Wednesday 12 January 2022

बलसागर भारत... विनीत वर्तक ©

 बलसागर भारत... विनीत वर्तक ©

गेल्या काही महिन्यात भारताकडे जगातील सर्व देशांच लक्ष लागलेलं आहे. त्यात एक प्रकारचा दुस्वास ही आहे आणि पोटदुखी ही आहे. त्याला कारण म्हणजे संरक्षण क्षेत्रात भारत ज्या पद्धतीने पुढे जातो आहे. ते जगातील प्रगत राष्ट्रांना पचनी पडणार नाही. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ज्या वेगाने भारताला संरक्षणाच्या बाबतीत आत्मनिर्भर करत आहे. तो वेग थक्क करणारा आहे. उदाहरण द्यायचं झालच तर एकट्या डिसेंबर २०२१ या महिन्यात डी.आर.डी.ओ. ने तब्बल ९ वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत. यात अगदी पिनाका रॉकेट पासून ते अग्नी प्राईम या २००० किलोमीटर अंतरावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. एकाच वेळी इतक्या वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या भारताची संरक्षणा बाबतीत होणारी वाटचाल संपूर्ण जगाला नोंद घेण्यास भाग पाडत आहेत. अजूनही या चाचण्या थांबलेल्या नाहीत तर डी.आर.डी.ओ. अजून वेगाने स्वयंसिद्धतेकडे वाटचाल करते आहे. 

दोन दिवसांपूर्वी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ब्राह्मोस या जगातील एकमेव सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल ची पुन्हा एकदा चाचणी घेतली आहे. ही चाचणी अनेक अर्थाने वेगळी आहे. हिंद महासागरात चिनी नौदलाची ताकद वाढलेली असताना भारतीय नौदलला तोडीस तोड क्षमता देण्यासाठी ही चाचणी अतिशय महत्वाची होती. ब्राह्मोस बद्दल अनेकवेळा लिहिलं गेलं आहे. ३४५० किलोमीटर / तास या स्वनातीत वेगाने झेपावणारे ब्राह्मोस जगात प्रसिद्ध आहे ते त्याच्या अचूकतेसाठी. वेगासोबत जमीन अथवा पाण्याच्या अतिशय जवळून ते आपल्या लक्ष्याकडे झेपावते. या शिवाय ब्राह्मोस हे फायर एन्ड फर्गेट पद्धतीचे क्षेपणास्त्र आहे. याचा अर्थ आहे की एकदा लक्ष्य त्याला आखून दिलं की त्या लक्ष्याने आपल्या वेगात, जागेत, दिशेत बदल केला तरी ब्राह्मोस स्वतःच्या रस्त्यात स्वतःच बदल करून लक्ष्यभेद करण्यास सक्षम आहे. ब्राह्मोस चा वेग आणि त्याच वजन हे प्रचंड प्रमाणात गतिशील ऊर्जा (कायनेटिक एनर्जी) उत्पन्न करतात. त्यामुळे ब्राह्मोस मधील स्फोटकांच प्रमाण कमी असलं तरी त्याने होणारी हानी मात्र कित्येक पट असते. 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने आता केलेल्या ब्राह्मोस च्या चाचणीत समुद्रातून समुद्रात लक्ष्य भेदण्यात आलं. आय.एन.एस. विशाखापट्टणम ही नौका काही महिन्यांपूर्वी नौदलात दाखल झालेली आहे. तिच्यावरून ब्राह्मोस ला डागण्यात आलं. ब्राह्मोस च लक्ष्य होतं तब्बल ४०० किलोमीटर दूरवर समुद्रात असलेली एक नौका. लक्षात घ्या की ब्राह्मोस हे चालत्या जहाजावरुन पण डागता येते आणि ते चालत्या जहाजाला लक्ष्य करू शकते ते ही ४०० किलोमीटर लांब अंतरावर. या चाचणीत ब्राह्मोस च्या पुढल्या व्हर्जन ने आय.एन.एस. विशाखापट्टणम उड्डाण केलं आणि ४०० किलोमीटर च अंतर ३४५० किलोमीटर / तास वेगाने ७ मिनिटापेक्षा कमी वेळात कापत त्या बोटीच्या चिंधड्या उडवल्या. हा स्फोट इतका प्रचंड होता की क्षणात बोटीचे तुकडे होऊन तिला जलसमाधी मिळाली. ब्राह्मोस ला संपूर्ण जग वचकून आहे त्याच मूळ कारण त्याच्या वेगापेक्षा त्याची अचूकता आणि त्याच्या स्फोटामुळे होणारं नुकसान हे आहे. या आधीही ब्राह्मोस च्या आधीच्या चाचण्यात फक्त एका ब्राह्मोस च्या वाराने जहाजांची शकले उडत अक्षरशः दोन तुकडे होत जलसमाधी मिळताना जगाने बघितलेलं आहे. ब्राह्मोस च लक्ष्य हे रडार च्या पल्यापेक्षा लांब होतं. जो काही निर्णय लक्ष्याच्या बाबतीत घ्यायचा होता तो ब्राह्मोस ला रस्त्यात घ्यायचा होता. त्याच्याकडे अवघी काही मिनिटे त्यासाठी होती. आता लक्ष्याच्या बाजूने विचार केला तर जेव्हा ब्राह्मोस त्याच्यावर चालून येते आहे हे त्याला समजेल तोवर त्याच्याकडे उत्तर द्यायला फार फार तर १५-२० सेकंदाचा अवधी असेल. कारण ब्राह्मोस अवघ्या १० मीटर उंचीवरून प्रवास करते. या उंचीवरून रडार च्या टप्यात येत नाही. त्यामुळेच ब्राह्मोस एकप्रकारे स्टेल्थ क्षेपणास्त्र आहे. 

या वर्षीच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिवसाचं औचित्य साधत भारताने भारतात बनवलेली विमानवाहू नौका आय.एन.एस. विक्रांत भारतीय नौदलात समाविष्ट होते आहे. तिच्या चाचण्या सध्या सुरु असून आय.एन.एस. विक्रमादित्य आणि विक्रांत साठी लढाऊ विमान विकत घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. आय.एन.एस. विक्रमादित्य वर जरी मिग २९ लढाऊ विमान असली तरी त्यांच आयुष्य जवळपास संपलेलं आहे. गेल्या २ वर्षात ३ लढाऊ विमानांना नौदलाने गमावलेलं आहे. त्यासाठी २०१७ मधे भारतीय नौदलाने ५७ लढाऊ विमानाचं टेंडर काढलं होतं. पण आता ही संख्या २७ पर्यंत कमी करण्यात आली आहे. यासाठी सध्या दोन लढाऊ विमान स्पर्धेत आहेत. एक म्हणजे अमेरिकेचं एफ १८ सुपर होर्णेट तर दुसरं म्हणजे डसाल्ट च राफेल एम. कोणत्याही विमानवाहू नौकेवरील लढाऊ विमानासाठी अतिशय महत्वाचं असते ते त्याच उड्डाण आणि लँडिंग. कारण इकडे धावपट्टी ही हलती असते आणि त्याची लांबी ही कमी असते. सो अश्या छोट्या धावपट्टी वरून उड्डाण आणि लँडिंग करता येणं हे अतिशय महत्वाचं असते. त्यासाठीच या दोन्ही लढाऊ विमानांच्या चाचण्या गोवा इकडे सुरु आहेत. 

अमेरिका जे एफ १८ विमान देणार सांगत आहे. ते त्या विमानाचं सगळ्यात एडव्हान्स व्हर्जन आहे. त्या शिवाय एफ १८ ला अमेरिकन विमानवाहू जहाजांवर अनेक वर्ष वापरण्यात येते आहे. या अमेरिकन विमानाच्या जमेच्या बाजू असल्या तरी फ्रांस च्या राफेल एम पुढे सध्यातरी ते फिकं पडते आहे. राफेल एम च्या छोट्या आकारामुळे विक्रांत च्या डेकवर एकाचवेळी १४ राफेल एम बसू शकतात. तर एफ १८ जास्तीत जास्त १० बसू शकतात. या शिवाय वायू दलात आधीच राफेल असल्याने त्याचा मेन्टनन्स, ट्रेनिंग आणि स्पेअर पार्टस अश्या सर्व गोष्टी एकमेकांसोबत वाटता येतील. त्यामुळे भारताच्या खर्चात बचत होईल. फ्रांस ने या आधीच भारत जेवढी मागेल तेवढी राफेल अगदी तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याच्या अटीसह मान्य केलं आहे. (जर भारताने ११४ विमानांची ऑर्डर दिली तर तंत्रज्ञान हस्तांतरण समाविष्ट आहे.) राफेल एम भारतीय नौदलाच्या स्टोबार चाचणीत यशस्वी ठरलं आहे. STOBAR (Short Take-Off But Arrested Recovery). येत्या मार्च महिन्यात एफ १८ च्या चाचण्या होतील. त्यानंतर भारतीय नौदल यातून एकाची निवड करेल. जी पुढल्या काही महिन्यात अपेक्षित आहे. 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने बंगाल च्या उपसागरात पुन्हा एकदा १९ ते २१ जानेवारी २०२२ साठी नोटॅम प्रसिद्ध केला आहे. हा नोटॅम ७८०  किलोमीटर अंतरासाठी लागू आहे. या काळात कोणत्याही जहाजाला, विमानांना, ड्रोन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या समुद्रातील हालचालींना बंधन टाकण्यात आलेलं आहे. या काळात डी.आर.डी.ओ. ब्राह्मोस च्या इ. आर. (एक्स्टेंडेड रेंज) किंवा Hypersonic Technology Demonstrator Vehicle (HSTDV) ची चाचणी घेण्याची शक्यता आहे. चीन ने नुकतीच हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्यावर हायपरसॉनिक तंत्रज्ञान लवकरात लवकर संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित करण्याचं सुतोवाच भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी केलं होतं. त्या धर्तीवर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था हायपरसॉनिक तंत्रज्ञानाची चाचणी करेल असा कयास आहे. भारत ब्राह्मोस २ किंवा ज्याला ब्राह्मोस के (भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ याच्या नावाच्या पुढे 'के' हे अक्षर लावण्यात आलं आहे.) असं म्हंटल जातं त्याची निर्मिती करत आहे. याचा वेग मॅक ८ (ध्वनीच्या ८ पट) म्हणजे जवळपास ९८०० किलोमीटर / तास इतका प्रचंड असणार आहे. तसेच १००० किलोमीटर वरील कोणत्याही लक्ष्याचा खात्मा करण्याची याची क्षमता असणार आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार भारत २०२५ पर्यंत 'ब्राह्मोस के' प्रत्यक्षात वापरात आणेल असा अंदाज आहे. अजून जगाला ब्राह्मोस ला रोखण्याचं उत्तर मिळालेलं नाही तोवर भारताने हायपरसॉनिक तंत्रज्ञानात केलेली प्रगती अनेक देशांच्या डोळ्यात खुपणारी आहे. 

भारताला संरक्षण क्षेत्रात समृद्ध आणि आत्मनिर्भर करणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या सर्व कर्मचारी , वैज्ञानिक, संशोधक , अभियंते यांच अभिनंदन आणि पुढील चाचण्यांसाठी शुभेच्छा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :-  गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  





3 comments:

  1. खुप छान माहिती आहे.
    धन्यवाद

    ReplyDelete
  2. D.R.D.O. च अभिनंदन व आपण माहिती दिल्याबद्दल आभार... जय हिंद

    ReplyDelete