Sunday 21 April 2019

#आकाशाकडे_बघताना भाग २ (ओरायन तारका समूह) ... विनीत वर्तक ©

#आकाशाकडे_बघताना भाग २ (ओरायन तारका समूह) ... विनीत वर्तक ©

ओरायन किंवा ज्याला मृग नक्षत्र असं म्हंटल जाते. त्या बद्दल आपण पहिल्या भागात बघितलं. नुसत्या डोळ्यांनी आकाशात दिसणारा हा तारका समूह आकाशात लगेच दिसून येतो पण त्याच सोबत आपल्याला आकर्षित पण करतो. ह्या तारका समूहातल्या प्रत्येक ताऱ्याच एक विशिष्ठ वैशिष्ठ आहे. ते जाणून घेतल्यावर जेव्हा आपण आकाशात ह्या तारका समूहाला एका वेगळ्या नजरेतून बघू. आधी सांगितलं त्या प्रमाणे ओरायन हा तारका सुमह ज्या सात महत्वाच्या ताऱ्यांनी बनला आहेत ते आहेत बेटलज्यूस, रायजेल, बेलाट्रिक्स, साईफ, अलनिटक, अलनिलम आणि मिनटाका. आता हे सर्व तारे वेगवेगळ्या अंतरावर आहेत ते आपण बघितलं. आता ह्या ताऱ्यांन विषयी थोडं जाणून घेऊ.

१) बेटलज्यूस :- ओरायन तारका समूहातील मला आणि जगातील पूर्ण वैज्ञानिकांना आकर्षित करणारा बेटलज्यूस हा तारा आहे. आपण त्याला राक्षसी तारा म्हणू शकतो. बेटलज्यूस हा रेड सुपर जायंट तारा आहे. आपल्या आकाशातील ९ वा सगळ्यात तेजस्वी तारा आणि ओरायन तारकासमूहातील दुसऱ्या नंबरचा तेजस्वी तारा आहे. सूर्यापेक्षा जवळपास २० पट हा तारा मोठा आहे. जर हा तारा सूर्याच्या जागी ठेवला तर हा गुरु च्या कक्षेपर्यंतची जागा व्यापेल इतका अवाढव्य आहे. इतका मोठा असूनही हा आकाशातील राक्षसी ताऱ्यांच्या मानाने लहान आहे. पण तरीसुद्धा बेटलज्यूस चा आकार खूप मोठा आहे. हा तारा व्हेरीएबल स्टार किंवा तारा आहे. ह्याचा आकार बदलत असून हा विश्वाच्या पोकळीत सुमारे ३० किमी/ सेकंद वेगाने प्रवास करत आहे.

बेटलज्यूस वर वैज्ञानिकांनी का इतकं संशोधन केलं आहे तर ह्याच उत्तर आहे हा तारा अवकाशातील एक टायमर लावलेला बॉम्ब आहे. बेटलज्यूस च वय साधारण १० मिलियन वर्ष आहे. जवळपास ४०,००० हजार वर्षापूर्वी त्याने आपल्या आयुष्याचा शेवटच्या घटका मोजायला सुरवात केली आहे. आपल्या आतल्या भागात हेलियम चं न्युक्लीयर फ्युजन करत ऑक्सिजन आणि कार्बन तयार आहे. एका क्षणाला ह्या आतल्या भागाला तो सांभाळू शकणार नाही. मग जे होईल ती आकाशातली दिवाळी असेल. बेटलज्यूस एखाद्या बॉम्ब प्रमाणे फुटेल. हा स्फोट इतका प्रचंड असेल की जवळपास ६४३ प्रकाशवर्ष दूर असलेल्या पृथ्वीवर ही दिवाळी उघड्या डोळ्यांनी चक्क दिवसा पण दिसू शकेल. ह्या स्फोटाची व्याप्ती इतकी असेल की चंद्राइतकी तेजस्वी असेल. दिवसा ही चंद्रा प्रमाणे आकाशात दिसून येईल.

बेटलज्यूस चा स्फोट आत्ता झाला ही असेल किंवा त्याला होण्यासाठी काही मिलियन वर्षाचा कालावधी ही लागेल. आत्ता झाली तरी आपल्याला पृथ्वीवरून दिसण्यास ६४० वर्षाचा कालावधी लागेल. ह्या ताऱ्याचा आकार, वस्तुमान हे अनेक गणितांवर आधारित आहे. त्यामुळे हा बॉम्ब नक्की केव्हा फुटेल हे कोणीच सांगू शकत नाही. पण जेव्हा कधी ही दिवाळी अवकाशात होईल तेव्हा हा सोहळा अवकाशातील एक अभूतपूर्व सोहळा असेल.

२) रायजेल :- ओरायन तारकासमूहातला सगळ्यात तेजस्वी तारा आणि आकाशातील ७ वा सगळ्यात तेजस्वी तारा म्हणून रायजेल ओळखला जातो. रायजेल पण राक्षसी तारा आहे. रायजेलची त्रिज्या सूर्याच्या त्रिजेच्या ७० पट आहे. सूर्यापेक्षा रायजेल जवळपास ६१,५०० टे ३६३,००० पट जास्ती तेजस्वी आहे. रायजेल पण व्हेरियेबल तारा असल्याने त्याच्या तेजस्वीपणात उतार चढाव येत असतात. जेव्हा आपलं तंत्रज्ञान तोकडं होतं तेव्हा रायजेल हा एकच तारा असं वाटत होतं. पण खरे तर रायजेल च्या बाजूला तिन ताऱ्यांची एक सिस्टीम आहे. रायजेल च्या तेजस्वितेमुळे ह्या ताऱ्यांचा प्रकाश झाकला जातो. रायजेल भविष्य ही सुपरनोव्हा हे आहे.

३) बेलाट्रिक्स :- हा तारा पण आकाराने खूप मोठा आहे. सूर्याच्या ८.६ पट ह्याच वस्तुमान आहे. ह्याच वय जवळपास २५ मिलियन वर्ष आहे. ह्याच्या बाह्य भागाच तपमान जवळपास २२,००० केल्विन आहे. ओरायन तारकासमूहातला तिसरा सगळ्यात तेजस्वी आणि आपल्या आकाशातला २५ वा सगळ्यात तेजस्वी तारा आहे.

४) साईफ :- ओरायन तारका समूहातला हा तारा पण राक्षसी तारा आहे. ह्याच वय जवळपास ६.२ मिलियन वर्ष असून ह्याच वस्तुमान सूर्यापेक्षा जवळपास २८ पट जास्त आहे. ह्या ताऱ्यावरील इंधन म्हणजेज हायड्रोजन संपुष्टात आलेला असून ह्याची वाटचाल ही ओरायन तारकासमुहातील इतर ताऱ्यान प्रमाणे सुपरनोव्हा कडे सुरु आहे.

५) ते ७) अलनिटक, अलनिलम आणि मिनटाका :- हे तिन तारे मिळून ओरायन तारकासमूहाचा बेल्ट तयार होतो. ह्या ओरायन बेल्ट मधील सगळ्यात वरच्या बाजूचा तारा म्हणजे मिनटाका. मिनटाका हा तारा खरे तर तिन ताऱ्यांची रचना आहे. ह्या बेल्ट मधला मधला तारा म्हणजे अलनिलम. अलनिलम हा तारा पण निळा राक्षसी तारा आहे. ह्याचा तेजस्वीपणा सूर्यापेक्षा तब्बल २७५,००० पट जास्ती आहे. ह्याची त्रिज्या सूर्यापेक्षा २४ पट मोठी आहे. काही मिलियन वर्षात ह्या ताऱ्याच रुपांतर रेड सुपर जायंट मध्ये होईल. ह्याच वय जवळपास ५.७ मिलियन वर्ष आहे. ओरायन बेल्ट मधला सगळ्यात शेवटचा तारा म्हणजे अलनिटक. अलनिटक तारापण निळा राक्षसी तारा असून ३३ पट सूर्यापेक्षा मोठा आहे. २१,००० पट सूर्यापेक्षा जास्त तेजस्वी आहे. हा तारा एक नसून तिन ताऱ्यांची एक रचना आहे.

हे सात तारे मिळून ओरायन तारकासमूह तयार होतो. आकाशात बघताना हे सगळे तारे एक वाटले तरी ह्यातील प्रत्येक तारा आपलं स्वतःच एक वेगळं नशीब घेऊन जन्माला आला आहे. त्यांच्या जन्माच्या वेळीच त्यांचा मृत्यू कसा होणार हे ठरलेलं आहे. पण त्या आधी कित्येक मिलियन वर्ष विश्वाच्या ह्या अनंत पोकळीत आपला प्रकाश हे तारे सोडत आहेत. आज पृथ्वीवर आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी ह्या वेगवेगळ्या अंतर्वर असणाऱ्या एकमेकांशी संबंध नसणाऱ्या ताऱ्यांना ओरायन किंवा मृग नक्षत्रात एकत्र बांधून त्याचं एक वेगळं विश्व तयार केलं आहे.

ओरायन तारकासमूह हा ह्या ताऱ्यान पुरती मर्यादित नाही. आधी सांगितलं त्या प्रमाणे ह्या तारका समुहात तारे निर्मितीची एक भट्टी सुरु आहे. जिकडे अश्याच कित्येक ताऱ्यांचा जन्म सुरु आहे. ह्या तारकासमूहातील ह्या भट्टी म्हणजेच ओरायन नेब्युला विषयी जाणून घेऊ पुढल्या भागात.

तळटीप :- ताऱ्यांचा आकार दाखवणारा हा एक फोटो. आपल्या सौरमालेतील ग्रहांपासून सुरु झालेला हा वाढत्या आकाराचा प्रवास आपल्या सूर्याला ही एक कणाच अस्तित्व देतो. तिकडे माणूस म्हणून आपण कुठेच नाही.

1) Mercury < Mars < Venus < Earth
2) Earth < Neptune < Uranus < Saturn < Jupiter
3) Jupiter < Wolf 359 < Sun < Sirius
4) Sirius < Pollux < Arcturus < Aldebaran
5) Aldebaran < Rigel < Antares < Betelgeuse
6) Betelgeuse < Mu Cephei < VV Cephei A < VY Canis Majoris

क्रमश:

माहिती स्त्रोत :- गुगल, विकिपिडीया

फोटो स्त्रोत :- गुगल.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल.


No comments:

Post a Comment