Sunday 9 February 2020

अवकाशाला गवसणी घालणारी क्रिस्टिना कोच... विनीत वर्तक ©

अवकाशाला गवसणी घालणारी क्रिस्टिना कोच... विनीत वर्तक ©

'If you want to shine like a sun, first burn like a sun'.... Dr. A. P. J. Abdul Kalam

कोणताही यशाचा क्षण यायला अनेक वर्ष मेहनतीची जावी लागतात. कदाचित हाच अनुभव आज क्रिस्टिना कोच घेतं असेल. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे की पृथ्वीपासून साधारण ४०० किलोमीटर उंचीवर पृथ्वीभोवती फिरत आहे तिकडे जवळपास ३२८ दिवसांचा काळ व्यतीत करून एक जागतिक विक्रम क्रिस्टिना कोच ने आपल्या नावावर केला आहे. सर्वाधिक काळ एक सलग अवकाशात राहण्याचा विक्रम तिने केला आहे. पेगी विटसन च्या नावावर ३ मोहिमेत ६६५ दिवस राहण्याचा जागतिक विक्रम आहे पण क्रिस्टिना कोच ने एकाच मोहिमेत सलग इतके दिवस राहून अवकाशात स्री च्या अस्तित्वाचा एक नवीन झेंडा रोवला आहे.

क्रिस्टिना कोचच्या मते तिचा विक्रम हा तिच काम करताना झालेला एक प्रवास आहे. अवकाशात राहून क्रिस्टिना कोच ने अनेक गोष्टींवर काम केलं आहे ज्यात प्रामुख्याने अवकाशात इंधन कसं जळते? त्यातून निर्माण होणारा धूर तसेच ती विझवण्यासाठी काय करावं लागेल? ह्याच सोबत इंधन अजून जास्ती चांगल्या पद्धतीने कसं वापरता येईल ज्यायोगे पृथ्वीवरील प्रदूषण कमी होईल. ह्या शिवाय अवकाशात वाढणाऱ्या झाडांवर प्रयोग केले आहेत. झाडांच्या वाढीवर गुरुत्वाकर्षण आणि वातावरण ह्यांचा कसा प्रभाव पडतो. ह्या शिवाय वृक्ष रोपण आणि त्यांची देखरेख  इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये कसं अवकाशवीरांच्या मनस्थितीवर प्रभाव पाडते. ह्याच सोबत इतका जास्त काळ अवकाशात राहिल्याने किडनी तसेच शरीरांच्या कार्यावर होणारा परिणाम. तसेच प्रोटीन क्रिस्टल च्या रूपात तिने केलेलं संशोधन पार्किन्सन आणि अल्मायझर रोगांवर सगळ्यांना उपयोगी पडणार आहे. एक स्री म्हणून अवकाशात स्री च्या शरीरावर होणाऱ्या  परिणामांचा अभ्यास करण्यात तिने मोलाची भूमिका बजावलेली आहे. जास्ती वेळ अवकाशात राहण्यापेक्षा ह्या प्रयोगातून पुढे आलेले निष्कर्ष हे तिचं यश आहे.


क्रिस्टिना कोच ने १२ मार्च २०१९ ला अवकाशात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर आपलं पाऊल ठेवलं होतं. जवळपास ३२८ दिवसांचा काळ तिने इकडे सलग व्यतीत करताना १८ ऑक्टोबर २०१९ ला तिने जेसिका मिर सोबत पहिल्यांदा 'ऑल वूमन स्पेस वॉक' करून एक इतिहास रचला. ह्या स्पेस वॉक मध्ये तिने इंटरनॅशनल स्पेस स्टेशन च्या पॉवर सिस्टीम मध्ये काही अपग्रेड केले त्याच सोबत काही प्रयोग ही केले. ह्या काळात तिने ५२४८ वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. दररोज १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दर्शन घेतलं. जवळपास २२३ मिलियन किलोमीटर चं अंतर तिने ह्या काळात कापलं. १९६१ जेव्हा मानव अवकाशात  गेला तेव्हापासून ५६० पुरुष अवकाशात गेले आहेत तर फक्त ७० स्त्रिया आजवर अवकाशात जाऊ शकल्या आहेत. स्री अवकाशात पण पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करू शकते हे तिने दाखवून दिलं आहे. आपला प्रवास सांगताना ती सांगते,

“We both drew a lot of inspiration from seeing people who were reflections of ourselves as we were growing up, and developing our dreams to become astronauts, Diversity is important and it is something worth fighting for.”

“We caught each other’s eye and we knew that we were really honoured with this opportunity to inspire so many, and just hearing our voices talk to Mission Control, knowing two female voices had never been on the loops, solving those problems together outside – it was a really special feeling.”

क्रिस्टिना कोच चा जन्म २९ जानेवारी १९७९ ला  अमेरीका ला झाला. विद्युत अभियांत्रिकी मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर तिने नासा मध्ये प्रवेश घेतला. २०१३ साली तिची निवड अवकाशयात्री म्हणून झाली. आपलं ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण केल्यावर २०१९ साली तिने अवकाशात उड्डाण केलं. नासाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अवकाश यात्रींची ने आण करणाऱ्या रॉकेट प्रक्षेपणात बदलावं केल्याने तिचा मुक्काम वाढला. ६ फेब्रुवारी २०२० ला रशियाच्या सोयूझ कॅप्सूल मधून ती पुन्हा पृथ्वीवर उतरली. जवळपास ३२८ दिवसांनी पहिल्यांदा जमिनीला लागलेले पाय आणि अंगावर येणाऱ्या वाऱ्याच्या त्या झुळुकेचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून त्या दिवशी वाहत होता.

क्रिस्टिना कोच ने आपल्या जिद्दीने, मेहनतीने एक नवा आदर्श जगातील समस्त स्री वर्गापुढे ठेवला आहे. तिच्या कर्तुत्वाला माझा सलाम. येणाऱ्या अनेक पिढयांना क्रिस्टिना कोचचा प्रवास प्रेरणा देतं राहील.

फोटो स्रोत :- गुगल

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment