Thursday 6 February 2020

आदित्य (भाग २ )... विनीत वर्तक ©

आदित्य (भाग २ )... विनीत वर्तक ©

सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात होणारे बदल पृथ्वीच्या वातावरणात खूप बदल करतात. सूर्याचं चुंबकीय क्षेत्र कश्या पद्धतीने पृथ्वीच्या वातावरणात बदल घडवतात हे अजून आपल्याला पूर्ण समजलेलं नाही. सूर्यावरच्या डागावरून सूर्य हा स्थिर नसून स्वतःभोवती फिरतो हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलेलं आहे. पण हे डाग तयार होतात कसे? सोलार प्लाझ्मा फुटतो कसा? सोलार फ्लेअर नक्की कश्या पद्धतीने पृथ्वीवर आदळतात ते त्यांचा परीणाम आणि ह्याच सोबत सूर्याच्या 'कोरोना' च तपमान हा सगळ्यात मोठा प्रश्न अजून आपल्यासाठी कोडं आहे. भारतात फार पूर्वीपासून सूर्याला अनन्यसाधारण महत्व दिलं गेलं आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवताना आजच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक अश्या नव्या भारतात अशीच एक मोहीम भारताने हाती घेतली आहे. सूर्याच्या न सोडवलेल्या कोड्यांना उत्तर शोधण्यासाठी भारत आपल्या परीने योगदान देण्यासाठी सज्ज झाला आहे. ह्या वर्षीअखेर भारताची इसरो सूर्याच्या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी एक मिशन सूर्याच्या दिशेने सोडतं आहे. ज्याचं नाव आहे 'आदित्य एल १'.

कोणतही मिशन म्हंटलं की त्याची काही उद्दिष्ठ असतात. सूर्याच्या 'कोरोना मधील तपमानाच्या कोड्यांना' ला आपलं मुख्य लक्ष ठेवताना सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचे पृथ्वीवर होणारे परीणाम, त्याच सोबत सोलार प्लाझ्मा आणि सोलार फ्लेअर सारख्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी इसरो ने आदित्य एल १ मिशन ची आखणी  केली आहे. आधी सांगितलं तसं ह्या मिशन साठी सगळ्यात महत्वाचं आहे ते सूर्याच्या कोरोना वर सतत लक्ष ठेवणं त्याच्या तपमानात होणारे बदल नोंदवणं त्याशिवाय त्याच्यातून येणाऱ्या क्ष किरणांचा अभ्यास करणं जेणेकरून कोरोना च्या इतक्या प्रचंड तपमानाचा उलगडा होऊ शकेल. त्यामुळे आदित्य एल १ प्रक्षेपित केल्यावर ते सतत सूर्याच्या समोर राहणं गरजेचं आहे.अवकाशात सूर्याचं जसं गुरुत्वाकर्षण आहे तसचं पृथ्वी चं ही आहे. ह्या दोन्ही गुरुत्वाकर्षणावर मात करून सतत सूर्य दिसतं राहील अश्या ठिकाणी यान प्रक्षेपित करणं गरजेचं आहे. त्यामुळेच आदित्य ला एल १ ह्या ठिकाणी भारत प्रक्षेपित करणार आहे.

'एल १' काय भानगड आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन बलांचा अभ्यास करावा लागेल. सूर्याभोवती आपली पृथ्वी एका कक्षेत फिरते. सूर्याचं गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड आहे तर पृथ्वी सूर्यावर जाऊन आदळायला हवी. पण तसं होतं नाही. ह्याला कारण आहे सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला अगदी विरुद्ध असं एक बल कार्यरत आहे ज्याला सेंट्रीफ्युकल फोर्स ( केंद्रापासून दूर जाणारं बल ) असं म्हणतात. जेव्हा ही दोन्ही बल समान असतात तेव्हा पृथ्वी एका स्थिर कक्षेत सूर्याभोवती फिरत रहाते. जेव्हा एखादं यान सूर्य आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते तेव्हा त्याला ह्या दोघांच्या गुरुत्वाकर्षण बलावर मात करणं गरजेचं असते. त्यासाठी त्याला जास्ती सेंट्रीफ्युकल फोर्स ( केंद्रापासून दूर जाणारं बल ) ची गरज लागते. जेवढा जास्ती वेग तेवढं हे बल जास्ती म्हणजेच जास्ती वेगासाठी जास्ती इंधनाची गरज. पण ह्या दोघांच्या भोवती अश्या ५ जागा आहेत. जिकडे सूर्य आणि पृथ्वी चं गुरुत्वाकर्षण एकमेकांना मारक ठरते. त्या जागांना लाग्रांगीण (Lagrangian) असं म्हणतात. ह्या ५ ठिकाणी यान जर आपण प्रक्षेपित केलं तर कमीत कमी इंधनात ते पृथ्वी आणि सूर्याभोवती फिरत राहू शकेल. ह्याच ठिकाणी दुर्बिणी अथवा यान पाठवण्यात येतात जेणेकरून त्यांचं आयुष्य वाढेल.

इसरो चं आदित्य मिशन लाग्रांगीण (Lagrangian) १ ह्या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात येणार आहे म्हणून ह्या मिशन चं नाव आदित्य एल १ असं आहे. हा भाग सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्या मधे पृथ्वीपासून सुमारे १.५ मिलियन किलोमीटर वर आहे. एल १ भागात आदित्य मिशन पाठवल्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय आदित्य सतत सूर्याचा वेध घेऊ  शकणार आहे. ह्याशिवाय कमीत कमी इंधनात ते सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत राहणार आहे. इसरो चं वर्कहॉर्स रॉकेट पी.एस.एल.व्ही. एक्स एल साधारण १५०० किलोग्रॅम वजनाच्या आदित्य एल १ ला पृथ्वीपासून १.५ मिलियन किलोमीटर घेऊन जाणार आहे. आदित्य एल १ वर ७ वैज्ञानिक उपकरणं लावली जाणार असून ही सर्व उपकरणं सूर्याच्या अनेक रहस्यांचा वेध घेणारआहेत. ह्या सर्व उपकरणांची निर्मिती पूर्णपणे भारतात केलेली आहे. 'मेक इन इंडिया' हा टॅग घेऊन जेव्हा आदित्य लाग्रांगीण (Lagrangian) १ वर प्रक्षेपित होईल तेव्हा जगातील सर्व संशोधकांचं लक्ष त्याच्यावरील उपकरणांनी सूर्याच्या कोरोना आणि इतर गोष्टींच्या टिपलेल्या आकड्यांकडे असणार आहे.

लालबुंद सूर्याला सफरचंद समजून त्याला पकडण्यासाठी उडी घेतलेल्या हनुमानाची गोष्ट आपण सगळ्यांनी वाचलीच असेल. ह्या उडी नंतरच हनुमानाच्या शक्तींची जाणीव पूर्ण स्वर्गलोकाला झाली. त्याचप्रमाणे इसरो ची आदित्य उडी येणाऱ्या काळात सूर्याच्या अनेक कोड्यांना सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावेल त्याचसोबत भारताच्या तांत्रिक प्रगतीची ताकद सगळ्या जगाला दिसेल ह्या बद्दल माझ्या मनात शंका नाही. इसरो च्या आदित्य मिशन साठी सर्व वैज्ञानिक आणि अभियंतांना खूप खूप शुभेच्छा.

फोटोत लाग्रांगीण (Lagrangian) पॉईंट च्या पाच जागा. ह्यातील एल १ जागेवर आदित्य मिशन जाणार आहे.

फोटो स्रोत :- गुगल

समाप्त.

सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

2 comments:

  1. आपण करित असलेले कार्य स्तुत्य आहे. या माध्यमातुन आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडी सहज आणि सोप्या शब्दात लोकांपर्यंत पोहोचत आहे. पण,
    तुम्ही लिहिलेल्या माहितीचे मुख्य स्त्रोत दिल्याखेरीज तुमचे शब्दांकन copyright© होऊ शकत नाही. कारण, सदरची माहिती तुम्ही स्वतः संशोधनाने मांडली नाही. तुम्ही त्या मुख्य माहितीचे तुमच्या शब्दात केलेले भाषांतर आहे.

    तुमचा शुभेच्छुक

    ReplyDelete
    Replies
    1. माहितीचे मुख्य स्रोत इंटरनेट आहे. कॉपीराईट माझ्या शब्दांकनाच आहे. तसं स्पष्टपणे लेखाच्या खाली मांडलेलं आहे.

      Delete