Tuesday, 4 February 2020

आदित्य (भाग १)... विनीत वर्तक ©

आदित्य  (भाग १)... विनीत वर्तक ©

आदित्य म्हणजेच आपला सूर्य. आपल्याला सगळ्यात जवळचा तारा. पृथ्वीवर जीवसृष्टीचा निर्माता आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अतिशय महत्वाचं स्थान असणाऱ्या ह्या सूर्याबद्दल आपलं ज्ञान तसं थोडं कमीच आहे. सूर्य ह्या विश्वाच्या पसाऱ्यात एक सामान्य तारा आहे. खूप मोठा ही नाही आणि खूप लहान ही नाही. आपल्या आकाशगंगेत एका टोकावर तो आहे. सूर्याचं प्रचंड मोठं असलेलं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या रोखाने आलेल्या सगळ्या धूमकेतू अथवा लहान मोठ्या खडकांना त्याच्याकडे खेचून आपल्या पृथ्वीचं संरक्षण करतो. असा हा सूर्य प्रत्येक क्षणाला ४ बिलियन बिलियन बिलियन ( ४ वर २६ शून्य ) वॅट इतका प्रकाशमान (सूर्याच तेज) असतो. हे प्रकाशमान कमी जास्त होतं असते. प्रत्येक ११ वर्षात सूर्याचं तेज सगळ्यात कमी आणि जास्ती होते. ह्या सगळ्या बदलांचा परीणाम पृथ्वीवर पडतो. सूर्याच्या प्रकाशमानात होतं असलेले बदल पृथ्वीवर खूप मोठा परीणाम करतात त्यामुळेच सूर्या बद्दल जाणून घेणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. 

अतिशय तेजोमय असलेल्या सूर्यावर ही डाग आहेत. सूर्य आपल्याला दिसतो तसा नाही. जो गोलाकार आकार आपल्याला दिसतो त्याला सूर्याचा 'फोटोस्पिअर' असं म्हणतात. खरे तर सूर्यावर जमीन नाही. सूर्य तप्त वायूचा गोळा आहे. ह्या गोळ्यात अनेक प्रक्रिया सुरु असतात. प्रत्येक क्षणाला सूर्य ६०० मिलियन टन हायड्रोजन चं ५९६ मिलियन टन हेलियम मध्ये रूपांतर करतो. ह्या प्रक्रियेत जी ऊर्जा निर्माण होते त्याने सूर्य प्रकाशमान होतो. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रक्रियेमुळे सूर्यावर चुंबकीय प्रक्रिया सुद्धा सुरु असतात ह्याचाच परीणाम म्हणजे सूर्यावर काही भागात सोलार प्लाझ्मा अडकतो. तिकडे सूर्याचं तपमान कमी म्हणजे ४००० डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरते. सूर्याच्या इतर भागात त्याचवेळी तपमान ६००० डिग्री सेल्सिअस च्या आसपास असते. जेव्हा आपण पृथ्वीवरून सूर्याकडे बघतो तेव्हा हाच कमी तपमान असलेला भाग आपल्याला डागांच्या रूपात दिसतो. सूर्याचे हे डाग कधीतरी अचानक फुटतात. फुटल्यावर त्यात अडकलेला सोलार प्लाझ्मा अवकाशात फेकला जातो. ह्यालाच आपण 'सोलार फ्लेअर' म्हणतो.

जेव्हा सूर्याकडून अश्या सोलार फ्लेअर फेकल्या जातात त्यात अनेक विकिरण तसेच इतर अनेक कण पृथ्वीवरपण आदळतात. आपलं नशीब चांगलं की पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र प्रबळ असल्याने हे कण पृथ्वीच्या ध्रुवांकडे खेचले जातात. ह्याच कणांना आपण ध्रुवीय प्रदेशातून (नॉर्वे आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशातून)  हिरव्या, निळ्या रेषांच्या रंगात आकाशात बघू शकतो ज्याला 'ऑरोरा बोरलिस' असं म्हणतात. आपल्या सूर्याचं गूढ मात्र अजून एका गोष्टीत आहे. ती गोष्ट म्हणजे सूर्याचा 'कोरोना'. आधी सांगितलं त्या प्रमाणे सूर्य हा तप्त वायूचा गोळा आहे. ह्या गोळ्याच्या आजूबाजूला जे वातावरण आहे जे की सूर्यापासून हजारो किलोमीटर दूरवर पसरलेलं आहे. ह्या भागाचं तपमान साधारण ५५०० डिग्री सेल्सिअस च्या आसपास आहे. पण ह्याच्या पलीकडे सूर्याचा 'कोरोना' सुरु होतो. वास्तविक बघता जर आपण सूर्यापासून लांब गेलो तर हळूहळू सूर्याची झळ कमी व्हायला हवी असं विज्ञान सांगते. पण कोरोना च्या बाबतीत मात्र नेमकं उलट घडते.

सूर्याच्या कोरोना चं तपमान कमी होतं नाही तर इतकं वाढते की जितकं सूर्याचं तपमान पण नाही. सूर्याच्या कोरोना चं तपमान साधारण १ मिलियन डिग्री सेल्सिअस ते १० मिलियन डिग्री सेल्सिअस च्या आसपास आहे. ( १० लाख डिग्री ते १ कोटी डिग्री सेल्सिअस). कोरोना मध्ये असं काय होते की त्याच तपमान इतकं प्रचंड वाढते ह्याच उत्तर अजून गुलदस्त्यात आहे. त्यामुळेच सूर्याचा कोरोना हा सगळ्या वैज्ञानिकांसाठी एक न उलगडलेलं कोडं आहे. सूर्याचा कोरोना हा नेहमी सूर्याच्या तेजामुळे लपलेला असतो. सूर्याच्या प्रकाशात तो दिसत नाही. पण जेव्हा सूर्यग्रहण (खग्रास) होते तेव्हा कोरोना चं दर्शन आपल्याला पृथ्वीवरून होते. हे दर्शन अगदी काही मिनिटांकरता वर्षातून जास्तीत जास्त दोनदा शक्य होते. ह्यामुळेच सूर्याचा कोरोनाचा अभ्यास एक आव्हान आहे. जर आपल्याला कोरोना ला समजून घ्यायचं असेल तर अश्या ठिकाणी आपण आपलं यान पाठवायला हवं जिकडून आपल्याला कोरोना नेहमी बघता येईल. त्याच्यावर नजर ठेवता येईल आणि त्याच्या बदलांचा अभ्यास करून त्याच्या गूढतेची उत्तर शोधता येतील.

फोटो १ :- सूर्यावरील डाग

फोटो २ :- सूर्याचा कोरोना

क्रमशः

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

फोटो स्रोत :- गुगल


3 comments:

  1. Nice information...real curious about mission...all Indians..!!!!

    ReplyDelete
  2. छानच. खूप सुरेख माहिती।

    ReplyDelete