कॅससीओपीया ए... विनीत वर्तक ©
नासा च्या Imaging X-ray Polarimetry Explorer (IXPE) ने 'कॅससीओपीया ए' या सुपरनोव्हा झालेल्या ताऱ्याचा एक सुंदर फोटो घेतला आहे. हा फोटो खूप सुंदर दिसत आहे. मानवाने केलेल्या तांत्रिक प्रगतीचा एक नमुना या फोटो ला म्हणता येईल. 'कॅससीओपीया ए' हा तारा पृथ्वीपासून ११,०९० प्रकाशवर्ष लांब आपल्या मिल्की वे आकाशगंगेच्या दुसऱ्या आर्म मधे आहे. आता आपण जो फोटो बघत आहोत त्यातील प्रकाश ११,०९० वर्षापूर्वीचा आहे. पण पृथ्वीवर तो आत्ता पोहचत आहे. या ताऱ्याचा स्फोट साधारण १६९० साली झालेला आहे. त्याकाळी जर आपली तांत्रिक क्षमता असती तर हा नजारा विश्वाच्या अनंत पोकळीत बघता आला असता. आज ३३२ वर्षानंतर या ताऱ्याच्या स्फोटातून फेकली गेलेला सगळा भाग तब्बल १० प्रकाशवर्ष अंतरावर पसरलेला आहे.
'कॅससीओपीया ए' ताऱ्याची प्रकाशमानता सूर्यापेक्षा २,४०,००० ते २,७०,००० पट जास्ती होती असा वैज्ञानिकांचा निष्कर्ष आहे. या रेड जायंट ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या २० ते ५० पट पर्यंत असलं असेल असा अंदाज आहे. लक्षात आलं असेल की किती प्रचंड मोठा हा तारा असेल. आपलं इंधन म्हणजेच हायड्रोजन जाळून झाल्यावर तो आपल्या वस्तुमानाला सांभाळू शकला नाही. सुपरनोव्हा च्या रूपात या ताऱ्याची शकले उडाली. सध्या १० प्रकशवर्ष पसरलेल्या याच्या गॅस आणि धुळीचं तपमान तब्बल ५० मिलियन डिग्री सेल्सिअस असावं असा अंदाज आहे. आता 'कॅससीओपीया ए' ही नवीन ताऱ्यांची भट्टी (नेब्युला) म्हणून अवकाशात प्रसिद्ध आहे. ज्यातून नवीन ताऱ्यांच्या निर्मितीला सुरवात झालेली आहे. हा लेख लिहीपर्यंत विश्वाच्या पोकळीत ८ ते १० असे सुपरनोव्हा फुटत आहेत. जुन्या ताऱ्यांचा अंत होतो आहे तर नवीन ताऱ्यांची निर्मिती ही प्रक्रिया विश्वाच्या पोकळीत न थांबता सुरु आहे.
विज्ञानतलं काही कळत नसलं तरी अश्या घटना अतिशय रोमांचकारी आहेत. कारण विश्वाच्या तुलनेत आपलं अस्तित्व किती क्षुद्र आहे ते कळते. त्या शिवाय जग कुठे जाते आहे आणि या सगळ्यात आपण कुठे आहोत याचा अंदाज आपल्याला येतो. मला नेहमीच अश्या घटना काहीतरी नवीन शिकवतात. कुठेतरी या विश्वाच्या अंतरंगाची जाणीव करून देतात. त्यासाठीच नासा चा हा फोटो खूप महत्वाचा आहे.
फोटो सौजन्य :- नासा, अमेरिका
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment