Thursday 20 February 2020

एका प्रेमाची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका प्रेमाची गोष्ट... विनीत वर्तक ©

१४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा ला भ्याडपणे भारतीय जवानांवर अतिरेकी हल्ले करणाऱ्या अतिरेक्यांच्या शोधात भारतीय सेनेने कंबर कसली होती. ह्या हल्या मागचा सुत्रधार पुलवामा मधेच असल्याची माहिती भारतीय सेनेला मिळाली. भारतीय सेनेने ह्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी सुरु केलेल्या मोहिमेत ५५ राष्ट्रीय रायफल चे मेजर विभूती धोऊंडियाल हे सहभागी होते. अतिरेक्यांना एका कोपऱ्यात बंदिस्त केल्यावर त्यांनी सैनिकांवर बेछूट गोळीबार सुरु केला. तब्बल २० तास हा गोळीबार सुरु होता. ह्या गोळीबारात मेजर विभूती ह्यांना एक मानेवर तर एक पोटात अश्या दोन गोळ्या लागल्या. जखमी झालेल्या मेजर विभूती ह्यांना ह्या मोहिमेत वीरमरण आलं. मेजर विभूती ह्यांच्यावर पूर्ण घराची जबाबदारी होती. आपली आई, तीन बहिणी आणि अवघ्या १० महिन्या पूर्वी त्यांच्या आयुष्याची जोडीदार झालेल्या निकिता कौल धोऊंडियाल ह्या सर्वाना मागे सोडून देशाचं कर्तव्य बजावताना ते शहीद झाले.

मेजर विभूती धोऊंडियाल ह्यांना शेवटच्या क्षणी बघताना निकिता कौल धोऊंडियल ह्यांनी त्यांच्या कानात आपल्या भावना व्यक्त करताना म्हंटल होतं,

"मला तुझा आज खूप अभिमान वाटतो. आम्ही सगळेच तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू ज्या पद्धतीने सगळ्यांवर प्रेम केलस ते खूप वेगळं होतं कारण तू आपल्या आयुष्यच बलिदान ज्यांच्यासाठी दिलं ज्यांना तू कधी बघितलेलं पण नाहीस. तू खूप पराक्रमी आहेस. तू माझा जोडीदार असल्याचा मला खूप अभिमान आहे. तू खूप शूरवीर आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. माझं आयुष्य तुझ्यासाठीच आहे".

अवघ्या १० महिन्याचा संसार एका क्षणात उध्वस्त झाल्याचा धक्का निकिता ह्यांना पचवावा लागणार होता पण कुठेतरी मनात आपल्या प्रेमासाठी त्याच्या स्वप्नांसाठी जगण्याचे विचार मनात घोळत होते. आयुष्याच्या अश्या बिकट प्रसंगी त्यांना सहानभूती नको होती. दुःखाचा डोंगर बाजूला ठेवत १५ व्या दिवशी निकिता आपल्या जॉब मध्ये रुजू झाली. पण जो धक्का बसला त्यातून सावरायला तिला वेळ लागत होता. एकीकडे मेजर विभूती ची अधुरी स्वप्ने आणि दुसरीकडे त्याची कमतरता अश्या वेळी त्याची अधुरी स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय तिने घेतला. भारतीय सेनेने विधवा झालेल्या सैनिकांच्या जोडीदारांना सैन्यात प्रवेश घेण्याची असलेली वयाची मर्यादा शिथिल केली आहे. त्याचा उपयोग करत निकिता कौल धोऊंडियल हिने भारतीय सैन्य प्रवेश परीक्षा दिली. वयाची अट शिथिल असली तरी बाकी सगळ्या गोष्टी भारतीय सेनेच्या कडक नियमांना धरून असणार होत्या. तिकडे कोणतीही शिथिलता नसते त्यामुळे निकिता कौलला  निवड चाचणी च्या सगळ्या पायऱ्यांवरून इतरांप्रमाणे जावं लागलं.

परीक्षेच्या वेळी त्या जागी प्रवेश करताना तिला भरून आलं. आपला विभू पण असाच परीक्षेला आला असेल. अशीच तयारी त्याने केली असेल. परीक्षेचं ते वातावरण आणि भारतीय तिरंगा सगळच मनात कुठेतरी त्या अधुऱ्या स्वप्नांची जाणीव करून देतं होतं. ह्या प्रवेश परीक्षेच्या मुलाखती च्या वेळी एका अधिकाऱ्याने त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? ह्यावर त्यांनी उत्तर दिलं, दोन वर्ष. त्यांच्या ह्या उत्तराने अधिकारी गोंधळला. तो म्हणाला की इकडे कागदपत्रात तर तुमचं लग्न ९ महिन्याआधी झालं होतं असं लिहिलेलं आहे. त्यावर निकिता कौल धोऊंडियल ह्यांनी उत्तर दिलं,

"विभू आता शरीराने ह्या जगात नसेलही पण ह्याचा अर्थ त्याची साथ सुटली आणि आमचं लग्न संपलं असा होतं नाही".

त्यांच्या ह्या उत्तराने समोर बसलेला अधिकारी ही अवाक झाला. गेल्या आठवड्यात निकिता कौल धोऊंडियल ला मुलाखतीत पास आणि भारतीय सेनेच्या ट्रेनिंग साठी निवड झाल्याचं कळालं तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. भारतीय सेनेत प्रवेशासाठी केलेल्या मेहनतीचं फळ तिला मिळालं होतं पण तिच्या  मते हे तर पहिलं पाऊल आहे.

"मी भारतीय सेनेत निवड होण्यासाठी खूप मेहनत केली, पण आता मला एका वर्षाच्या प्रशिक्षणात अव्वल राहायचं आहे. मला भारतीय सेनेची अशी एक अधिकारी व्हायचं आहे जिच्यावर पूर्ण देशाला गर्व असेल विभूला गर्व असेल".

येत्या काळात जेव्हा निकिता कौल धोऊंडियल चेन्नई च्या ऑफिसर ट्रेनिंग अकॅडेमी मध्ये प्रवेश घेईल तेव्हा मेजर विभूती धोऊंडियाल ह्यांच्या अधुऱ्या राहिलेल्या देशसेवेच्या व्रताला पूर्ण करण्यासाठी एका रणरागिणीने घेतलेली ती एक उंच उडी असेल.

१४ जानेवारीला प्रेम दिवस साजरा करणाऱ्या प्रत्येकासाठी विभूती आणि निकिता ची गोष्ट खरं प्रेम काय असते ह्याच एक जिवंत उदाहरण आहे. भारतात आज असे सैनिक आहेत म्हणून आपण जिवंत आहोत. भारतीय सेना हे एक व्रत आहे. ज्याला ते कळलं त्याने हिमालयाची उंची गाठली.

शहीद मेजर विभूती धोऊंडियाल आणि त्यांच्या पत्नी निकिता कौल धोऊंडियल ह्यांना माझा कडक सॅल्यूट. मला आणि माझ्या देशाला तुम्हा दोघांचा खूप अभिमान आहे.

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

4 comments:

  1. hi vinit sir please share me ur contact number i want to share some ideas with you

    ReplyDelete
  2. hi vinit sir please share me ur contact number i want to share some ideas with you

    ReplyDelete
  3. अभ्यासपूर्ण लिखाण

    ReplyDelete