Friday 8 November 2019

अनंताच्या प्रवासाला (भाग १)... विनीत वर्तक ©

अनंताच्या प्रवासाला (भाग १)... विनीत वर्तक ©

रात्रीच्या अंधारात दिसणाऱ्या असंख्य ताऱ्यांना झाकुन टाकणारा एकमेव तारा म्हणजेच सुर्य. सूर्याच्या प्रकाशापुढे सगळेच तारे झाकले जातात. त्याचा अस्त जेव्हा मावळतीच्या क्षितिजावर होतो तेव्हा एका वेगळ्या विश्वाचा उदय आपल्या आकाशात होतो. मानवी डोळ्यांना दिसणारे असंख्य तारे, ग्रह, धुमकेतू, उल्का, तारकापुंज ह्यांनी भरलेलं आकाश प्रत्येक मानवाचं एक कुतूहल नेहमीच बनुन राहिलं आहे. विश्वाच्या करोडो वर्षाच्या भुतकाळात आज आपण पृथ्वीच्या कोणत्याही भुभागावरून डोकावून बघू शकतो. तंत्रज्ञान, विज्ञान ह्यांच्यात झालेल्या प्रगती नंतर विश्वाच्या ह्या पोकळीत आपल्या सारखं कोणी आहे का? ते आपल्या पृथ्वी चे भाऊबंध असणारे इतर ग्रह नक्की कसे आहेत? ह्याची उत्तर शोधण्याची ओढ माणसाला अश्या एका मोहिमेला जन्म देऊन गेली. त्या मोहिमेचं नावं होतं "व्हॉयजर मोहीम" आपल्यापासुन लांब कित्येक किलोमीटर लांब पण आपल्याच सौरमालेचे भाऊबंध असणाऱ्या ह्या भावांना जवळुन बघण्यासाठी आणि त्याही पलीकडे शक्य झालचं तर आपल्या घराच्या कुंपणाबाहेर काय जग आहे? ह्याची ओळख करून घेण्यासाठी अमेरिकेच्या 'नासा' ने ही मोहीम हाती घेतली होती.

२० ऑगस्ट १९७७ ला व्हॉयजर २ तर त्याच्या दोन आठवड्यानंतर ५ सप्टेंबर १९७७ ला नासाने विश्वाच्या पोकळीत माणसाच्या तंत्रज्ञानातील आविष्काराला, त्याच्या प्रगतीला एका अनंत प्रवासावर पाठवून दिलं. व्हॉयजर मोहीम आखताना नासा चा मुळ उद्देश सूर्याला खुप लांबुन परीक्रमा करणाऱ्या गुरु, शनी, नेपच्यून, युरेनस ग्रह आणि ह्या सर्वांचे ज्ञात आणि अज्ञात उपग्रहांचा अभ्यास करणं हा होता. त्या पलीकडे शक्य झालचं तर आपल्या सौरमालेच कुंपण किती लांब आणि त्या पलीकडे असणार असणारं अज्ञात विश्व ह्यांचा अभ्यास करणं हा होता. व्हॉयजर मोहिमेच्या उड्डाणाची तारीख आणि दोन्ही यानांचा प्रवासाचा रस्ता हा खुप अभ्यास करून आखला गेला होता. जवळपास १७६ वर्षांनी येणाऱ्या एका योगाला नासा ने आपलं लक्ष्य केलं होतं. यानाचा वेग आणि पृथ्वीच्या भोवती फिरताना ह्या ग्रहांचा मार्ग ह्याच गणित करून रस्ता असा बनवला गेला की ही दोन्ही यान आपल्या प्रवासात ग्रहांच्या जवळुन प्रवास करतील आणि त्या सोबत ह्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून दुसऱ्या पुढल्या ग्रहाकडे आपोआप ढकलले जातील. एकाचवेळी सगळ्या ग्रहांना असं लक्ष्य करणं शक्य झालं नसतं म्हणुन 'व्हॉयजर १' ने गुरु आणि शनी चा अभ्यास करून आपलं मार्गक्रमण पुढे केलं तर 'व्हॉयजर २' ने त्याचवेळी युरेनस आणि नेपच्युन चा अभ्यास केला.

इतक्या लांबच्या प्रवासात नासा ला काही धोका पत्करायचा नव्हता. नासा आपल्या मोहीम आखताना नेहमीच 'प्लॅन बी' चा विचार करत असते. त्यानुसार ह्या दोन्ही यानाच्या कक्षा ठरवण्यात आल्या होत्या. व्हॉयजर २ ने जरी आधी उड्डाण केलं तरी त्याचा अनंताचा प्रवास हा व्हॉयजर १ च्या पाठीमागे सुरु झाला. काही कारणाने जर का व्हॉयजर १ वरील वैज्ञानिक उपकरणं खराब झाली अथवा यानाकडून संदेश येणं बंद झालं तर गुरु आणि शनी ग्रहाचा अभ्यास शक्य नव्हता. अश्या वेळेस त्याच्या मागोमाग प्रवास करणाऱ्या व्हॉयजर २ चा रस्ता बदलवून युरेनस, नेपच्युन पेक्षा गुरु, शनी ग्रहाचा अभ्यास करता आला पाहिजे असा नासा ने प्लॅन बी आखला होता. पण तसं करण्याची गरज नासा ला भासली नाही. दोन्ही व्हॉयजर नी आपलं काम चोख पुर्ण करताना आपल्याला आपल्याच घराबद्दल असलेल्या माहितीत खुप मोलाची भर टाकली. (विनीत वर्तक ©)
व्हॉयजर १ आणि व्हॉयजर २ दोन्ही मोहिमांनी गुरु आणि शनी बद्दल अनेक रहस्यांचा उलगडा केला आणि अनेक नवीन शोध लावले. व्हॉयजर १ ने गुरु ग्रहाच पहिलं चित्र १९७८ मध्ये १२६ मिलियन किलोमीटर वरून पृथ्वीवर पाठवलं. १९७९ ला त्याने गुरु ग्रहाच्या भोवती असणाऱ्या एका रिंग चा उलगडा शास्त्रज्ञांना केला. त्याचसोबत गुरु चे उपग्रह थेबे आणि मेटिस चा शोध लावला. व्हॉयजर २ ने आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत गुरु ग्रहाची अनेक छायाचित्र घेताना त्याचा उपग्रह युरोपा ची अनेक छायाचित्र जवळुन बंदिस्त केली. त्या नंतर दोन्ही यानांनी आपला मोर्चा शनी ग्रहाकडे वळवला. व्हॉयजर १ ने शनी च्या दोन उपग्रह प्रोमॅथुरेस आणि पंडोरा ह्यांचा शोध लावला. ह्याशिवाय त्याने शनी च्या भोवती असणाऱ्या 'जी' कडीचा ही शोध लावला. ह्यानंतर व्हॉयजर २ ने ही शनीचा अभ्यास करताना अनेक सुंदर छयाचित्रात ह्या ग्रहाला आणि त्याच्या उपग्रहांना बंदिस्त केलं. (विनीत वर्तक ©)

व्हॉयजर १ ने त्याला नेमुन दिलेलं संशोधनाच काम संपवून आपल्या घराच्या कुपणांकडे म्हणजेच सौरमालेच्या टोकाकडे आपला प्रवास सुरु केला. तर तिकडे व्हॉयजर २ ने त्याच्या कामाची सुरवात केली. १९८६ साली युरेनस जवळुन जाताना व्हॉयजर २ ने युरेनस चं वातावरण ८५% हायड्रोजन तर १५% हेलियम ने बनलेलं असल्याचं सिद्ध केलं. ह्या शिवाय युरेनस च्या भोवती कडी असल्याच तसेच त्याच्या १० नवीन उपग्रहांन सोबत युरेनस च्या विचित्र असणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचा शोध लावला. हे चुंबकीय क्षेत्र युरेनस ग्रहाच्या मध्यरेषेपासुन ५५ डिग्री कोनात कललेलं आहे. ह्या नंतर व्हॉयजर २ ने नेपच्युन ग्रहावर आपलं संशोधन सुरु ठेवलं. १९८९ ला त्याने ह्या ग्रहाच्या जवळुन जाताना नेपच्युन ग्रहाचे ५ नवीन उपग्रह आणि त्याच्या भोवती असलेल्या ४ कड्यांचा शोध लावला. नेपच्युन ला भेट देऊन व्हॉयजर २ ने ही आपल्या घराच्या कुंपणाकडे म्हणजेच सौरमालेच्या टोकाकडे प्रवास सुरु केला.

क्रमशः

(भाग २ मध्ये अनंताच्या प्रवासाला निघालेल्या ह्या दोन्ही यानांची सद्यस्थिती, त्यांचा विश्वाच्या पोकळीत होणार प्रवास, तसेच जवळपास ४२ वर्षानंतर ह्या यानांना चालु ठेवणारी यंत्रणा तसेच त्यांचं भविष्य ह्याचा वेध घेणार आहे. )

फोटो स्रोत :- गुगल.

सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.


No comments:

Post a Comment