Sunday, 30 January 2022

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १८ )... विनीत वर्तक ©

 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग १८ )... विनीत वर्तक ©

सध्या जगाच्या नकाशावर युद्धाच वादळ घोंघावू लागलेलं आहे. पुन्हा एकदा जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने जाते आहे की  काय अशी भीती जगातल्या अनेक तज्ञांना वाटत आहे. या वाऱ्याची झळ अजून भारतापर्यंत पोहचली नसली तरी भारत जागतिक मंचावर अतिशय धोकादायक स्थितीतून प्रवास करत आहे. नक्की हे वादळ काय आहे? त्याची कारणं? नक्की पुढे काय होणार? जागतिक राजकारणावर आणि एकूणच भारतीयांवर या गोष्टींचा कसा प्रभाव पडणार आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कारण संपूर्ण जगाच्या आर्थिक स्थितीची उलथापालथ करण्याची क्षमता या वादळाची असणार आहे. एक काळ असा होता जेव्हा अमेरिका आणि रशिया एकमेकांसोबत कोल्ड वॉर मधे अडकले होते. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात अनेकांना त्याची झळ सोसावी लागली होती. १९९१ मधे सोव्हियत युनियन च्या विघटनानंतर १५ देश हे रशियापासून वेगळे झाले आणि आताच्या रशियाची निर्मिती झाली. सोव्हियत युनियन च्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युरोपियन देशांनी १९४९ North Atlantic Treaty Organization (NATO) ची स्थापना केली. नाटो च्या फौजा एकत्र येऊन सोव्हियत युनियन च्या विरुद्ध कोल्ड वॉर च्या काळात शड्डू ठोकून उभ्या राहिल्या होत्या. 

१९९१ नंतर रशियाच्या विघटनानंतर जे १५ देश रशियाकडून वेगळे झाले त्यांना जवळ करण्यासाठी अमेरिकेने नाटो च्या नावाने आपलं जाळ फेकायला सुरवात केली. हे सर्व देश रशियाचा आधी भाग होते त्यामुळे त्यांची सीमा आजही रशियाशी जुळते. जर आपण या देशांना जवळ केलं म्हणजेच नाटो चा सदस्य केलं तर आपण रशियाच्या अगदी सीमेलागत आपलं सैन्य, सैनिकी तंत्रज्ञान पाठवू शकतो हे अमेरिकेला चांगल माहित होतं. अमेरिकेने आणि पर्यायाने नाटो ने याच देशांना नाटो च सदस्य बनवलं. पुन्हा एकदा अमेरिका आणि रशिया मधे संघर्षाची ठिणगी पडली. नाटो चा रशियाच्या क्षेत्रात वाढता प्रभाव कुठेतरी रशियाला अस्वस्थ करत होता. त्यातच अमेरिकेने युक्रेनकडे आपली नजर वळवली. युक्रेन आणि रशिया यांचे खूप जुने घनिष्ठ संबंध आहेत. त्याचा इतिहास कित्येक शतका आधीचा आहे. युक्रेन च्या संस्कृतीवर रशियाचा प्रभाव खूप आहे. युक्रेन क्षेत्रफळाच्या मानाने युरोपात रशियाच्या खालोखाल आहे. युक्रेनची २२९५ किलोमीटर इतकी प्रचंड लांब सीमा रशियासोबत जोडलेली आहे. आज जरी युक्रेन रशियाचा भाग नसला तरी युक्रेन मधील अनेक लोकांना रशियाचा भाग होण्याची आजही इच्छा आहे. त्यामुळेच पूर्वेकडील युक्रेन च्या भागात आज बंडखोर लोकांच वर्चस्व आहे. हे बंडखोर लोकं युक्रेन सरकार विरुद्ध रशियात जाण्यासाठी आजही युद्ध आणि उठाव करत आहेत. 

युक्रेन जर नाटो चा सदस्य झाला तर रशियाच्या अगदी खोलवर नाटो आणि पर्यायाने अमेरिकेला शिरता येणार आहे. हेच रशियाला नको आहे. कारण युक्रेन जर नाटो च्या अमिषाला बळी पडला तर अमेरिके सारख्या शत्रू राष्ट्राला आपलं शेजारी करणं हे रशियाला परवडणारं नाही. अमेरिका आणि युरोपियन संघाच्या आर्थिक बंधनामुळे रशियाची अर्थव्यवस्था सध्या गडबडली आहे. रशियाच्या चलनाचे मूल्य जवळपास ५०% नी कमी झालं आहे. एकीकडे आर्थिक विवंचनेत सापडलेला रशिया युक्रेन नाटो च्या जवळ जाण्याने पेटून उठला आहे. रशियाने अमेरिकेच्या आणि नाटो च्या पावलांना वेळीच ओळखून युक्रेन च्या सरहद्दीवर जवळपास १ लाख सैन्याची जमवाजमव केली आहे. त्याच सोबत एस ४००, रणगाडे, मिसाईल, लढाऊ विमाने तैनात केली आहेत. युक्रेन च्या काही राजकीय नेत्यांनी रशियाच्या या पावलांना युक्रेन वर रशिया हल्ला करणार आणि पुन्हा एकदा रशियात समाविष्ट करणार असं म्हणून जगाकडे मदतीची याचना केली. रशियाच्या मानाने युक्रेनकडे असलेली सैन्य क्षमता खूप कमी आहे. मिसाईल, लढाऊ विमान, रणगाडे या सर्व बाबतीत युक्रेन रशियाची बरोबरी करू शकत नाही. 

युक्रेन ने रशियाच्या विरुद्ध आपली फौज उभारण्यासाठी नाटो कडून मदत मागितली. युक्रेनला रशियन फौजांना रोखण्यासाठी अमेरिकेकडून स्ट्रिंगर, टॉमहॉक सारखी मिसाईल हवी आहेत. नाटो आणि अमेरिकेने युक्रेनला रशियाच्या विरुद्ध शस्त्रास्त्रे द्यायला सुरवात केली आणि जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा युद्धाचं वादळ घोंघावू लागलं आहे. रशियाने एकीकडे आपलं सैन्य तयार ठेवलं आहे तर दुसरीकडे युक्रेन ने कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. २०१४ पासून अनेक युक्रेन च्या नागरिकांनी आपले प्राण या अशांततेत गमावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा असा नरसंहार होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अमेरिकेला या युद्धात प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा नाही. अमेरिकन सैनिकांना पुन्हा एकदा वेठीस धरण्याची मानसिकता अमेरिकन नागरिकांची नाही. त्यामुळेच बायडेन प्रशासनाला अमेरिकन सैन्य युक्रेन मधे उतरवायचं नाही. पण त्याचवेळी नाटो च्या माध्यमातून रशियावर वचक ही ठेवायचा आहे. त्यामुळे अमेरिका नाटो च्या आडून युक्रेन ला मदत करत आहे. फेब्रुवारीत रशिया युक्रेनवर हल्ला करेल असा अंदाज आहे. यामागे ही कारणे आहेत. रशिया युरोप ला मोठ्या प्रमाणावर नॅचरल गॅस चा पुरवठा करते. आता थंडीची सुरवात झाली की रशियाकडून जर हा नॅचरल गॅस चा पुरवठा थांबला तर युरोपला ऊर्जेची गरज भागवणे कठीण जाणार. तसं होऊ नये म्हणून रशियाच्या युक्रेन वरच्या हल्याला युरोपियन राष्ट्र जास्ती विरोध करणार नाहीत हे रशियाला चांगलं माहित आहे. 

अमेरिकेसाठी सुद्धा रशियापेक्षा आज चीन च संकट अमेरिकेपुढे जास्त आहे. रशियाच्या मागे आपली आर्थिक, सैनिकी शक्ती वाया घालवणं अमेरिकेला परवडणारं नाही. त्यामुळे अमेरिका फक्त आग लावून बाजूला होणार हे उघड आहे. इकडे चीन ने रशियाच्या बाजूने पवित्रा घेतला आहे. तर या सगळ्यात अडचणीत सापडलेला आहे तो भारत. भारताचे राजनैतिक आणि सैनिकी असे दोन्ही संबंध अमेरिका आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांशी अतिशय जवळचे आहेत. त्यामुळे कोणत्याही बाजूला भारत झुकला तर त्याचे विपरीत परिणाम हे होणार आहेत. रशिया आणि भारताची मैत्री सर्वश्रुत आहे. त्याचवेळी भारतासाठी अमेरिका खूप महत्वाची आहे. त्यामुळेच भारताची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे. भारताने तूर्तास कोणतंही भाष्य यावर करण्याचं टाळलं आहे. रशियाने जर युक्रेनवर सैनिकी कारवाई केली तर हे युद्ध दोन्ही देशांना खूप महागात पडेल. रशियाची आर्थिक स्थिती आणखीन खालावेल. युरोपियन देशांसोबत असलेले आर्थिक आणि इतर संबंधांवर अंकुश लागेल. युरोपियन राष्ट्र आणि नाटो ला ही त्याची झळ पोहचेल. एकूणच जगाची आर्थिक स्थिती अजून खालावेल. याचे चटके जगासह भारताला ही बसतील. ज्याप्रमाणे इराण ला वाळीत टाकण्यासाठी भारताची कोंडी अमेरिकेने केली. तशी कोंडी अमेरिका भविष्यात रशियावर दबाव टाकण्यासाठी भारताची करू शकते. 

काही लोकं भारताने अमेरिकेचा विचार करू नये रशियासोबत जावं असं म्हणतील. पण ते तितकं सोप्प नाही. भारतासाठी आज दोन्ही देश तितकेच महत्वाचे आहेत. कोल्ड वॉर सोबत रशियावर अवलंबून असलेला भारत आता जागतिक स्पर्धेत सर्व देशांशी संबंध सांभाळून आहे. त्यामुळे कोण्या एका देशाची मक्तेदारी अथवा मैत्री ही भारताची आजची गरज नाही. अमेरिकेचं नको तिकडे नाक खुपसणं हे सगळ्या जागतिक त्रासाचं मूळ आहे. जर अमेरिकेने नाटो च्या माध्यमातून युक्रेन मधे इतकी घुसखोरी केली नसती तर रशियाला आज सैनिकी कारवाईचा विचार करावा लागला नसता. एकेकाळी आपला असलेला आपला शेजारी देश  आपल्याच शत्रूला राहायला जागा देतो हे शांतपणे बघणं रशियाला नक्कीच आवडणारं आणि परवडणारं नाही. पण त्याचवेळी या सगळ्यातून निष्पन्न काही झालं तरी अमेरिकेला त्याचा काही त्रास होणार नाही पण युरोपियन देश मात्र  होरपळून निघतील. यात चीन चा पुन्हा एकदा फायदा होईल आणि भारतासाठी तारेवरची कसरत. 

हे घोंघावणारं वादळ सध्या तरी शांत वाटते आहे. पण ही शांतता त्याच्या येण्यापूर्वीची आहे की ते शांत झाल्याची वर्दी आहे हे वाहणारे वारे ठरवतील. तूर्तास या वाऱ्यांची दिशा लवकर ओळखून होणाऱ्या परिणामांसाठी आपण तयार रहाणं हेच आपल्या हातात आहे.   

फोटो शोध सौजन्य :-  गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment