Friday 29 March 2019

भारताला सुरक्षित करणारा एमीसॅट... विनीत वर्तक ©

भारताला सुरक्षित करणारा एमीसॅट... विनीत वर्तक ©

काही दिवसांपूर्वी भारताने ३०० की.मी. वरील एका उपग्रहाला क्षेपणास्त्राने मारत मोजक्या देशांकडे असलेल्या तंत्रज्ञानाला गवसणी घातली. ह्या चाचणीचा मुख्य उद्देश हा जर कोणत्या देशाने भारताच्या हेरगिरी करणाऱ्या अथवा इतर उपग्रहाना लक्ष्य केलं तर भारत सुद्धा त्या देशांच्या उपग्रहाचा जमिनीवरून लक्ष्यभेद करू शकतो हा होता. मुळातच ही चाचणी इतक्या तातडीने घ्यायचं कारण आहे की भारत आपल्या सिमेंवर असलेल्या शत्रूंवर आता अवकाशातून लक्ष ठेवण्यासाठी सज्ज होतो आहे. त्यामुळेच अश्या हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांची मालिका येत्या काही काळात भारत म्हणजेच इस्रो आणि डी.आर.डी.ओ. अवकाशात प्रक्षेपित करत आहे. ह्या उपग्रहांची क्षमता इतकी प्रचंड आहे की ह्यामुळे शत्रूला कळायच्या आत त्याच्या चारी मुंड्या चित होणार आहेत. ह्याच मालिकेतला एक महत्वाचा उपग्रह एमीसॅट १ एप्रिल २०१९ ला पी.एस.एल.व्ही. सी ४५ मिशन मधून अवकाशात सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी झेपावत आहे.

भारताच्या दोन्ही बाजूच्या सिमेंवर सतत शत्रूच्या कारवाया सुरु असतात. ह्यामुळे अनकेदा दोन्ही बाजूने घुसखोरी होत असते. ह्या सगळ्यांवर नजर ठेवण्यासाठी आजवर ड्रोन, हेलियम चे फुगे तसेच इतर गोष्टींचा वापर केला जात होता. ह्या सगळ्या गोष्टींच्या वापरावर काही मर्यादा आहेत. पण उपग्रहाच्या वापरावर मर्यादा येत नाहीत म्हणूनच भारत तंत्रज्ञानाचा वापर करून शत्रूंवर वचक ठेवण्यासाठी सज्ज होतो आहे. आजवर भारताचे ६-८ हेरगिरी उपग्रह अवकाशात शत्रूवर नजर ठेवून असून त्यांची संख्या येत्या काळात कमालीची वाढणार आहे. हेरगिरी किंवा संरक्षणासाठी अत्यंत उपयोगी असलेल्या उपग्रहांच जाळ भारत अवकाशात निर्माण करत असून एमीसॅट हा त्या साखळीचा एक भाग आहे. ही साखळी भारताच्या शत्रूवर नजर ठेवताना भारताच्या सीमांच्या रक्षणासाठी लागणारी माहिती भारताच्या सेनेला सतत पुरवणार आहे. ह्या माहितीच्या आधारे शत्रूच्या चालींचा मागोवा तसेच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोप्प होणार असून देशविरोधी कोणत्याही हल्ला, युद्ध अथवा कारवाई होण्या आधीच मिळालेल्या माहिती वरून शत्रूला निष्प्रभ करता येणार आहे.

एमीसॅट मध्ये नक्की असं काय आहे? की ज्याच्या प्रक्षेपणामुळे भारतीय सेनेला अवकाशातून गरुडाची नजर प्राप्त होणार आहे? एमीसॅट हा एक सिग्नल इंटीलिजंस असणारा उपग्रह आहे. हा उपग्रह पृथ्वीवरून प्रसारित झालेले सिग्नल जे की कोणत्याही दळणवळणाच्या साधनाने जसे मोबाईल फोन, रडार तसेच कोणत्याही इलेक्ट्रोनिक सिस्टीम ने केलेले असो त्यांना पकडण्यात सक्षम आहे. बर्फ, जंगलं, डोंगर, नद्या किंवा कोणत्याही प्रकारच्या भूभागावरून तसेच हवेतून प्रसारित झालेले सगळे सिग्नल पकडण्यात सक्षम आहे.

इस्रो आणि भारताने आधीच अवकाशात काट्रोसॅट सिरीज मधील उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केलेले आहेत. ह्या उपग्रहांवर हाय रिझोल्यूशन प्यान कॅमेरे आहेत. तसेच जीसॅट २९ ह्या उपग्रहावर असलेल्या कॅमेरा अगदी ०.५ मीटर ( ५० सेंटीमीटर मधील दोन वस्तुत फरक कळेल ) इतका प्रचंड सक्षम आहे. ह्या शिवाय हा कॅमेरा अवकाशातून वस्तूंचा, लोकांचा अथवा एखाद्या समुदायाचा व्हिडीओ रेकोर्डिंग करण्यात ही सक्षम आहे. अश्या उपग्रहांच्या जोडीला आता एमीसॅट ची भर घालत आहे. शत्रूच्या हालचालींवर लक्ष तसेच इकडे असणाऱ्या रडार, फोन अश्या कोणत्याही वस्तूंची इत्यंभूत माहिती आपल्याला मिळणं शक्य होणार आहे. ह्याच्या पुढे जाऊन नक्की त्यातून काय संवाद होतो आहे हे समोरच्याला न कळता जाणून घेण्याच्या क्षमतेवर भारत काम करत आहे. जी की एक खूप कठीण प्रक्रिया आहे पण येत्या काळात भारत ती सिद्धी मिळवेल अशी अपेक्षा आहे. एमीसॅट ची निर्मिती डी.आर.डी.ओ, ने ८ वर्षांच्या अथक परिश्रमा नंतर केली आहे.

एमीसॅट हा ४३६ किलोग्राम वजनाचा उपग्रह ७४९ किलोमीटर उंचीवर पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केला जाणार असून त्याच्या सोबत इतर २८ इतर देशांचे उपग्रह ज्यात अमेरिका, स्विझर्लंड, स्पेन च्या उपग्रहांचा समावेश असून त्यांना ५०४ किलोमीटर च्या कक्षेत प्रक्षेपित केले जातील. ह्या नंतर पी.एस.एल.व्ही ची कक्षा ४८५ किलोमीटर वरून आणून त्याच इंजिन एका प्लाटफॉर्म प्रमाणे काम करणार असून त्यावर तीन प्रणाली काम करणार आहेत. ज्यात,
Automatic Identification System (AIS) from ISRO, Automatic Packet Repeating System (APRS) from AMSAT (Radio Amateur Satellite Corporation), Advanced Retarding Potential Analyser for Ionospheric Studies (ARIS) from Indian Institute of Space Science and Technology (IIST)

ह्यांचा समावेश आहे. इस्रो च्या इतिहासात पहिल्यांदा इस्रो च वर्कहॉर्स पी.एस.एल.व्ही. रॉकेट तीन वेगवेगळ्या कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हे सगळं १८० मिनिटात पूर्ण केलं जाणार आहे.

येत्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आपल्या नवीन उपग्रह प्रक्षेपण यान एस.एस.एल.व्ही. द्वारे अजून दोन सैनिकी उपग्रह इस्रो – डी.आर.डी.ओ. अवकाशात प्रक्षेपित करत आहेत. शत्रू राष्ट्रांना भारताच्या अवकाशातील प्रगतीमुळे कापरं भरलं आहे. पाकिस्तान सारखा देश तर ह्यामुळे हतबल झाला आहे. कारण ज्या तंत्रज्ञानामुळे भारताने ही मजल गाठली आहे. ते तंत्रज्ञान पुढल्या ५० वर्षात पण ते बनवू शकत नाहीत ह्याची त्यांना जाणीव आहे. चीन जो की ह्या क्षेत्रात आपल्यापेक्षा पुढे आहे त्याच्यावर ही एक प्रकारे भारताने अंकुश ठेवायला सुरवात केली आहे.
एमीसॅट सारखे उपग्रह कोणत्याही युद्धाच्या वेळी किती प्रचंड महत्वाची भूमिका बजावू शकतात ह्याची जाणीव चीन सोबत इतर सगळ्या प्रगत राष्ट्रांना आहे. म्हणूनच भारताच्या संरक्षणाच्या दृष्ट्रीने अतिशय महत्वाच्या असलेल्या उपग्रहाना नष्ट करण्याची जोखीम जर एखाद्या राष्ट्राने उचलली तर त्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी अंतराळात बुद्ध हसण्याची गरज होती. एमीसॅट सारखे उपग्रह आणि त्यांचे रक्षण करणारं एन्टी सॅटेलाईट वेपन किंवा ( A SAT ) सारख क्षेपणास्त्र भारताला येत्या काळात शत्रूच्या पुढे एक पाउल ठेवण्यात मोलाची भूमिका बजावतील ह्याची माझ्या मनात शंका नाही. इस्रो आणि डी.आर.डी.ओ. च्या वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, अभियंते ह्यांना एमीसॅट च्या उड्डाणासाठी खूप खूप शुभेछ्या.

माहिती स्रोत :- गुगल, इस्रो

फोटो स्रोत :- गुगल


No comments:

Post a Comment