Sunday 3 November 2019

रणगाड्याना निष्प्रभ करणारे हवालदार अब्दुल हमीद... विनीत वर्तक ©

#हिरोज रणगाड्याना निष्प्रभ करणारे हवालदार अब्दुल हमीद... विनीत वर्तक ©

एक सैनिक हा एक सैनिक असतो. तो हिंदू, मुसलमान, शिख किंवा ख्रिश्चन नसतो. तो देशासाठी जगतो आणि देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देतो. खाली दिलेले शब्दनं शब्द खरे करणारे, जगणारे भारतीय सैनिक होते आणि आहेत म्हणुन आज भारत अखंड आहे.

तलवारों पे सर वार दिए
अंगारों में जिस्म जलाया है
तब जाके कहीं हमने सर पे
ये केसरी रंग सजाया है

ए मेरी ज़मीं अफसोस नहीं
जो तेरे लिए सौ दर्द सहे
महफूज रहे तेरी आन सदा
चाहे जान ये मेरी रहे न रहे

कित्येक सैनिकांनी ह्या मातृभूमीसाठी आपलं बलिदान दिलं. आज त्यांच ते बलिदान इतिहासाच्या पानात कुठेतरी कोपऱ्यात बंदिस्त झालेलं आहे. अश्याच एका इतिहासाच्या पानात विस्मृतीत गेलेल्या रणगाड्याशी दोन हात करणाऱ्या हवालदार अब्दुल हमीद ह्यांच्या पराक्रमाची ही गोष्ट. एक, दोन नाही तर सहा पाकिस्तानी रणगाड्याना त्यांनी फक्त आपल्या आर.सी.एल. नी नष्ट केलं. रणगाड्याच्या समोर उभं राहुन पाकिस्तानी रणगाड्याना भारतीय भुमीवरून माघार घ्यायला लावणाऱ्या कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद ह्यांच्या शौर्यामुळे १९६५ च्या युद्धाचं पारडं पुर्णपणे भारताच्या बाजूने झुकलं.

असल उत्तर इकडे भारतीय सेना आणि पाकिस्तानी सेना ह्याच्यात झालेली १९६५ ची लढाई दुसऱ्या महायुध्दा नंतर सगळ्यात मोठी रणगाड्यांची लढाई होती. दोन्ही बाजूने तब्बल ३ दिवस धुमश्चक्री सुरु होती. ह्या युद्धात पाकिस्तान ला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. जवळपास ९७ पाकिस्तानी रणगाडे ह्या युद्धात नष्ट झाले किंवा पकडले गेले. त्याचवेळी भारताला १० रणगाडे गमवावे लागले. ब्रिगेडिअर थॉमस थिओग्रज ह्यांनी रचलेल्या सापळ्यात पाकिस्तानी रणगाडे पूर्णपणे अडकले. घोड्याच्या नालेप्रमाणे भारतीय रणगाड्यांनी तिन्ही बाजूने पाकिस्तान च्या सेनेवर आक्रमण केलं. खिंडीत सापडलेल्या पाकिस्तानी सैन्याला खूप मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं. ह्या युद्धात पाकिस्तान चे पुर्व राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ ह्यांनी लेफ्टनंन म्हणुन सहभाग घेतला होता. ज्यांना पाकिस्तानात परत पळून जायला भारतीय सेनेच्या सैनिकांनी भाग पाडलं होतं.

असल उत्तर ची लढाई एकहाती जिंकुन देण्यात कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद ह्यांचा सिंहाचा वाटा होता. असल उत्तर इकडे पाकिस्तानी रणगाड्यांनी आंतरराष्ट्रीय सिमा ओलांडुन ७-८ सप्टेंबर १९६५ ला भारताच्या हद्दीत प्रवेश केला. त्यांना थोपवण्याच्या कामगिरीत कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद सगळ्यात पुढे होते. आपल्या आर.सी.एल. लॉन्चर ने त्यांनी पहिल्या पाकिस्तानी रणगाड्याला लक्ष्य केलं. त्याला निष्प्रभ केल्यावर त्यांनी दुसऱ्या रणगाड्याचा खात्मा केला. ह्या नंतर पाकिस्तानी सैन्याने आक्रमण मागे घेतलं. दुसऱ्या दिवशी भारतीय सैनिकांना थोपवण्यासाठी पाकिस्तान ने सॉर्बे विमानांनी भारताच्या ठाण्यावर हवाई हल्ला केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही. पाकिस्तानी रणगाड्याची दुसरी फळी भारतीय सैनिकांवर चाल करून आली. पुन्हा एकदा कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद त्यांच्या समोर उभे होते. आपल्या लॉन्चर ने त्यांनी अजुन ४ रणगाड्यांचा खात्मा केला. आपली जीप रणगाड्यांच्या टप्यात येते म्हणुन त्यांनी जीपवरून उतरून आपल्या हातातुन त्यांच्यावर लॉन्चर डागायला सुरवात केली. पाकिस्तानी च्या रणगाड्यांनी आपला पुर्ण मोर्चा कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद ह्यांच्याकडे वळवला. समोर आलेल्या रणगाड्याच्या तोफेसमोर न घाबरता त्यांनी एकमेकांवर हल्ला केला. ह्यात रणगाडा उध्वस्थ झाला तर कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद धारातिर्थी पडले. भारताने रणगाड्याना निष्प्रभ करणाऱ्या सिंहाला गमावलं होतं. कदाचित त्यांच्या मनात शेवटचे विचार हेच असतील,

ऐ मेरी ज़मीं महबूब मेरी
मेरी नस नस में तेरा इश्क बहे
पीका ना पड़े कभी रंग तेरा
जिस्म से निकल के खून कहे

ओ वतन वे मेरे वतन
वे तेरा मेरा प्यार निराला था
कुर्बान हुआ तेरी अस्मत पे
मैं कितना नसीबों वाला था

त्यांच्या परमोच्च बलिदानासाठी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद ह्यांना १० सप्टेंबर १९६५ ला भारताच्या सर्वोच्च सैनिकी पुरस्कार 'परमवीर चक्र' ने सन्मानित करण्यात आलं. असल उत्तर इथल्या ह्या पराक्रमाची साक्ष आजही तिकडे गेल्यावर आपल्याला बघायला मिळते. पाकिस्तानी सैन्याने सोडलेले ते नष्ट झालेले रणगाडे आजही भारतीय सेनेच्या आणि क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद ह्यांच्य पराक्रमाची साक्ष देतं आहेत.
आजही क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद जिकडे असतील तिकडुन म्हणत असतील,
तेरी मिट्टी में मिल जावां
गुल बनके मैं खिल जावां
इतनी सी है दिल की आरजू
तेरी नदियों में बह जावां
तेरे फसलों में लहरावां
इतनी सी है दिल की आरजू

भारताच्या ह्या बहादुर सैनिकाला माझा कडक सॅल्युट..

फोटो स्रोत :- गुगल

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

No comments:

Post a Comment