Sunday 23 January 2022

Our Beloved Summer... विनीत वर्तक ©

 Our Beloved Summer... विनीत वर्तक ©

नात्यांची परीभाषा अनेकदा शब्दात व्यक्त करता येत नाही. ते कधी सुरु होते, कधी आपल्या मनाचा ठाव घेते, कधी हसवते, कधी रडवते, कधी विचार करायला भाग पाडते तर कधी विचार न करताच निर्णय घ्यायला लावते. असं सगळं असताना पण आपल्याला ते नात हवं असते. कधी भांडलो असू, कधी हसलो असू, कधी मत्सर वाटला असेल, कधी राग आला असेल आणि कधी प्रेम जाणवलं असेल. काहीही असलं तरी ते क्षण आपलेच असतात. आयुष्याच्या प्रवासात अनेकदा अश्या नात्यांचे रंग उडणाऱ्या फुलपाखरा प्रमाणे हातावर रंग सोडून दूर निघून जातात. कधी आपण बाजूला होतो तर कधी परिस्थिती तशी असते. काहीही असलं तरी ते आपलं असते म्हणून ते क्षण त्या दोघांच्या आयुष्यात नेहमीच जोडलेले राहतात. जेव्हा पुन्हा एकदा लांब गेलेलं ते फुलपाखरू आपल्या आयुष्याच्या एका अपरिचित वळणावर समोर येत तेव्हा आपल्याला जाणवत की बाहेरून किती द्वेष केला, कितीही राग आला तरी आतून कुठेतरी एक कोपरा आजही फक्त त्या व्यक्तीसाठीच राखीव असतो. 

अलगद, हळुवार मनाच्या आठवणींच्या कोपऱ्यात कोरलेले ते क्षण जेव्हा पुन्हा समोर येतात तेव्हा आपली अवस्था आपल्यालाच कळत नाही. कुठेतरी नको पण कुठेतरी हवं वाटणार सगळच आपल्याला गोंधळात टाकतं. अनुभवलेले ते रंग पुन्हा सजीव होतात, काही खपल्या पुन्हा ओल्या होतात तर काही क्षण पुन्हा सजीव होतात. या सगळ्यात आपण काय करावं हेच सुचत नाही. हे सगळं पुन्हा एकदा का? कशाला? कुठे घेऊन जाणार? असे प्रश्न मनाचा नकळत ठाव घेतात. पण कसं असते ना आपण दाखवलं नाही तरी ती व्यक्ती आपल्याशी कुठेतरी जोडलेली असते. भले आपण पुन्हा सोबत जाऊ किंवा लांब जाऊ पण अनुभवलेले ते क्षण मात्र त्या दोन व्यक्तींचेच असतात. आयुष्यात नात्यांची होणारी ही घालमेल सध्या एका सिरीज मधून अतिशय सुंदर, तरल पद्धतीने समोर आलेली आहे. अतिशय सुंदर कथा, पटकथा, त्या कथेचा फ्लशबॅक ते वर्तमानात होणारा प्रवास, खूप खूप सुंदर अभिनय, शब्दांची उंची, सुंदर संगीत, अतिशय सुंदर असा  बॅकग्राउंड साउंड, सुंदर सिनॉमेटोग्राफी आणि संवादाशिवाय मनात असणारा गुंता समोर ठेवण्याचं कसब या सगळ्या पातळ्यांवर अगदी सर्वोत्तम बसेल अशी ही सिरीज म्हणजेच 'Our Beloved Summer'. 

आयुष्यात प्रत्येकजण या अनुभवातून गेलेला असेल. तारुण्याच्या त्या उंबरठ्यावर प्रत्येकाने 'क्रश' हे अनुभवलेलं असतेच. ज्यावर ते असते त्याला आपण कधी सांगून मोकळे होतो तर कधी ते शेवटपर्यंत अव्यक्त रहाते. कधी त्याच्या प्रवासाला सुरवात होते, तरी कधी ते शेवटपर्यंत आपल्याच सोबत असते. पण अनेकदा आयुष्याच्या प्रवासात ते धागे अर्धवट तुटतात. चूक का बरोबर असा निर्णय त्यात घेता येत नाही. कधी काही गोष्टी आपण ठरवलं तरी सांगूच शकत नाहीत. तर कधी परिस्थिती अशी असते की आपण फक्त त्याच्यासोबत पुढे जात रहातो. शेवट काहीही असो पण जगलेले, अनुभवलेले, उमललेले ते क्षण प्रत्येकाच्या मनात शेवटपर्यंत कोरलेले राहतात. ही सिरीज बघताना आपण अगदी सहज आपसूक त्याच्या सोबत पुन्हा एकदा जोडले जातो. इतक्या सुंदर पद्धतीने त्या क्षणांशी जोडताना आपल्यालाच आपल्या हातून निसटून गेलेल्या काही गोष्टी गवसतात. कधी आपल्या चुकांची जाणीव होते तर कधी समोरच्याच्या परिस्थितीची जाणीव होते. ते क्षण आपण आपसूक पुन्हा एकदा जगतो. इतक्या सहजतेने ही सिरीज आपल्याला आपल्याशी जोडते. 

 'Our Beloved Summer' सारख्या नितांत सुंदर मालिका आपल्याकडे का निर्माण होत नाही हे कोड मला अजूनही उलगडलेलं नाही. प्रेमासारखी तरल भावना त्याच तरलतेने समोर आणली तर ती जास्ती खोलवर रुजते. बटबटीतपणा, ओंगळवाण प्रदर्शन, नात्यांच उदात्तीकरण, संस्कृती चे बुरखे याचा सतत तोच तोच भडीमार करणाऱ्या मालिका बघितल्या तर समाज म्हणून आपण कुठे मागे पडतो आहोत याचा अंदाज येतो. या बाबतीत साऊथ कोरियन संस्कृती खूप वरती आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही. नात्यांचे पदर हे हळूच उलगडायचे असतात. त्यातले धागे उसवले तरी ते शिवता येतात. अगदी नाहीच शिवले तरी बाकीचे जपता येतात. दहा वेळा प्रेम आहे हे सांगून प्रेम मोठं होत नाही. तर ते न सांगताही मोठं करता येतं. स्पर्शाची अनुभुती फक्त सेक्स मधून जाणवून द्यायची नसते तर अलगद गुंफलेली बोटं सुद्धा अनेकदा त्या पलीकडे घेऊन जातात. 

'Our Beloved Summer' बघताना मी जे अनुभवलं त्यातलं थोडं इकडे लिहिलं आहे. ही सिरीज कॉमेडी प्रकारात मोडते पण प्रत्यक्षात खूप अंतर्मुख करून जाते. असं मी तरी अनुभवलं. एखादी व्यक्ती अशी का असते? याची उत्तर आपल्याला अनेकदा मिळत नाहीत. पण ते जाणून घेण्यासाठी आपण त्या पद्धतीने विचाराचं करत नाहीत हे या सिरीज मधून जाणवलं. आपण गोष्टी बघतो, ऐकतो, समजतो त्या पलीकडे एक वेगळी बाजू असते जी जाणून घेतली तर कदाचित ते आपले क्षण अजून नक्कीच सुंदर झाले असते किंवा होतील याची जाणीव मला झाली. 

पुन्हा एकदा Our Beloved Summer ही एक अतिशय सुंदर सिरीज ज्यांना खरच आपल्या प्रेमाच्या पदरांना पुन्हा एकदा हळुवार स्पर्श करायचा आहे त्यांनी नक्कीच बघा. नेटफ्लिक्स वर ही सिरीज उपलब्ध आहे. प्रेक्षकांच्या मतानुसार तिला ४.९ स्टार मानांकन आहे. ( ५ पैकी) तर आय.एम.डी.बी. नुसार ८.८ मानांकन असलेली ही सिरीज चुकवू नये अशीच आहे. 

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



No comments:

Post a Comment