Sunday, 16 February 2020

एका हल्याचा बदला ( भाग १) ... विनीत वर्तक ©

एका हल्याचा बदला ( भाग १) ...  विनीत वर्तक ©

१४ फेब्रुवारी २०१९ ला झालेल्या पुलवामा इथल्या अतिरेकी हल्यात सी.आर.पी.एफ. च्या ४० जवान शहीद झाले. हल्ला इतका जबरदस्त होता की त्यादिवशी चं चित्र पूर्ण भारताला कुठेतरी आतून पोखरून गेलं. पाकीस्तान आजपर्यंत अतिरेकी आणि त्यांच्या मसीहांना पोसत आलेला आहे. त्याच पिलावळीच एक शेपूट म्हणजे जैशे ए मोहम्मद ही अतिरेकी संघटना. हीच संघटना पुलवामा हल्यासाठी जबाबदार होती. पाकीस्तान ने भूतकाळात ही असेच हल्ले करत भारताच्या अनेक निष्पाप नागरीक आणि सैनिकांचा बळी घेतलेला होता. त्यांनी हल्ला करायचा आणि भारताने फक्त तोंडाने वाफ सोडायची असा शिरस्ता गेली अनेक वर्ष चालू होता. पण ह्या वेळेस चा हल्ला भारताच्या सैनिकांचं मनोधैर्य खच्ची करणारा होता. पाकिस्तानी अतिरेक्यांनी अगदी टिपून भारतीय सैनिकांना आपलं लक्ष्य केलं होतं. ह्या ही वेळेस राजनैतिक संबंध, प्ररराष्ट्र धोरण आणि पाकीस्तान ची अण्वस्त्र ह्यांना घाबरून भारत पुन्हा काही दिवसांनी शांत होईल असा अंदाज पाकीस्तान आणि इतर देशांनी बांधला पण ह्या वेळेस च्या हल्याने कुठेतरी भारताच्या सहन करणाच्या क्षमतेला खिंडार पाडलं होतं. त्यानंतर जे झालं तो इतिहास आहे.

आज एक वर्षानंतर काही राजकारणी पुन्हा एकदा त्याच गोष्टींचं राजकारण करू पाहत आहेत. भारताने बालाकोट ने काय मिळवलं? इथपासून ते नक्की भारताने पुलवामा हल्याचा बदला घेतला का? ह्या सगळ्या प्रश्नांना धुमारे फुटले आहेत. मला त्यात जायचं नाही पण भारताने एक गोष्ट केली ज्याचा अभिमान आणि त्याचा प्रभाव येणारी अनेक वर्ष पाकिस्तानातील प्रत्येक अतिरेक्याच्या डोक्यात राहील. ती गोष्ट म्हणजे बालाकोट हवाई हल्ला. आज एका वर्षानंतर भारताच्या बदललेल्या भूमिकेचा प्रभाव कायम आहे. नक्कीच बालाकोट हल्याने आतंकवाद थांबणार नाही किंवा असे हल्ला पुन्हा होणार नाहीत ह्याची खात्री आपण देऊ शकत नाही. पण एक खात्री देऊ शकतो ती म्हणजे आता तोंडाने वाफा काढत भारत रडत बसणार नाही. अर्थात तशी कणखर भूमिका घेणारं राजकीय नेतृत्व, भारताची आर्थिक स्थिती आणि इतर देशांशी असलेले संबंध ह्याचा प्रभाव नक्कीच असेल पण तरीही कुठेतरी शहिदांच बलिदान वाया जाऊ देणार नाही.

एका चिनी जनरल ने म्हंटल होतं,

"If you know the enemy and know yourself, you need not fear the result of a hundred battles. If you know yourself but not the enemy, for every victory gained, you’ll also suffer defeat. If you know neither the enemy nor yourself, you will succumb in every battle".

पुलवामा हल्यानंतर भारताला ह्याची जाणीव झाली की आपण जर नुसत्या आण्विक युद्धाची भिती घेऊन कारवाई केली नाही नाही आणि आपल्या आर्थिक, सैनिकी शक्तीला कुठेतरी महत्व दिलं नाही तर पाकीस्तान असे हल्ले करत राहणार आणि भारताचे निष्पाप नागरिक आणि सैनिक मरत राहणार. पाकीस्तान चे नागरीक भारताचे शत्रू नाहीत तर भारताचे शत्रू पाकीस्तानी अतिरेकी आणि त्यांना पोसणारे आहेत. जर भारताला जर बदला घ्यायचा आहे तर तिथेच घ्यावा लागेल जिकडे सगळ्यात जास्ती दुखेल. जिकडे झालेली जखम दाखवता पण येणार नाही आणि लागलं ते सांगता पण येणार नाही. त्याचवेळी त्याने होणारं नुकसान येणाऱ्या काळात टोचत राहील. भारताने नेमकं हेच केलं.

चोरून अण्वस्त्रधारी झालेला पाकीस्तान आणि त्याचे मूर्ख राज्यकर्ते त्या अण्वस्त्रांचा प्रयोग कधीही करू शकतात त्यामुळेच बदला घेताना पण डोकं शांत ठेवून घ्यावा लागणार होता. एक चूक आणि त्याच परीवर्तन युद्धात किंवा भारताला त्याचे चटके लागू शकतात ते भारतावर बाजी उलटू शकते अशी बिकट परिस्थिती होती. एकीकडे त्या ४० जवानांच बलिदान, लोकांचा आक्रोश आणि प्रक्षोभ तर दुसरीकडे राजनैतिक संबंध, परराष्ट्र धोरण आणि पाकिस्तान आणि भारतातले त्याचे चाहते जे भारतात राहून त्यांची भाषा बोलत होते. ह्या सगळ्यांना एका दगडात गप्प बसवण्याचं शिवधनुष्य भारताच्या सेना, वायू आणि नौदला सोबत राजकीय नेतृत्वाला पेलायच होतं. २०१६ साली केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तान पुलवामा हल्यानंतर अश्या पद्धतीच्या हल्यासाठी आधीच तयारीत होता त्यामुळे पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करणं सोप्प ही नव्हतं आणि भारताला प्रतिउत्तर एकास दहा अश्या स्वरूपात द्यायचं होतं. त्यामुळे हा ऑप्शन बाजूला गेला. दुसरा ऑप्शन म्हणजे हवेतून ठरलेल्या लक्ष्यावर मारा करणं पण ह्यात एक अडचण होती ती म्हणजे नक्की शत्रू कुठे आहे त्या स्थानाचे कॉर्डीनेट माहित असणं अत्यंत गरजेचं होतं. कारण चुकीच्या ठिकाणी हल्ला झाल्यास निष्पाप लोकांचा बळी जाण्याची भिती होती.

भारताला जवळपास १५ अतिरेकी केंद्रांची माहिती होती जिकडे अतिरेकी तयार केले जातात. जेहाद च्या नावाखाली त्यांना निष्पाप लोकांवर गोळी
चालवण्यासाठी तयार केलं जाते. अश्या केंद्रांवर बॉम्ब टाकल्यास एकाचवेळी अनेक अतिरेक्यांचा खात्मा होऊ शकतो हे भारताला आणि भारताच्या सेनेला चांगलं ठाऊक होतं. पण अडचण एकच होती की ह्या सगळ्यात निरपराध लोकांना त्रास होता कामा नये पण त्याचवेळी पाकीस्तान च्या नाकावर टिच्चून बदला घ्यायचा होता. बालाकोट च अतिरेकी केंद्र मुख्य शहरापासून लांब तसेच वर्दळी पासून लांब होतं. त्याचवेळी तिकडे साधारण तयार झालेले आणि तयार होण्यासाठी आलेले जवळपास २००-३०० अतिरेकी जमले होते. पुलवामा हल्यानंतर सगळे त्या यशाचा आनंद साजरा करून अजून अश्या अनेक हल्याची तयारी करण्यात गुंग होते. त्यामुळे बालाकोट भारताच्या गुप्तचर संस्था आणि सेनेच्या रडारवर आलं.

क्रमशः

पुढल्या भागात बदल्याची आखणी आणि हवाई हल्ला करणाऱ्या विमानाची माहिती.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment