Friday, 14 January 2022

एका वर्षानंतर... विनीत वर्तक ©

 एका वर्षानंतर... विनीत वर्तक ©

मे २०२१ मधे जेव्हा कोरोना रुग्णसंख्येने भारतात प्रत्येक दिवशी ४ लाख रुग्णांचा आकडा ओलांडला तेव्हा जागतिक मिडिया, भारतीय मिडिया, भारतातील स्वतःला अतिज्ञानी म्हणवणारे वरिष्ठ पत्रकार, पुरोगामी राजकारणी ते पांढरपेशा समाजातील अनेकांनी भारताच्या तेव्हाच्या परिस्थीती वर अगदी कोकलून भारताची इज्जत वेशीवर टांगली. भारतात जळणाऱ्या चिता, हॉस्पिटल बाहेर लागलेल्या रांगा, मृतदेहांचा खच यावर अगदी मसाला थापून त्याच्या बातम्या केल्या. काही अग्रगण्य मासिकांनी यावर स्पेशल एडिशन म्हणून आपले अंक छापले. भारत सरकार कसं अपयशी आहे? भारतीय लोक हेच जागतिक कोरोना लाटेला कसे कारणीभूत आहेत हे सांगून अनेक देशात भारतीयांना जाण्यासाठी मज्जाव टाकण्यात आला. एकूणच काय तर कोरोना जगात कुठे अस्तित्वात आहे किंवा पसरतो आहे तो भारतीयांमुळे असं एक चित्र जगापुढे ठेवलं गेलं. या सगळ्यासाठी आपल्याच देशातील गद्दार, आपल्याच देशातील राजकारणी आणि आपल्याच देशातील मिडिया कारणीभूत होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 

आज १५ जानेवारी २०२२ रोजी मात्र हेच सर्व शेपूट गुंडाळून गप्प बसून आहेत. गेल्या २४ तासात एकट्या अमेरिकेत ८ लाखांपेक्षा जास्ती नवीन कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत. यु.के. मधे हीच संख्या १ लाखाच्या घरात आहे. भारतात ही जवळपास २ लाख ६७ हजार नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. पण जर आपण १० लाख लोकांमागे किती रुग्ण याची सरासरी काढली तर अमेरिकेची १ लाख ९८ हजार आहे. तर यु.के. ची २ लाख २० हजार आहे. या तुलनेत भारत कुठे आहे. तर भारतात दर १० लाख लोकांमागे फक्त २७ हजार रुग्ण आहेत. भारतात ही रुग्ण संख्या दुप्पट जरी मानली तरी हा आकडा या देशांच्या मानाने पुष्कळ कमी आहे. मग असं असताना भारतातल्या कोरोना लाटेवर गेल्या वर्षी स्पेशल एडिशन छापणारे आता यावर काही लिहणार आहेत का? प्रश्न हा नाही की संख्येच्या खेळात कोण पुढे आणि कोण मागे? प्रश्न हा आहे की भारताबाबत दुट्टपी धोरण का?  

८ डिसेंबर २०२० चा दिवस होता. जेव्हा जगातील कोरोना लसीकरणाची सुरवात ब्रिटन ने केली होती. तर १२ डिसेंबर २०२० रोजी अमेरिकेने आपल्या कोरोना लसीकरणाची सुरवात केली. जेव्हा जगातील प्रगत राष्ट्र स्वतःच्या लोकसंख्येला लसीकरण करून सुरक्षित करत होते तेव्हा भारताचं काय होणार? असा प्रश्न अनेक जागतिक आणि भारतातील विचारमंतांना पडला होता. अनेकांनी भारताला लस कोण देणार? लसीसाठी लागणारे पैसे, नियोजन कसं करणार? राज्य आणि केंद्र सरकारात वाद ही कारणं पुढे करत लसीकरणाचं शिवधनुष्य भारताला पेलवणारं नाही. भारतात मृत्यूचं तांडव कोरोना करेल असं भाकीत केलं. तर लस ही एका पक्षाची असल्याचं सांगत काही राजकारण्यांनी त्याला पक्षीय रंग देण्याचं ही काम केलं. पण या सर्वांवर मात करत अनेक अडचणींवर मात करत भारताने १६ जानेवारी २०२१ रोजी जगातल्या सगळ्यात मोठ्या कोरोना लसीकरणाची सुरवात केली. 

१४० कोटी लोकांच लसीकरण ते ही दोन वेळा हे नक्कीच सोप्प लक्ष्य नव्हतं. अडचणी मोजल्या तर कमी पडतील इतक्या होत्या. सगळ्यात मोठी अडचण होती लसींच निर्माण आणि त्यांचा अखंडित पुरवठा. इतक्या प्रचंड प्रमाणावर लसींची निर्मिती करण्यासाठी उद्योजक, त्यांना लागणारा कच्चा माल आणि तयार झालेल्या लसींचा पुरवठा हे खूप मोठं आव्हान एकूणच सरकार, वैद्यकीय मंत्रालय, याच्याशी संबंधित सर्वच लोकांवर होतं. त्यात भरीस भर म्हणून लोकशाही रचना ही एक मोठी अडचण होती. कारण प्रत्येक प्रदेशात असलेली राज्य सरकार, त्यांचे कायदे, त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या सूचना या सर्वाना एकाच पातळीवर आणून त्यांच्यात समन्वय साधणं हे सगळ्यात मोठं कठीण काम होतं. यात अनेक अडचणी आल्या. लसींची कमतरता, राज्य सरकारच्या भुमीका, केंद्र सरकारचा दुजाभाव, राज्य आणि केंद्र यांच्या मधील समन्वय या सगळ्याचा खूप मोठा त्रास सर्वानांच झाला यात कोणाचं दुमत नसेल. पण कुठेतरी मार्ग काढत जेव्हा पुढे जाण्याचा रस्ता मोकळा झाला तेव्हा दुसरी मोठी अडचण आ वासून समोर उभी होती. 

भारतातील लोकांमध्ये लसी बद्दल असलेली नकारत्मका. वैद्यकीय क्षेत्रातील 'ग' माहित नसलेल्या राजकीय नेत्यांनी अकलेचे तारे तोडत आपली पक्षीय पोळी भाजून घेण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न, लसीबद्दल पसरवलेली नकारत्मका, कोणत्याही फेसबुक, व्हाट्स अप फॉरवर्ड ला जागतिक प्रबंध मानून त्याच्या मागे धावणारी स्वतःला सुशिक्षित मानणारी भारतीय जनता. आयुर्वेदाचे, कोणत्यातरी काढ्याचे नाव घेऊन बिनधास्त कोणत्याही पुराव्या शिवाय आपल्याकडे आलेला कचरा पुढच्याकडे ढकलून देण्यात सराईत असलेले सुशिक्षित लोक यामुळे कुठेतरी लसीबद्दल अविश्वास जनमानसात निर्माण झाला. त्याला दूर करून स्वच्छेने लस घेण्यास भारतीयांना प्रवृत्त करणे हे ही खूप मोठं कठीण काम होतं. पण म्हणतात ना काळ माणसाला शिकवतो. मे २०२१ च्या लाटेत ज्या पद्धतीने कोरोना ने लोकांची वाताहत केली ते बघितल्यावर लस हीच आपल्या आणि मृत्यूच्या मधे उभी आहे हे भारतीयांना कळून चुकलं. त्यानंतर जे झालं तो इतिहास आहे. एका दिवसात तब्बल २.५ कोटी लोकांच लसीकरण ते १०० कोटी लोकांच लसीकरण करत आज पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं आहे. 

आज हा लेख लिहीपर्यंत १५५ कोटी पेक्षा जास्ती लस भारतीयांना दिल्या गेल्या आहेत. जवळपास ६५ कोटी लोकांच दुहेरी लसीकरण पूर्ण झालं आहे. तर तिसऱ्या बूस्टर डोस तसेच १५-१८ वर्ष वयोगटातील जवळपास ४० लाख पेक्षा जास्त मुलांना कोरोना लस देण्यात आली आहे. उद्या भारताच्या लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण होतं आहे. या एका वर्षात आपण अनेक बदलातून गेलो आहोत आणि जात आहोत. आज कोरोना पुन्हा एकदा वेगाने पसरत असला तरी त्याची दाहकता कमी झालेली आहे. आजही भाताचा मृत्युदर जगात अतिशय कमी आहे. कोरोना ची दाहकता कमी जाणवण्यामागे गेल्या एका वर्षात ज्या पद्धतीने सर्व भारतीयांच लसीकरण झालं त्याचा मोठा वाटा आहे. 

भारताने आपल्या लसींनी फक्त भारतीयांना नाही वाचवलं तर आपल्याच घरात लढत असताना भारताने जगातील तब्बल ९६ देशांना ११ कोटी ५० लाखांपेक्षा जास्त लसींचा पुरवठा केला आहे. हा आकडा ३१ डिसेंबर २०२१ चा आहे. ज्यात अजून भर पडत आहे. अजून एक मोठी गोष्ट म्हणजे भारताने या लसी मदत किंवा गिफ्ट म्हणून दिलेल्या आहेत. एकीकडे चीन जिथे पाकिस्तान ला मदत करताना सुद्धा तुम्हाला लसी हव्या असतील तर तुमचे विमान पाठवा, आमचा टॅक्स भरा. आम्ही फक्त लस देऊ ती घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची आहे असं सुनावतो. तिकडे भारताने ९७ देशांना गिफ्ट कसं द्यायचं असते ते दाखवून दिलं आहे. कारण भारताने या सर्व लसी आपल्या 'एअर इंडिया' च्या विमानाने कोणताही कर अथवा छुपा अधिभार न लावता त्या देशात नेऊन त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या आहेत. गिफ्ट आणि मदत देण्याचे वेगळे पायंडे भारताने जागतिक मंचावर पडले आहेत. ज्याचे दूरगामी परिणाम आपल्याला येत्या काळात दिसतील. ही राष्ट्र कदाचित जगाच्या नकाशावर अगदी छोटी असतील त्यांच महत्व ही कदाचित जागतिक राजकारणाच्या दृष्टीने नगण्य असेल. पण भारत रंग, आर्थिक सुबत्ता, स्वतःचा फायदा हे बघून मदत करत नाही तर त्या देशात राहणारे ही माणसं आहेत आणि त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे हा खूप मोठा संदेश जगात गेला आहे. याचा फायदा भारतीय जेव्हा जेव्हा या देशात जातील तेव्हा तिथल्या लोकांच्या दृष्टिकोनातून तो त्यांना नक्कीच जाणवेल या बद्दल माझ्या मनात शंका नाही. 

जगातील कोणतीही लस कोरोना होण्यापासून संरक्षण करत नाही. पण नक्कीच ती आपल्या आणि मृत्यूच्या मधे उभी रहाते. त्यामुळेच आज भारतीय सुटकेचा निश्वास सोडत आहेत. पण ही लढाई अजून सुरु आहे. आपण पहिला किल्ला सर केला म्हणजे स्वराज्याची निर्मिती होत नसते तर शत्रू अजून वेगळ्या रूपात समोर येतो. त्यामुळे गाफील न राहता. कोरोना ला थांबण्यासाठी योग्य ती काळजी घेणं प्रत्येक भारतीयांच कर्तव्य आहे. ते आपण सर्व भारतीय पूर्ण करूयात. आज लसीकरणाच्या एक वर्षाच्या पूर्वसंध्येला मी समस्त भारतीयांतर्फे सर्व डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, सेवाभावी संस्था, लसींचे निर्माते, त्याचे पुरवठादार, पोलीस, सेवाभावी माणसं, प्रशासकीय अधिकारी त्यांचा कर्मचारी वर्ग, हेल्थ मिनिस्ट्री, राज्य सरकारे आणि केंद्र सरकार या सर्वांचा मनापासून आभारी आहे. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :-  गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे. 



1 comment:

  1. हा माहितीपूर्ण लेख दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो व कौतुकही करतो!
    लेख थोडासा एकतर्फी आहे असे मला वाटतं कारण भारतात मृत्यूंचे प्रमाण जितके होते त्यापेक्षा जास्त अमेरिकेत होते आणि प्रेत दहनाची प्रथा नसल्यामुळे प्रेतं पुरावयास जागा नसल्याच्या अनेक बातम्या अमेरिकन चित्रवाणीवर भारतात आलेल्या मी पाहिल्या होत्या.
    भारतात मोदी सरकारच्या तत्पर कारवाईमुळे खूप परिणामकारक नियंत्रण दिसू लागले असताना कांही अनपेक्षित समस्यांमुळे परिस्थिति बिघडू लागली.
    पहिली समस्या आली ती ‘तबलीघी जमात’ या संस्थेच्या दिल्लीतील आंतरराष्ट्रीय संमेलनामुळे! या संमेलनाला हजार-एक लोक हजर होते. ते लक्षात येताच ते संमेलन लगेच बंद करण्यात आले पण त्यात संसर्ग झालेले लोक परत गेले ते तो रोग घेऊन!
    दुसरी चूक झाली ती पाठोपाठ आलेल्या रमज़ान ईदसाठी घराबाहेर न पडण्याच्या नियमात दिलेल्या सवलतींमुळे! पण तरीही भारताने मिळविलेले यश कौतुकास्पदच आहे.
    सध्या मी अमेरिकेत आहे पण इथे मास्क वापरण्यावर किंवा लसीकरणावर लोकशाहीमुळे हा देश आपल्यासारख्याच परिस्थितीत आहे! कित्येक दुकानांत ‘मास्क वापरणे बंधनकारक नाहीं’ अशा पाट्या मी पाहिलेल्या आहेत.
    इथेही लाटा येतच आहेत.
    पुन्हा एकदा आपल्या लेखाबद्दल अभिनंदन व आभार.
    सुधीर काळे

    ReplyDelete