आम्ही भारतीय... विनीत वर्तक ©
आम्ही अमेरिकन नाहीत ज्यांनी ११ वर्ष दुसऱ्यांच्या जमिनीवर आपला झेंडा गाडला आणि जाता जाता ८५ बिलियन अमेरिकन डॉलर ची शस्त्रास्त्र तालिबानी लोकांच्या हवाली केली. आम्ही रशियन नाहीत ज्यांनी कोणाची भूमी काबीज केली आणि नरसंहार केला, लोकांना देश सोडण्यासाठी प्रवृत्त केलं. आम्ही चिनी नाहीत ज्यांनी फक्त आपलं वर्चस्व आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आर्थिक गाजरं दिली. आम्ही पाकिस्तानी तर मुळीच नाही ज्यांनी फक्त धर्माच्या नावाखाली निरपराधी लोकांच्या रक्ताचे पाट वाहिले. आम्ही आहोत भारतीय ज्यांच्या मनगटात तोडीस तोड उत्तर देण्याची ताकद आहे. बंदुकीची गोळी देशासाठी झेलणारी छाती आहे. आम्ही शस्त्र उचलतो ते फक्त मातृभूमीच्या रक्षणासाठी अन्याय करण्यासाठी नाही आणि वर्चस्व गाजवण्यासाठी तर मुळीच नाही. १५० वर्ष पारतंत्र्यात घालवून पण आम्ही आज आत्मनिर्धरतेच्या लक्ष्याकडे सगळ्याच क्षेत्रात वाटचाल करत आहोत.
जेव्हा संपूर्ण जग फक्त बैठका बोलावून चर्चा करते तेव्हा आम्ही कोणताही गाजावाजा न करता मदत करतो. एकीकडे आम्ही एका दिवसात १५ ते १८ वर्ष वयोगटातल्या ४१ लाख मुलांच लसीकरण करतो. त्याचवेळी सगळ्यांनी आपापल्या मतलबा साठी ज्या लोकांचा वापर केला आणि मग वाऱ्यावर सोडलं त्या लोकांसाठी भारताने माणुसकीच्या दृष्टिकोनातून ५ लाख कोरोना लसी पाठवून दिल्या आहेत. भारत- अफगाणिस्तान अशी विमानसेवा सध्या उपलब्ध नाही. त्यावर उपाय म्हणून भारताने या लसी इराण च्या मदतीने इंदिरा गांधी हॉस्पिटल, काबुल इकडे सुरक्षितरित्या पोहचवल्या आहेत. भारताने यासाठी कोणतं कर्जाचं गाजर किंवा त्याच्या बदल्यात तालिबानी सरकारकडून मदतीची अपेक्षा केलेली नाही. भारताने स्वखर्चाने ही सगळी मदत माणुसकीच्या दृष्टिकोनातून केलेली आहे.
कोणी म्हणेल की विष ओकणाऱ्या सापासाठी काय माणुसकी दाखवायची पण काही साप विषारी असले म्हणून संपूर्ण साप विषारी नसतात. त्यामुळेच ही मदत तिथल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना, जेष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. हे पाऊल कोणाला पटो वा न पटो पण भारताची ही भूमिका हजारो वर्षापासून हीच आहे आणि हीच राहील. जो आमच्या भूमीवर वाईट नजर ठेवेल त्याला आम्ही दगडाने शोध घेऊन ठेचूच पण त्यासाठी निरपराधी लोकांवर दगडफेक करणार नाही. या पलीकडे जो समुद्र जगातील सगळ्यात धोकादायक समुद्र समजला जातो. निसर्गामुळे नाही तर तिकडे होणाऱ्या चाचेगिरीमुळे अश्या सोमालियाच्या आखातात युनायटेड नेशन कढून जाणाऱ्या ३०३० टन खाण्याचं सामान घेऊन जाणारं एम.व्ही.जुईस्ट या जहाजाला बारबेरा ते मोगादिशू हा ३००० किलोमीटर चा सगळ्यात धोकादायक प्रवास सुरक्षित करून देण्याची जबाबदारी भारतीय नौदलाला देण्यात आली होती. जिकडे प्रत्येक क्षणाला जहाजावर हल्ला होण्याची भीती असते त्या अतिशय धोकादायक प्रवासाची सूत्र भारतीय नौदलाच्या आय.एन.एस. ऐरावत ने समर्थपणे पेलली. युनायटेड नेशन च्या एम.व्ही.जुईस्ट जहाजाचा संपूर्ण प्रवास सुरक्षित करताना भारतीय नौदलाने पुन्हा एकदा भारताची 'वसुधैव कुटुंबकम' ही भूमिका अधोरेखित केली.
युनायटेड नेशन च्या #UNWFP या कामाला २०२० साली नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. एम.व्ही.जुईस्ट हे जहाज याच कामाच्या अंतर्गत ही मदत मानवतेच्या दृष्टिकोनातून करत होतं. खेदाची बाब हीच की ज्यांच्यामुळे शांती प्रस्थापित होते ते मात्र आपलं काम पडद्यामागून शांतपणे करत असतात. ना त्यांना कोणत्या पुरस्काराची ओढ असते ना त्यांना त्याबद्दल चा काही गर्व असतो. पुरस्काराच्या बाबतीत पडद्यामागचा खेळ आपल्याला काही नवीन नाही. साध्या कार्यक्रमाला स्टेजच्या खुर्चीवर बसण्यासाठी पडद्यामागून राजकारण खेळणारे आपल्या गल्लीत असतात तर आंतरराष्ट्रीय पातळीवर का नसतील. पण त्यामुळे आपण आपलं चांगलं काम थांबवायचं नसते कारण आपली उद्दिष्ठ आणि लक्ष्य त्यापेक्षा बऱ्याच उंचीवर असते.
ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली दिवस रात्र गळे काढून विष ओकणाऱ्या मिडिया मधील एकाला सुद्धा याची ब्रेकिंग न्यूज करावीशी वाटली नाही. यावरून चौथ्या स्तंभाचा आधार नक्की कसला आहे हे स्पष्ट होते. अर्थात त्यांचे ही हात दगडाखाली अडकलेले असतील. पण त्यामुळे गोष्टी लपून रहात नाहीत. १०० नंबरी सोनं हे खणखणीत असते ते कुठेही चकाकते. आमच्यात कितीतरी कमतरता असतील, आम्ही कितीतरी चुका करत असू, आम्ही खड्यात पडत असू पण आम्ही भारतीयांनी आमची संस्कृती सोडलेली नाही. ती कोणत्या जातीवर, धर्मावर, पंथावर, आणि कोणत्या देशाशी निगडित नाही तर ती सर्वसमावेशक आहे. त्यासाठी मला आणि इतर तमाम भारतीय लोकांना भारतीय असल्याचा अभिमान नेहमीच वाटत राहील.
जय हिंद!!!
फोटो शोध सौजन्य :- गुगल
१) पहिल्या फोटोत आय.एन.एस. ऐरावत युनायटेड नेशनच्या एम.व्ही.जुईस्ट जहाजाला दक्षिण सोमालियाच्या समुद्रात सुरक्षित नेताना.
२) दुसऱ्या फोटोत भारताकडून कोवॅक्सीन चे ५ लाख डोस अफगाणिस्तान च्या भूमीवर.(फोटो सौजन्य :- वियोन)
सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.
No comments:
Post a Comment