Wednesday, 10 April 2019

एका बुडलेल्या जहाजाची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका बुडलेल्या जहाजाची गोष्ट... विनीत वर्तक ©

बरोबर १०७ वर्षापूर्वी एका जहाजाने समुद्राच्या आपल्या पहिल्या प्रवासाला सुरवात केली. २६९.१ मीटर लांब, २८.२ मीटर रुंद ५३.३ मीटर उंच ( आपल्या चिमण्यासहित ) असणार तब्बल ४६,००० हॉर्सपॉवर शक्ती निर्माण करणाऱ्या इंजिनांनी बनवलेलं आपल्या सोबत एका वेळेस ३३०० पेक्षा जास्ती लोकांना घेऊन जाऊ शकणार. त्या काळी ज्याला न बुडणार जहाज असं सांगितलं गेलं असं १४५ मिलियन अमेरिकन डॉलर ( २०१८ च्या मानाने किंमत) किंमत असणाऱ्या आर.एम.एस. टायटेनिक ने साउथहेमटन ते न्यूयॉर्क, अमेरिका ह्या प्रवासासाठी नॉर्थ अटलांटीक महासागरात सुरवात केली. आर.एम.एस. टायटेनिक हे त्याकाळी समुद्रात तरंगणार जगातील सगळ्यात मोठं जहाज होतं. सेवेत आल्यावर फक्त पाच दिवसात जगातील न बुडणाऱ्या जहाजाला जलसमाधी मिळाली.

३१ मार्च १९११ ला बेलफास्ट आर्यलंड इकडे जवळपास १ लाखापेक्षा जास्त लोकं जमा झाली होती ती जगातील सगळ्यात मोठं आणि सर्व सुविधांनी युक्त अश्या ( रॉयल मेल शिप ) आर.एम.एस.टायटेनिक च्या उद्घाटनासाठी. ४६ हजार टनापेक्षा जास्त वजन असणारं टायटेनिक ची निर्मिती हारलेंड एंड वॉल्फ शिपयार्ड ने केली होती. थॉमस एन्ड्रू ह्याचा मुख्य आर्किटेक्ट होता. आर.एम.एस. टायटेनिक चं सारथ्य कॅप्टन एडवर्ड स्मिथ ह्यांच्याकडे होतं. ह्याच्या प्रथम वर्गाच्या श्रेणी मध्ये सुखवस्तू लोकांसाठी सगळ्या सोयी सुविधा केलेल्या होत्या अगदी स्विमिंगपूल, वाचनालय. व्यायामशाळा अश्या सगळ्या गोष्टी त्यात समाविष्ट होत्या.

१० एप्रिल १९१२ ला आपला प्रवास सुरु केल्यावर चार दिवसात आर.एम.एस. टायटेनिक ने न्यू फाउंड ल्यांड च्या दक्षिणेपासून ६०० कि.मी. वर रात्री ११.४० च्या सुमारास एका हिमनगाला धडक दिली. त्या नंतर २ वाजून २० मिनिटांनी आर.एम.एस. टायटेनिक चे दोन तुकडे होतं ह्या जहाजाला जलसमाधी मिळाली. अपुऱ्या लाईफबोटीनमुळे जहाजावर तेव्हा १००० पेक्षा जास्त लोकं होते. टायटेनिक च्या जलसमाधीमुळे पूर्ण जगाला हादरा बसला. समुद्रातील एकूणच नौकानयन शास्त्रावर ज्यात जहाज बांधणी टे त्याचा उपयोग अश्या सगळ्या गोष्टी समाविष्ट होत्या त्यावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज पूर्ण जगाला भासली. त्यातून International Convention for the Safety of Life at Sea (SOLAS) १९१४ साली स्थापना झाली. ज्याचे आज जवळपास जहाज बनवणारे, वापर करणारे १६२ देश सदस्य आहेत. जे समुद्र मार्गाने वहातुक करणाऱ्या सगळ्या जहाजांच्या ९९% हिस्सा आहेत.

आर.एम.एस. टायटेनिक नक्की का बुडलं? ह्याचा अभ्यास जगातील अनेक अभियंते आणि वैज्ञानिकांनी केला. नक्की असं काय झालं? की एकेकाळी न बुडणार जहाज असं समुद्राच्या तळाशी आपल्या पहिल्याच प्रवासात विसावलं. १९८५ च्या आसपास जेव्हा अमेरिका आणि फ्रांस च्या शास्त्रज्ञांनी टायटेनिक चे समुद्रात बुडवलेले तुकडे समुद्र तळातून बाहेर काढले तेव्हा त्याच्या जलसमाधीवर पुन्हा एकदा संशोधन सुरु झालं. समुद्रातून काढलेल्या स्टील च्या तुकड्यांना जेव्हा थंड पाण्यात ठेऊन त्यांच्यावर हातोडा मारला तेव्हा त्याचे तुकडे-तुकडे झाले. १९९० च्या दशकात अनेकांचं असं मत झालं कि आर.एम.एस. टायटेनिक च्या निर्मितीमध्ये जे स्टील वापरण्यात आलं ते योग्य नसल्याने टायटेनिक ला जलसमाधी मिळाली. पण ह्यावर अजून संशोधन झाल्यावर अजून वेगवेगळे मतप्रवाह पुढे आले त्यातील काही इकडे मांडत आहे.

१) आर.एम.एस. टायटेनिक चा वेग जेव्हा हिमनगाशी टक्कर झाली तेव्हा २२ नॉट होता. ( जवळपास ४० किमी./ तास ) वैज्ञानिकांच असं म्हणणं आहे की कॅप्टन एडवर्ड स्मिथ हिमनग असलेल्या रस्त्यावरून इतकं महाकाय जहाज वेगाने नेतं होता. ह्या वेगात हिमनगा सोबत झालेली टक्कर आर.एम.एस. टायटेनिक ला समुद्रात जलसमाधी देऊन गेली.
२) ह्या बोटीवर असणाऱ्या रेडीओ ऑपरेटर ने त्याला मिळालेल्या संदेशाकडे दुर्लक्ष केलं. आर.एम.एस. टायटेनिक ची धडक होणाच्या जवळपास एक तास आधी इथे असलेल्या द केलिफोर्निया नावाच्या जहाजाने ह्या भागात मोठे हिमनग असल्याची सूचना दिली होती. पण सूचना देताना त्या पुढे एम.एस.जी. ( Master’s Service Gram) हे सूचना पाठवताना त्याने लावलं नाही. त्यामुळे हा संदेश महत्वाचा नसून त्यासाठी कॅप्टन एडवर्ड स्मिथ ने हे सांगण्याची गरज रेडीओ ऑपरेटर ला वाटली नाही.
३) आर.एम.एस. टायटेनिक बनवताना त्याच्या मटेरीअल च्या दर्जात फेरफार केली गेली. ह्याची निर्माती कंपनी एका वेळेस टायटेनिक सारखी तिन जहाज एकाचवेळेस बांधत होती. ही जहाज वेळेत पूर्ण करण्याच लक्ष्य त्यांच्यापुढे होतं म्हणून अनेक गोष्टीत दर्जा बद्दल तडजोडी करण्यात आल्या. आर.एम.एस. टायटेनिक मध्ये जवळपास ३ मिलियन रिवेट वापरले गेले होते. ( त्या काळी लोखंड अथवा स्टील च्या दोन पट्यांना एकसंध जोडण्यासाठी रिवेट चं वापर केला जायचा. जेव्हा वेल्डिंग हा प्रकार अस्तित्वात नव्हता. असे रिवेट आपण दादरला पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलावर अथवा भायंदर च्या खाडी वरील पुलावर आज बघू शकतो. ) ह्या रिवेट मध्ये अनेक अशुद्धी आढळल्या. ह्या अशुद्धीमुळे फटका बसल्यावर रिवेट तुटून लोखंडाच्या आणि स्टील च्या प्लेट मधील एकसंधपणा नष्ट होऊन दोन पट्ट्या तुटू अथवा वेगळ्या होऊ शकतात. हे एक प्रमुख कारण टायटेनिक च्या अपघातासाठी मानलं गेलं आहे.
४) एका वैज्ञानिकाच्या मते १९१२ साली पृथ्वी अचानकपणे सूर्य आणि चंद्र ह्या दोघांच्या जवळ ओढली गेली होती. ह्या जवळ जाण्याने ह्या दोघांच्या गुरुत्वाकर्षण चा प्रभाव पृथ्वीवर त्या वर्षी सगळ्यात जास्त होता. त्यामुळे त्या वर्षी पृथ्वीवर खूप मोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या. ह्यामुळेच खूप मोठे मोठे हिमनग तुटून वेगळे होऊन समुद्रात आले असावेत असा निष्कर्ष काढला आहे. असा ही एक कयास आहे की ऑप्टीकल इल्युजनमुळे लाईट बेंड झाला असेल आणि त्यामुळे दुरून हिमनगावर लक्ष ठेवणाऱ्या लोकांना त्याचा अंदाज आधी आला नसेल. तसेच लक्ष ठेवणाऱ्या लोकांकडे साध्या दुर्बिणीपण नव्हत्या. जर कदाचित हिमनगाचा अंदाज आधी आला असता तर ही दुर्घटना टाळता आली असती.

टायटेनिक च्या लोखंडाचा दर्जा हा बर्फाच्या पाण्यासाठी योग्य नव्हता किंवा त्याचे रिवेट हलक्या दर्जाचे अशुद्ध होते. किंवा त्याकाळी पृथ्वीवर भरती ओहोटी जास्ती होती किंवा टायटेनिक वर जीव वाचवणाऱ्या बोटी ( लाईफ बोट ) अपुऱ्या होत्या किंवा टायटेनिक चं वेग खूप होता अश्या सगळ्या शक्यता धरल्या तरी आर.एम.एस. टायटेनिक हे जहाज आपल्या सोबत १५०० लोकांना घेऊन बुडाल हे सत्य आहे. आर.एम.एस. टायटेनिक ने आजपासून बरोबर १०७ वर्षापूर्वी आपल्या पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला सुरवात केली होती. आज इतके वर्षानंतर पण जगातील कोणीच आज ह्या जहाजाला विसरू शकलेलं नाही. न बुडणार जहाज आज बुडालेल्या जहाजाची एक दंतकथा बनून राहिलं आहे.

माहिती स्त्रोत :- गुगल
फोटो स्त्रोत :- गुगल, विकिपीडिया



खालील फोटोत हिमनगाला टक्कर दिल्यावर जहाजाच्या रिवेट तुटल्यामुळे कश्या पद्धतीने लोखंडाच्या प्लेट वेगळ्या झाल्या असतील हे दाखवलेलं आहे.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल ह्याची नोंद घ्यावी.



1 comment:

  1. या लेखामुळे टायटेनिक च्या बाबत अनेक वेगळ्या तांत्रिक बाजूंची माहिती मिळाली. धन्यवाद विनीत .

    ReplyDelete