Wednesday 19 January 2022

हुंगा टोंगा हुंगा हापाई... विनीत वर्तक ©

 हुंगा टोंगा हुंगा हापाई... विनीत वर्तक ©

'हुंगा टोंगा हुंगा हापाई' हे नाव वाचून आपल्यापैकी अनेकजण बुचकळ्यात पडू. खरे तर हे नाव आहे पॅसिफिक महासागरात असलेल्या एका ज्वालामुखीचे. टोंगा हा देश अनेक बेटांचा समूह बनून बनलेला आहे. फिजी बेटांपासून ८०० किलोमीटर तर न्यूझीलंड या देशापासून २३८० किलोमीटर अंतरावर ही बेटं आहेत. या देशाची लोकसंख्या फक्त १ लाख आहे. हा देश जगातील 'रिंग ऑफ फायर' या अतिशय संवेदनशील ठिकाणी वसलेला आहे. याच टोंगा देशातील 'हुंगा टोंगा हुंगा हापाई' या ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झाला आहे. हा उद्रेक हजारो वर्षातून होणारा एखादा उद्रेक असल्याचं अनेक संशोधकांच म्हणणं आहे. या उद्रेकाची व्याप्ती, त्याची कारणे. त्याचे परिणाम हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. त्याच सोबत 'रिंग ऑफ फायर' म्हणजे काय? हुंगा टोंगा हुंगा हापाई ज्वालामुखी ने नक्की काय समीकरणं बदलली आहेत हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. 

टोंगा हा देश वर लिहिलं तसं 'रिंग ऑफ फायर' वसलेला आहे. 'रिंग ऑफ फायर' या प्रदेशाला का म्हणतात त्यासाठी आपण थोडा भूगोल समजून घेऊ. पॅसिफिक महासागरात पृथ्वीच्या अनेक टेक्टोनिक प्लेट्स एकत्र येतात. या प्लेट्स एकमेकांवर कुरघोडी करतात म्हणजे काय तर एकमेकांच्या अंगावर चढतात. त्यामुळे एखादी प्लेट दुसऱ्या प्लेट च्या खाली दबली जाते. यामुळे हे क्षेत्र भौगोलिक दृष्ट्या अतिशय संवेदनक्षील आहे. प्लेट च्या हालचालीमुळे जगात माहित असलेल्या ज्वालामुखी पैकी ४५० ज्वालामुखी या प्रदेशात आहेत. जवळपास ४०,००० किलोमीटर च क्षेत्र या 'रिंग ऑफ फायर' चा भाग आहे. त्यामुळे या भागात ज्वालामुखीचे उद्रेक, भूकंप, त्सुनामी या नेहमीच होत असतात. वर्षाला १ ते २ इंच या प्लेट्स सरकतात. पण ही लहान हालचाल पण खूप काही विध्वंस करण्यास सक्षम असते. टोंगा या देशाच्या भागात पॅसिफिक प्लेट ही इंडो- ऑस्ट्रेलियन प्लेट च्या खाली चिरडली जाते आहे. साहजिक या हालचालीत पृथ्वीच्या अंतर्भागात असलेला लाव्हा / मॅग्मा हा वर ढकलला जातो. 

टोंगा इकडे १५ जानेवारी २०२२ रोजी 'हुंगा टोंगा हुंगा हापाई' ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झाला आणि शांत असलेल्या टोंगा बेटांकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं. हा ज्वालामुखीचा उद्रेक मध्यम स्वरूपाचा असला तरी यातून निघालेल्या शॉक व्हेव, त्सुनामी आणि विजांच्या कडाडण्याने संपूर्ण जगाला स्तिमित केलं आहे. या स्फोटातून निर्माण झालेल्या शॉक व्हेव चक्क अलास्का पर्यंत पोहचल्या आणि त्यातून निर्माण झालेल्या त्सुनामी ने जगाच्या अर्ध्या किनाऱ्यांवर धडक दिलेली आहे. त्यामुळेच हा ज्वालामुखीचा उद्रेक संपूर्ण जगात अभ्यासला जातो आहे. टोंगा देशाची राजधानी 'नुकुअलॉफ' च्या ६५ किलोमीटर अंतरावर हुंगा टोंगा आणि हुंगा हापाई ही समुद्राच्या वर साधारण १०० मीटर असलेली दोन बेटं आहेत. याच बेटांच्या खाली पाण्यामध्ये लपलेला आहे तब्बल १८०० मीटर उंच आणि २० किलोमीटर लांब असलेला 'हुंगा टोंगा हुंगा हापाई' ज्वालामुखी. या बेटावर मनुष्यवस्ती नाही कारण गेली काही दशके इकडे ज्वालामुखीचे छोटे, मोठे उद्रेक हे सुरूच असतात. १५ जानेवारी ला झालेला स्फोट हा १००० वर्षातून एकदा होतो असं वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. 

संपूर्ण ज्वालामुखी हा पाण्यात असताना पण त्याचा उद्रेक का होतो? हे समजून घेण्यासाठी एकूणच त्याची रचना समजून घेतली पाहिजे. लाव्हारस ज्याला 'मॅग्मा' असं म्हणतात तो जमिनीखालून वर येत असताना त्याचा संपर्क समुद्राच्या पाण्याशी थेट येत नाही. १२०० डिग्री सेल्सिअस इतकं प्रचंड तपमान असलेला मॅग्मा आणि थंड असलेलं समुद्राचं पाणी या दोघांच्या मधे वाफेचा एक पडदा तयार होतो जो की अवरोधकाच काम करतो. बाहेरून जरी मॅग्मा थंड वाटला तरी आत तो त्याच्या प्रचंड तपमानाला उकळत असतो. हा जो मॅग्मा असतो तो दोन प्रकारचा असतो एक जो अधिक द्रवरूप असतो किंवा आपण त्याला 'पातळ' असं म्हणू. दुसरा असतो तो थोडा 'जाड' असतो जो एखाद्या तुपासारखा असतो. मॅग्मा जर पातळ आणि प्रवाही असेल तर त्यातले गॅसेस हे बाहेर फेकले जातात किंवा लाव्हारस पाण्याप्रमाणे वाहू लागतो. जसं आपण हवाई बेंटांवर बघतो. पण जेव्हा हा मॅग्मा जाड असतो तेव्हा त्यात तयार झालेले गॅसेस हे त्यात अडकून राहतात. एखाद्या सोड्याच्या बॉटल प्रमाणे. हळूहळू त्या गॅस वरील दाब वाढत जातो. अशी एक वेळ येते जेव्हा त्याचा आतील दाबामुळे उद्रेक होतो. या उद्रेकात अजून एक गोष्ट घडते ती म्हणजे मॅग्मा आणि समुद्राचं पाणी यात जे वाफेच आवरण तयार झालेलं असते ते उध्वस्थ होते. आतला १२०० डिग्री सेल्सिअस तपमान असणारा मॅग्मा समुद्राच्या पाण्याशी संयोग करतो. यामुळे एक प्रकारे रासायनिक प्रक्रिया अतिशय वेगाने घडते. जशी एखाद्या बॉम्ब ब्लास्ट मधे घडते. त्याचा स्फोट होतो. या स्फोटात पुन्हा एकदा मॅग्मा आणि पाण्याचा संयोग घडतो आणि पुन्हा एकदा स्फोट होतो. अशी स्फोटांची मालिका सुरु होते. 

टोंगा इकडे १५ जानेवारी २०२२ झालेल्या स्फोटात अश्याच प्रकारे 'चेन रिएक्शन' ज्याला म्हणतात ती घडली आणि अभूतपूर्व असा विस्फोट झाला. या स्फोटात निर्माण झालेल्या शॉक वेव्ह ने ३०० मीटर / सेकंद या वेगाने प्रवास करत अर्ध्या जगाला आपली नोंद घ्यायला लावली. या स्फोटातून निघालेली राख, धूळ ही आकाशात तब्बल २० किलोमीटर पर्यंत फेकली गेली. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून जवळपास २६० किलोमीटर क्षेत्रावर या राखेच अस्तित्व दिसून आलं. जेव्हा अश्या प्रकारे गरम वाफ, राख वातावरणात अतिशय उंचावर फेकली जाते. तेव्हा यातील गरम कणांचा संबंध वातावरणातील बर्फाच्या आणि थंड अश्या बाष्पातील कणांशी आल्याने प्रचंड प्रमाणात विजा कडाडतात. एका अंदाजानुसार 'हुंगा टोंगा हुंगा हापाई' मधील उद्रेकात जवळपास ४ लाखापेक्षा जास्ती वेळा विजेच्या लोळाने तिथल्या जमिनीला आणि समुद्राला झोडपून काढलेलं आहे. एखाद्या वेळेस जर तिकडे मनुष्य वस्ती असती तर विज अंगावर पडण्याने सगळ्यात जास्ती मृत्यूची नोंद झाली असती. या उद्रेकाचा आवाज अगदी अलास्का पर्यंत ऐकायला गेलेला आहे. हा उद्रेक इतका प्रचंड होता की जपान च्या किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामी च्या लाटा १० मीटर तर अमेरिकेच्या किनाऱ्यावर धडकलेल्या लाटांची उंची ४ मीटर होती. सध्या या सर्व भागावर राखेच साम्राज्य पसरल्याने नक्की किती नुकसान झालं किंवा या बेटांच्या ठिकाणी आता काय परिस्थिती आहे याबद्दल काहीच सांगता येत नाही आहे. 

'हुंगा टोंगा हुंगा हापाई' च्या उद्रेकाने पुन्हा एकदा पृथ्वीच्या गर्भात सुरु असलेल्या हालचालींबद्दल आपलं ज्ञान किती तोकडं आहे याची पुन्हा एकदा जगाला जाणीव झाली आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर उद्रेकाचा प्रभाव जाणवण्यासाठी खूप प्रचंड प्रमाणात ऊर्जा लागलेली आहे. एका मध्यम स्वरूपाच्या ज्वालामुखी उद्रेकातून जर इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रभाव जाणवू शकतो. तर 'रिंग ऑफ फायर' मधे असलेल्या देशांच्या जवळ असा एखादा स्फोट काय प्रलय आणू शकतो याची चुणूक बघायला या स्फोटाने मिळाली आहे. अजूनही या स्फ़ोटावर संशोधन सुरु आहे. हा शेवट होता की ही सुरवात आहे याबद्दल ही वैज्ञानिक स्पष्ट काहीच सांगू शकत नाहीत. भविष्यात सुद्धा 'हुंगा टोंगा हुंगा हापाई' पुन्हा एकदा आपलं रौद्र स्वरूप दाखवेल असा अनेक वैज्ञानिकांना वाटते. 

फोटो शोध सौजन्य :-  गुगल.  पहिल्या फोटोत हुंगा टोंगा हुंगा हापाई ज्वालामुखी आणि दुसऱ्या फोटोत रिंग ऑफ फायर.    

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment