Thursday, 21 February 2019

एक छोटीसी लव्ह स्टोरी... विनीत वर्तक ©

एक छोटीसी लव्ह स्टोरी... विनीत वर्तक ©

प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतंच!कधी ते प्रेम आपल्या आयुष्याचा भाग बनतं तर कधी अव्यक्त रहातं... कोणाला तरी 'आय लव्ह यू' बोलणं जितकं कठीण असतं त्याहीपेक्षा त्या शब्दांना आयुष्यभरासाठी निभावणं हे शिवधनुष्य अनेकांना पेलणं जड जातं. सगळं काही व्यवस्थित असतानाही एकेकाळी हवंहवसं वाटणारं प्रेम अचानक अचानक निरस होऊन जातं. आधी सहजरित्या न आवडणाऱ्या गोष्टी पण पचत असतात परंतु जशी वेळ जाते तसं आवडणाऱ्या गोष्टी पण डोक्यात जायला लागतात. उसवलेले धागे मग उसवतच जातात ते अगदी ताटातूट होईपर्यंत!! (विनीत वर्तक ©)

परंतु,काही नाती ह्या पलीकडे असतात. ती प्रेमाच्या वेगळ्या धाग्यांनी जोडलेली असतात. व्यवहारी आयुष्य जगणाऱ्या अनेकांना ही नाती न कधी समजत न कधी पचनी पडत...

आयुष्यात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात तसे त्या तीन शब्दांना आपलं आयुष्य मानणाऱ्यांचे पण असतात. आयुष्यात कितीही बाका प्रसंग आला तरी त्या तीन शब्दांना तो ह्या आयुष्यातून निघून गेल्यावर पण तोडू शकत नाही इतके ते प्रेमाचे बंध मजबूत असतात. अशीच एक छोटीसी लव्ह स्टोरी आपल्याला खूप काही शिकवून जाते.(विनीत वर्तक ©)

तुमच्या-आमच्यासारखी ह्या कथेतली दोन पात्रं; पण त्याचं प्रेम हे जगावेगळं. पहिल्यांदा बघता क्षणी एकमेकांत एकरूप झालेली ती दोन मनं आयुष्याच्या सगळ्या त्सुनामीत तशीच राहिली. सगळ्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजावून गेली.

मेजर 'शशिधरन व्ही. नायर' भारतीय सेनेचा शूरवीर अधिकारी! पुण्याच्या नामांकित फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीधर झालेल्या शशी नायर ला लहानपणापासून सैन्यात जायचं होतं. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना त्याने २००७ साली भारतीय सेनेची 'सी.डी.एस.' ही परीक्षा उत्तीर्ण केली. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखवण्याची जिद्द त्याला 'एन.सी.सी.' मध्ये घेऊन आली. त्यासाठी रोज सकाळी ६ वाजता फर्ग्युसन कॉलेजमधील एन.सी.सी.च्या क्लास ला हजर राहण्यासाठी २० किलोमीटर सायकल चालवून तो शार्प ६ वाजता कॉलेजला पोहचत असे. त्याची शारीरिक कणखरता खूप चांगली होती. आपल्यासोबत तो इतरांना ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी प्रोत्साहन देत असे. (विनीत वर्तक ©)

२००७ साली मेजर शशिधरन नायर ह्यांची ओळख त्यांच्या एका मित्राने तृप्तीशी करून दिली. बघताक्षणीच तृप्ती आणि शशिधरन नायर एकमेकांच्या प्रेमात पडले. तृप्तीने कॉम्प्यूटर एप्लिकेशन मधून आपलं मास्टर पूर्ण केलं होतं. 'लव्ह एट फर्स्ट साईट' अशा वेगळ्या प्रेमकथेत दोघांनाही कळून चुकलं की 'अपनी जोडी तो उसने बनाई है।' ६ महिन्यानंतर दोघांनी एंगेजमेंट केली. आयुष्याच्या एका वळणावर अवचित भेटलेल्या दोघांनी आपल्या प्रेमाला आयुष्यभर जोडीदार बनून निभावण्याचा निर्णय घेतला.

पण नियतीच्या मनात काही वेगळचं होतं. एंगेजमेंटनंतर अवघ्या ८ महिन्यात तृप्ती ला एका दुर्धर आजाराने वेढलं. तृप्ती ला 'मल्टीपल आर्टिरिओस्क्लेरोसिस'असल्याचं निदान झालं. त्यामुळे तृप्तीला व्हीलचेअरचा आसरा पूर्ण आयुष्यभर घ्यावा लागणार हे नक्की झालं. नुकतीच कुठे मेजर नायर आणि तृप्ती ह्यांची एक छोटीसी लव्ह स्टोरी सुरु झाली होती. पण त्याला असं ग्रहण लागलं ज्यात पुन्हा ते सुटण्याची कोणतीच चिन्ह दिसतं नव्हती.

मेजर शशिधरन नायर ह्यांच्यापुढे प्रसंग बाका होता. एक निर्णय त्यांना घ्यावा लागणार होता; ज्यावर पूर्ण आयुष्याची वाटचाल अवलंबून असणार होती. तृप्ती च्या अशा दुर्धर आजारानंतर अनेकांनी मेजर नायर ह्यांना वेगळ्या पर्यायाचा विचार करण्यास सांगितलं. पण म्हणतात नं,

'साथ छोडने वालों को तो एक बहाना
चाहिए, वरना निभाने वाले तो,
मौत के दरवाजे तक साथ
नहीं छोडते!'

पहिल्या क्षणात आपली झालेल्या तृप्ती ला साथ द्यायचा निर्णय त्यांनी घेतला. एका सैनिकाचा तो शब्द होता. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायला मागे पुढे न हटणाऱ्या मेजर शशिधरन नायर ह्यांनी आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या सगळ्या अडचणींना त्याच निर्धाराने तोंड देण्याचा निर्धार केला. २०१२ मध्ये मेजर शशीधरन नायर आणि तृप्ती विवाहबंधनात अडकले. पण नियती इकडे ही आडवी आली. लग्नानंतर काही दिवसात स्ट्रोक चा झटका आला. ज्यात तृप्ती ची कंबरेखालचं पूर्ण शरीर हे अधू झालं. नियतीने समोर आणलेल्या अशा अनेक आघातांचं दु:ख, शशी नायर ह्यांनी कधीच सगळ्यांसमोर आणि त्यांच्या प्रेमात आणलं नाही. आपल्या बायकोला कधी व्हील चेअर घेऊन तर कधी आपल्या हातात उचलून अनेक पार्टींना तसेच इतर अनेक कार्यक्रम, गेट टू गेदर सगळीकडे नेत असे. त्यांचं प्रेम हे त्या शरीरापलीकडे होतं, व्यावहारिक जगाच्या गणितापलीकडे होतं!! त्यांची छोटीसी लव्ह स्टोरी कुठेतरी सगळ्यांना पुन्हा एकदा खरं प्रेम दाखवून देत होती. (विनीत वर्तक ©)

नियतीला हे मान्य नव्हतं. मेजर शशिधरन ह्यांचं पहिलं प्रेम आपला देश होता. मातृभूमी च्या रक्षणासाठी आपला जीव देण्याची तयारी अगदी लहानपणापासून त्यांनी केली होती. कदाचित नियतीने त्यांची परीक्षा पाहिली. त्यांची पोस्टिंग काश्मीरच्या 'नौशेरा' सेक्टरमध्ये झाली. तृप्तीच्या मनात कुठेतरी शंकेने घर केलं. पण कर्तव्य पहिलं मानलेल्या सैनिकाला देश सगळ्यात जास्त प्रिय असतो. २ जानेवारी २०१९ ला मेजर शशीधरन नी तृप्तीला देशाची सेवा करायला जाताना बाय म्हंटलं ते शेवटचं नसू दे इतकीच प्रार्थना तृप्तीने केली. पण नियती इथेही आडवी आली. ११ जानेवारी २०१९ ला नौशेरा इकडे झालेल्या आय.ई.डी. च्या स्फोटात मेजर शशिधरन नायर ह्यांना वीरमरण आलं. नियतीने एका छोट्या लव्ह स्टोरीचा असा अचानक शेवट केला. पण नियती त्या दोघांचं प्रेम मात्र तोडू शकली का? नाही! त्यांचं प्रेम अमर झालं,त्या अमर जवान सैनिकांसारखंच. (विनीत वर्तक ©)

'मेजर शशिधरन नायर' आणि 'तृप्ती' ह्यांची एक छोटीसी लव्ह स्टोरी येणाऱ्या कित्येक पिढ्यांना खऱ्या प्रेमाची आठवण करून देत राहील ह्यात शंकाच नाही!

सूचना :- ही पोस्ट (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल ह्याची नोंद घ्यावी.

माहिती स्त्रोत :- गुगल

फोटो स्त्रोत :- गुगल

No comments:

Post a Comment