ब्राह्मोस ई.आर. एक पाऊल पुढे... विनीत वर्तक ©
दोन दिवसांपूर्वी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने ब्राह्मोस ई. आर. या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्ती ची यशस्वी चाचणी केली. मुळात ई. आर. काय प्रकार आहे? या चाचणीने काय साधलं हे जाणून घेणं महत्वाचं आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे मुळात सुपरसॉनिक क्षेपणास्त्र म्हणून भारत आणि रशियाने संयुक्तिकरित्या विकसित केलं. जेव्हा ब्राह्मोस च्या चाचण्या झाल्या तेव्हा अश्या पद्धतीच्या तंत्रज्ञानात भारताने कमालीचं वर्चस्व मिळवलं. सुपरसॉनिक क्षेपणास्त्रात सगळ्यात महत्वाची असते ती अचूकता. ब्राह्मोस च्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याची अचूकता आहे १ मीटर. याचा अर्थ काय तर ब्राह्मोस ३०० किलोमीटर लक्ष्य हे १ मीटर च्या व्यासात अचूकतेने भेदू शकते. ब्राह्मोस चा स्वनातीत वेग आणि त्याची अचूकता त्याला जगातील सगळ्यात भयंकर असं क्षेपणास्त्र बनवतात.
२०१६ मधे जेव्हा भारत एम.टी.सी.आर. चा सदस्य झाला तेव्हा ३०० किलोमीटर अंतराची मर्यादा मोडीत निघाली. ब्राह्मोस ची क्षमता वाढवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. पण इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की मुळात क्रूझ क्षेपणास्त्र ही महत्वाची असतात ती अचूकतेसाठी. त्यामुळेच ते जी अंतर कापतात ती लहान असतात. कारण आपण जसजशी अंतराची मर्यादा वाढवत नेऊ तसतशी त्यांची अचूकता कमी होते जाते. जरी तुमचं क्षेपणास्त्र खूप लांब गेलं तरी अचूकतेने लक्ष्याचा खात्मा करेल याची शाश्वती देता येत नाही. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) पुढे हेच आव्हान होतं. जर ब्राह्मोस ची क्षमता वाढवायची तर त्याची अचूकता वाढवण्यासाठी लागणार तंत्रज्ञान पण विकसित करावं लागणार होतं.
आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करताना संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने ब्राह्मोस च्या नेव्हिगेशन प्रणालीत आमूलाग्र बदल केले. ब्राह्मोस जी. पी. एस., ग्लोनास आणि नाविक अश्या तिन्ही उपग्रह प्रणालींचा वापर करते. त्यातून आपलं लक्ष्य अचूकतेने भेदते. याच प्रणालीचा विकास भारताच्या संशोधक आणि वैज्ञानिक यांनी यशस्वीरीत्या केल्यावर ब्राह्मोस च्या मर्यादेत आता वाढ करण्यात आली आहे. याआधीच ब्राह्मोस ने ४५० किलोमीटर चा टप्पा पार केला होता. परवा झालेल्या चाचणीत ब्राह्मोस ने तब्बल ७००- ८०० किलोमीटर चा टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे. हा टप्पा पार करणं म्हणजे फक्त तितकं अंतर त्याने कापणं नव्हे. तर त्या अंतरावर असलेल्या लक्ष्याचा अचूकतेने वेध घेणं हे तितकं महत्वाचं आहे. त्यात ब्राह्मोस ई.आर. म्हणजेच ब्राह्मोस एक्क्सटेंडेड रेंज यशस्वी ठरलं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) झपाट्याने ब्राह्मोस ला विकसित करत आहे. ब्राह्मोस ई. आर. हे तब्बल १५०० किलोमीटर पर्यंत अचूकतेने लक्ष्य भेदण्यासाठी त्याच्या तंत्रज्ञानात बदल केले जात आहेत. त्याचाच एक भाग परवाची चाचणी होती. ज्यात ८०० किलोमीटर चा टप्पा पार केला गेला. पुढला टप्पा कदाचित १००० किलोमीटर, त्यानंतर १२०० किलोमीटर आणि त्यानंतर १५०० किलोमीटर चा असेल.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ब्राह्मोस ला आता अग्नी सिरीज प्रमाणे विकसित करत आहे. ३०० किलोमीटर पासून १५०० किलोमीटर पर्यंत कोणत्याही टप्यात लक्ष्य भेदणारं सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल असणारा भारत एकमेव देश असेल. त्यात ब्राह्मोस ची अचूकता आणि वेग याची तुलना जर अशीच राहिली तर ब्राह्मोस ला १५०० किलोमीटर पर्यंत रोखणं जगातल्या कोणत्याही मिसाईल डिफेन्स सिस्टीम ला शक्य होणार नाही. त्यात एकाचवेळी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) 'ब्राह्मोस के' च निर्माण करत आहे. जे की ध्वनी च्या ७-८ पट (९६०० किलोमीटर / तास ) वेगाने जाऊ शकणार आहे. त्याचा ही मारक क्षमता १००० किलोमीटर ची असणार आहे. ज्याप्रमाणे भारताने टप्या टप्याने अग्नी ला विकसित करत त्याची क्षमता आज ८००० किलोमीटर पर्यंत नेली आहे. ब्राह्मोस जर अश्या पद्धतीने येत्या काही वर्षात विकसित झालं तर पाकिस्तान आणि चीन सोबत भारतावर वाईट नजर ठेवणाऱ्या सर्वांवर वचक बसेल.
तूर्तास परवाच्या ब्राह्मोस ई. आर. चाचणीच्या यशासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), वैज्ञानिक, अभियंते, कामगार, ब्राह्मोस एरोस्पेस आणि इतर सर्व संलग्न उद्योगांच अभिनंदन
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
China has Hypersonic Inter Continental Surface to surface missile series called DongFeng 31 which has a range of 12000 km and Circular Error Probability of 10 mts. That means China can hit Washington DC without launching a fighter aircraft. Our "experts" write without doing any homework...all info available on net, not a secret.It is OK to be proud of Indian scientific achievement, but also need to be realistic, instead of turning into ostriches.
ReplyDelete