Tuesday 26 February 2019

सर्जिकल स्ट्राईक २ करणारे मिराज २०००... विनीत वर्तक ©
गेल्या काही महिन्यात भारताने खरेदी केलेल्या डसाल्ट राफेल विमानांवरून खूप रणकंदन झालेलं आहे. ३६ राफेल विमान सरकारने खरेदी करण्याचा करार नाहक वादात गोवला गेला. अजूनही त्यावर राजकारण होतं असलं तरी हे विमान बनवणारी डसाल्ट कंपनी भारतीय वायू सेनेसाठी नवी नाही. डसाल्ट एविएशन ह्या फ्रांस च्या कंपनीने बनवलेलं ४ थ्या पिढीतलं मिराज २००० आज प्रत्येक भारतीयाच्या तोंडी आहे. आज कौतुकाचा विषय बनलेलं मिराज २००० हे डसाल्ट एविएशन च लढाऊ विमान भारतीय सेनेत दाखल होणाऱ्या राफेल विमानांचा थोरला भाऊ म्हंटल्यासं वावगं ठरणार नाही. कारण मिराज २००० च्या ६०० पेक्षा जास्ती विमानांकडे जगातील ९ देशांच्या हवाई संरक्षणाची जबाबदारी आहे. फ्रांस, तैवान, इजिप्त, ब्राझील, पेरू, यु.ए.ई. सह भारताचा समावेश ह्यात आहे. काय कारण आहे की भारताने सर्जिकल स्ट्राईकसाठी मिराज २००० वर विश्वास ठेवला जेव्हा की भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात सुखोई एम.के.आय. ३० आणि मिग २९ सारखी पुढल्या पिढीतील लढाऊ विमाने आहेत? जाणून घेऊ या ह्या मल्टीरोल मिराज २००० लढाऊ विमानाविषयी. (विनीत वर्तक ©)
मिराज २००० हे चौथ्या पिढीतील लढाऊ विमान असून भारताच्या वायू सेनेमधील बहुआयामी आणि खतरनाक असं लढाऊ विमान आहे. १९७८ साली पहिल्यांदा उड्डाण भरलेलं आणि १९८४ साली फ्रांस च्या हवाई दलाचा भाग झालेलं विमान भारताने पाकिस्तान च्या एफ १६ च्या विरोधात फ्रांस सरकारकडून खरेदी करण्याचा करार केला. ह्या विमानांनी आपली उपयुक्तता १९९९ च्या कारगिल युद्धात सिद्ध केल्यावर भारत सरकारने अजून १४ विमानांची ऑर्डर डसाल्ट एविएशन ला दिली. ह्यामुळे आज ५० डसाल्ट मिराज २००० भारतीय वायू सेनेचा भाग आहेत. ह्या विमानांना अपग्रेड करून ह्याचं आयुष्य आता २०३० पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. ह्याच डसाल्ट एविएशन ने आता राफेल ची निर्मिती सुरु केली असून त्याच धर्तीवर भारताने ३६ राफेल विमान खरेदी करण्याचा करार केला आहे.
मिराज २००० हे एक पायलट असलेलं लढाऊ विमान असून दोन पायलट मध्ये ते बदलवता येऊ शकते. हे विमान लांबीला १४.२६ मीटर असून आपल्या पंखानोबत ह्याची रुंदी ९१.३ मीटर आहे. ह्या विमानाच वजन ७५०० किलोग्राम असून १७,००० किलोग्राम वजन घेऊन उड्डाण भरण्यास सक्षम आहे. मिराज २००० ची सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे तो म्हणजे ह्याचा वेग. हे विमान ध्वनीच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने म्हणजे २.२ माख ( २३३६ किमी/ तास ) ह्या वेगाने प्रवास करण्यास सक्षम असून एका फेरीत १५५० किमी. अंतर कापण्याची ह्याची क्षमता आहे. हवेतून ५९,००० फुट (१७ किलोमीटर ) उंचीवरून हे विमान उड्डाण करू शकते. ह्यावर फ्लाय बाय वायर कंट्रोल सिस्टीम असून लेझर गायडेड बॉम्ब ( जे आज पाकिस्तानात अतिरेक्यांवर डागले गेले आहेत ) तसेच एअर टू एअर, एअर तो सरफेस क्षेपणास्त्रे घेऊन जायची ह्याची क्षमता असून रडार डॉपलर मल्टी टार्गेट रडार ह्यावर बसवलेलं आहे. जे ठरवून दिलेल्या लक्ष्याच सर्वनाश करण्यात सक्षम मानलं जाते. (विनीत वर्तक ©)
सुखोई एम.के.आय ३० आणि मिग २९ सारखी अत्याधुनिक लढाऊ विमान आपल्या ताफ्यात असताना भारतीय वायू सेनेने मिराज २००० ची निवड करण्यामागे काही कारणे आहेत. एकतर १९९९ च्या युद्धात ह्या विमानांनी आपल्या चपळता, अचूकता आणि वेगाने युद्धाच पारड भारताच्या बाजूने वळवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांच्या क्षमतेवर जास्ती विश्वास होता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्जिकल स्ट्राईक सारख्या ठिकाणी अचूकता, वेग, वेळ ह्या तीन गोष्टीना अतोनात महत्व असते. काय होतं आहे हे कळायच्या आधी आपलं काम फत्ते करून आपल्या घरी परतायचं असते. जोवर शत्रू जागा होतो तोवर सगळं संपलेलं असते. मिराज २००० चा वेग हा सुखोई ३० एम.के.आय. पेक्षा जास्ती आहे. सुखोई ३० एम.के.आय. २१२० किमी/ तास ह्या वेगाने उड्डाण भरू शकते जो वेग जवळपास २०० किमी/तास ने मिराज २००० पेक्षा कमी आहे. तसेच एम.के.आय. ३० आणि मिग २९ वजनांनी जड आहेत. ह्यामुळे अचूकता, वेग आणि चपळता ह्या बाबतीत सर्जिकल स्ट्राईक सारख्या मिशन मध्ये मिराज २००० हे सर्वोत्तम पर्याय भारतीय वायू सेनेकडे होतं. (विनीत वर्तक ©)
१२ मिराज २००० विमानांनी जेव्हा उड्डाण भरलं तेव्हा काही विमानांन मध्ये लेझर गायडेड बॉम्ब बसवण्यात आले होते. अवघ्या २१ मिनिटांच्या हल्यात मिराज २००० नी पाकिस्तान च्या हद्दीत घुसून ३०० पेक्षा जास्ती अतिरेक्यांना ठार केलं. पाकिस्तान च्या एअर बेस आणि एफ १६ ला ह्या हल्याचा सुगावा लागला परंतु भारतीय मिराज २००० विमानांच्या चपळता आणि शक्ती पुढे आपली खैर नाही हे लक्षात आल्याने मुग गिळून गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. उरलेली विमान स्ट्राईक करणाऱ्या विमानांना कव्हर देत होती. ह्यामुळे पाकिस्तानला काहीच करण्याची संधी मिळाली नाही. (विनीत वर्तक ©)
ह्या सगळ्यात मोठा भाग हा भारतीय हवाई दलाच प्लानिंग, विमान चालवणारे पायलट ह्यांचा असला तरी मोक्याच्या क्षणी धोका न देता शत्रूला चारी मुंड्या चीत करणाऱ्या मिराज २००० लढाऊ विमानांचा ही वाटा मोठा आहे. डसाल्ट एविएशन च पुढच पाउल किंवा तंत्रज्ञानात अजून प्रगत असलेल्या राफेल विमानांच्या येण्याने पाकिस्तान च्या तोंडच पाणी पळाल आहे ते उगाच नाही. ही एक सुरवात आहे. भारताने अजून आपल्या पुढल्या फळीतील सुखोई एम.के.आय. ३० आणि मिग २९ विमानांचा वापर केलेला नाही जे मिराज २००० पेक्षा अत्याधुनिक असून ब्राम्होस सारखं जगातील सगळ्यात वेगवान क्षेपणास्त्र हवेतून डागण्यात सक्षम आहेत. तूर्तास सर्जिकल स्ट्राईक २ मध्ये भाग घेतलेल्या सगळ्याच सैनिकांना माझा सलाम. जय हिंद.
सूचना :- ही पोस्ट (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल ह्याची नोंद घ्यावी.
माहिती स्त्रोत :- गुगल, न्यूज १८
फोटो स्त्रोत :- गुगल


1 comment: