Monday 25 November 2019

देशांपलीकडली नाती... विनीत वर्तक ©

देशांपलीकडली नाती... विनीत वर्तक ©

देश विदेशात अनेकदा कामाच्या निमित्ताने फिरत असताना अनेक अनुभव येतात. जगाच्या प्रवासात आपलं अस्तित्व अनेकदा खूज वाटतं राहते. आपली ओळख सुरु करताना आपली सुरवात ही नावावरून होते. आपल्या शहरात/ गावात असताना नाव आणि आडनावावरून आपण आपली ओळख जमावतो. हे अमुक आडनाव म्हणजे तु ह्या जातीचा किंवा तुझं गांव इथलं असेल असा आराखडा आपल्यापैकी अनेक लगेच मनात बांधतात. हाच प्रवासाचा पल्ला आपल्या शहरातुन, गावातुन निघुन जेव्हा राज्यावर येतो तेव्हा हीच ओळख जिल्ह्यावर येऊन थांबते. आपल्या बोलणाच्या शैलीवरून तु कोकणातला, घाटावरचा की विदर्भातला असे आखाडे मनात बांधले जातात. हा प्रवास जेव्हा देशावर जातो तेव्हा ही ओळख राज्यावर येऊन थांबते. महाराष्ट्रातला माणुस मग आपल्याला आपला वाटायला लागतो. जेव्हा विदेशात आपण फिरतो तेव्हा हीच ओळख देशावर येऊन थांबते. एक भारतीय भेटला तरी तो आपला वाटतो. कधी कधी तर अवस्था अशी असते की अगदी आशियाई माणूस असेल तरी तो आपल्याला आपल्याच माजघरातला वाटतो.

सध्या कामाच्या निमित्ताने मलेशियात प्रवास सुरु आहे. एका ट्रेनिंग च्या निमित्ताने मलेशियातल्या शहरांपलीकडे माझा प्रवास सुरु होता. आपल्या इकडे जेवढा फरक शहरात आणि गावात दिसुन येतो तेवढाच फरक मलेशियात ही आढळतो. माझं ट्रेनिंग दुपारी असल्याने साधारण दुपारी १ च्या वेळेस मी तिकडे पोहचलो. सकाळपासुन मेडिकल आणि प्रवास झाल्याने थोडा थकलेला होतो. भुक तर लागलेली होती आणि ट्रेनिंग च्या ठिकाणी जेवणाची सोय ही होती. पण ते जेवण बघुन त्याच्या वासाने अन्न पोटात घेण्याची इच्छा झाली नाही. फक्त भात मी घेतला खरा पण त्यावर डाळ अथवा कोणतीही कढी नव्हती. दुसऱ्या सर्व गोष्टी मटण, बीफ अश्या असल्याने ते खायची सोय नव्हती. माझी ही अडचण जेवणाचं बघणाऱ्या 'इबरार' च्या लक्षात आली. त्याच्या चाणाक्ष नजरांनी माझी घालमेल ओळखली. लगेच तो हिंदीत म्हणाला, "साहब अपने घर का खाना यहा कहा, आप थोडा चिकन खालो" पण मला ते खायची इच्छा नव्हती. प्लेट परत ठेवून मी नंतर खाईन असं त्याला सांगितलं.

मी जेवत नाही हे बघून इबरार लगेच माझ्याकडे आला आणि म्हणाला. "साहब क्या हुवा? आपको दाल चाहिये क्या?' त्याच्या ह्या प्रश्नाने मी लगेच म्हंटल आपको कैसे पता चला? तर त्यावर म्हणाला "सर जी आप ओर मैं एकी मिट्टी से तो आते हैं, हम लोगो के खाने का स्वाद इनको क्या समझेगा, आप रुको आप के लिये मैं दाल लेके आता हुं" मी नको म्हणण्याचा लटका प्रयत्न केला. प्रत्यक्षात पोटात कावळे ओरडत होते. थोडं वरण भात म्हणजे माझ्या पोटाला संजीवनी मिळाली असती. कारण पुढे परत विमानात प्रवास करायचा होता. इबरार पाच मिनिटात कुठून तरी दोन पिशव्या घेऊन आला. माझ्या पुढे एका वाडग्यात डाळ तर दुसऱ्या वाडग्यात कांदे-बटाट्याची भाजी त्याने आणुन ठेवली. मी त्याला लगेच विचारलं अरे इतक्या लगेच कुठून आणलस? तर तो म्हणाला, 'साहब यहा कुछ इंडियन खाना बनाते हैं, वहीं से लेके आया आपके लिये, अब आप बिना कुछ पूछे पेहले खा लो, बादमे बाते करते हैं. माझ्यासाठी इबरार देवापेक्षा कमी नव्हता. पुढल्या १० मिनिटात मस्त पैकी डाळ आणि भाताने मी पोटभर जेवलो.

जेवण झाल्यावर माझ्या आणि इबरार च्या गप्पा सुरु झाल्या. मी म्हंटल अरे कशाला खर्च केलास, ह्याचे पैसे माझ्याकडुन घे, तर तो म्हणे क्या साहब अब रुलाओगे क्या? आप तो हमारे भाई हैं, भाई से कोई पैसा नहीं लेता, मुझे पता होता तो आपके लिये पेहले से सब रेडी रखता, जब भी कोई अपने वतन से आता हैं तो मैं ये सब उनके लिये रेडी रखता हूं. अपने घर के खाने स्वाद इनके खाने मैं कहा. मी निशब्द झालो आणि त्याला मिठी मारली. त्याला म्हंटल आजचं जेवण मला आयुष्यभर लक्षात राहील. हे उधार राहिलं माझ्याकडे. आपण परत भेटू नक्की.

हा इबरार कोणी भारतीय नव्हता तर तो होता पाकिस्तान मधला. इबरार चं मूळ गाव इस्लामाबाद च्या जवळ आहे. पोटापाण्यासाठी इबरार मलेशियात काम करतो. माझ्या चेहऱ्यावरून त्याने मी भारतीय आहे हे ओळखलं आणि त्याच्या संवादाची सुरवात हिंदी मधुन केली. मी भारतीय आणि तो पाकिस्तानी, मी हिंदू तर तो मुस्लिम पण जातीच्या, धर्माच्या आणि देशांच्या भिंती आज गळून पडल्या होत्या. "सर जी आप ओर मैं एकी मिट्टी से तो आते हैं!" हे त्याच वाक्य मला निशब्द करून गेलं. त्या वेळेस तो मला भावासारखा वाटला अगदी स्वतःच्या लहान भावासाठी एक छोटा वाटा आपल्या तटातून काढून त्याने मला दिला होता. इबरार सारख्या व्यक्ती पुन्हा एकदा माणुसकी वरचा विश्वास वाढवतात. काय भारत, काय पाकिस्तान आपण एका मातीतुन आलो आणि आपल्या मसाल्यांची, जेवणाची चव ह्यांना काय कळणार? ह्यात त्याने मला जी आपुलकीची जाणीव एका वेगळ्या देशात करून दिली तो अनुभव माझ्यासाठी एक अविस्मरणीय असाच होता. घाईघाईत त्याचा फोटो नाही काढता आला पण मलेशियात असलो तर इबरार ला पुन्हा एकदा नक्की भेटीन आणि ह्या वेळेस माझ्या ताटातलं त्याच्यासाठी थोडं बाजूला काढून ठेवीन.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment