Sunday 16 February 2020

एका हल्याचा बदला ( भाग २) ... विनीत वर्तक ©

एका हल्याचा बदला ( भाग २) ... विनीत वर्तक ©
बालाकोट ला हल्ला करणं तितकं सोप्प नाही ह्याची कल्पना सेनेच्या सगळ्याच अधिकारी आणि ह्या मिशन मध्ये असणाऱ्या सगळ्यांना होती. एकतर बालाकोट नियंत्रण रेषेपासून आत होतं. त्यात पाकीस्तान ची एअर फोर्स भारताच्या प्रतिउत्तरासाठी तयार होती. भारतात राहून नक्की बालाकोट ला काय चालू आहे हे समजणं कठीण होतं. भारताचे आकाशातील डोळे ह्या कामी आले. शत्रूला न कळता भारताच्या डोळ्यांनी अवकाशातून बालाकोट चे फोटो सेनेला पाठवून दिले होते. भारताच्या वायू दलासमोर आव्हान होतं ते म्हणजे पाकीस्तानी हवाई दलाच्या डोळ्यात धूळ झोकत अतिशय सफाईने आणि अतिशय वेगाने आपलं मिशन पुर्णत्वाला नेणं. कारण वेळ, अचूकता आणि तांत्रिक क्षमता अश्या तिन्ही गोष्टी जुळून येण्यावर हे मिशन यशस्वी होणं अवलंबून होतं.
सुखोई एम.के.आय. ३० हे जरी भारतीय हवाई दलाचा कणा असलं तरी काही बाबतीत त्याच्या वापरावर मर्यादा येतात. सुखोई साधारण २१२० किलोमीटर/ तास वेगाने हवेतून उडू शकते. त्याच सोबत सुखोई च वजन जास्ती आहे. त्यामुळेच अश्या मिशन मध्ये जिकडे चपळता आणि वेग ह्याची नितांत गरज आहे तिकडे भारताने आपल्या दुसऱ्या फळीतील विमानांचा वापर करण्याचं ठरवलं. त्यांच नाव होतं 'मिराज २०००'. मिराज २००० हे लढाऊ विमान आता सध्या भारतात येणाऱ्या राफेल विमानांचा मोठा भाऊ आहे. फ्रांस ची डसाल्ट एव्हिएशन कंपनी ने ह्याची निर्मिती केलेली आहे. मिराज २००० चा वेग हे त्याच अस्त्र आहे. मिराज २००० हवेतून २३३६ किलोमीटर/ तास वेगाने जाऊ शकते. तसेच ह्यावर इस्राईल ने बनवलेले स्पाईस बॉम्ब बसवले जाऊ शकतात. स्पाईस चा अर्थ होतो (Smart, Precise Impact, Cost-Effective). नावाप्रमाणे ह्या बॉम्ब मध्ये स्वतःची जी.पी.एस. प्रणाली आहे. त्या सोबत ऑप्टिकल फायबर कॅमेरा आहे. ह्या दोघांमुळे अगदी ६० किलोमीटर वरून डागलेले हे बॉम्ब अतिशय अचूकतेने लक्ष्यभेद करण्यात सक्षम आहेत.
तांत्रिक क्षमता आणि अचूकतेत भारतीय हवाई दल कुठेच कमी नव्हतं. आता मोठा प्रश्न होता योग्य वेळेचा आणि पाकीस्तान हवाई दलाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा. बालाकोट मिशन साठी भारतीय वायू सेना पूर्ण नियोजनबद्ध आणि पूर्ण क्षमतेने उतरली होती. प्रत्येक गोष्टीवर विचार केला गेला होता. शत्रू काय विचार करेल? काय प्रतिउत्तर देईल? ह्याचा सुद्धा विचार करून हे मिशन आखलं गेलं होतं. भारताने एक वेगळीच चाल खेळली. जम्मू काश्मीर मध्ये रात्रीच्या वेळी ये जा करणाऱ्या लढाऊ विमानांची गस्त वाढवली. ह्यामुळे पाकीस्तानी सेनेचं लक्ष तिकडे वेधलं गेलं. मिशन साठी १२ मिराज २००० विमानांचा ताफा आग्रा आणि बरेली हवाई बेस वरून हवेत उडाला. त्यांच्या सोबत ४ सुखोई एम.के.आय ३० आणि दोन निरीक्षण करणारी विमानं ज्यात Airborne Warning and Control System (AWACS) आणि Netra Airborne Early Warning and Control (AEW&C) समावेश होता. ह्या शिवाय दोन आय.एल. ७६ एस हवेत लढाऊ विमानांन मध्ये इंधन भरणारी विमान असा भला मोठा ताफा पाकिस्तान च्या दिशेने कूच करण्यात आला.
ह्या सर्व विमानांना दिल्ली वरून पाकीस्तान पर्यंत जायचं होतं. त्यासाठी अतिशय व्यस्त असणाऱ्या दिल्ली च्या हवाई क्षेत्रात डार्क कॉरीडॉर तयार करण्यात आला. दिल्ली मध्ये येणारी विमाने वळवण्यात आली त्यामुळे हवाई दलाच्या ताफ्याला पाकीस्तान ला जाण्यासाठी हवाई मार्ग मोकळा मिळाला. कोणाच्याही नजरेत न येता ही सगळी विमाने सरहद्दीवर पोहचली. इकडे पाकीस्तान ला मूर्ख बनवण्यासाठी काही विमानांनी युद्धाच्या फॉर्मेशन मध्ये बहावलपूर कडे कूच केलं. पाकीस्तान च्या सरहद्दी मध्ये युद्धाच्या फॉर्मेशनमध्ये घुसलेली विमान पाकीस्तान च्या रडारवर दिसताच जैशे ए मुहम्मद च्या मुख्य कार्यालयावर जे की बहावलपूर मध्ये आहे त्यावर भारत हल्ला करणार असा समज पाकीस्तान चा झाला व पाकीस्तान च्या हवाई दलाच्या विमानांनी त्यांना रोखण्यासाठी बहावलपूर च्या दिशेने कूच केलं. हीच वेळ होती जेव्हा पाकीस्तान चं पूर्ण लक्ष हे त्या विमानांवर होतं आणि इकडे भारताची मिराज २००० विमानांची दुसरी फळी जमिनीच्या जवळून बालाकोट कडे आपलं मिशन साध्य करण्यासाठी रवाना झाली.
एकीकडे बहावलपूर मध्ये घुसणाऱ्या मिराज २००० च्या फॉर्मेशन ला रोखण्यासाठी हवेत उडालेल्या पाकीस्तान च्या विमानांना आपल्याला मूर्ख बनवल्याचं लक्षात आलं. कारण मिराज २००० ची बालाकोट ला जाणारी दुसरी विमाने जेव्हा रडार वर दिसली तेव्हा पाकीस्तान ची विमाने त्यांच्यापासून १५० किलोमीटर पेक्षा अधिक दूरवर होती. हा काही मिनिटाचा वेळ भारताने मोठ्या चातुर्याने निर्माण केला होता. हिच वेळ होती जेव्हा बदला घेण्यापासून भारतीय हवाई दलाला कोणीही रोखू शकत नव्हतं. मिराज २००० ची सगळी विमान स्पाईस बॉम्ब बसवलेली होती. ५ स्पाईस बॉम्ब जेव्हा पाच विमानातून बालाकोट मधल्या वेगवेगळ्या बिल्डिंगवर लॉक केले गेले. तेव्हा विमानातून सुटलेल्या त्या बॉम्ब नी १००% अचूकतेने बालाकोट च्या आतंकवादी तळाचा सुपडा साफ केला. काय होते आहे हे कळायच्या आधी सगळे जेहाद ची स्वप्न बघणारे त्यांच्या स्वप्नातच ढगात पोहचले होते. इकडे जोवर पाकीस्तान ची विमाने बालाकोट पर्यंत येतील तोवर आपलं मिशन फत्ते करून मिराज २००० विमाने ध्वनीच्या दुप्पट वेगाने भारतीय हद्दीत सुरक्षितरीत्या पोहचली. पाकीस्तान ची अवस्था नक्की कोणाच्या मागे जावं अशी असताना दोन्ही तुकड्या सुखरूप भारताच्या हद्दीत परतल्या. पाकीस्तानी विमानांनी पाठलाग केला पण सरड्याची धाव कुंपणा पर्यंत त्या प्रमाणे हद्दीजवळ त्यांची वाट थांबली. आपलं शेपूट मागे फिरवण्याशिवाय पाकीस्तानी च्या हवाई दलाकडे दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नव्हता.
वेळ, अचूकता, आपल्या शत्रूचा पुरेपूर अभ्यास, तांत्रिक क्षमतांचा अफलातून मेळ आणि आपल्या बहादूर सैनिकांचा पराक्रम ह्यांच्या जोरावर भारताने पाकीस्तान ला त्यांच्याच घरात घुसून ठोकलं होतं. रक्षा क्षेत्राचा अभ्यास असणारे अनेक जाणकार खासगीत सांगतील इतकं सगळं प्लॅनिंग आणि त्याच नियोजनबद्ध अनुसरण आणि ते ही अवघ्या काही दिवसात ह्यासाठी किती कष्ट लागले असतील. बालाकोट मध्ये जवळपास २००- ३०० अतिरेकी मारले गेल्याचा अंदाज आहे. अंदाज ह्यासाठी कारण न पाकीस्तान काही उघडपणे स्विकारणार आहे न कोणाला त्या भागात जाऊन त्याची शहानिशा करून देणार आहे. पण बालाकोट सारख्या यशस्वी बदल्याला जेव्हा आपलेच राजकारणी आणि सो कॉल्ड सेक्युलर लोक संशयतेने बघतात तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. राजकारणात काय होते त्याच्याशी मला काहीच देणंघेणं नाही पण जेव्हा प्रश्न आपल्या देशाच्या सुरक्षिततेचा आणि सैनिकाच्या अस्मितेचा असतो तेव्हा आपण राजकारण बाजूला ठेवायला हवं. आज एक वर्ष झाल्यावर आपण कोणी काय मिळवलं ह्याचा हिशोब मागतो तेव्हा आपण ह्या देशासाठी काय दिलं? ह्याचा विचार आधी आपण करायला हवा.
आजही ते ४० सैनिक आपल्या सोबत आहेत. कारण सैनिक कधी मरत नसतात तर ते अमर होतात.
उरूजे कामयाबी पर कभी हिन्दोस्ताँ होगा
रिहा सैयाद के हाथों से अपना आशियाँ होगा
चखाएँगे मज़ा बर्बादिए गुलशन का गुलचीं को
बहार आ जाएगी उस दम जब अपना बाग़बाँ होगा
ये आए दिन की छेड़ अच्छी नहीं ऐ ख़ंजरे क़ातिल
पता कब फ़ैसला उनके हमारे दरमियाँ होगा
जुदा मत हो मेरे पहलू से ऐ दर्दे वतन हरगिज़
न जाने बाद मुर्दन मैं कहाँ औ तू कहाँ होगा
वतन की आबरू का पास देखें कौन करता है
सुना है आज मक़तल में हमारा इम्तिहाँ होगा
शहीदों की चिताओं पर लगेगें हर बरस मेले
वतन पर मरनेवालों का यही बाक़ी निशाँ होगा
कभी वह दिन भी आएगा जब अपना राज देखेंगे
जब अपनी ही ज़मीं होगी और अपना आसमाँ होगा....
(कवी :- जगदंबा प्रसाद मिश्र)
त्या सर्व अमर जवानांच्या स्मृतीस माझा कडक सॅल्यूट आणि वंदन.. जय हिंद.
समाप्त.
फोटो स्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


1 comment:

  1. सुरेख आखणी, नियोजन आणि अंमलबजावणी. भारतिय वायुसेनेला मानाचा मुजरा 🙏🇮🇳🙏

    ReplyDelete