'टाटा' लोककल्याणाचा सव्वाशे वर्षांचा प्रवास... विनीत वर्तक ©
What advances a nation or a community is not so much to prop up its weakest and most helpless members, but to lift up the best and the most gifted, so as to make them of the greatest service to the country."
- Jamsetji Tata
आपलं हे ब्रीदवाक्य बनवत जमशेदजी टाटा यांनी १८९२ मध्ये म्हणजे आजपासून जवळपास १२९ वर्षांआधी लोककल्याणाच्या कार्याचा श्रीगणेशा केला होता. ज्यावेळेस संपूर्ण विश्वात श्रीमंत होण्यासाठी चढाओढ लागली होती, त्यावेळेस टाटा भारताला विश्वात उभारी देण्यासाठी कार्यरत होते. आज या गोष्टीला १२९ वर्षं होत आहेत आणि त्यांचे लोककल्याणाचे महान कार्य आजही त्यांचे वंशज पुढे नेत आहेत. आज टाटा समूह जो भारतातील सगळ्यात मोठा उद्योगांचा समूह तर आहेच, पण जगातील अग्रगण्य समूहांतही तो समाविष्ट आहे. आज टाटा समूहाचं बाजारमूल्य तब्बल १०६ बिलीयन अमेरिकन डॉलर आहे. त्यातील ६६% हिस्सा हा टाटा ट्रस्टकडे आहे. या ट्रस्टशी संबंधित तब्बल ८५५ पेक्षा जास्ती वेगवेगळ्या संस्था आहेत. भारताच्या ३३ राज्यातून ६४० पेक्षा जास्ती जिल्ह्यांत या संस्थेच्या मार्फत ते भारताच्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा स्तर उंचावत आहेत. आज टाटा ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल १०० मिलियन भारतीयांना आपलं आयुष्य उंचावण्याची संधी दिली जात आहे.
गेली १२९ वर्षं टाटा कोणताही गाजावाजा न करता लोककल्याणाचे आपले काम शांतपणे करत आलेले आहेत. एका पिढीकडून तीच तत्त्वं दुसऱ्या पिढीकडे देण्यात आली आहेत. आज रतन टाटा या लोककल्याणाच्या वटवृक्षाचं काम पुढे नेत आहेत. २०२० साली भारताच्या दरवाज्यावर कोरोनाच्या महामारीने धडक दिल्यावर झालेल्या अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी पुढे येणारा हाच वटवृक्ष होता. टाटा ग्रुपने २०२० मध्ये १५०० कोटी रुपयांची तात्काळ मदत पी.एम. केअर्स फंडला केलेली होती. याची कोणतीही जाहिरात त्यांनी केली नाही, ना त्या बदल्यात सरकारकडून टाटांनी अपेक्षा ठेवली. कदाचित भारतीय लोकांनाही त्याची जाणीव होऊ दिली नाही. पण आज टाटांच्या या लोककल्याणाच्या कामाला जेव्हा पाश्चात्य देशातील संस्थेने पहिलं स्थान दिलं, तेव्हा भारतीयांना या वटवृक्षाची जाणीव झाली.
Hurun Research and EdelGive Foundation या संस्थेने २०२१ मध्ये सादर केलेल्या रिपोर्टनुसार जगात गेल्या १०० वर्षांत ज्या लोकांनी आपल्या कमाईचा सर्वाधिक वाटा लोककल्याणासाठी दिला अश्या यादीत भारताचे 'जमशेदची टाटा' यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. त्यांनी केलेल्या लोककल्याण कामासाठी दिलेल्या कमाईची अंदाजित किंमत आज जवळपास १०२.४ बिलियन (१ बिलियन म्हणजे १०० कोटी) अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. त्यांच्या मागे असणारं बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन तब्बल २८ बिलियन अमेरीकन डॉलरने मागे आहे. १०० बिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्ती पैसे दान करणारे जगात एकमेव व्यक्ती आणि संस्था आहे, ती म्हणजे 'टाटा ग्रुप'. ती व्यक्ती एक भारतीय आहे याचा अभिमान सगळ्याच भारतीयांना असायला हवा.
रुपर्ट हूजवर्फ जे हुरून संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांनी म्हटलं आहे,
“While American and European philanthropists may have dominated the thinking of philanthropy over the last century, Jamsetji Tata, Founder of India’s Tata Group, is the world’s biggest philanthropist.”
Rupert Hoogewerf, the chairman and chief researcher at Hurun
'हुरून'ने आपल्या रिपोर्टमध्ये पुढे म्हटलं आहे, की लोककल्याणाची सुरूवात जमशेदजी टाटानी १८९२ मध्ये केली. आपल्यानंतरही ते काम पुढे तसेच सुरू ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या कमाईमधील २/३ हिस्सा हा ट्रस्टकडे ठेवला आणि त्यातून लोककल्याणाचे हे व्रत असेच अविरत सुरू राहील याची काळजी घेतली. आज रतन टाटांनी हे व्रत असंच सुरू ठेवलं आहे. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आज शिक्षण, हेल्थकेअर ते अनेक क्षेत्रात भारतीयांना आयुष्यात वर येण्यासाठी संधी आणि मदत दिली जाते. जमशेदजी टाटांनी म्हटल्याप्रमाणे भारताला पुढे नेण्याचं पवित्र कार्य आज टाटा ग्रुप अविरत करत आहे. टाटा ग्रुपच्या दानशूरपणाला माझा कडक सॅल्यूट आणि त्यांच्या पुढील कार्याला माझ्या शुभेच्छा.
जय हिंद!!!
फोटो स्त्रोत :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment