Wednesday 2 June 2021

रांगण्याची गोष्ट... विनीत वर्तक ©

 रांगण्याची गोष्ट... विनीत वर्तक ©


कोणतंही मूल जन्माला आल्यावर काही महिन्यांनी ज्या गोष्टीची सगळेजण वाट बघत असतात, ती म्हणजे ते रांगायला केव्हा लागते. आपल्या आयुष्यात स्वतःच्या हिमतीवर पुढे जाण्यासाठी केलेली ती धडपड म्हणजेच आयुष्यात त्याने टाकलेल्या पहिल्या पावलांची नांदी असते. काळाच्या ओघात आपण 'रांगणे म्हणजे काय?' हे विसरून जातो. मोठेपणी आपल्या घरातील दोन भिंतींएवढं अंतर रांगून दाखव, असं म्हटलं तरी आपल्याला घाम फुटेल. पण आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी  आणि आपलं लक्ष्य मिळवण्यासाठी कोणी तब्बल ११ दिवस रांगून ३ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर तब्बल १७,००० फूट उंचीवर गाठलं असेल, असं आपल्याला कोणी सांगितलं, तर आपला विश्वास बसणार नाही. कारण आपल्याला पडद्यावरचे शत्रुघ्न सिन्हा माहीत असतात पण असा भीमपराक्रम करणारे 'नायक शत्रुघ्न सिंग' मात्र इतिहासाच्या पानात लुप्त झालेले असतात. तर कोण आहेत हे शत्रुघ्न सिंग? आणि काय आहे त्यांच्या रांगण्याची गोष्ट? कारगिल युद्धाचं पारडं भारताच्या बाजूने झुकवण्यात त्यांच्या रांगण्याची काय भूमिका होती?

३ मे १९९९ चा दिवस होता, जेव्हा बटालिक सेक्टरमधल्या गरकोन गावातील ताशी आणि तेरसिंग गुराखी आपल्या याक-ना चरायला घेऊन गेले होते. याक-चा शोध घेताना बटालिकच्या टेकड्यांवर त्यांना काही माणसे जाताना दिसली. बर्फ अजून वितळायचा होता आणि थंडीच्या काळात आपल्या पोस्ट सोडून मागे गेलेले भारतीय सैनिक परत यायला वेळ होता, अश्या वेळेस कोण लोक बटालिकच्या टेकड्यांवर जात आहेत, असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी वेळ न दवडता त्यांची माहिती भारतीय सेनेच्या ३ पंजाब रेजिमेंटला दिली. हीच सुरूवात होती कारगिल युद्धाची. मे संपता संपता हे स्पष्ट झालं होतं की भारताच्या भूमीत पाकिस्तानने घुसखोरी केली आहे. पण पाकिस्तान असं भासवत होता की काही आतंकवादी इकडे घुसले असतील. आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचं पितळ उघडं पाडण्यासाठी भारताला पुरावे हवे होते. याच काळात भारताने काही सैनिकांना गमावलं तर काहींना पाकिस्तानने पकडलं होतं. 

२९ मे १९९९ रोजी मेजर एम. सर्वानन यांच्या नेतृत्वाखाली १ बिहार टीमच्या १५ जणांनी पॉईंट ४२६८ वर हल्ला बोल केला. पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्या टीम वर गोळ्यांचा वर्षाव सुरु केला. मेजर एम. सर्वानन यांनी मागे परतण्याचा विचार सोडून दिला आणि शत्रूवर हल्ला केला. या धुमश्चक्रीत मेजर आणि नायक गणेश प्रसाद यांना वीरमरण आलं. पण त्यांचे मृतदेह शत्रूच्या हाती लागू नये यासाठी नायक शत्रुघ्न सिंग यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शत्रूच्या दिशेने हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या साथीदारांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी कव्हर फायर देण्यास सुरवात केली. पण पुढे काय होणार आहे याचा अंदाज सर्वांना आला होता, पण 'बचेंगे तो ओर भी लढेंगे' या उक्तीला भारतीय सैनिक पुरून उरले. आपल्या साथीदारांना मदत करताना नायक शत्रुघ्न सिंग यांना उजव्या पायात गोळी लागली आणि ते जायबंदी झाले. 

आपल्या उरलेल्या साथीदारांना त्यांनी स्वतःला युद्धभूमीत सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं. आपण जायबंदी झाल्यामुळे आपले साथीदार शत्रूच्या हातात सापडू नयेत म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला आणि युद्धभूमीवर शत्रूवर गोळीबार करत राहिले. शत्रू त्यांच्यासमोर अगदी १०० मीटर वरून गोळ्यांचा वर्षाव करत होता. प्रतिउत्तर यायचं कमी झाल्याचं दिसताच शत्रूने भारतीय सैनिक जिकडे होते तिकडे ते सर्व मेल्याची खात्री करण्यासाठी त्यांनी शोध सुरु केला. जायबंदी झालेल्या नायक शत्रुघ्न सिंग यांना दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता तेव्हा त्यांनी मेल्याचं नाटक केलं. तब्बल ७ तास ते आपला श्वास रोखून तसेच निपचित पडून होते. शत्रू आणि भारताच्या सैनिकांनाही ते मृत्युमुखी पडल्याचं वाटलं. त्यांच्या कुटूंबियांनाही ते हुतात्मा झाल्याचं कळवण्यात आलं. पण नायक शत्रुघ्न सिंग यांचा लढा संपला नव्हता. तब्बल ७ तासांनी सगळं शांत झाल्याचा अंदाज आल्यावर त्यांनी डोळे उघडले. १७,००० फुटावर जिकडे बर्फाचे साम्राज्य असते तिकडे हाडे गोठवणाऱ्या थंडीत उभे राहण्यास आणि चालण्यास असमर्थ असलेल्या  भारतीय सैनिकाची गोष्ट संपत नाही तर इकडे सुरू होते.  

डोळे उघडल्यावर त्यांनी आजूबाजूचा अंदाज घेतला. आणि तिथे मृतदेहांची सुरक्षा करत असलेल्या पाकिस्तानी सैनिकाला त्यांनी तश्या अवस्थेत टिपलं. त्याचा देह जिकडे निपचित पडला होता तिकडे रांगत जाऊन त्यांनी त्याची मशिनगन हस्तगत केली. त्याचसोबत त्याच्या खिशातून काही कागदपत्रे त्यांनी मिळवली. ती बघताच त्यांना पाकिस्तानचा हेतू स्पष्ट झाला. कारण जिकडे भारत आणि जग आतंकवाद्यांनी घुसखोरी केली असं समजत होते तिकडे प्रत्यक्षात पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण नियोजन करून हा डाव खेळला होता. त्याच्या खिशात असलेलं पाकिस्तानी सैन्याचं ओळखपत्र आणि पगाराची पावती या गोष्टी पाकिस्तानी सैनिक या युद्धाला जबाबदार आहेत हे स्पष्ट करत होत्या. पण आता हे सगळं भारतीय सैन्याच्या बेसपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. उभं राहण्यासही असमर्थ असलेल्या नायक शत्रुघ्न सिंग यांनी रांगायला सुरवात केली. १७,००० फुटावर तब्बल ११ दिवस कोणत्याही अन्न-पाण्याशिवाय शत्रूच्या नजरेत न येता ते रांगत होते एका लक्ष्यासाठी.... तब्बल ३ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर त्यांनी बर्फाच्या कातळांवर रांगत येऊन आपल्याकडील पाकिस्तानी सैनिकाची हस्तगत केलेली मशिनगन, दारुगोळा आणि सगळ्यात महत्वाची असलेली कागदपत्रं त्यांनी भारतीय सेनेला दिली. यानंतर युद्धाची रणनीती संपूर्णपणे बदलून गेली आणि पाकिस्तान जागतिक मंचावर उघडा पडला. 

 नायक शत्रुघ्न सिंग यांना त्यांच्या भीमपराक्रमासाठी 'वीर चक्राने' सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पराक्रमानंतर एकट्या बटालिक सेक्टरमधे ६० पेक्षा जास्ती पाकिस्तानी सैनिकांची आणि अधिकाऱ्यांची ओळख पटवण्यात आली. लहानपणी टाकलेल्या पहिल्या पावलाने नायक शत्रुघ्न सिंग यांनी असा एक पराक्रम केला ज्याचा विचारही आपण आज करू शकत नाही. पण त्यांच हे रांगणं नेहमीप्रमाणे इतिहासाच्या पानात लुप्त झालं. 'खामोश' असं आपल्या स्टाईलने म्हणणाऱ्या शत्रुघ्नसोबत प्रत्येक भारतीयाने रांगणाऱ्या नायक शत्रुघ्न सिंग यांना पण लक्षात ठेवलं तर माझ्या मते तो त्या सैनिकाच्या पराक्रमाचा यथोचित सन्मान असेल. नायक शत्रुघ्न सिंग यांना माझा कडक सॅल्यूट. 

जय हिंद!!! 

फोटो स्त्रोत :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment