Monday, 10 January 2022

ठिपक्यांची रांगोळी... विनीत वर्तक ©

 ठिपक्यांची रांगोळी... विनीत वर्तक ©

टी.व्ही. बघण्याची संधी आणि इच्छा खूप कमी वेळा मला होते. त्यातही मराठी मालिका म्हंटल की उरली सुरली इच्छा पण नाहीशी होते. मराठी भाषेशी माझं वावडं नाही पण ज्या पद्धतीच्या मराठी मालिका सुरु असतात. त्यांच कथानक आणि एकूणच सादरीकरण माझ्या पचनी पडत नाही. पण याला अपवाद म्हणून घरी असताना काही दिवस स्टार प्रवाह वरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेने कुठेतरी खिळवून ठेवलं आहे. शरद पोंक्षे, लीना भागवत, मंगेश कदम, सुप्रिया पाठारे, राजन ताम्हाणे अश्या तगड्या कलाकारांसोबत ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, नम्रता प्रधान, तन्वी बर्वे असे काही नवीन कलाकार मिळून ही रांगोळी चांगलीच जमली आहे. 

या मालिकेचं सगळ्यात आवडता भाग म्हणजे त्याच कथानक आणि ज्या पद्धतीने आणि ताकदीने सर्व कलाकारांनी त्याच सादरीकरण केलं आहे. मराठी मालिका बहुतांशी या कुटुंबातील कलहावर आधारित असतात. सासू- सुना, जावई- मुलं, जावा- जावा, काका- काकू ते मामा- मावश्या. कदाचित मराठी प्रेक्षकांना तश्याच पद्धतीच्या मालिका आवडत असतीलही. पण मुळातच कट- कारस्थान रचण्यात अनेक मालिकांच्या कथानकाचे १०० भाग होतात. त्यामुळे मराठी मालिका एकूणच साचेबद्ध असल्याचं माझं व्यक्तिशः मत आहे. पण त्यावर एक वेगळी झुळूक 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेने तूर्तास तरी आणली आहे. कारण मला पुढलं कथानक कसं जाईल याबद्दल माहित नाही. पण निदान हा लेख लिहीपर्यंत ही रांगोळी खूप सुंदर झाली आहे. 

एकत्र कुटुंब पद्धती हा भारतीय समाजाचा पाया आहे. तोच आज कुठेतरी ठासळतो आहे. नक्कीच त्याच्या दोन्ही बाजू आहेत. मी, माझं, स्वतःच, माझ स्वातंत्र्य या सगळ्यात आणि आभासी जगात आपलं स्वतःच अस्तित्व हरवलेलं आहे. नात्यांची वीण सगळ्या बाजूने उसवत चाललेली आहे. चुलत आणि मावस या गोष्टी जवळपास इतिहासजमा झालेल्या आहेत. आज आपले स्वतःचे जन्मदाते आपल्याला डोईजड व्हायला लागले आहेत. तश्याच गोष्टींचा भडीमार मराठी सिरीयल मधून झाला तर त्यात काही नवल नाही. पण यात कुठेतरी ही मालिका उजवी ठरते आहे. त्यामुळेच कुठेतरी ती मला स्वतःला बघताना खूप छान वाटते आहे. स्वभावाचे वेगवेगळे रंग काही नवीन गोष्ट नाही. ते शेकडो वर्ष आणि अनेक पिढ्या असेच आहेत. पण आजच त्याची अडचण व्हायला लागली आहे. याचा अर्थ की आपण रांगोळीचे टिपके चुकीचे जोडत आहोत. कोणीतरी ते योग्य पद्धतीने जोडणारं आज आपल्या कुटुंबात नाही. खऱ्या आयुष्यात माझ्या मते हीच भूमिका सगळ्यात महत्वाची आहे. 

शरद पोंक्षे यांनी साकारलेली विनायक दादांची भूमिका म्हणजेच आपल्या समाजात हरवलेलं ते माणूस. वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांना एकत्र बांधून ठेवताना कोणत्यातरी एका माणसाकडे आपलं स्व बाजूला ठेवून कुटुंबाचा विचार करण्याची जाणीव लागते. त्या जाणिवेला मान देण्याची जरब, प्रेम, जिव्हाळा, शिस्त जेव्हा कुटुंबातील लोकांकडे असते तेव्हा ते टिपके योग्य रीतीने जोडले जातात आणि रांगोळी सुंदर तर होतेच पण त्यात भरणारे रंग आपल्याला न मागता ही खूप काही समाधान देतात. ही गोष्ट जुळून येण्यासाठी त्या व्यक्तीबद्दल नुसतं प्रेम कामाचं नाही तर त्या सोबत जिव्हाळा, त्या व्यक्तीबद्दल आत्मीयता, त्या व्यक्तीबद्दल आणि त्यांनी किंवा तिने घेतलेल्या निर्णयावर विश्वास आणि कोणत्याही परिस्थिती मधे आपण हे आपल्या माणसांसाठी करतो आहोत ही जाणीव असणं सगळ्यात महत्वाचं असते. माझ्या मते विनायक दादांच त्या मालिकेतील पात्र अगदी चपखल या भूमिकेत बसते. 

ठिपक्यांची रांगोळी ही मालिका फक्त मनोरंजन करत नाही तर आज आपल्यातून निसटलेल्या नात्यांचा विचार करायला भाग पाडते. माझ्या मते तेच या मालिकेचं यश आहे. 'अपूर्वा वर्तक' चं पात्र मला तरी व्यक्तिशः खूप आवडलेलं आहे. 'ज्ञानदा रामतीर्थकर' चा अभिनय इतका सुंदर आहे की तो अल्लडपणा तिने लिलया पेलला आहे. अनेकांना तिच्या पत्राबद्दल अतिशोयक्तीपणा, बालिशपणा वाटू शकेल. पण त्यामागे लपलेल्या निरागस भावना संवादातून, आपल्या अभिनयाने ज्या ताकदीने समोर येतात त्या नक्कीच प्रशंसनास पात्र आहेत. ही मालिका खूप पद्धतीने मला कोरियन मालिकेच्या जवळ जाताना वाटली. जिकडे शब्दांशिवाय नुसत्या चेहऱ्यावरच्या अभिनयाने संदेश पोहचवले जातात. तिच्या हळदीच्या वेळी झालेला आजीसोबतचा संवाद आणि तो भाग तर मला खूप आवडला. नवीन आणि जुन्या पद्धतीने आज सुद्धा इतक्या चांगल्या रीतीने पुढे नेलं जाऊ शकते. हे बघणं नक्कीच आनंद देणारं होतं.   

एकूणच काय तर 'ठिपक्यांची रांगोळी' खूप सुंदर पद्धतीने रंगली आहे. ही रांगोळी कितपत रंगेल या बद्दल आत्ता काही बोलणं योग्य राहणार नाही. कारण अनेकदा अश्या छान मालिका कथानक भरकटल्याने डोक्याला शॉट होतात हे आधी अनुभवलेलं आहे. पण कुठेतरी नक्कीच अनेक मराठी मालिकांच्या गर्दीत या मालिकेचं वेगळेपण सध्यातरी दिसून येते आहे. कुटुंब हेच आपल्या समाजाचा पाया आहे. जोवर तुम्ही ते बांधून ठेवता तोवर कोणत्याही संकटाला तुम्ही सामोरं जाऊ शकतात. त्याचे तुकडे पाडायला वेळ लागत नाही. वेळ लागतो ते निभावून न्यायला. त्यासाठी सगळ्याच रंगाची सोबत गरजेची असते. त्या सगळ्या रंगांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या त्या ठिपक्यांची सुद्धा. म्हणूनच 'ठिपक्यांची रांगोळी' बघताना हेच सगळं अनुभवतो आहे. 

फोटो शोध सौजन्य :-  गुगल  

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 




No comments:

Post a Comment