Saturday 1 January 2022

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १६ )... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १६ )... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात काही महत्वपूर्ण घटना भारताच्या दृष्टीने जागतिक पटलावर घडलेल्या आहेत. गेली अनेक दशके खरे तर स्वातंत्र्यानंतर भारत रक्षा प्रणालींचा आयात करणारा देश म्हणून प्रसिद्ध होता. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कोट्यवधी ते अब्जोवधी चे व्यवहार रक्षा क्षेत्रात होत होते. या अब्जो रुपयांच्या व्यवहारात दलाली, लाचखोरी ही मोठ्या प्रमाणावर होत होती. भारतात घडलेली 'बोफोर्स' सारखी प्रकरणे जागतिक मंचावर भारताची खिल्ली उडवण्यासाठी आजही वापरली जातात. पण गेल्या काही वर्षात वाऱ्यांनी दिशा बदललेली आहे. भारताने आपल्या संरक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टी देशातच बनवण्यावर भर दिला. 'मेक इन इंडिया' सारख्या योजनांमधून जास्तीत जास्त रक्षा उत्पादन ही भारतात बनवण्यासाठी चालना मिळाली. त्यामुळेच गेल्या काही वर्षात भारतात रक्षा प्रणालींची आयात मोठ्या प्रमाणावर घटली आहे. गेल्या वर्षात तर ही घट तब्बल ३३% इतकी नोंदली गेली आहे. याचा सरळ अर्थ आहे की भारताचं परकीय चलन यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाचलं तर आहेच. पण देशांतर्गत निर्मितीमुळे देशात रोजगाराची निर्मिती झाली आहे. यावर न थांबता आता भारत रक्षा प्रणाली निर्यात करण्याच्या मार्गावर प्रस्थान करू लागला आहे. भारताचा रक्षा प्रणाली निर्याती मधील उदय गेल्या आठवड्यातील काही घटना स्पष्टपणे दर्शवित आहेत. 

सौदी अरेबिया हा जगातील रक्षा प्रणाली आयात करणारा सगळ्यात मोठा देश आहे. भारताच्या संपूर्ण रक्षा अंदाजपत्रकापेक्षा त्यांनी मागणी नोंदवलेल्या रक्षा प्रणालीचा आकडा मोठा आहे. भारताचं रक्षा अंदाजपत्रक जवळपास ७० बिलियन (१ बिलियन = १०० कोटी) अमेरिकन डॉलर इतकं आहे. तर सौदी अरेबिया ने येत्या काळात फक्त अमेरिकेकडून विकत घेतलेल्या रक्षा प्रणालीची किंमत ११० बिलियन अमेरिकन डॉलर च्या घरात आहे. येत्या १० वर्षात अजून ३५० बिलियन अमेरिकन डॉलर ची रक्षा प्रणाली सौदी अरेबिया अमेरिकेकडून विकत घेणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की भारताच्या दृष्टीने नक्की वाऱ्यांनी काय दिशा बदलली आहे? तर गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकन सरकार आणि सौदी अरेबिया मधील नेतृत्व यांच्यात धुसपूस सुरु आहे. याशिवाय अमेरिकेवर रक्षा प्रणालीच्या बाबतीत इतकं अवलंबून राहणं सौदी नेतृत्वाला अस्वस्थ करत आहे. सौदी कडे दुसरे पर्याय होते ते म्हणजे युरोपियन युनियन, रशिया, चीन आणि शेवटी भारत. 

रशिया कडून रक्षा प्रणाली घेणं म्हणजे अमेरिकेचा रोष ओढवून घेणं जे की सौदी आत्ता करू शकत नाही. येमेन मधे निष्पाप लोकांवर बॉम्ब टाकण्यासाठी युरोपियन युनियन चा रोष सौदी वर आहेच. आता राहिला चीन. तर सौदी ने चीन कढून काही रक्षा प्रणाली घेतल्या. त्यांची अवस्था 'आ बैल मुझे मार' अशी झाली. चीन च्या मिसाईल नी दगा दिल्यानंतर सौदी अरेबिया चा चीन वरून विश्वास पूर्णपणे तुटला आहे. आपलीच माणसं चीन च्या मिसाईल ने मारली जातील अशी एक भीती सौदी ला सध्या वाटते आहे. त्यामुळेच सौदी अरेबिया ने भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे. या संदर्भातला एक मोठा करार नुकताच Power For Defense Technologies Co (PDTC) सौदी अरेबिया आणि Bharat Electronics Limited (BEL) भारत यांच्यात झाला आहे. या करारा प्रमाणे दोन्ही देश संरक्षण क्षेत्रात एकमेकांशी भागीदारी करू शकणार आहेत. ज्या मधे एकमेकांच्या रक्षा प्रणाली ची खरेदी-विक्री ही समाविष्ट आहे. सौदी अरेबीया ला भारताच्या 'आकाश' मिसाईल डिफेन्स प्रणालीत रस आहे. आता या करारामुळे सौदी अरेबिया भारताशी कधीही या प्रणालीच्या खरेदी बाबत तसेच इतर प्रणालीच्या खरेदी बाबत करार करू शकणार आहे. सौदी अरेबिया सारखा ग्राहक जर भारताशी जोडला गेला तर भारतासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट असणार आहे. आकाश नंतर सौदी अरेबिया ला भारताच्या 'तेजस' विमानात ही रस आहे. 

जगातील सगळ्यात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल 'ब्राह्मोस' च्या खरेदीसाठी फिलिपाइन्स ने तब्बल २.८ बिलियन पेसोस (५५ मिलियन अमेरिकन डॉलर) ची रक्कम बाजूला ठेवली आहे. याशिवाय भारताने फिलिपाइन्स ला १०० मिलियन अमेरिकन डॉलर ची क्रेडिट लाईन दिली आहे. आता कोणत्याही क्षणी भारत आणि फिलिपाइन्स यांच्यामधे ब्राह्मोस खरेदी- विक्री च्या व्यवहाराची घोषणा होऊ शकेल. कारण या आधीच भारताने ब्राह्मोस च्या विक्रीतील सगळे अडथळे पार केले आहेत म्हणजेच रशियाची मंजुरी घेतलेली आहे. जे ब्राह्मोस आपण फिलिपाइन्स ला विकणार आहोत त्याची क्षमता २९० किलोमीटर पर्यंतच आहे. भारताचं ४०० किलोमीटर पेक्षा जास्त क्षमता असलेलं ब्राह्मोस मात्र आपण अजून विकेलेलं नाही. एका अभ्यासानुसार भारताकडे आजच्या क्षणाला तब्बल १४,००० पेक्षा जास्ती ब्राह्मोस क्षेपणास्त्र तयार स्थितीत आहेत. यातील जवळपास सगळीच भारताच्या सरहद्दीवर भारताच्या संरक्षणासाठी तैनात केली गेली आहेत. ब्राह्मोस घेण्यासाठी अनेक देश रांगा लावून उभे आहेत. या पहिल्या करारा नंतर इतर देशांच्या पुढल्या करारांचा मार्ग मोकळा होणार आहे. यातील बहुतांश देश हे साऊथ चायना सी मधील तर काही दक्षिण अमेरिकेतील आहेत. ज्यांना ब्राह्मोस देण्यासाठी रशियाला कोणतीही अडचण असणार नाही. ब्राह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तरीत्या विकसित केल्याने त्याची विक्री इतर देशांसोबत करण्यासाठी रशियाच्या परवानगीची गरज आहे.  

डोक्यावर पडलेल्या पाकिस्तान ने पुन्हा एकदा आपल्या अकलेची दिवाळखोरी सिद्ध केली आहे. भारताच्या राफेल ला टक्कर देण्यासाठी २५ जे १० सी लढाऊ विमान चीन कडून विकत घेतली आहेत. राफेल च्या सोबत कोणत्याही पद्धतीने बरोबरी करू न शकणाऱ्या जे १० सी च्या खरेदीने संपूर्ण जग नाही तर पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानी सरकारची खिल्ली उडवत आहेत. आपल्याकडे असलेली जुनी एफ १६ राफेल ला जास्ती चांगली टक्कर देऊ शकतात असं म्हणत पाकिस्तानी सरकारचे वाभाडे तिथल्याच जनतेने वेशीवर टांगले आहेत. जिकडे चीन च्या सगळ्यात अद्यावत असणाऱ्या जे २० लढाऊ विमानाला राफेल ला टक्कर देताना घाम फुटेल तिकडे राफेल ला टक्कर देईल अशी लढाऊ विमान एकतर जगात अगदी मोजकी आहेत. अर्थातच ती घेण्याची कुवत पाकिस्तानकडे नाही हे सत्य पाकिस्तान ला पचवायला जड जाते आहे. राफेल, ब्राह्मोस आणि एस ४०० अश्या तिहेरी सर्वोत्तम प्रणाली समोर आपली परमाणू क्षेपणास्त्र कराची पण पार करू शकत नाहीत हे पाकिस्तान ला कळून चुकलं आहे. 

गेल्या आठवड्यातील या घटना जागतिक पातळीवर भारताच्या बदलत जाणाऱ्या प्रतिमेचे द्योतक आहेत. वाऱ्यांची दिशा आता आयाती कडून निर्याती कडे बदललेली आहे. ही बदललेली दिशा भारतासाठी येणाऱ्या काळात खूप काही सकारात्मक बदल मग ते आर्थिक बाबतीत, राजकीय बाबतीत, आंतरराष्ट्रीय दबदबाच्या बाबतीत घडवून आणणार आहेत. तूर्तास या वाऱ्यांचा आनंद आपण भारतीय म्हणून घेऊ यात. 

जय हिंद 

फोटो शोध सौजन्य :-  गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




1 comment: