Tuesday 22 June 2021

पडद्यामागचं 'गगनयान'... विनीत वर्तक ©

 पडद्यामागचं 'गगनयान'... विनीत वर्तक ©


कोरोनाच्या महामारीने जसं लोकांना प्रभावित केलं आहे, तसं अनेक कार्यक्रमांनाही कोरोनाचा फटका बसला आहे.  'इसरो' सुद्धा यातून सुटलेली नाही. 'इसरो' चा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच भारतीयांना भारताच्या भूमीवरून अवकाशात पाठवून पुन्हा त्यांना भारताच्या भूमीवर सुरक्षितरीत्या उतरवणे. याच मोहिमेला 'इसरो'ने 'गगनयान' असं नाव दिलेलं आहे. 'आकाशातील वाहन' अश्या अर्थाच्या संस्कृत शब्दांवरून हे नाव ठेवण्यात आलं आहे. आजवर जगातील फक्त तीन देशांकडे माणसाला अवकाशात नेऊन सुखरूप परत आणण्याचं तंत्रज्ञान अवगत आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांना आजवर हे शक्य करता आलेलं आहे. जर भारत गगनयान मोहीम यशस्वी करू शकला, तर भारत जगातील असं तंत्रज्ञान अवगत करणारा चौथा देश असेल. 

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिवसाच्या आधी भारतीयांना अवकाशात पाठवून त्यांना पुन्हा जमिनीवर आणण्याचं शिवधनुष्य 'इसरो'ने उचललेलं होतं, पण गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीने सगळी गणितं चुकवलेली आहेत. पण तरीसुद्धा इसरो थांबलेली नाही. पडद्यामागून 'गगनयान' मोहिमेची बांधणी कोरोना काळातसुद्धा सुरू असून आता त्याने वेग घेतला आहे. अवकाशात अंतराळयात्री पाठवणं हे खूप किचकट काम आहे. तंत्रज्ञानाशिवायही खूप साऱ्या गोष्टी यामध्ये येतात. गुरूत्वाकर्षणरहित जागेत रहाणे, खाणे, पिणे, रोजच्या इतर घडामोडी यांसोबत तिथे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तब्बेत या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सगळ्या पर्यायांचा विचार करावा लागतो. तिकडे आज डोकं दुखते किंवा ताप आला म्हणून आज कामावर जाणार नाही किंवा सुट्टी घेण्याची सोय उपलब्ध नसते. त्यामुळेच अनेक बारीकसारीक गोष्टींचा विचार यात करावा लागतो.  

भारत आपल्या इतिहासात पहिल्यांदा या सगळ्या अनुभवांतून जात आहे. त्याचसाठी भारताने या क्षेत्रात अनुभव असलेल्या आपल्या मित्राची म्हणजेच रशियाची मदत घेतली आहे. गेले वर्षभर भारताचे चार अंतराळयात्री हे मॉस्को, रशिया इथल्या 'गागारीन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर' इकडे अविरत प्रक्षिशण घेत होते. जेव्हा संपूर्ण जग कोरोना सावटाखाली चाचपडत होतं, तेव्हा हेच चार भारतीय वीर अंतराळात राहण्याचा सराव करत होते. या सरावात अनेक गोष्टींचा अंतर्भाव होता, जसे आणीबाणीच्या काळात काय करायचं? आपला जीव कसा वाचवायचा? पृथ्वीवर उतरताना कोणती काळजी घ्यायची? समजा समुद्रात उतरले तर कश्या पद्धतीने उतरायचं? जमिनीवर उतरताना काय काळजी घ्यायची? अंतराळातील शी-शू पासून ते सामना कराव्या लागणाऱ्या 'जी फोर्सेस', सेंट्रिफ्यूज फोर्सेस, गुरूत्वाकर्षणरहित अवस्थेत कार्य कश्या पद्धतीने करायचं अश्या एक ना विविध गोष्टींवर सराव सुरू होता. इकडे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की एक चूक आणि गेम ओव्हर, त्यामुळेच चुकीला जागा नाही. झोपेतून उठवल्यावरसुद्धा आपण काय करायचं याची तालीम डोक्यात फिक्स असली पाहिजे, असं हे खडतर प्रक्षिशण आहे. या चारही अंतराळवीरांनी रशियन भाषासुद्धा आत्मसात केलेली आहे, ज्यामुळे रशियन प्रक्षिक्षक आणि त्यांच्यात संवाद सुलभ व्हावा. 

फेब्रुवारी २०२० ते जवळपास २०२१ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत हे खडतर प्रक्षिशण पूर्ण करून हे चारही अंतराळयात्री पुढल्या टप्प्यासाठी भारतात परतले आहेत. त्यांनी घेतलेलं प्रक्षिशण हे रशियाच्या सोयूझ कॅप्सूलमध्ये घेतलेलं होतं. आता अभ्यास सुरू झाला आहे तो भारताने बनवलेल्या कॅप्सूलमध्ये प्रक्षिशण घेण्याचा. भारताने आपल्याला गरजेचे तसे त्यात बदल केलेले आहेत. एकीकडे इसरो रॉकेट आणि स्पेस कॅप्सूलच्या तांत्रिक आणि अभियांत्रिकी बाबींवर काम करत आहे. त्याचवेळी दुसरीकडे भारताने आपला दुसरा मित्र फ्रांससोबत अंतराळातील औषध, अन्न कसं असावं यावर काम सुरू केलं आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधे फ्रांस हा औषधांच्या बाबतीत दादा देश समजला जातो. त्याचसाठी भारताने फ्रांससोबत सहकार्याची घोषणा केली आहे. 

प्रत्यक्षात अंतराळवीर पाठवण्याआधी आपण बनवलेल्या तांत्रिक क्षमतांची चाचणी 'इसरो'ला घेणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही भारतीयाचा जीव धोक्यात घालणं परवडणारं नाही. त्यामुळे 'इसरो'ने प्रत्यक्ष मोहिमेआधी दोन चाचण्या तांत्रिक क्षमतांच्या घेण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. या दोन्ही चाचण्यांत विविध तंत्रज्ञान जे 'इसरो'ने मानवमोहिमेसाठी विकसित केलं आहे, त्याच्या चाचण्या होणार होत्या. डिसेंबर २०२० मधे एक तर २०२१ मध्ये दुसरी आणि प्रत्यक्ष मोहीम २०२२ च्या सुरूवातीला नियोजित कार्यक्रमानुसार अपेक्षित होती. पण कोरोनाच्या महामारीमुळे हे वेळापत्रक गडबडलेलं आहे. आता जर गोष्टी सुरळीत झाल्या, तर पहिली चाचणी ही डिसेंबर २०२१ आणि दुसरी चाचणी २०२२ मध्ये तर प्रत्यक्ष मोहीम २०२३ मध्ये अपेक्षित आहे. 

कोरोना काळात न थांबता 'इसरो'ने गगनयान वर आपलं काम पडद्यामागून सुरू ठेवलेलं आहे. नक्कीच भारताच्या अंतराळ प्रगतीमध्ये ही मोहीम एक मैलाचा दगड ठरणार आहे. या मोहिमेमुळे अनेक तंत्रज्ञानावर अभ्यास आणि संशोधन सुरू आहे. ज्याचा फायदा इसरो आणि भारताला येत्या काळात होईल. कोणी म्हणेल की इतके पैसे खर्च करण्यापेक्षा गरिबांना वाटा (आपल्याला सगळं फुकट खायची आणि मागायची सवय लागली आहे तो भाग वेगळा). पण अश्या मोहिमांमधून तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगती होत असते. आज अमेरिका चंद्रावर जाऊन पोहोचली कारण त्यांच्या राज्यकर्त्यांनी विज्ञानाची कास तब्बल ५० वर्षांपूर्वी धरली होती. चंद्रावर जाण्याआधी २०-२५ वर्षं त्यावर काम सुरू होतं. त्यामुळेच एका रात्रीत यश मिळवण्यासाठी अनेक रात्री जागवल्या पाहिजेत. भारताची अंतराळातली उदिष्टं ही नक्कीच वेगळी आहेत. त्यामुळे आपल्याला झेपेल तितकीच उडी मारायची आहे आणि आजवर इसरो ते करत आली आहे. 'गगनयान' मोहीमसुद्धा याहून वेगळी नसेल असा मला विश्वास आहे. 

'गगनयान' मोहिमेसाठी मेहनत घेणाऱ्या त्या चार अंतराळवीरांना माझ्या खूप शुभेच्छा. 'इसरो'च्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांनाही माझ्या शुभेच्छा. येत्या काळात भारतीय भारतातल्या जमिनीवरून अंतराळात जाऊन ७ दिवस भारताला अवकाशातून न्याहाळून जेव्हा पृथ्वीवर सुखरूप परत येतील, तेव्हा एका नव्या पर्वाची नांदी भारतात सुरू झाली असेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

जय हिंद!!! 

फोटो स्त्रोत :- गुगल (रॉसकॉसमॉस- रशिया) 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  


No comments:

Post a Comment