Saturday 8 June 2019

स्पाईस... विनीत वर्तक ©

स्पाईस... विनीत वर्तक ©

पुलवामा इथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्यानंतर पूर्ण देश शोकाकुल झाला होता. ह्या घटनेने पूर्ण देशभरात संतापाची लाट होती. अतिरेक्यांच्या ह्या भ्याड हल्याच उत्तर त्यांच्याच भाषेत देण्यासाठी भारत सरकार आणि भारतीय सेना दोघांवर दडपण आलं होतं. हे उत्तर जशास तश्या पेक्ष्या एकास दहा ह्या गुणोत्तरात दाखवण्याची वेळ आली होती. २६ फेब्रुवारी च्या रात्री भारतीय वायू सेनेने बालाकोट इथल्या अतिरेक्यांच्या तळावर हल्ला केला. ह्या कारवाईत जवळपास ३०० पेक्षा जास्ती अतिरेकी मारले गेले. अर्थात ह्या आकड्यावरून राजकारण झालं आणि होतं असलं तरी ह्या हल्याने अतिरेक्यांच खूप नुकसान झालं हे सर्वश्रुत आहे. बालाकोट इथल्या यशस्वी कारवाईत भारतीय वायू सेना, मिराज २००० लढाऊ विमान आणि त्यांचे पायलट ह्यांचा मोठा हात असला तरी त्यांच्या ह्या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली होती ती ‘स्पाईस’ ह्या गायडेड गायडंस कीट ने. नुकतेच भारताने असे १०० कीट इस्राईल ह्या देशाकडून जवळपास ४३.२ मिलियन अमेरिकन डॉलर ( ३०० कोटी रुपये) खरेदी करण्याचा करार केला असून येत्या ३ ते ६ महिन्यात हे कीट भारताच्या संरक्षणात दाखल होतीलं.

‘स्पाईस’ चा अर्थ आहे ( Smart, Precise Impact, Cost-Effective) वर सांगितलं तसे स्पाईस ही एक गायडेड गायडंस सिस्टीम असून ह्याची निर्मिती इस्राईल च्या राफेल एडव्हान्स डिफेन्स सिस्टीम ने केली आहे. इस्राईल देश संरक्षण उत्पादन आणि त्यातील तंत्रज्ञान क्षमतेत पूर्ण जगात ओळखला जातो. भारत आणि इस्राईल चे राजनैतिक संबंध मजबूत असल्याने इस्राईल ने तंत्रज्ञानाच्या बाबतीत वरचढ असलेलं ‘स्पाईस’ तंत्रज्ञान भारताला दिलेलं आहे. तर नक्की काय आहे असं की ह्या ‘स्पाईस’ मुळे बालाकोट च्या हल्यात पाकिस्तान ला कोणतीही बातमी न लागता हल्ला केला गेला तसेच ह्या बॉम्ब ज्यांना ‘स्पाईस बॉम्ब’ म्हंटल गेलं त्यांनी अगदी अचूक आपली कामगिरी फत्ते केली. ‘स्पाईस’ तंत्रज्ञानाच्या अचूकतेमुळेच बालाकोट कारवाई मध्ये इतक्या प्रचंड अतिरेक्यांचा खात्मा झाला.

स्पाईस गायडेड गायडंस सिस्टीम ही दोन भागांची बनलेली असते. ह्यात एक भाग आकाशातून टाकता येणाऱ्या बॉम्ब च्या पुढे तर दुसरा मागे बसवण्यात येतो. पुढल्या भागात इलेक्ट्रो ऑप्टीकल गायडंस सिस्टीम तर मागच्या भागात बॉम्ब ला उडण्यासाठी पंख असतात. जमिनीवर शत्रू लक्ष्याचा पूर्ण अभ्यास झाल्यावर ती सगळी माहिती ह्या कीट च्या मेमरी चीप मध्ये टाकण्यात येते. ज्यात त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती, जी.पी.एस. लोकेशन, उपग्रहावरून किंवा ड्रोन ने घेतलेली छायाचित्रे तसेच तिथल्या आजूबाजूच्या परिसराची माहिती ते बॉम्ब नक्की कुठे फुटण गरजेच आहे अशी सगळी माहिती ह्या चीप मध्ये टाकण्यात येते. त्यानंतर हे स्मार्ट बॉम्ब घेऊन लढाऊ विमान उड्डाण करून आपल्या ठरलेल्या ठिकाणी हवेतून ह्या स्पाईस बॉम्ब ला हवेत डागतात. हवेत सोडल्यावर स्पाईस सिस्टीम मधला कॉम्प्यूटर आधीच सांगितलेल्या लक्ष्याची छायाचित्र, जी.पी.एस. लोकेशन कॉड्रीनेट ह्यांचा ताळमेळ साधतो. पुढल्या भागात असलेला कॅमेरा तसेच इलेक्ट्रो ऑप्टीकल गायडंस सिस्टीम लक्ष्याचा ताळमेळ साधत बॉम्ब ला जवळपास ६० किमी च्या पट्यात मागे असलेल्या पंख्यांनी ग्लाईड करून लक्ष्यभेद करू शकते. ह्यामुळे बॉम्ब चा सी.ई.पी. म्हणजेच सर्क्युलर एरर प्रोबेबल अवघे ३ मीटर चा आहे.

स्पाईस गायडेड गायडंस सिस्टीम मधील हे तंत्रज्ञान सीन म्याचींग अल्गोरिदम ने काम करते. ह्याच्या पुढल्या टोकावर असलेली सिस्टीम पुढे दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींना टिपून आधीच आत ठरवलेल्या लक्ष्याशी जोडते. ह्यात बदल असल्यास अथवा झाल्यास त्या प्रमाणे बॉम्ब ची दिशा, तसेच बॉम्ब पडण्याची जागा ह्यात बदल करून लक्ष्यभेद करण्याची ह्या सिस्टीम ची क्षमता आहे. ही सिस्टीम इतर रेडीओ, उपग्रह संदेश ह्यावर अवलंबून नसल्याने ह्या बॉम्ब ना रडार वर पकडणं अतिशय कठीण समजलं जाते. ह्याची क्षमता ६० किमी. ची असल्याने सुरक्षित क्षेत्रात राहून स्पाईस सिस्टीम असलेले बॉम्ब डागता येतात. तसेच जवळपास १०० लक्ष्य ह्यात आधीच साठवून ठेवता येतात. ह्यापेकी कोणत्या लक्ष्यावर हल्ला करण्याचा निर्णय पायलट किंवा योग्य ती व्यक्ती शेवटच्या क्षणी घेऊ शकते.

स्पाईस गायडेड गायडंस सिस्टीम कोणत्याही बॉम्बची अचूकता कैक पटीने वाढवून त्याचवेळी शत्रूला हल्याची पूर्व कल्पना होऊ न देता लढाऊ पायलट चं आयुष्य वाचवण्यात मोलाची भूमिका बजावते. बालाकोट इथल्या अचूक हल्यात स्पाईस गायडेड गायडंस सिस्टीम चा मोठा हात आहे. ह्याची उपयुक्तता ह्या हल्यात दिसून आल्यावर भारत सरकारने तातडीने ह्या सिस्टीम च्या मागणीचा करार इस्राईल सोबत करून भारताच्या वायू दलाला समर्थ बनवण्यासाठी पावले टाकली आहेत. त्याबद्दल त्याचं अभिनंदन. स्पाईस गायडेड गायडंस सिस्टीम बसवलेले बॉम्ब राफेल विमानांवर बसवल्यानंतर शत्रूला शेवटचा श्वास घेण्याची ही संधी मिळणार नाही. संपूर्ण जगात इस्राईल आणि भारत ह्या दोनचं देशांकडे स्पाईस गायडेड गायडंस सिस्टीम आहे. ह्यावरून इस्राईल आणि भारत ह्या दोन्ही देशाचे असलेले घनिष्ठ संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.



No comments:

Post a Comment