एका 'लसी'ची गोष्ट... विनीत वर्तक ©
३१ डिसेंबर, २०१९ चा दिवस होता. जगातील बहुतेक व्यवहार सुरळीत सुरु होते. त्याचवेळी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्लू.एच.ओ.च्या चीनमधील कार्यालयात एका बातमीने खळबळ उडाली होती. चीनच्या अधिकाऱ्यांनी एका नवीन विषाणू चा इशारा डब्लू.एच.ओ.ला दिला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डिसेंबर २०१९ मधेच या विषाणूबद्दल कल्पना चीनच्या आरोग्यखात्याला आली होती. त्याचं नाव SARS-CoV-2 असं ठेवण्यात आलं, पण त्याचं स्वरूप समजायला किंवा निदान जगाला सांगायला त्यांनी खूप उशीर केला होता. बघता बघता जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात कोरोना-१९ ने आपले हातपाय पसरले आणि संपूर्ण मानवजातीला त्याने लॉकडाऊन केलं. कोरोनाचा प्रसार ज्या वेगाने होत होता, त्यामुळे जगाची संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडली. त्याचा प्रसार रोखण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी मानवजातीला एका लसीची गरज होती पण ती कधी येईल? किती यशस्वी होईल? लस आल्यावर पृथ्वीवरील प्रत्येकाला कशी देता येईल? असे सगळेच प्रश्न जगासाठी अनुत्तरित होते.
जेव्हा जग कोरोनाच्या उत्तरासाठी चाचपडत होतं, तेव्हा महाराष्ट्रातील पुण्यामध्ये असणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्रयोगशाळेत जगाची गरज भागवणाऱ्या लसी तयार होत होत्या. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लस बनवणारी जगातील सगळ्यात मोठी प्रयोगशाळा आणि कंपनी आहे. वर्षाकाठी तब्बल १.५ बिलियन लस इकडे प्रत्येक वर्षी तयार केल्या जातात आणि जगातील १७० देशांमध्ये प्राणघातक रोगांपासून मानवाचे प्राण वाचवण्यासाठी तिथल्या लोकांना टोचल्या जातात. जगातील ६५% बालकांना भारताच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवलेल्या लसीमधून जीवनदान दिले जाते, ज्यात बी.सी.जी., टिटॅनस, हिपेटायटीस, रुबेला सारख्या रोगांवरील लसींचा समावेश आहे. १९६७ मध्ये टिटॅनसच्या लसीपासून सुरु झालेला प्रवास आज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, युनिसेफ सारख्या जागतिक संघटनांना जगातील प्रत्येक व्यक्ती आणि बालकापर्यंत वैद्यकीय सेवा पोहचवण्यात महत्वाचा दुवा ठरत आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत स्वस्त आणि त्याचवेळी उत्तम दर्जा राखत लसी पोहचवण्याच्या सिरमच्या कार्याचं कौतुक संपूर्ण जगाने केलं आहे.
कोरोनावर लसीचे संशोधन सुरु असताना, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना पुढल्या काही महिन्यांत काय होणार आहे, याचा अंदाज आला होता. ज्या पद्धतीने जग कोरोनाच्या विषाणूपुढे होरपळले जात होते, त्यावेळेस कोरोनाची जर लस आली तर जगाच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचवण्यासाठी जगातील सर्व प्रयोगशाळा आणि लस बनवणाऱ्या कंपन्या अपुऱ्या पडणार हे नक्की होतं. याचसाठी जगातील लसींच्या बाजारामधील ५०% पेक्षा जास्त हिस्सा असणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला आपल्या कार्यक्षमतेत प्रचंड वाढ करावी लागणार होती. प्रत्येक वर्षी निर्माण होणाऱ्या १.५ बिलियन लसीसुद्धा जगासाठी कमी पडणार होत्या. एकट्या भारताची लोकसंख्या १.३ बिलियन पेक्षा जास्ती आहे, त्यामुळे जगाची लसीची गरज भागवण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला आपल्या कार्यक्षमतेत वाढ करण्याची गरज त्यांनी ओळखली. 'सिरम'चा प्रवास हा एका कुटुंबाभोवती झालेला आहे. याचे काही फायदे असले, तरी काही तोटेही आहेत. उद्योग वाढवण्यासाठी 'सिरम'ची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अदार पूनावाला यांनी एप्रिल २०२० मध्ये तब्बल ३६६ मिलियन अमेरिकन डॉलर स्वतःची गुंतवणूक केली, आणि ४०० मिलियन अमेरिकन डॉलरची आर्थिक मदत सेवाभावी कार्य करणाऱ्या मेलिंडा-गेट्स फौंडेशनने त्यांना केली. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या कार्यक्षमतेत १ बिलियन वार्षिक लसींची भर घालत, तब्बल २.५ बिलियन लस प्रत्येक वर्षी बनवू शकतो इतकी केली.
ज्या वेळेस कोरोनावर लस येईल का? आली तर कितपत यशस्वी होईल? त्या लसीला देशांची आणि जागतिक मान्यता मिळेल का? अशी सगळी अनिश्चितता असताना अदार पूनावाला यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या ऍस्ट्राझेनेका टीमसोबत त्यांच्या लसीचे १ बिलियन डोस बनवण्याचा शब्द दिला. त्याचसोबत नोव्हाव्हॅक्स, स्पायबायोटेक, कोडाजेनिक्स सारख्या इतर संशोधनाच्या टीम सोबत करार केले. सप्टेंबर २०२० येईपर्यंत ऍस्ट्राझेनेका लसीची युरोपात पहिल्या चरणाची प्रक्रिया सुरु झाली. इकडे अदार पूनावाला यांनी येणाऱ्या परिणामांची वाट न पाहता भारतात ऍस्ट्राझेनेकाच्या लसीचे प्रचंड प्रमाणात उत्पादन सुरु केले. लस यशस्वी कितपत होईल, आणि झाली तरी तिला वापरण्यासाठीची मुभा कितपत मिळेल याची ३०% शाश्वती नसताना अदार पूनावाला आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एक जुगार खेळला. डिसेंबर उजाडेपर्यंत त्यांनी जवळपास ऍस्ट्राझेनेका लसीचे जवळपास ५ कोटी डोस तयार केले होते. लस यशस्वी होईल, किंवा तिला मान्यता मिळेल की नाही याची कोणतीही शक्यता माहीत नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी लसीचं उत्पादन करून ठेवलं होतं.
३ जानेवारी, २०२१ ला Drug Controller General of India (DCGI) ने कोरोना लसीला मान्यता दिली. अदार पूनावाला आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्रयोगशाळेत ऍस्ट्राझेनेकाच्या ५०० लसी प्रत्येक मिनिटाला तयार होत आहेत. भारतासोबत जगातील ६७ देशात ऍस्ट्राझेनेकाच्या या लसी कोरोनाविरुद्धच्या लढाईत निर्णायक भूमिका निभावणार आहेत. जगातील तब्बल ७.५ बिलियन लोकांपर्यंत कोरोनाची लस पोहोचवण्याचं अदार पूनावाला यांचं स्वप्न आहे. ते साकार करण्यासाठी ऍस्ट्राझेनेकासोबत इतर अनेक लसीसुद्धा ते निर्माण करणार असून, कोरोनाची ही लस सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची किंमतही अवघी ३ अमेरिकन डॉलर इतकीच ठेवली जाणार आहे, जी जेमतेम त्याच्या उत्पादन शुल्काइतकीच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर लसींचं उत्पादनही त्यांनी बंद केलं आहे, ज्याच्या विक्रीने कित्येक डॉलरचा फायदा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला झाला असता. पण जगातील लोकांचं आयुष्य वाचवण्यासाठी त्यांनी कोरोनाच्या लसीला प्राधान्य दिलं आहे.
आज सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या हडपसर, पुणे इथल्या प्रयोगशाळेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. कारण भारताच्या औषधांच्या बाबतीत शीर्ष असलेल्या डी.सी.जी.आय.ने त्यांच्या 'कोव्हीशील्ड'ला मान्यता दिल्यानंतर आता या लसीचा मार्ग मोकळा झाला आहे. नक्कीच आज प्रत्येक भारतीयापर्यंत ही लस पोहोचवणे हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि अदार पूनावाला यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचसोबत त्यांना या लसीचा फायदा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं शिवधनुष्यही त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पेलायचे आहे. या सगळ्यात पुन्हा एकदा ते यशस्वी होतील याची मला खात्री आहे.
आज लसीच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात भारताचं नाव मोठं करणाऱ्या 'सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' आणि अदार पूनावाला यांना कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सुचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment