#सलाम आय.पी.एस.अधिकारी हर्ष पोद्दार... विनीत वर्तक ©
जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो…
साचले मोहाचे धुके घनदाट हो …
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती.....
महाराष्ट आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील तरुण वर्ग धर्माच्या, जातीच्या, राजकारणाच्या दुहीने पोखरून निघाला असताना नक्की कुठे जावे? काय करावे? ह्या गोंधळात हा वर्ग चुकीची वाट निवडत आहे. National Crime Records Bureau (NCRB) च्या मते कायद्याला आव्हान देणाऱ्या घटनांमध्ये विशेषतः तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात सर्वप्रथम आहे. ह्याचा सरळ अर्थ आहे की महाराष्ट्राची पुढली पिढी कुठेतरी चुकीच्या वाटेने पुढे जात आहे. ह्यावर कुठेतरी नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नकळत महाराष्ट्रासाठी 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' ज्याचा अर्थ ( To protect Good and to destroy Evil) असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांवर आहे. चुकीच्या मार्गाकडे वळणाऱ्या ह्या तरुण पिढीला योग्य मार्गाकडे नेण्यासाठी महाराष्ट्रातील एका पोलीस अधिकाऱ्याने एक वेगळा उपक्रम ह्या भरकटलेल्या आणि त्या वळणावर जाणाऱ्या तरुण पिढीसाठी सुरु केला. एकेकाळी प्रायोगिक तत्वावर सुरु केलेल्या ह्या उपक्रमाने तरुणांच्या मानसिकतेत केलेले बदल लगेच दिसुन आले. ह्या उपक्रमाची व्याप्ती पुर्ण महाराष्ट्रभर नेण्यात आली. आज महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील २,००,००० पेक्षा जास्त तरुणांच्या मानसिकतेत बदल झालेला आहे. ह्या उपक्रमामागे ज्यांची दूरदृष्टी होती ते म्हणजे आय.पी.एस. अधिकारी हर्ष पोद्दार. नागपुरच्या डेप्युटी कमिशनर ह्या पदानंतर सध्या बीड जिल्ह्याचे 'सुप्रिटेंडन्ट ऑफ पोलीस' म्हणुन नुकताच कार्यभार स्विकारलेल्या हर्ष पोद्दार ह्यांनी महाराष्ट्रातील तरुणांना योग्य दिशा दाखवण्याचं काम तर केलचं आहे पण त्याही पलीकडे पोलीस आणि सामान्य नागरिक ह्यांच्यात समन्वय साधण्याचं शिवधनुष्य लिलया पेललं आहे. (विनीत वर्तक ©)
आय.पी.एस. हर्ष पोद्दार ह्यांनी National University of Juridical Sciences (NUJS) कोलकत्ता इथुन आपलं पदवी शिक्षण पुर्ण केल्यावर आपलं पुढलं शिक्षण Balliol College of the University of Oxford.इकडे पुर्ण केलं. तिकडे त्यांना अतिशय प्रतिष्ठेच्या Chevening Scholarship (a scholarship awarded by the UK government to outstanding students with leadership potential) ने सन्मानित करण्यात आलं. आपलं शिक्षण झाल्यावर त्यांनी लंडन मध्ये आपली वकीली सुरु केली. पैसा, पद, प्रतिष्ठा असं सर्व मिळाल्यावर पण आपण जिथुन आलो त्या लोकांसाठी काहीतरी काम करण्याची इच्छा स्वस्थ बसुन देतं नव्हती. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर,
“I wanted to be a civil servant, I wanted to be a part of policy-making in India.”
२०१० साली लंडन मधली वकिली सोडून त्यांनी भारताचा रस्ता धरला. भारतात आल्यावर लोकसेवायोगाची परीक्षा पहिल्या प्रयत्नात त्यांनी पास केली. आय.आर.एस. होण्याची संधी असताना ही त्यांनी २०१३ मध्ये पुन्हा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली त्यात त्यांचा ३६१ नंबर देशातुन आला व सोबतच आय.पी.एस. बनण्याचं त्यांच स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात रुजू झाल्यावर धार्मिक द्वेषातुन गुन्ह्यांनकडे वळणाऱ्या तरुणाईला रोखण्यासाठी त्यांनी एका वेगळ्या कल्पनेला जन्म दिला. महाराष्ट्राच्या करवीर इकडे ए.सी.पी. असताना त्यांनी Aurangabad’s Nath Valley School (NVS) and Aurangabad Police Public School (APPS) इथल्या तरुणांना एकत्र करून आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी काय करता येईल ह्यासाठी टीम तयार केली. भ्रष्टाचार, नक्षल, टेररिस्ट ते सेक्सुअल ऑफेंस अश्या विविध गुन्ह्यांना रोखण्यासाठी त्यांनी काय योगदान दिलं आणि अजून चांगल्या पद्धतीने त्यावर वचक बसवण्यासाठी काय करता येईल ह्याबद्दल त्यांच्या कल्पना समोर मांडण्यात आल्या. गरीब आणि साधारण घरातुन येणाऱ्या ह्या मुलांच्या मनावर केलेल्या योग्य संस्कारामुळे ते रहात होते त्या भागातील गुन्ह्यांन मध्ये लक्षणीयरीत्या घट झाल्याचं नंतर झालेल्या अभ्यासात समोर आलं. जबाबदार झालेले हे तरुण गुन्हा रोखण्यासाठी घेतलेला पुढाकार हा हिंसक नसुन आपल्या कुटुंबातील, आजूबाजूच्या लोकांना योग्य दिशा दाखवणारा होता. (विनीत वर्तक ©)
आय.पी.एस. हर्ष पोद्दार ह्यांच्या कल्पनेने गुन्ह्या मुळापासुन रोखण्यास मदत होत होती. Youth Parliament Championship ही त्यांची पुर्ण संकल्पना महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात राबवण्यात आली. आज २,००,००० अधिक तरुण ह्यामुळे पोलिसांशी जोडले गेले आहेत. सहाजिक ह्याचा प्रभाव महाराष्ट्रातील गुन्ह्यांवर नियंत्रण तसेच तरुणांना योग्य रस्ता दाखवण्यासाठी होतो आहे. आय.पी.एस. हर्ष पोद्दार ह्यांचं कार्य इकडेच थांबत नाही तर त्यांनी महाराष्ट्रातील गावागावातील अनेक पोलीस स्टेशन च्या कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल केले. त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच आय.एस.ओ. मानांकन मिळवण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील अनेक पोलीस स्टेशनांना आज आय.एस.ओ. प्रमाणपत्र मिळालेलं आहे. ह्याशिवाय 'उडान' ह्या योजनेअंतर्गत कोणतेही पैसे ना घेता गावातील तरुणांना लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आय.पी.एस. बनण्यासाठी उद्युक्त केलं आहे. काही वर्षापुर्वी भिमा-कोरेगाव ह्या जातीय उद्रेगात त्यांच्यावर अतिसंवेदनशील अश्या मालेगाव ची जबाबदारी होती. हिंदू, मुस्लिम, दलित अश्या तिन्ही समाजाचं प्राबल्य असलेल्या भागात जातीय सलोख्या राखण्यात त्यांचं कुशल नेतृत्व कामी आलं होतं. तळागाळात असलेलं खबरींच जाळ, दंगल सांभाळण्यासाठी करायच्या उपाययोजनांचा सराव, ह्याशिवाय समाजात काय चालू आहे ह्यावर जातीने लक्ष ह्या सगळ्यांमुळे भिमा-कोरेगाव जातीय दंगलीच्यावेळी मालेगाव शांत होतं.
एक सुखवस्तु आयुष्य पायाशी लोळण घेतं असताना ते सर्व सोडून लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आय.पी.एस. परीक्षा पास होतं, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या उभारणीत आपल्या कल्पक नेतुर्त्वाने चुकीचं वळण घेतलेल्या तरुणाईला योग्य दिशा दाखवत, समाजात शांतता, सलोखा, सर्वधर्म सहभाव रुजवण्यास मदत करणाऱ्या आय.पी.एस. हर्ष पोद्दार ह्यांना माझा सलाम व त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
फोटो स्रोत :- गुगल.
No comments:
Post a Comment