बुद्ध अंतराळात हसला... विनीत वर्तक ©
२७ मार्च २०१९ रोजी दुपारी भारताच्या पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषणात बुद्ध अंतराळात हसल्याची घोषणा करून भारताच्या संरक्षण सामर्थ्याची गुढी उभारली. सामान्य माणसाच्या दृष्ट्रीने अंतराळात एखादा उपग्रह नष्ट करण्याची घटना तितकी महत्वाची नसली तरी आंतराष्ट्रीय पटलावर ही घटना एखाद्या देशाने अण्वस्त्रे बनवण्याचं तंत्रज्ञान विकसित करून त्यांची चाचणी घेण्याइतकं महत्वाची आहे. म्हणूनच ही घटना भारताच्या दृष्ट्रीने इतकी महत्वाची होती की खुद्द पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषणात पूर्ण जगाला ह्याची कल्पना दिली. मुळातच एखादा उपग्रह नष्ट करण्याची गरज ते असं एखाद क्षेपणास्त्र निर्माण करण्यामागच्या अडचणी समजून घेतल्या तर भारताने टाकलेलं पाउल किती मोठं आहे ह्याचा अंदाज आपल्याला येईल.
आज प्रत्येक क्षेत्रात उपग्रहाचा वापर केला जातो. कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी उपग्रहांच महत्व खूप मोठं आहे. त्यामुळेच आज काल प्रत्येक देशाला आपला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत असावा असं वाटू लागलं आहे. विश्वातीत अनेक छोटे देश ह्या साठी प्रयत्न करत असले तरी स्वबळावर उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता फक्त मोजक्याच देशांकडे आहे. भारत अशी क्षमता असणारा जगातील एक देश आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जसा उपग्रहांचा वापर त्या देशांच्या नागरिक तसेच इतर दळणवळणांच्या साधनांसाठी होतो तसा तो हेरगेरी साठी ही होतो. आपल्या देशात बसून आपण दुसऱ्या देशाच्या भूमीवर काय चालू आहे हे आरामात बघू शकतो. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज काल लांब वाटणार जग अवकाशातून बघणं आता काही मीटर पर्यंत येऊन पोहचलं आहे.
आपण आपल्या देशात बसून दुसऱ्या देशात अगदी काही मीटर पर्यंतच्या अचूकतेने काय चालू आहे हे बिनदिक्कत बघू शकतो. हे करताना त्या देशाला किंवा त्या लोकांना ह्याची काहीच कल्पना नसते. हे म्हणजे अगदी लपवलेल्या कॅमेराने एम.एम.एस. बनवण्यासारखं आहे. ज्याचा बनतो त्याला काही कळत नाही. जो बनवतो तो ह्याचा वापर त्याला हवा तसा करू शकतो. दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे हे बघण्यासाठी अमेरिका, रशिया ह्या राष्ट्रांनी हेरगिरी उपग्रह अवकशात सोडून पृथ्वीच्या बाहेर अंतराळातून देशांच्या सार्वभौमत्वावर एक प्रकारे अंकुश ठेवण्यास सुरवात केली. नंतर चीन सोबत अगदी भारताने असे उपग्रह बनवण्याचं तंत्रज्ञान स्व बळावर निर्माण केल्यावर असे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापन केले. जमिनीवरून, पाण्यातून आणि हवेतून आपल्या घरात परिंदा पर नाही मार सकता पण अवकाशाच काय? हा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा त्याच उत्तर होतं एन्टी सॅटेलाईट वेपन किंवा ( A SAT ).
एन्टी सॅटेलाईट वेपन किंवा ( A SAT ) म्हणजे काय तर अंतराळातून आपल्या देशांच्या सिमांमध्ये अश्या हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाना नेस्तनाबूत करणारं क्षेपणास्त्र. कोणी म्हणेल की जगात इतकी क्षेपणास्त्र असताना आणि इतक्या लांब पल्याची क्षेपणास्त्र असताना ह्या ए सॅट ची निर्मिती इतकी कठीण का? तर ह्याच उत्तर आहे ते त्याला गाठायच्या लक्ष्यामध्ये. सामान्यतः क्षेपणास्त्राला नष्ट करायची लक्ष ही स्थिर असतात किंवा त्यांचा वेग हा हवेतून जास्ती नसतो. त्यामुळे त्यांचा वेध घेणं सोप्प असते. पण हेरगिरी करणारे उपग्रह अंतराळात लिओ ( लो अर्थ ऑर्बिट) ( ६०० ते १६०० किमी जमिनीपासून उंचीवर ) परिक्रमा करत असतात. ह्या कक्षेत त्यांचा वेग असतो जवळपास २८,००० किलोमीटर / तास किंवा ७.८ किमी / सेकंद. आता विचार केला की पृथ्वीपासून ८०० किमी उंचीवर भारतावर देखरेख करणारा एक उपग्रह जात आहे. त्याला नष्ट करायचं असेल तर भारताच्या क्षेपणास्त्राला १३५० किलोमीटर च अंतर अवघ्या ३ मिनिटाच्या आत कापावं लागेल. इतकच नाही तर इतक्या वेगात त्या उपग्रहाची कक्षा आणि क्षेपणास्त्राला गाठायची कक्षा ह्याच गणित काही सेंटीमिटर मध्ये जुळून यायला हवं नाहीतर हा वार चुकीचा जाणार.
आता लक्षात आलं असेल की एकतर इतक्या वेगात जाणार क्षेपणास्त्र निर्माण करणं त्या नंतर शत्रूच्या हेरगिरी उपग्रहाच्या कक्षेच गणित अचूकतेने अवकाशातून करायला खूप उच्च प्रतीच विज्ञान, तंत्रज्ञान आणि क्षमता लागते. अश्या हेरगिरी उपग्रहांची कक्षा, त्याचं स्थान, त्यांचा वेग हे सगळं आकाशातून मोजणारी तुमच्या देशाची यंत्रणा हवी. ह्या शिवाय जमिनीवरून प्रक्षेपित केल्यावर लक्ष्य गाठायला लागणारा वेग मिळवणार क्षेपणास्त्र हवं. तसेच ह्या दोन्ही गोष्टींचा अचूक ताळमेळ हा काही सेंटीमीटर मध्ये जमायला लागणार तंत्रज्ञान ही हवं. म्हणून एन्टी सॅटेलाईट वेपन किंवा ( A SAT ) क्षेपणास्त्र आजवर फक्त तिन देशांना निर्माण करता आलेलं आहे. अमेरिका, रशिया, चीन नंतर असं तंत्रज्ञान असणारा भारत आज जगातील चौथा देश ठरला आहे.
देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्ट्रीने एन्टी सॅटेलाईट वेपन किंवा ( A SAT ) हे भारताच्या अवकाश संशोधनातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. आज पुन्हा एकदा भारतीय संशोधक, वैज्ञानिक, अभियंते ह्यांच्या प्रयत्नांमुळे बुद्ध अंतराळात हसला. सर्व जगाच्या नाकावर टिच्चून कोणाला पुसटशी कल्पना न देता भारताने स्व बळावर एन्टी सॅटेलाईट वेपन किंवा ( A SAT ) हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. ‘मिशन शक्ती’ यशस्वी करणाऱ्या सर्वच वैज्ञानिक, अभियंते, संशोधक तसेच डी.आर.डी.ओ. आणि इस्रो च्या सर्व कर्मचाऱ्यांना माझा सलाम. भारताचा नागरिक म्हणून मला तुमचा अभिमान आहे.
Very nice information tnx
ReplyDeleteVery proud of this. Congrats to all those who made this mission successful.
ReplyDeleteExcellent information
ReplyDelete