Sunday 6 June 2021

एका आरश्याची गोष्ट... विनीत वर्तक ©

एका आरश्याची गोष्ट... विनीत वर्तक ©

आपलंच प्रतिबिंब आपल्याला दाखवणारी गोष्ट म्हणजेच आरसा. रोज सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत प्रत्येकजण एकदातरी स्वतःला आरश्यात न्याहाळतो. जो आरसा आपल्याला प्रतिबिंब दाखवतो, तोच आपल्याला विश्वाचं प्रतिबिंबही दाखवतो. अनंत अंतरापासून निघालेला प्रकाश आपल्या कवेत घेऊन, त्याला परावर्तित करून माणसाच्या डोळ्यांपर्यंत पोहोचवल्याने आज विश्वाची अनेक कवाडं माणसाला उघडी झाली आहेत. ही गोष्ट आहे अश्या एका आरश्याची, जो पुढल्या दहा वर्षांत मानवाच्या विश्वाबद्दलच्या ज्ञानात प्रचंड भर तर घालणार आहेच, पण त्याचसोबत आपल्या पृथ्वीला धोका असलेल्या अनेक गोष्टींची धोक्याची सूचनाही आपल्याला आधीच देणार आहे. चला तर मग जाणून घेऊ विश्वाचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या या आरश्याची गोष्ट! 

२००८ साली जगातील अनेक संशोधक अमेरिकेतल्या ऍरिझोना विद्यापीठातल्या एका भट्टीसमोर जमले होते. त्या भट्टीमधलं तापमान जवळपास १२०० डिग्री सेल्सिअसला पोहोचलं होतं. त्या भट्टीत २२ टन (२२,००० किलोग्रॅम) वजनाचा काचेचा गोळा तब्बल ६० किलोमीटर/ तास वेगाने गोल फिरत होता. त्या दिवशी ही काच आपल्या वितळण्याच्या तपमानाला पोहोचली. तिने एखाद्या मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे आकार घ्यायला सुरूवात केली. तीच सुरूवात होती, जेव्हा जगातील सगळ्यांत शक्तिशाली आरसा आकाराला येत होता. त्याला घडवल्यानंतर ९० दिवसांपेक्षा जास्ती दिवस थंड करण्यात गेले. कारण तापमानातील फरक त्या आरश्याची क्षमता खराब करू शकत होता. तयार झाल्यावर तब्बल ६ वर्षं त्याला ग्राइंडिंग आणि पॉलिशिंग केलं गेलं. त्यातून जन्माला आला 'एम १ एम ३' आरसा. 

'एम १ एम ३' आरसा हा चिली-मध्ये बनत असलेल्या वीरा सी. रुबीन Large Synoptic Survey Telescope (LSST) वेधशाळेचा मुख्य भाग आहे. जी २०२२ मध्ये तयार होऊन आकाशाचा वेध घ्यायला सुरू करेल. या वेधशाळेची क्षमता बघितली तर डोळे विस्फारून जातील. आकाशातील ३७ बिलियन ( १ बिलियन म्हणजे १०० कोटी) तारे, ग्रह यांचा वेध घेण्याची हिची क्षमता आहे. विश्वाचा वेध घेताना, पृथ्वीला धोका असणाऱ्या १० मिलीयन (१ मिलियन १० लाख) वस्तूंचे अलर्ट तसेच १००० पेअर ऑफ एक्स्पोजर आणि २० टेराबाईटची माहिती प्रत्येक रात्रीत गोळा करण्याची प्रचंड अशी क्षमता आहे. यावरील कॅमेरा हा तब्बल ३२०० मेगा पिक्सलचा आहे. ज्यातून पोर्णिमेचे ४० चंद्र बसतील इतकी मोठी इमेज प्रत्येक क्लिकमध्ये घेण्याची क्षमता आहे. हे सगळं या वेधशाळेला बंदिस्त करणं शक्य होणार आहे, ते या 'एम १ एम ३' आरश्यामुळे. आपल्या विश्वाबद्दलच्या माहितीत आमूलाग्र भर घालण्याची क्षमता या आरश्यामुळे वीरा सी. रुबीन. वेधशाळेला प्राप्त झाली आहे. 

'एम १ एम ३' आरसा हा साधासुधा आरसा नाही. याच्या निर्मितीमध्ये अगदी या आरश्यात असलेल्या प्रत्येक खड्याला मोजून मापून निरखून घेण्यात आलं आहे. या आरश्यासाठी लागणाऱ्या मटेरिअल सॅण्ड, सोडाऍश आणि लाइमस्टोनमधील प्रत्येक कण हा पारखून निवडण्यात आला आहे. त्याची निवड ही  जपानमधील एका कंपनीने केली आहे. अमेरिकेत भट्टीमध्ये तापवण्याआधी यातील प्रत्येक लेअर ही योग्य प्रमाणात रचली गेली आहे. अत्यंत किचकट असणारी प्रत्येक  पायरी आणि काळजी घेऊन या आरश्याची निर्मिती केली गेली आहे. विश्वाच्या कोपऱ्यात येणाऱ्या अगदी अंधुक प्रकाशाचा वेध घेण्यासाठी या आरश्याचा पृष्ठभाग हा आपल्या केसांच्या जाडीइतक्या अचूकतेने पॉलिश  केला गेला आहे. त्याला हवा तसा आकार देण्यासाठी एका इंचाच्या एक मिलियन-व्या(१० लाख ) भागाइतकी अचूकता त्याच्या पृष्ठभागावर ठेवण्यात आली आहे. आता लक्षात येत असेल की अश्या पद्धतीचा आरसा ग्राइंडिंग आणि पॉलिश करायला तब्बल ६ वर्षं का लागली असतील.   

'एम १ एम ३' हा एक आरसा नाही, तर दोन आरसे एकात एक असे बनवले गेले आहेत. रात्रीच्या आकाशात जेव्हा वीरा सी. रुबीन वेधशाळा विश्वाचा वेध घेण्यासाठी हा आरसा फोकस करेल, तेव्हा विश्वाच्या पोकळीतून येणारा प्रकाश 'एम १' आरश्यावर ('एम १' आरसा म्हणजे ह्या आरश्याचा बाहेरचं वर्तुळ) पडून प्रतिबिंबित होईल. हे प्रतिबिंब ३.४ मीटरच्या दुसऱ्या 'एम २' आरश्यावर पडून पुन्हा 'एम ३' आरश्यावर, जे की ह्या आरश्याचं आतलं वर्तुळ आहे त्यावर प्रतिबिंबित होईल आणि मग तिकडून प्रतिबिंबित झालेला प्रकाश ३२०० मेगापिक्सल असलेल्या लेन्सवर प्रतिबिंबित होऊन आपल्या समोर विश्वाची कवाडं उघडी करेल. विश्वातील आत्तापर्यंतचा मानवाने बनवलेला सगळ्यात शक्तिशाली कॅमेरा हा असेल. ज्यातून विश्वाच्या अनेक अद्भुत रहस्यांचा उलगडा होणार आहे.   

आजवर आपण जे विश्व बघत आलो, त्याला एका वेगळ्याच पातळीवर प्रतिबिंबित करणारा हा आरसा मानवाच्या तांत्रिक कौशल्यातील एक मैलाचा दगड नक्कीच आहे. पुढल्या वर्षी जेव्हा ही वेधशाळा सुरू होऊन विश्वाचा वेध घ्यायला सुरूवात करेल, तेव्हा गेली १२-१३ वर्षं त्याच्या निर्मितीत वेचलेल्या प्रत्येक क्षणाचं सोनं होईल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. या आरश्याच्या निर्मितीसाठी मेहनत करणाऱ्या वैज्ञानिक, कामगार आणि अभियंते तसेच या वेधशाळेच्या निर्मितीसाठी पैसा उपलब्ध करणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार. मला खात्री आहे, की  येत्या काही काळात वीरा सी. रुबीन Large Synoptic Survey Telescope (LSST) आपल्याला ज्ञात असणाऱ्या विश्वाच्या जडघडणीत मोलाचं योगदान देईल.       

फोटो स्त्रोत :- गुगल ( एका फोटोत आरश्याच्या निर्मितीचं मटेरियल काळजीपूर्वक भट्टीत रचताना तर दुसऱ्या फोटोत वैज्ञानिक अचूकतेने आरश्याला पॉलीश करताना) 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


 




No comments:

Post a Comment