माझ्या नजरेतून ( भाग १ )... विनीत वर्तक ©
विहरीत अडकलेल्या बेडकासारखी आपली कधी कधी गत होते. आपण बघतो तेच विश्व असं अनेकदा आपल्याला वाटत रहाते. माझ्या जन्मापासून ते सरकारी नोकरीत असेपर्यंत आयुष्याचा सगळा भाग धावणाऱ्या मुंबईशी जोडला होता. कदाचित त्यामुळे मुंबई बाहेर असणाऱ्या विश्वाशी नाळ जुळण्याचे प्रसंग कमीच आले. नंतर मात्र कामाच्या निमित्ताने फिरताना देशासोबत अनेक वेगवेगळ्या देशांचे लोक, सामाजिक जीवन, तिथली निसर्ग समृद्धी अनुभवायला मिळाली. मग आयुष्याचे अनेक संदर्भ बदलत गेले. विहरीपुरती मर्यादित असलेलं माझं विश्व कधी महासागरात बदलून गेलं मलाच कळलं नाही. त्यातून आचारात, विचारात जे बदल झाले त्याने माझं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून गेलं. आयुष्याचे असे अनुभव आपल्याला नेहमीच जास्ती प्रगल्भ करत असतात नाही का?
देशाच्या अगदी काना कोपऱ्यात असलेल्या गावा गावातून फिरताना अनेक माणसं भेटली. कधी आपुलकी ने बोलणारी तर कधी तिरस्काराने बघणारी. पण सगळीच काही न काही नाळ जोडून गेली. जात, भाषा, प्रांत आणि देश ह्या पलीकडे माणूस घेताना अनेकदा आपल्याच व्यक्तिमत्वाला आपण दुसऱ्यात शोधत आहोत असा भास अनेकदा झाला. आपल्यासाठी वाटणाऱ्या शुल्लक गोष्टी कोणासाठी खूप महत्वाच्या असतात ते आपल्या वाणाच्या दुकानात मिळणारी एक साधी गोष्टपण अनेकदा मिळवण्यासाठी डोंगराएवढे कष्ट करावे लागतात हे पण अनुभवायला मिळालं.
मुंबईत सकाळ झाली की स्टेशन वरची अनाउन्समेंट ऐकायला यायची. स्टेशन जवळच घर असल्याने ट्रेन चे हॉर्न आणि रुळांचा ऐकू येणार तालबद्ध आवाज ह्याची सवय कानाला झाली असल्याने त्या आवाजाकडे लक्ष द्यायला न मला वेळ असायचा न माझ्या मेंदूला. पण काम करताना मी नेहमीच जगाच्या अश्या भागात असतो की जिकडे माणूस हा प्राणी कमी असतो. त्यामुळे तिथली जीवघेणी शांतता मात्र अनेकदा मला अस्वस्थ करून जाते. कोणीतरी असण्यापेक्षा कोणीतरी नसण्याचा त्रास मी नेहमीच अनुभवला आहे. स्वतःशी बोलणं मला आधी खूप वेड्यासारखं वाटायचं पण आता त्याची सवय झाली आहे. माणसांच्या गराड्यात राहूनपण एकटेपणा अनुभवायची मज्जा आता शिकलो आहे.
सकाळी शाळेत जाताना मुलं बघितली आणि माझ्या विहरीपलीकडंच विश्व मला दिसायला लागलं. पाठीवरच दप्तर सांभाळत हातात काठी घेऊन बाजूच्या जमिनीवर एक लांब रेष सोडत आपल्याच मस्तीत जगणाऱ्या त्या जीवांना बघून मुंबई सारख्या शहरात बैलांसारखं मार्कांच्या शर्यतीत जुंपलेल्या मुलांची न राहवून आठवण झाली. शाळेत जाणं ह्या वेळेतले क्षण सुद्धा अविस्मरणीय असू शकतात आणि आज आपल्या विहरीत आपण त्यांना गमावून बसलो आहोत हे पुन्हा एकदा कळून चुकलं. हातातून निसटलेल्या अनेक गोष्टी अश्या पटकन समोर उभ्या राहतात तेव्हा नक्की काय करावं अनेकदा सुचत नाही. चेहऱ्यावर त्या मुलांना बघून उमटलेलं स्मित हास्य मात्र त्यांना आणि मला बरच काही सांगून गेलं.
आपण समजतो त्या पलीकडे ही बरच काही आहे ज्याची जाणीव तर जाऊन दे पण कल्पना ही आपल्याला नसते. बेडकासारख कूपमंडूक होऊन आपण आपल्याच विश्वात रमत असतो. त्यातून बाहेर पडलो तर एका वेगळ्याच विश्वाची जाणीव आपल्याला होते. फक्त विहिरीतून बाहेर येण्याची आणि ते विश्व अनुभवण्याची आपली तयारी हवी..
No comments:
Post a Comment