Saturday 23 March 2019

#आकाशाकडे_बघताना भाग १ (ओरायन तारका समूह) ... विनीत वर्तक

#आकाशाकडे_बघताना भाग १ (ओरायन तारका समूह) ... विनीत वर्तक

रात्रीच्या अंधारात आकाशाकडे बघितलं की अनेक तारे लुकलुकताना आपल्याला दिसतात. शहराच्या रोषणाई मध्ये तसं आकाश आपल्याशी कमीच बोलते पण कधी गावाला अथवा कधी वीज गेल्यावर पूर्ण अंधारात ताऱ्यांचा जो सडा आपल्या समोर उभा राहतो तो आपल्याला आपण ह्या विश्वाचा किती छोटा भाग आहोत ह्याची जाणीव करून देणारा असतो. ह्या सगळ्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांन मध्ये ही अनेक गोष्टी लपलेल्या असतात. ज्याची जाणीव एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला कमीच असते, कारण आकाशाकडे बघायचं तर दुर्बीण हवी किंवा टेलिस्कोप हवा अशी एक समजूत. त्या शिवाय आकाशात अनेक तारे जोडून तयार होणारे नेमके आकार कोणते आणि त्याचं महत्व ह्या पासून आपण सामान्य माणूस कोसो दूर असतो. पण जर थोडा अभ्यास केला तर हे अनेक आकार आपल्या पुढे जे सौंदर्य उभं करतात ते जर आपण समजायला लागलो तर ह्या आकाशाची मज्जाच काही वेगळी आहे.

हजारो वर्षापासून प्रत्येक संस्कृतीत मानवाला आकाशाच कुतूहल राहिलं आहे. कारण तिकडून येणारा हा प्रकाश ह्या विश्वाच्या अनंत रूपाच एक रूप घेऊन आपल्याशी बोलत असतो. हा प्रकाश कधी कधी आपल्याला कित्येक वर्ष मग ती हजारो ते लाखो वर्ष मागे नेतो. कारण तो आपल्या पर्यंत पोहचायला तितका काळ लागलेला असतो. आज आपण आपल्या स्थानावरून अश्या कित्येक हजारो वर्षाच्या इतिहासाला आपल्या डोळ्यात बंदिस्त करू शकतो. ह्याला फक्त नजर हवी आणि बघण्याचा दृष्ट्रीकोन. आकाशात दिसणाऱ्या ह्या वेगवेगळ्या ताऱ्यांना जगातील अनेक संस्कृतीने अनेक आकारात बंदिस्त केलं आहे. ढगांचे आकार बघताना जसं आपण एखाद्या गोष्टीशी त्याला समरस करतो तेच अनेकांनी ताऱ्यांच्या बाबतीत केलं आहे. म्हणून जगात आज अनेक तारकासमूह हे वेगवेगळ्या नावाने प्रत्येक संस्कृतीत ओळखले जातात.

असाच एक तारकासमूह जो आपल्याला नुसत्या डोळ्यांनी आकाशात स्पष्ट तर दिसतोच पण त्याचा आकार आणि त्यातले तारे आपलं लक्ष नेहमीच वेधून घेतात तो म्हणजे ओरायन तारकासमूह. जानेवारी ते मार्च ह्या महिन्यांमध्ये ओरायन तारकासमूह आपल्याला आकाशात स्पष्टपणे दिसतो. हा तारकासमूह ओळखायला ही खूप सोप्पा आहे. संध्याकाळच्या आकाशात साधारण डोक्याच्या आणि क्षितिजाच्या मध्ये बघितलं तर आकाशात तीन तारे एका सरळ रेषेत दिसतील त्यांची नाव आहेत. अलनिटक, अलनिलम आणि मिनटाका. ह्या तीन ताऱ्यांच्या भोवती चार तारे आपल्याला चौरस बनवताना दिसतील. त्यातले दोन तर खूपच तेजस्वी आहेत. जे ओळखणं खूप सोप्प आहे. ह्यातला वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात एक तारा तांबूस रंगाचा दिसेल त्याच नाव आहे बिटलज्यूस आणि खालच्या बाजूच्या उजव्या कोपऱ्यात एक निळ्या रंगाचा तेजस्वी तारा दिसेल त्याच नाव आहे रायजेल. ह्या ताऱ्यांच्या तुलनेने उरलेले दोन अंधुक पण कोपऱ्यात असणाऱ्या ताऱ्यांची नाव आहेत बेलाट्रिक्स आणि साइफ.

अश्या सात ताऱ्यांनी मिळून तयार होणारा तारकासमूह रात्रीच्या आकाशात एकदम स्पष्ट आपल्याला दिसतो. ह्यातील प्रत्येक तारा खरे तर वेगवेगळ्या अंतरावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी आहे. पण पृथ्वीवरून बघताना मात्र ते एकाच पटलावर आहेत असा भास होतो.

बेटलज्यूस साधारण ६४३ प्रकाशवर्ष लांब आहे. ( १ प्रकाशवर्ष म्हणजे एका वर्षात प्रकाशाने कापलेले अंतर)

रायजेल साधारण ८६० प्रकाशवर्ष लांब आहे.

बेलाट्रिक्स साधारण २५० प्रकाशवर्ष लांब आहे.

मिनटाका साधारण १२०० प्रकाशवर्ष लांब आहे.

अलनिलम साधारण २००० प्रकाशवर्ष लांब आहे.

अलनिटक साधारण १२६० प्रकाशवर्ष लांब आहे.

साइफ साधारण ६५० प्रकाशवर्ष लांब आहे.

पृथ्वीपासून ह्यांची अंतर बघितली तर हे तारे विश्वाच्या पोकळीत किती लांबवर पसरलेले आहेत ह्याचा थोडा अंदाज आपल्याला येईल. ह्या ताऱ्याकडून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोहचायला प्रत्येक ताऱ्याच्या प्रकाशाचा कालावधी कित्येक वर्षांनी वेगळा आहे. पण पृथ्वीवरून बघताना हे सगळेच एकाच ठिकाणाहून प्रकाशमान आहेत असं आपल्याला वाटत रहाते.

ह्यातील प्रत्येक तारा आपल्या सोबत कित्येक वर्षाचा इतिहास घेऊन पृथ्वीवर पोहचत आहे. ह्या सातही ताऱ्यांची माहिती पुढे देणार आहे पण ओरायन तारकासमूह हा फक्त ह्या सात ताऱ्यान पुरती मर्यादित नाही तर इकडे तारे निर्मितीची एक भट्टी आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. जी पूर्ण आकाशात उघड्या डोळ्यांनी दिसणारी एकमेव भट्टी आहे. ह्या भट्टीच नाव आहे ओरायन नेब्युला. ह्या नेब्युला आणि ताऱ्यान विषयी वाचू पुढल्या भागात.

क्रमशः

माहिती स्त्रोत :- गुगल, विकिपिडिया

फोटो स्त्रोत :- गुगल


No comments:

Post a Comment