अवकाश सफारीचं नवीन वाहन 'स्पेस एक्स ड्रॅगन.'.. विनीत वर्तक ©
मानवाने चंद्रावर पाऊल ठेवल्यावर, अवकाश हे आपली तंत्रज्ञानातील प्रगती जगापुढे मांडण्याचं एक स्थान झालं. त्यामुळे अवकाश, पुन्हा तिथे जाण्यासाठी जगातील तंत्रज्ञानाच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या देशांना खुणावू लागलं. शीत युद्धाच्या काळात अमेरिकेने रशियावर कुरघोडी करण्यामागे अमेरिकेचा 'स्पेस प्रोग्रॅम' कारणीभूत होता. म्हणून पुन्हा एकदा पूर्ण जगात तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडी घेण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष 'निक्सन' ह्यांनी ५ जानेवारी १९७२ ला अमेरिका पुन्हा वापरता येतील अशा स्पेस शटल प्रोग्रॅम वर काम करत असल्याचं जाहीर केलं. जवळपास ९ वर्षांनी नासा ने १२ एप्रिल १९८१ ला कोलंबिया स्पेस शटलचं पहिलं उड्डाण करून आपण ह्या क्षेत्रात दादा असल्याचं पूर्ण जगाला दाखवून दिलं! (विनीत वर्तक ©)
'स्पेस शटल प्रोग्रॅम' अंतर्गत कोलंबिया, चॅलेंजर, डिस्कवरी, अटलांटीस, एन्डेव्हर अशा पाच स्पेस शटलची निर्मिती केली. २१ जुलै २०११ ला शेवटचं उड्डाण भरेपर्यंत ह्या पाच स्पेस शटलनी जवळपास १३५ मिशन पूर्ण केले होते. पण कुठेतरी हा प्रोग्रॅम अमेरिका आणि नासा ह्या दोघांनाही डोईजड होता. ह्यातील प्रत्येक शटल हे १०० वेळा उड्डाण करण्यासाठी बनवलं गेलं होतं; पण चॅलेंजर, कोलंबिया ह्यांच्या अपघातातून ह्या स्पेस शटल वर असलेला विश्वास कमालीचा कमी झाला. पूर्ण स्पेस शटल प्रोग्रॅम मागचा नासाने केलेला खर्च जवळपास १९६ बिलियन अमेरिकन डॉलर इतका प्रचंड होता!!
गणित केल्यास प्रत्येक मिशनसाठी जवळपास ४५० मिलियन अमेरिकन डॉलर नासाला मोजावे लागत होते. इतके पैसे मोजूनही जुनी झालेली शटल आणि त्यात वाढत्या अपघातांचं प्रमाण हे नासा ला अस्वस्थ करत होतं. नासा च्या पूर्ण बजेट मधील मोठा हिस्सा हा स्पेस शटल प्रोग्राम आणि आय.एस.एस. वर खर्च होतं होता. त्यामुळे ह्याशिवाय अवकाशात काही अजून नवीन संशोधन करणाऱ्या सगळ्या योजना बारगळल्या होत्या. (विनीत वर्तक ©)
'स्पेस शटल' सारखा पांढरा हत्ती जोपासणं नासाला भारी पडत होतं. त्यामुळे नाईलाजाने नासा ने हा प्रोग्रॅम बंद करत असल्याची घोषणा केली. पण ह्यामुळे नासा आणि अमेरिका आपल्या भूमीवरून पुढील एक दशक माणसांना अवकाशात घेऊन जाऊ शकणार नाहीत हे सत्य नासाला आणि पर्यायाने अमेरिकेला स्वीकारावं लागलं. ह्या मधल्या काळात शीत युद्धात आपला शत्रू राहिलेल्या रशियाकडे पैसे मोजून आपल्या वैज्ञानिक आणि संशोधकांना 'आय.एस.एस.'वर ने आण करण्यासाठी रॉकेट भाड्यावर घेण्याची नामुष्की नासा वर ओढवली. नासा सद्य स्थितीला एका माणसाला रशियाच्या सोयूझ रॉकेटमधून अवकाशात पाठवण्यासाठी जवळपास ७६,०००,००० अमेरिकन डॉलर मोजत आहे. ह्यासाठीच नासा ने स्पेस शटल नंतर माणसांना अवकाशात ने- आण करणाऱ्या वाहनांच्या निर्मितीसाठी २०१४ साली 'बोईंग' ₹ला ४.२ बिलियन अमेरिकन डॉलर तर 'स्पेस एक्स' ला २.६ बिलियन अमेरिकन डॉलरचं काम दिलं. एकदा मानवी उड्डाणासाठी सज्ज झाल्यावर तूर्तास नासा ने ६ उड्डाणाचं काम 'स्पेस एक्स' ला दिलं आहे. (विनीत वर्तक ©)
२०१४ ला स्पेस एक्सला काम मिळाल्यावर स्पेस एक्सने ड्रॅगनच्या निर्मितीवर काम सुरु केलं. ड्रॅगन मध्ये दोन भाग करण्यात आले, 'एक जे समान वाहून नेईल आणि एक जे माणसांना घेऊन जाईल.'
एकदा उड्डाण भरून आय.एस.एस. ( इंटरनेशनल स्पेस स्टेशन ) ला डॉकींग झाल्यावर ते सोयूझप्रमाणे जास्तीत जास्त २१० दिवस राहून मग पृथ्वीवर पुन्हा परतणार आहे. पृथ्वीवर परत आल्यावर पुन्हा ते पुढच्या उड्डाणासाठी वापरता येणार आहे. 'स्पेस एक्स ड्रॅगन' हे ४ मीटर व्यासाचं असून ह्याची उंची ८.१ मीटर इतकी आहे. एका वेळेस ७ माणसांना अवकाशात नेण्याची ह्याची क्षमता आहे. उड्डाण भरताना हे आपल्या सोबत ६ टन वजन नेऊ शकतं.तर परत येताना ३ टन वजन सोबत घेऊन पृथ्वीवर उतरू शकतं. ह्यात 'कॅप्सूल' आणि 'ट्रंक' असे दोन भाग असून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याआधी ट्रंक मेन कॅप्सूल पासून विलग होतो.
ड्रॅगन मध्ये आर.पी.१ इंधन म्हणून वापरण्यात येते. लिक्विड हायड्रोजन हे इंधन हे जास्त वजनाला अवकाशात घेऊन जाण्यासाठी वापरण्यात येते. पण लिक्विड हायड्रोजनचं इंधन खर्च खूप जास्त आहे. त्या तुलनेत आर.पी.१ स्वस्त आहे. ह्यात फ्रोझन ऑक्सिजन साठवला जातो. त्यामुळे इंधन टाक्यांना जागा कमी लागते तसेच सॉलीड इंधनाचा वापर न करता सगळीकडे क्रायोजेनिक इंजिनाचा वापर केलेला आहे. ह्याच्या पुढच्या व्हर्जन मध्ये लिक्विड मिथेन चा इंधन म्हणून वापर करण्यात येणार हे ज्यामुळे ह्याची कार्यक्षमता अजून वाढणार आहे. ह्यावर ८ सुपर ड्रको इंजिन असून प्रत्येक इंजिन ७१ किलोन्यूटनचं बल निर्माण करण्यात सक्षम आहे. (विनीत वर्तक ©)
आज 'स्पेस एक्स 'च्या ड्रॅगन ने अवकशात भरारी घेतली आहे. हे उड्डाण मानवरहित चाचणीचा एक भाग आहे. 'फाल्कन ९' ह्या स्पेस एक्स च्या रॉकेट ने ड्रॅगन ला ठरवलेल्या कक्षेत प्रक्षेपित केलं आहे. फाल्कन ९ ने उड्डाण भरल्यावर त्याच्या पहिल्या स्टेजचं इंजिन अवघ्या १० मिनिटांनी ड्रॅगनला प्रक्षेपित करत आपल्या ठरलेल्या ठिकाणी पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित आलं. ड्रॅगन आता अवकाशात आय.एस.एस.ला जोडलं जाईल. काही दिवस तिकडे काढल्यावर ते पुन्हा एकदा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत अटलांटिक महासागरात कोसळेल. ह्या सर्व प्रवासात अनेक चाचण्या घेण्यात येतील ज्या सुरक्षित मानवी प्रवासासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. 'स्पेस एक्स ड्रॅगन' जर ह्या सगळ्या चाचण्यात पास झालं तर स्पेस शटलनंतर पुन्हा एकदा माणसाच्या अवकाश सफारी ला सुरुवात होईल!! (विनीत वर्तक ©)
आजवर 'स्पेस एक्स' रॉकेट आणि मानव विरहित उपग्रहांचं प्रक्षेपण करत होती.परंतु मंगळवार लोकवस्ती करण्याचं स्वप्न बघितलेल्या 'एलॉन मस्क' ची स्पेस एक्स आपल्या त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने एक खूप मोठ पाऊल पुढे टाकेल. स्पेस एक्स ड्रॅगन च्या यशस्वी भरारीसाठी सर्व अभियंते, वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांना माझ्या शुभेच्छा!!!
No comments:
Post a Comment