ मिलियन (१० लाख) लोक जखमी अथवा मृत्युमुखी पडू शकतात.


अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्रुमन ह्यांना १ मिलियन ह्या आकड्याने अस्वस्थ केलं. त्यांना युद्ध कसही करून लवकर संपवायचं होतं. नुकत्याच झालेल्या अणुबॉम्ब च्या चाचणीने अणुबॉम्ब चा पर्याय ट्रुमन ह्यांना मिळाला होता. आजवर ह्या बॉम्ब च्या हल्याने किती हानी होईल ह्याचा अंदाज कोणाला नव्हता. त्यामुळे अणुबॉम्ब चा वापर न करण्याचा सल्ला अनेक सिनियर संशोधक, वैज्ञानिक आणि मिलिटरी लोकांनी ट्रुमन ह्यांना दिला. पण ट्रुमन ह्यांना अणुबॉम्ब वापरल्याने युद्ध लवकर संपेल आणि अमेरिका शक्तिशाली असल्याचा संदेश जगात जाईल हे योग्य वाटलं. त्यांनी जपान वर अणुबॉम्ब टाकण्यास संमती दिली.

६ ऑगस्ट १९४५ रोजी रोजी ९००० पाउंड ( साधारण ४०९० किलो) वजनाचा "लिटिल बॉय" नावाचा युरेनियम २३५ ने बनवलेला अणुबॉम्ब बी-२९ बॉम्बर विमानावर लोड केला गेला. हिरोशिमा, साधारण ३.५ लाख लोकवस्तीचं शहर जपान चं उत्पादन केंद्र म्हणून ओळखलं जात होतं. त्याची निवड हा बॉम्ब टाकण्यासाठी केली गेली. सकाळी साधारण ८ वाजून १५ मिनिटांनी "लिटिल बॉय" ला बॉम्बर विमानाने हिरोशिमावर टाकलं. हिरोशिमा च्या जमिनीपासून २००० फुटावर "लिटिल बॉय" फुटला. फुटता क्षणी त्यातून साधारण १२,००० ते १५,००० टी.एन. टी. क्षमतेचा स्फोट झाला. काही कळायच्या आत ५ मैलाचा प्रदेश बेचिराख झाला. ८०,००० लोकं एका क्षणात मृत्युमुखी पडली. रेडिएशन आणि इतर गोष्टींमुळे जवळपास १ लाख ९२ हजार पेक्षा जास्त लोकं ह्या एका स्फोटात मृत्युमुखी पडली. एवढं करून जपान शरण येतं नाही हे बघून अमेरिकेने ३ दिवसांनी म्हणजेच ९ ऑगस्ट १९४५ ला नागासाकी ह्या जपान च्या दुसऱ्या शहरावर सकाळी ११ च्या सुमारास "फ्याट म्यान" हा प्लुटोनियम बॉम्ब टाकला. ह्या बॉम्ब चं वजन साधारण १०,००० पाउंड (४५०० किलोग्रॅम पेक्षा जास्ती ) होतं. ह्याची क्षमता २२,००० टी.एन.टी. इतकी होती. पण नागासाकी हे शहर डोंगर खोऱ्यात वसलेलं असल्याने ह्या बॉम्ब चा प्रभाव फक्त २.६ मैल क्षेत्रावर पडला. ह्यात ७०,००० लोकं एका क्षणात मृत्युमुखी पडली. ह्या दोन्ही अणुबॉम्ब हल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा २,२५,००० पेक्षा जास्ती आहे.

हिरोशिमा, नागासाकी वर झालेल्या हल्ल्यानंतर जपान चे राजे हिरोहितो ह्यांनी १५ ऑगस्ट १९४५ रोजी दुसऱ्या महायुद्धात सपशेल शरणागती पत्कारली. अश्या रीतीने दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला. जपान वर टाकलेल्या "लिटिल बॉय" आणि "फ्याट म्यान" च्या निर्मितीसाठी राबवलेल्या मिशन "मॅनहॅटन प्रोजेक्ट" वर १,३०,००० लोकांनी काम केलं होतं तर तब्बल १७ भौतिकशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या वैज्ञानिकांनी ह्यात आपलं योगदान दिलं होतं. अमेरिकेने ह्यासाठी त्याकाळी तब्बल २ बिलियन अमेरिकन डॉलर खर्च केले होते. जपान ने शरणागती पत्करल्यावर अमेरिकेत विजयी जल्लोष साजरा केला गेला. पण त्या जल्लोषात अमेरिकेने दोन लाखापेक्षा जास्ती निष्पाप जिवांचा बळी घेतला होता.

एक दोन नाही तर १७ नोबेल पारितोषिक विजेत्यांनी जगातील एका काळया दिवसाची निर्मिती केली असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. नक्कीच त्यांचा उद्देश अणुऊर्जेचा उपयोग विधायक कार्यासाठी व्हावा हा असेल किंवा वाटत ही असेल तरी अणुऊर्जा ही दुधारी तलवार असल्याचं त्यांना नक्कीच आजच्या दिवसानंतर त्यांना जाणीव झाली असेल. अमेरिका जिंकली आणि जपान हरला तरी आजचा दिवस जगाच्या इतिहासात एक काळा दिवस नक्कीच आहे. ह्या दोन्ही अणुबॉम्ब हल्यात त्या काळी मृत्युमुखी पडलेल्या तसेच आज ५४ वर्षानंतर ही त्या रेडिएशन चे चटके सोसणाऱ्या सर्वाना माझी विनम्र श्रद्धांजली आणि नमस्कार.

माहिती स्रोत :- गुगल

फोटो स्रोत :- गुगल (लिटिल बॉय आणि फ्याट म्यान अणुबॉम्ब )


सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment